You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एका चेंडूवर 16 धावा, अनोख्या विक्रमाची नोंद
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश स्पर्धेत एक अनोखा विक्रम पाहायला मिळाला. एका चेंडूतच 16 धावा चोपण्याची किमया स्टीव्हन स्मिथने केली.
सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात होबार्ट इथे झालेल्या सामन्यात हा दुर्मीळ विक्रम झाला.
होबार्टच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिले मेरडिथने टाकलेल्या पहिल्या षटकात सहाच धावा झाल्या. दुसरं षटक टाकण्यासाठी डावखुरा जोएल पॅरिस सरसावला.
ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाज स्टीव्हन स्मिथ स्ट्राईकवर होता. पहिला आणि दुसरा चेंडू निर्धाव पडला. पॉवरप्लेमध्ये दोन चेंडू निर्धाव गेल्याने फलंदाज स्मिथवरचं दडपण वाढलं.
जोएल पॅरिसने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर स्मिथने षटकार लगावला. अक्रॉस जाऊन स्मिथने चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावला. त्याचवेळी जोएलचं पाऊल क्रीझच्या पुढे पाऊल टाकलं असल्याचं स्पष्ट झाल्याने पंचांनी नोबॉल दिला.
यामुळे सात धावा मिळाल्या. जोएलचा पुढचा चेंडू वाईड गेला आणि फाईनलेगच्या दिशेने चौकार गेला. यामुळे 12 धावा झाल्या.
वाईड असल्याने फ्री हिट कायम राहिली. जोएलच्या त्या चेंडूवर स्मिथने चौकार मारला. अशा पद्धतीने एका चेंडूवर 16 धावांची लयलूट झाली.
स्मिथने चौथ्या चेंडूवरही चौकार लगावला. पाचव्या चेंडूवर स्मिथने एक धाव काढली. सहावा चेंडू निर्धावच गेला. या षटकात सिडनी सिक्सर्स संघाने 21 धावा वसूल केल्या.
सिडनी सिक्सर्स संघाने निर्धारित 20 षटकात 180 धावांची मजल मारली. स्मिथने 33 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 66 धावांची खेळी केली. स्मिथला बाकी सहकाऱ्यांची साथ मिळू शकली नाही. बेन ड्वाहर्सने 14 धावात 30 धावांची खेळी केली. होबार्टकडून पॅट्रिक डूलने 3 विकेट्स घेतल्या.
एका चेंडूवर 16 धावा देणाऱ्या जोएल पॅरिसने 3 षटकात 32 धावा दिल्या. त्याने कुर्टीस पॅटरसनला बाद केलं. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना होबार्ट हरिकेन्स संघाला 156 धावाच करता आल्या. झॅक क्राऊलेने 49 धावा केल्या. सिडनी सिक्सर्स संघाकडून जॅक्सन बर्ड, शॉन अबॉट, हेडन कीर या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या.
स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
स्टीव्हन स्मिथची पारंपरिक शैली ट्वेन्टी20 सारख्या वेगवान प्रकारासाठी अनुकूल नाही अशी टीका केली जाते. पण स्मिथ सध्या याच प्रकारात भन्नाट फॉर्मात आहेत.
स्मिथने या सामन्याआधी सिडनी थंडर्सविरुद्ध नाबाद 125 धावांची खेळी केली होती. त्याआधीच्या लढतीत अडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध 101 धावांची खेळी केली होती.
दुसऱ्या षटकाचा घटनाक्रम
पहिला चेंडू- निर्धाव
दुसरा चेंडू- निर्धाव
तिसरा चेंडू- नोबॉलवर षटकार
तिसरा चेंडूृ- फ्रीहिटवर वाईड जाऊन चौकार
तिसरा चेंडू- चौकार
चौथा चेंडू- चौकार
पाचवा चेंडू- एक धाव
सहावा चेंडू- निर्धाव
एकूण धावा- 21
कोण आहे जोएल पॅरिस?
30वर्षीय जोएलने 2 वनडेत ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. पॅरिस भारताविरुद्ध दोन वनडे खेळला. शिखर धवन त्याची पहिली विकेट होती. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पॅरिसने 32 सामन्यांमध्ये 119 विकेट्स घेतल्या आहेत.
उंच आणि डावखुऱ्या पॅरिसचा सामना करणं फलंदाजांना अवघड जातं. पण सोमवारी झालेल्या लढतीत मात्र पॅरिसच्या एकाच चेंडूवर 16 धावा कुटल्या गेल्या.
2016 मध्ये आयपीएल स्पर्धेतील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने जोएलला 30 लाख रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं होतं. पण दुखापतीमुळे त्याचं आयपीएल पदार्पण झालंच नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)