You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्रिकेट वर्ल्ड कप SA vs NED : नेदरलँड्सनं रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का
वन-डे विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सनं नवा इतिहास रचलाय. 2011 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱ्या या टीमनं बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला.
नेदरलँड्सनं दिलेलं 43 ओव्हर्समध्ये 246 धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 207 धावांवर बाद झाली.
अफगाणिस्ताननं दोन दिवसांपूर्वीच इंग्लंडला पराभूत केले होते. त्यापाठोपाठ विश्वचषक स्पर्धेतील हा दुसरा धक्कादायक निकाल आहे.
नेदरलँड्सची स्वप्नवत कामगिरी
नेदरलँड्सचा वन-डे विश्वचषक स्पर्धेतील 23 सामन्यांमध्ये हा तिसरा विजय आहे. त्यांनी यापूर्वी स्कॉटलंड आणि नामिबिया यांना पराभूत केलं होतं. डच आर्मीनं कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या टीमवर विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच विजय मिळवलाय.
ऑस्ट्रेलियामध्ये मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकातही नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. त्यापाठोपाठ वन-डे विश्वचषकातही त्यांनी आफ्रिकेला धक्का दिला आहे.
246 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात 4 बाद 44 अशी झाली होती. गेल्या काही सामन्यांपासून फॉर्मात असलेली आफ्रिकेची टॉप ऑर्डर झटपट परतली.
डेव्हिड मिलरनं 43 धावा करत हा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मिलरनं हाईनरिच क्लासेनसोबत पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागिदारी केली.
क्लासनेन आणि नंतर मिलर बाद झाल्यानंतर सामना नेदरलँड्सच्या बाजूनं झुकला.
नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केशव महाराजनं 40 धावा करत आफ्रिकेला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला.
नेदरलँड्सकडून लोगान वॅन बीकनं सर्वाधिक 3 विकेट्स मिळाल्या. पॉल वॅन मीकरेन, बास द लीडे, रॉलॉफ वेन दर मर्व यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कॉलिन एकरमननं 1 विकेट घेतली.
त्यापूर्वी नेदरलँड्सनं शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 246 धावांचं आव्हान दिलं होतं.
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड्सची 7 बाद 140 अशी अवस्था होती. त्यानंतर त्यांनी आठ बाद 245 पर्यंत मजल मारली.
एडवर्ड्स- वॅन देर मर्व जोडीनं आठव्या विकेटसाठी 64 धावांची भागिदारी केली. एडवर्ड्सनं सर्वाधिक 78 (नाबाद) धावा केल्या. तर, वॅन देर मर्वनं 19 बॉलमध्ये 29 धावांची आक्रमक खेळी केली.
वॅन दर मर्वनंतर दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या आर्यन दत्तनं 9 बॉलमध्ये 3 षटकारांसह नाबाद 22 धावा काढल्या.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा यांनी नाणेफेक जिंकून नेदरलँड्सला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरूवातीच्या टप्प्यात अचूक गोलंदाजी केली.
नेदरलँड्सनं शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये आक्रमक फलंदाजी करत सामन्याचं चित्र बदललं.
दक्षिण आफ्रिकेकडून ल्युंगी एन्गिडी, कागिसो रबाडा आणि मार्को जॅन्सन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
धरमशालेत झालेला हा सामना पावसाच्या अडथळ्यामुळे 43 ओव्हर्सचा खेळवण्यात आला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)