You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत पाकिस्तान मॅच : जेव्हा जावेद मियांदादनी भर मैदानात माकडउड्या मारल्या...
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे भावनांचे हिंदोळे उचंबळून येतात. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना नमवण्यासाठी उत्सुक दोन्ही संघातील खेळाडू बोलू लागतात.
1.आमिर सोहेल-वेंकटेश प्रसाद एकमेकांना भिडले तेव्हा
1996च्या विश्वचषकात भारत-पाकिस्तान लढतीदरम्यान पाकिस्तानचा आमिर सोहेल आणि भारताचा वेंकटेश प्रसाद यांच्यातील झालेलं द्वंद्व दंतकथा बनून राहिलं आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 287 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना आमिर सोहेल आणि सईद अन्वर यांनी 84 धावांची सलामी दिली. सोहेल चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. 51 धावांवर फलंदाजी करत असताना वेंकटेश प्रसादच्या गोलंदाजीवर सोहेलने डाऊन द ट्रॅक येत डीप पॉइंट क्षेत्रात खणखणीत चौकार लगावला.
चेंडू सीमारेषेपार गेल्यानंतर सोहेलने प्रसादच्या दिशेने बॅट खुणावत जा चेंडू घेऊन ये असा इशारा केला. चौकारासह असं वागून प्रसादवर आक्रमण गाजवण्याचा सोहेलचा डाव होता.
मात्र सोहेलच्या इशाऱ्याने खवळलेल्या प्रसादने पुढच्याच चेंडूवर सोहेलला त्रिफळाचीत करत वचपा काढला. प्रसादचा चेंडू मिडविकेच्या वरून मारण्याचा सोहेलचा प्रयत्न फसला आणि ऑफस्टंप उद्धव्स्त झाला.
सोहेलला बाद केल्यानंतर प्रसादने त्याला पॅव्हेलियनच्या दिशेने जाण्याचा इशारा करत चोख प्रत्युत्तर दिलं. अनेक वर्ष हा किस्सा क्रिकेटरसिकांच्या स्मरणात राहिला. आजही अनेकांना तो लक्षात आहे. युट्यूबवर या व्हीडिओला लाखो हिट्स मिळाले आहेत.
2.गौतम गंभीर, कामरान अकमल आणि शाहिद आफ्रिदीला सुनावतो तेव्हा
आक्रमक प्रवृतीच्या गौतम गंभीरची पाकिस्तानच्या खेळाडूंविरुद्ध वादावादी झाली नसती तरच नवल.
2010 मध्ये आशिया चषकाच्या श्रीलंकेतील डंबुला इथे झालेल्या लढतीदरम्यान गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमल यांच्यात बाचाबाची झाली.
सईद अजमलच्या गोलंदाजीवर गौतम गंभीरविरुद्ध झेलचं अपील कामरान अकमलने केलं. पंच बिली बोवडेन यांनी बाद दिलं नाही. यानंतर ड्रिंक्स ब्रेक झाला. ड्रिंक्स ब्रेकदरम्यान गंभीर आणि अकमल यांच्यात वाद झाला. पंच बिली बोवडेन, नॉन स्ट्रायकर एन्डला फलंदाजी करत असलेला महेंद्रसिंग धोनी यांनी हस्तक्षेप करत प्रकरण हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली.
2007 मध्ये कानपूर इथे झालेल्या लढतीदरम्यान गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात बाचाबाची झाली. गंभीर धाव पूर्ण करत असताना आफ्रिदी आणि गंभीर यांची टक्कर झाली. धाव घेता येऊ नये म्हणून आफ्रिदी जाणीवपूर्वक वाटेत आल्याचं गंभीरचं म्हणणं होतं. आफ्रिदीने हे म्हणणं फेटाळलं. मात्र या मुद्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद पाहायला मिळाला. पंचांनी हस्तक्षेप करत प्रकरण शांत केलं.
3.हरभजन-अख्तर यांच्यात तूतू मैंमैं
आशिया चषक 2010च्या डंबुला इथे झालेल्या लढतीत हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यात वादावादी झाली. भारतीय संघासमोर 268 धावांचं लक्ष्य होतं. शेवटच्या षटकांमध्ये 24 चेंडूत 36 धावांची आवश्यकता होती. 47वं षटक टाकण्यासाठी शोएब अख्तर आला. हरभजनने दुसऱ्याच चेंडूवर षटकार लगावला. षटकारानंतर हरभजन-शोएब यांनी एकमेकांना उद्देशून उद्गगार काढले.
मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत हरभजनने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यानंतर त्याने शोएब अख्तरच्या दिशेने बघत विजयाचा आनंद साजरा केला. शोएबने त्याला ड्रेसिंगरुममध्ये जाण्यास सांगितलं. युट्यूबवर ही बाचाबाची चवीचवीने पाहिली जाते.
4.'बाप बाप होता है' म्हटल्याचा सेहवागचा दावा
भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग खणखणीत फटकेबाजी जेवढा प्रसिद्ध आहे तितकाच दिलखुलास बोलण्यासाठीही.
पाकिस्तानविरुद्धच्या मुकाबल्यात वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर ही बिनीची जोडी सलामीला उतरली. पाकिस्तानचा शोएब अख्तर ताशी दीडशेच्या वेगाने गोलंदाजी करत होता. सेहवाग-तेंडुलकर जोडीला स्थिरावू न देणं हे शोएबचं उद्दिष्ट होतं.
चेंडू टाकल्यानंतर शोएब सेहवागला म्हणाला- मला हुकचा फटका मारून दाखव. मी तेव्हा 200च्या आसपास खेळत असल्याचं सेहवागने म्हटलं होतं.
शोएबने अनेकदा सेहवागला असं म्हणत उकसवण्याचा प्रयत्न केला. फलंदाजांची एकाग्रता भंग करण्यासाठी शेरेबाजीचा डावपेच म्हणून वापर केला जातो.
शोएबच्या सततच्या बडबडीने कंटाळलेल्या सेहवागने त्याला सांगितलं की, तुझा बाप नॉन स्ट्रायकिंग एन्डला फलंदाजी करतो आहे. हिंमत असेल तर हुकचा फटका मारून दाखव हे त्याला सांग, तो मारून दाखवेल.
शोएबने पुढच्या षटकात उसळता चेंडू सचिनच्या दिशेने टाकला. सचिनने मारायला अवघड अशा पूलच्या फटक्यासह षटकार खेचला. यानंतर मैदानात जल्लोषाची लाट उसळली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी निर्माण केलेला दबाव बाजूला सारण्यात सचिन यशस्वी ठरला.
सचिनच्या षटकारानंतर सेहवाग शोएबला उद्देशन म्हणाला- बेटा बेटा होता है, बाप बाप होता है.
सेहवागने शोएबला असं म्हटल्याचा दावा एका कार्यक्रमात केला. त्यानंतर सोशल मीडियावर हा किस्सा व्हायरल झाला.
दीड वर्षांपूर्वी शोएब अख्तरने सेहवागने असं काही म्हटल्याचं फेटाळून लावलं. सेहवाग मला असं काहीही म्हणालेला नाही. त्याने जो किस्सा सांगितला तो गमतीत सांगितला होता. सेहवाग मला असं काही म्हणाला असता तर त्याला बाद करून मैदानाबाहेर पिटाळला असता.
अख्तरच्या म्हणण्यात तथ्य असू शकतं कारण पाकिस्तानविरुद्ध सेहवागने त्रिशतकी खेळी केली. त्यावेळी तो 200च्या दरम्यान खेळला होता. त्या सामन्यात सचिनने 194 धावांची खेळी केली. मात्र त्या खेळीत एकही षटकार नव्हता. काही वर्षांनंतर सेहवागने पाकिस्तानविरुद्ध 254 धावांची खेळी केली मात्र त्यावेळी सचिनला फलंदाजीला यावं लागलं नाही. 2007 मध्ये सेहवागने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक द्विशतकी खेळी केली. मात्र त्यावेळी शोएब पाकिस्तान संघाचा भाग नव्हता.
5.जावेद मियांदादच्या माकडउड्या
भारत-पाकिस्तान क्रिकेट लढतींमधली सगळ्यात बहुचर्चित घटना असं मियांदाद-मोरे घटनेचं वर्णन केलं जातं. 1992 विश्वचषकात सिडनी इथे भारत-पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीची लढत झाली.
सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू खेळण्याचा मियांदादने प्रयत्न केला. यष्टीरक्षक मोरे यांनी झेलसाठी अपील केलं. त्याच षटकात मियांदाद धाव पूर्ण करत असताना क्रीझमध्ये असतानाही मोरे यांनी उडी मारून बेल्स उडवून अपील केलं. यानंतर मियांदाद यांनी उड्या मारून मोरे यांची नक्कल केली.
मियांदाद यांची विकेट मिळवणं भारतासाठी महत्त्वाचं होतं. मोरे यांनी ग्लोव्हजआडून बोलत मियांदाद यांची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून मियांदाद यांनी उड्या मारून दाखवत त्यांना प्रत्युत्तर दिलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)