You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हॅन्सी क्रोनिए : तो बदनाम क्रिकेटपटू, ज्याला सचिन तेंडुलकरही घाबरायचा
- Author, दिनेश उप्रेती
- Role, बीबीसी प्रतिनिधी
“आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी सातत्याने प्रवास करतो. कधी विमानाने तर कधी बसने. मला वाटतं की माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईन.”
मॅच फिक्सिंगचा बट्टा लागलेले दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांनी आपल्या मृत्यूच्या किती तरी वर्षे आधी ही भीती आपला भाऊ फ्रान्स यांच्याकडे बोलून दाखवली होती.
फ्रान्स यांनी मे 2012 मध्ये बीबीसी-5 ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं, “हॅन्सी क्रोनिए यांनी आपला मृत्यू दहा वर्षांपूर्वीच पाहिलेला होता.”
फ्रान्स म्हणाले, “काही वर्षांपूर्वी हॅन्सी क्रोनिए यांचा एक कार अपघात झाला होता. त्यांनी बसलेल्या कारच्या धडकेत एका लहान मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.”
यानंतर जवळपास दहा वर्षांनी म्हणजेच 2002 साली हॅन्सी क्रोनिए यांचं भाकित खरं ठरलं. 1 जून 2002 रोजी हॅन्सी क्रोनिए यांचं विमान अपघातात निधन झालं.
राक्षसी ताकद
फ्रान्स सांगतात, “हॅन्सी क्रोनिए यांच्यातील उत्सुकता किंवा कुतूहल हीच त्यांची जमेची आणि धोक्याची बाजू होती. त्यांनी अनेक वर्षे क्रिकेट खेळलं. विमानप्रवास आणि हॉटेलांमध्ये राहण्याला ते कंटाळले होते. याच कंटाळ्यामुळे त्यांनी कदाचित विचार केला असावा की फिक्सिंग करणं काहीतरी रंजक असू शकतं.”
1996 साली दक्षिण आफ्रिका संघ भारताच्या दौऱ्यावर असतानाही ते कंटाळलेले होते. खरं तर हे कोणत्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेलं आपल्याला दिसणार नाही. पण सुरुवातीला आपल्यावरील आरोप फेटाळून लावल्यानंतर 2000 सालच्या किंग कमिशनच्या चौकशीत हॅन्सी क्रोनिए यांनी याबाबत कबुली दिली होती.
“भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवावा यासाठी शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने विकेट गमावल्यास 30 हजार डॉलर मिळतील,” अशी ऑफर असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं.
त्यानंतर मॅच फिक्सिंगचं असं रॅकेट समोर आलं, त्यामध्ये हर्षल गिब्ज, निकी बोए यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचे काही खेळाडूही अडकले. पण आजीवन बंदीची कारवाई केवळ क्रोनिए यांच्यावरच झाली.
चौकशीदरम्यान हॅन्सी क्रोनिए यांनी आपली चूक मान्य करताना कोणत्या तरी राक्षसी ताकदीने त्यांच्याकडून हे सगळं करवून घेतलं आहे, असं म्हटलं होतं.
यानंतर पाहता पाहता दक्षिण आफ्रिकेचा हा गोल्डन बॉय यशाच्या सर्वोच्च शिखरावरून बदनामीच्या गर्तेत जाऊन अडकला.
पण नव्वदीच्या दशकात हॅन्सी क्रोनिए हे अत्यंत लोकप्रिय क्रिकेटपटू होते, ही बाब आपल्याला दुर्लक्षित करता येऊ शकणार नाही. लोकप्रियतेच्या बाबतीत हॅन्सी यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं जाऊ शकत होतं.
याच कारणामुळे मॅच फिक्सिंग प्रकरण समोर आल्यानंतर आजीवन बंदीची कारवाई झालेल्या क्रोनिए यांना 2004 सालच्या सर्व्हेमध्येही दक्षिण आफिकेतील महान व्यक्तींच्या यादीत 11वं स्थान मिळालं होतं.
हॅन्सी क्रोनिए हे क्रिकेटमध्ये एक सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू होते. ते एक चतुर कर्णधारही होते.
जर त्यांच्या डोक्यावर मॅच फिक्सिंगचा बट्टा लागला नसता तर इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत त्यांचा समावेश करता आला असता.
कर्णधार म्हणून त्यांची कामगिरीही लक्षवेधी आहे. क्रोनिए यांनी एकूण 68 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 53 सामन्यांमध्ये ते कर्णधार म्हणून मैदानावर उतरले.
त्यांच्या नेतृत्वाखाली 27 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजय मिळाला. तर 11 कसोटी सामने त्यांनी गमावले. क्रोनिए यांनी 138 वनडे सामन्यांचं कर्णधारपद भूषवलं. यामध्ये 98 सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला.
इतकंच नव्हे तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला जगात कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक त्रास दिला असेल, तर तेसुद्धा हॅन्सी क्रोनिए हेच होते.
सचिन तेंडुलकर यानेही अनेक व्यासपीठांवर बोलताना याबाबत मान्य केलं आहे.
सचिन म्हणतो की क्रोनिए यांनी त्यांना इतका त्रास दिला की त्यांच्या गोलंदाजीविरुद्ध काय करावं, हे आपल्याला कळायचं नाही.
द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे, “प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर हॅन्सी क्रोनिए यांनी मला इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा जास्त त्रास दिला. आम्ही जेव्हा-जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचो, त्यावेळी एलन डोनाल्ड किंवा शॉन पॉलॉक यांच्यापेक्षाही हॅन्सी क्रोनिए नेहमी मला बाद करण्यात पुढे असायचे. मला त्यांचे चेंडू कळायचे नाहीत, असं काही नाही. पण माहीत नाही चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊनच विसावा घ्यायचा.
क्रोनिए यांची क्रिकेट कारकीर्द
व्हेसल जोहानेस क्रोनिए यांचा जन्म 25 सप्टेंबर 1969 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या ब्लॉमफाऊंटेन शहरात झाला होता.
त्यांनी एप्रिल 1991 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं, तेव्हांपासूनच ते एक ना एक दिवस दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार होतील, असं बोललं जाऊ लागलं होतं.
वयाच्या 21व्या वर्षी हॅन्सी हे आपल्या राज्यातील ऑरेंज फ्री स्टेट या संघाचे कर्णधार बनले होते. अवघ्या 24व्या वर्षी ते दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे उपकर्णधार बनले.
हॅन्सी क्रोनिए यांना क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड होती. त्यांचा खेळ पाहिल्यास त्यांना पैसे देऊन क्रिकेट मॅचचा निकाल आधीच ठरवण्याचा आरोप त्यांच्यावर लावला जाऊ शकतो, ही कल्पना केली जाऊ शकत नाही.
हॅन्सी क्रोनिए हे पैशांच्या बदल्यात सामन्यातील महत्त्वाची माहिती सट्टेबाजांना पुरवतील, याचा विचारही कुणी करू शकत नव्हता.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा त्यांचा विक्रमही इतर कर्णधारांच्या तुलनेत जास्त होता.
1992 साली दक्षिण आफ्रिकेवरील बंदी संपुष्टात येताच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं सुरू केलं. क्रोनिए त्या सामन्यांमध्ये संघाचा भाग होते.
यासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे ते चेहरा बनले.
दक्षिण आफ्रिकेच्या युनायटेड क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन व्यवसथापकीय संचालक डॉ. अली बाकर यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांचं तोंडभरून कौतुक केलं होतं.
दक्षिण आफ्रिका संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या क्रिकेट बोर्डाने कृष्णवर्णीय खेळाडूंना घेण्याचा प्रयत्न केला असता क्रोनिए यांनी त्यावर कठोर प्रतिक्रिया दिली होती.
त्यांच्या मते, ते खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मानकांवर सिद्ध होत नाहीत, त्यामुळे क्रिकेटसारख्या स्पर्धेच्या खेळात कोटा सिस्टिम नसावं, असं त्यांचं मत होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)