12 शतकं, दोनशेच्या भराऱ्या आणि रिंकूचा पराक्रम, IPL मधील 7 रंजक गोष्टी

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा 16वा हंगाम अनेकविध कारणांनी चर्चेत राहिला. फलंदाजांसाठी सुवर्णकाळ ठरलेल्या या हंगामात सर्वाधिक शतकांची नोंद झाली. हंगामात सर्वाधिकवेळा दोनशेची वेस पार झाली.

रिंकू सिंगच्या रुपात स्पर्धेला नवा फिनिशर मिळाला. अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरीने चाहत्यांची मनं जिंकली.

नवीन उल हक हा अफगाणिस्तानचा शिलेदार विराट कोहली-गौतम गंभीर यांच्यातील वादाला कारणीभूत ठरला.

1. डझनवारी शतकं

आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक शतकांचा विक्रम प्रस्थापित झाला. चाहत्यांना या हंगामात तब्बल 12वेळा शतकी मेजवानी अनुभवता आली. हॅरी ब्रूकने यंदाच्या हंगामातलं पहिलंवहिलं शतक झळकावलं. योगायोग म्हणजे या शतकानंतर ब्रूकच्या कामगिरीत प्रचंड घसरण झाली.

कोलकातासाठी आयपीएलमध्ये पहिलंवहिलं शतक 2008 मध्ये ब्रेंडन मॅक्युलमने झळकावलं होतं. त्यानंतर तब्बल 15 वर्षानंतर कोलकाताच्या खेळाडूने शतकी नजराणा सादर केला. वेंकटेश अय्यरने कोलकातासाठी शतकांचा दुष्काळ संपवला.

युवा यशस्वी जैस्वालने मुंबईत तडाखेबंद शतकी खेळ साकारली. संघर्षमय परिस्थितीतून वाट काढत क्रिकेटची आवड जोपासलेल्या मुंबईकर यशस्वीचं मुंबईतच शतक झालं.

दशकभराहून अधिक काळ आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवचं शतकाचं स्वप्न या हंगामात पूर्ण झालं.

वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यात सूर्यकुमारने झंझावाती खेळी रचली.

पंजाब किंग्जतर्फे प्रभसिमरन सिंगने शतकी टिळा माथी लावला. चार हंगाम पंजाबच्या ताफ्यात असणाऱ्या प्रभसिमरनने शतकासह संघातली जागा पक्की केली.

शुबमन गिलने तीन शतकं झळकावत अनोखा विक्रम केला. टेस्ट, वनडे, ट्वेन्टी20 आणि आयपीएल अशा सगळीकडे गिलच्या नावावर शतक आहे.

हेनरिच लासेनने अफलातून फटकेबाजी करत शतक साजरं केलं. विराट कोहलीने 4 वर्षानंतर आयपीएलमध्ये शतक झळकावलं.

प्रचंड रक्कम खर्च करुन ताफ्यात समाविष्ट केलेल्या कॅमेरुन ग्रीनने वेगवान आणि आत्मविश्वासपूर्ण शतक झळकावलं.

2. रिंकू सिंहची भरारी

यंदाच्या हंगामाचा एकच मानकरी ठरवायचा झाला तर तो कोलकाताचा रिंकू सिंग असेल. सामन्याच्या शेवटच्या षटकात कोलकाताला 29 धावांची आवश्यकता होती. सामन्याचं पारडं गुजरातच्या दिशेने होतं.

रिंकूने सलग 5 षटकार खेचत कोलकाताला अद्भुत आणि थरारक विजय मिळवून दिला. सलग 5 षटकारांच्या विक्रमासह रिंकूंचं नाव विक्रमांच्या सूचीत नोंदलं गेलं. आपण केवळ एका सामन्याचा चमत्कार नाही हे रिंकूने हंगामात सातत्यपूर्ण खेळ करत सिद्ध केलं.

रिंकू सिंहने 14 सामन्यात जवळपास दीडशेच्या स्ट्राईकरेटने खेळताना 474 धावा केल्या.

3. तब्बल 36 वेळा 200ची वेस पार

ट्वेन्टी20 म्हणजे मुक्त फटकेबाजीचा प्रकार या गृहितकाला यंदाच्या हंगामाने सार्थ ठरवलं. यंदाच्या हंगामात तब्बल 36 वेळा संघांनी दोनशेची वेस ओलांडली.

ट्वेन्टी20 प्रकारात संघाला 120 चेंडू मिळतात. त्यात 200 धावा करणं म्हणजे चौकार, षटकारांची लयलूट आणि गोलंदाजांची कत्तल.

छोट्या आकाराची मैदानं आणि फलंदाजीला अनुकूल खेळपटट्या यामुळे संघांनी नियमितपणे 200 धावांची वेस ओलांडली. केवळ प्रथम फलंदाजी करतानाच नव्हे तर संघांनी 200पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग या हंगामात केला.

4. नव्या ताऱ्यांचा उदय

यंदाच्या हंगामाने भारतीय क्रिकेटला अनेक नवे युवा खेळाडू दिले. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओतणाऱ्या यशस्वी जैस्वालने यंदाच्या हंगामात ... धावा केल्या.

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या नेहल वढेरा आणि आकाश मढवाल यांनी छाप उमटवली. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर हे प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने आकाशला संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं. मुंबई संघव्यवस्थापनाने फिनिशरच्या भूमिकेसाठी वढेराला संधी दिली. उपयुक्त खेळी करत वढेराने मुंबईच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

बेबी मलिंगा नावाने प्रसिद्ध झालेल्या मथिशा पथिराणाने शिस्तबद्ध गोलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली. आयपीएल स्पर्धेत खेळणारा आयर्लंडचा पहिला खेळाडू ठरलेल्या जोशुआ लिटीलने दर्जेदार गोलंदाजीसह गुजरातच्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा उचलला. जोशुआसह अफगाणिस्तानचा डावखुरा फिरकीपटू नूर अहमद चर्चेत राहिला. डावखुरा रशीद असं नूरचं वर्णन केलं जातं.

हेडबँडसह खेळणाऱ्या सुयश शर्माने अनेकांना प्रभावित केलं. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून छाप पाडणाऱ्या ध्रुव जुरेलने राजस्थानच्या संघातलं स्थान पक्कं केलं. खणखणीत फटकेबाजी ही ध्रुवची ओळख. निराशाजनक हंगामात हैदराबादसाठी मयांक मार्कंडेयची फिरकी हा आशादायी किरण ठरला.

5. नवीन उल हकवरून गंभीर-कोहली आमनेसामने

लखनौ सुपरजायंट्सकडून खेळणारा अफगाणिस्तानचा नवीन उल हक यंदाच्या हंगामात वादाच्या केंद्रस्थानी राहिला. नवीन उल हकवरून लखनौ संघाचा मेन्टॉर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वादही झाला.

2 मे रोजी लखनौ आणि बंगळुरू यांच्यात सामना झाला. सामन्यादरम्यान लखनौचा नवीन आणि विराट यांच्यात वाद झाला होता.

सामन्या संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. त्यावेळी लखनौतर्फे खेळणारा गोलंदाज नवीन उल हक आणि कोहली यांच्यात वाद झाला.

यानंतर लखनौचा काईल मेयर्स आणि कोहली यांच्यातल्या बोलण्याला वादाचं स्वरुप येण्याआधीच लखनौचा मेन्टॉर गंभीरने मेयर्सला रोखलं.

काही सेकंदातच गंभीर रागाने कोहलीच्या दिशेने जाताना दिसला. लखनौचा कर्णधार के.एल.राहुलने गंभीरला रोखण्याचा प्रयत्न केला.

बंगळुरूतर्फे कर्णधार फाफ डू प्लेसिसने कोहलीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण गंभीर थेट कोहलीच्या दिशेने गेला. कोहलीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत आपलं म्हणणं सांगण्याचा प्रयत्न करताना दिसला.

ही वादावादी वाढत गेल्याने लखनौचा अनुभवी गोलंदाज अमित मिश्राने मध्यस्थी केली. बंगळुरूच्या खेळाडूंनी कोहलीला तर लखनौच्या खेळाडूंनी गंभीरला बाजूला केलं.

दरम्यान सामनाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आणि कोहली तसंच गंभीर यांच्या मानधनातून 100 टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.

लखनौचा गोलंदाज नवीन उल हकच्या मानधनातून 50 टक्के रक्कम कापून घेण्यात आली.

6. कोहलीचा विक्रमाधीश पण जेतेपदाविनाच माघारी

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीने स्वत:च्या नावावर केला. पण 16व्या वर्षीही कोहलीला जेतेपदाविनाच माघारी परतावं लागलं.

विराट कोहली सगळे हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी खेळला आहे. पण एकदाही बंगळुरू संघाला जेतेपद पटकावता आलेलं नाही. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता.

7 शतकांसह आता कोहली या विक्रमाचा मानकरी आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावाही कोहलीच्याच नावावर आहेत.

7. जुनं ते सोनं

कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या पीयुष चावला, इशांत शर्मा, मोहित शर्मा यांनी दिमाखदार कामगिरी करत अजूनही क्रिकेट संपलेलं नसल्याचं दाखवून दिलं.

गेल्या हंगामात नेट बॉलर म्हणून खेळलेल्या मोहित शर्माने यंदा सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या खेळाडूंच्या सूचीत स्थान पटकावलं. मोहित शर्माच्या नावावर परपल कॅप आहे. भारतासाठी वर्ल्डकप खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएल स्पर्धेत प्रदीर्घ काळ खेळतो आहे. मोहितने गेल्या हंगामात नेट बॉलर म्हणून चांगलं योगदान दिलं. गुजरात संघव्यवस्थापनाने मोहितच्या कौशल्यावर विश्वास ठेवला आणि त्याने या संधीचं सोनं केलं. प्लेऑफच्या लढतीत मोहितने लखनौविरुद्ध 5 विकेट्स पटकावण्याची किमया केली.

इशांत शर्माने अजूनही स्पर्धात्मक क्रिकेटसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. दिल्लीची यंदाच्या हंगामातली कामगिरी यथातथाच राहिली पण इशांतने आपली उपयुक्तता सिद्ध केली. दिल्ली संघव्यवस्थापनाने इशांतला उशिराने संधी दिली. इशांतने 8 सामन्यात 8.24च्या इकॉनॉमी रेटने 10 विकेट्स पटकावल्या.

भारतीय संघातून तसंच बीसीसीआयच्या वार्षिक सूचीतून बाहेर झालेल्या अजिंक्य रहाणेने आयपीएलच्या व्यासपीठाच्या माध्यमातून फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले.

मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर रहाणेने 27 चेंडूत 61 धावांची आक्रमक खेळी केली. कोलकाताविरुद्ध रहाणेने 29 चेंडूत 71 धावांची अविश्वसनीय खेळी केली.

पारंपरिक तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी रहाणे ओळखला जातो. यंदाच्या हंगामात मात्र गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत खेळणारा अजिंक्य पाहायला मिळाला आहे.

या कामगिरीच्या बळावर अजिंक्यची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघात निवड झाली.

प्रसिध कृष्णा दुखापतग्रस्त झाल्याने राजस्थानने संदीप शर्माला संघात समाविष्ट केलं. आयपीएलमध्ये 100हून अधिक विकेट नावावर असणाऱ्या संदीपने महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजाला रोखत राजस्थानला थरारक विजय मिळवून दिला. मात्र हैदराबादविरुद्ध संदीपने नोबॉल टाकल्याने राजस्थानला पराभूत व्हावं लागलं.

34वर्षीय पीयुष चावलाला मुंबई इंडियन्सने संघात घेतलं तेव्हा टीका झाली पण चावलच्या फिरकीचं कोडं आजही अनेकांना उलगडलेलं नाही. प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईसाठी पीयुष हा आशेचा किरण ठरला. पीयुषने 16 सामन्यात 22 विकेट्स पटकावल्या. पीयुषसाठी हा सर्वोत्तम आयपीएल हंगाम ठरला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)