'शाहीन आफ्रिदी म्हणजे वसीम अक्रम नाही', रवी शास्त्रींचं हे म्हणणं किती खरं आहे?

    • Author, विधांशु कुमार
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम जितकी परिणामकारक आणि आक्रमक गोलंदाजी करायचे तेवढीच शाहीन शाह आफ्रिदीही करतोय का?

पाकिस्तानी चाहते आणि काही क्रिकेट तज्ञांनी आफ्रिदीचं कितीही कौतुक केलं, तरी त्याची आणि अक्रमची तुलना होऊ शकत नाही, असं म्हणणं आहे भारताचे माजी प्रशिक्षक आणि कर्णधार रवी शास्त्री यांचं.

अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ फलंदाजी करत असताना समालोचनादरम्यान शास्त्रींनी आपल्या सहकारी समालोचकांना शाहीन शाहची जास्त स्तुती करू नका, असं सुनावलं होतं.

रवी शास्त्री म्हणाले, "शाहीन शाह आफ्रिदीला घाबरण्याची गरज नाही. शाहीन म्हणजे वसीम अक्रम नाही. तो चांगला गोलंदाज आहे, पण त्याची एवढी प्रशंसा करण्याची गरज नाही. तो एक साधा गोलंदाज आहे. तो प्रभावी गोलंदाज आहे असं म्हणण्याची अजिबात गरज नाही."

खरं तर पाकिस्तानी चाहते अनेक दिवसांपासून शाहीन शाह आफ्रिदीचं कौतुक करताना दिसत आहेत.

त्यांचं म्हणणं आहे की, आफ्रिदी विराट कोहली आणि रोहित शर्माला सहज बाद करू शकतो.

एक-दोन डावात तसं घडलंही असेल, पण या दोघांनी आणि इतर भारतीय फलंदाजांनी वेळोवेळी त्याच्या गोलंदाजीवर धुव्वाधार फलंदाजी केलीय.

या विश्वचषकातील आफ्रिदीची कामगिरी

नेहमीप्रमाणे या विश्वचषकातही पाकिस्तान संघाची ताकद ही त्यांच्या वेगवान गोलंदाजीत असल्याचं मानलं जातंय.

पण, पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये अशी कोणतीच चमक दाखवली नाहीये, की त्याच्या मदतीने पाकिस्तान विश्वचषक जिंकण्याची अपेक्षा करू शकेल.

नेदरलँडसारख्या कधी तरी क्रिकेट खेळणाऱ्या संघानेही त्यांच्याविरुद्ध धावांचा डोंगर रचला. तर श्रीलंकेसारख्या कमी अनुभवी संघाने 50 षटकांत 300 हून अधिक धावा केल्या.

त्यानंतर जेव्हा भारताविरुद्ध सामना झाला, तेव्हा 43 व्या षटकातच पाकिस्तानचा संघ 191 धावांवर ऑल-आऊट झाला होता.

पाकिस्तानी गोलंदाजही विशेष काही करू शकले नाहीत. भारताने हे लक्ष्य 19 षटकं शिल्लक असतानाच पूर्ण केलं.

शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली आणि हरिस रौफ या वेगवान त्रिकुटाकडून पाकिस्तानला खूप अपेक्षा होत्या. मात्र तिघांनीही संघाची निराशा केली आहे. यात सर्वांत मोठी भूमिका आफ्रिदीने बजावली आहे.

यावेळी विश्वचषकाच्या तीन डावांमध्ये शाहीनने 35 च्या सरासरीने केवळ 4 विकेट्स घेतल्या.

त्यासोबतच त्याने एका षटकामागे 6.31 धावांची सरासरी राखली आहे. यामुळे तो महान नसून महागडा गोलंदाज ठरतो.

नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात त्याने 37 धावांमागे एक विकेट घेतली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 66 धावांमागे एक विकेट घेतली, तर भारताविरुद्धच्या सामन्यात 36 धावांत दोन विकेट घेतल्या. या दोन्ही विकेट फलंदाजांच्या चूकांमुळे पडल्या.

अहमदाबादच्या सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली तेव्हा शाहीन शाहही हतबल दिसत होता.

कमी धावसंख्या असलेल्या या सामन्यात पाकिस्तानला झटपट विकेट्सची गरज होती जी आफ्रिदी पूर्ण करू शकला नाही.

गिल बाद झाला तो शादाब खानने पकडलेल्या कॅचमुळे. तर रोहित शर्माची विकेटही सॉफ्ट डिसमिसल म्हणता येईल.

या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही पाकिस्तानी गोलंदाजीवर टीका केली होती.

शोएब म्हणाला की, "रोहित शर्माने एकट्याने संपूर्ण गोलंदाजांना तोंड दिलं आणि भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानला लहान मुलांप्रमाणे हरवलं आहे."

खेळपट्टी हे कारण होतं का?

काही समालोचकांनी काळ्या मातीच्या खेळपट्टीला दोष दिला. या खेळपट्टीवर चेंडू थोडासा थांबून येत होता. पण हा दोष निराधार आहे कारण त्याच खेळपट्टीवर बुमराहने परिणामकारक गोलंदाजी करत 7 षटकात केवळ 19 धावा दिल्या. तर आफ्रिदीने 6 षटकात 36 धावा दिल्या.

त्या सामन्यात बुमराह आणि आफ्रिदीची तुलना करताना गौतम गंभीर म्हणाला की, बुमराह त्याच्या संघासाठी आणि कर्णधारासाठी सर्वांत महत्त्वाचा खेळाडू आहे.

गौतम गंभीर म्हणाला, "बुमराह दुपारी 2 वाजता कडक उन्हात गोलंदाजी करत होता तर शाहीनला संध्याकाळी गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. चेंडू स्विंग होण्यासाठी हा सर्वात चांगला वेळ होता. त्यानंतर बुमराहच्या गोलंदाजीत एक धार दिसली."

अहमदाबादची खेळपट्टी हे निमित्त ठरू शकत नाही. कारण हैदराबादमध्ये झालेल्या याआधीच्या दोन सामन्यांमध्ये शाहीनला विशेष अशी कामगिरी करता आलेली नाही.

एवढं असूनही पाकिस्तानी संघाने हैदराबादमध्येच सराव केला आणि बराच वेळ घालवला. तिथे खेळलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही शाहीनला जास्त विकेट घेता आल्या नव्हत्या.

त्यामुळे हैदराबादची खेळपट्टीही शाहीनला मानवली नाही असं म्हणायचं का?

महान गोलंदाज वसीम अक्रमकडून अशा बहाण्यांची अजिबात अपेक्षा होत नव्हती. कारण तो प्रत्येक विकेटवर आणि प्रत्येक स्थितीत विकेट घेणारा सक्षम गोलंदाज होता.

आकड्यांची तुलना

एक नजर आकड्यांवर टाकली तर वसीम अक्रम आणि शाहीन शाह या दोघांमध्ये खूप फरक दिसेल.

शाहीन शाहने आतापर्यंत 27 कसोटी सामन्यात 25.58 च्या सरासरीने 108 बळी घेतले आहेत.

त्याने 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 23.86 च्या सरासरीने 90 बळी घेतले आहेत. तर 52 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 64 बळी घेतले आहेत.

दुसरीकडे, वसीम अक्रमने 104 कसोटी सामन्यांमध्ये 23.6 च्या सरासरीने 414 विकेट घेतल्या आहेत. तर 356 एकदिवसीय सामन्यांमध्ये 23.5 च्या सरासरीने 502 विकेट घेतल्या आहेत.

इथे वसीम अक्रमने घेतलेल्या विकेट्सची संख्या खूप जास्त आहे आणि शाहीन आफ्रिदीला इथपर्यंत पोहचण्यासाठी बराच काळ गोलंदाजी करावी लागेल.

दुसरं म्हणजे, कमी सामन्यांमध्ये चांगली सरासरी काढता येऊ शकते. पण 100 हून अधिक कसोटी आणि 300 हून अधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये एवढी सरासरी राखणं वसीम अक्रमसारखा गोलंदाजच करू शकतो.

तो कोणत्याही सपाट विकेटवर जबरदस्त स्विंगच्या सहाय्याने विकेट घेऊ शकत होता. म्हणूनच त्याला 'सुलतान ऑफ स्विंग' असं म्हटलं जायचं.

याआधी 2020 मध्ये एका पाकिस्तानी वाहिनीने शाहीन शाह आणि नसीम शाह यांची तुलना वसीम अक्रम आणि वकार युनूस या जोडगळीशी केली होती. तेव्हा वकार म्हणाला होता की, "त्यांनी घाई करू नये, हे दोघेही चांगले आणि विकेट घेणारे गोलंदाज आहेत, पण ते अजून त्या तोडीचे नाहीत."

आफ्रिदीची कमकुवत बाजू

शाहीन आफ्रिदीची एक कमकुवत बाजू म्हणजे त्याचं आरोग्य. तो तरुण आहे पण अनेकदा तो पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असतो.

शारीरिक तंदुरुस्ती सोबत त्याच्या गोलंदाजीच्या वेगातही फरक पडला आहे.

पूर्वी तो 145 किंवा 150 च्या वेगाने गोलंदाजी करायचा. सध्या, तो सरासरी 130 च्या वेगाने गोलंदाजी करतोय. त्याचा हा वेग कधीकधी 136-137 पर्यंत जातो.

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक याच्या मते, वेग कमी झाल्यामुळे त्याच्या गोलंदाजीत फरक पडला आहे.

एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल रझाकने सांगितलं की, "पूर्वी जेव्हा त्याचा वेग चांगला होता तेव्हा चेंडू योग्य ठिकाणी पडायचा आणि स्विंगही मिळायचा. अहमदाबादमधील त्याची गोलंदाजी पाहिली तर लक्षात येतं की त्याला स्विंग पण कमी मिळाले आणि त्याच्या गोलंदाजीतील आक्रमकपणाही कमी झाला."

खरं सांगायचं तर शाहीन शाह अजूनही 'वर्क इन प्रोग्रेस' आहे. म्हणजे त्याच्या गोलंदाजीवर अजून काम सुरू आहे. तो वसीम अक्रमशी बरोबरी करू शकतो का हे येणारा काळच सांगेल. मात्र त्यासाठी त्याला किमान दशकभर अव्वल स्तरावर गोलंदाजी करावी लागेल.

तसेच, फलंदाज त्याचा अचूक वेध घेतात, त्यामुळे त्याला त्याच्या गोलंदाजीतही विविधता आणावी लागेल.

आणि हे सर्व करताना त्याला आपला वेगही कायम ठेवावा लागणार आहे. पण शाहीन शाह आफ्रिदी यासाठी तयार आहे का?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)