उद्धव ठाकरे यांना बारसूमध्ये जाहीर सभेची परवानगी नाहीच

फोटो स्रोत, FACEBOOK
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -
1. उद्धव ठाकरे यांना बारसूमध्ये जाहीर सभेची परवानगी नाहीच
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात बारसू येथे जाहीर सभा घेण्याबाबतची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. यामुळे त्यांना बारसू येथे केवळ ग्रामस्थांची भेट घेऊनच माघारी परतावं लागणार आहे.
कोकणातील बारसू रिफायनरीसंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (6 मे) येथील नागरिकांची भेट घेणार आहेत.
मात्र या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांना जाहीर सभा घेता येऊ शकणार नाही, असं पोलिसांनी म्हटलं. दरम्यान, प्रकल्पाच्या समर्थनार्थ विविध संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चालाही पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
मुंबईतील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्याची घोषणा केली होती. यादरम्यान येथे जाहीर सभा घेण्याचा त्यांचा मानस होता.
सभेची परवानगी नसल्याने उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम बदलण्यात आला असून ते सकाळी 10 वाजता साखरकोंभ येथे हेलिकॉप्टरने पोहोचतील. त्यानंतर ते बारसू येथील कातळशिल्पांना भेट देऊन गिरमादेवी येथे ग्रामस्थांशी संवाद साधतील. यानंतर येथे पत्रकार परिषद घेऊन ते दुपारी महाडच्या दिशेने रवाना होणार आहेत. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
2. कोव्हिड-19 आता सार्वजनिक आरोग्य आणीबाणी नाही – WHO
कोव्हिड-१९ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेला नाही, अशी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने WHO केली आहे.
WHOच्या आपत्कालीन समितीच्या 15 व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत माहिती देताना WHO चे प्रमुख डॉ. टेड्रोस अद्यनोम गेब्रेयसूस म्हणाले, “आपत्कालीन समितीची 15 वी बैठक गुरुवारी (4 मे) पार पडली. यावेळी, माझ्याकडे शिफारस करण्यात आली की, मी जगभरात कोव्हिड-19 आता जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही याबाबतची घोषणा करावी. मी त्यांचा सल्ला स्वीकारला असून याबाबतची घोषणा करत आहे.”
30 जानेवारी 2020 रोजी कोव्हिड-19 ला त्यांनी जागतिक आणीबाणी जाहीर केलं होतं. ही घोषणा केली तेव्हा चीनमध्ये केवळ 100 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तोवर करोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. परंतु तीन वर्षांनंतर ही संख्या 70 लाखांच्या पुढे गेली. आमच्या अंदाजानुसार या रोगामुळे आतापर्यंत जगभरात 2 कोटींहून अधिक लोकांनी प्राण गमावले असावेत, असंही WHO ने सांगितलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
3. राजकारणात आलो नसतो तर लष्करात असतो – एकनाथ शिंदे
"आपण जर राजकारणात आलो नसतो तर लष्करात देशाची सेवा करत असतो", असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
"आपलं लष्करात सिलेक्शन झालं होतं. पण प्रशिक्षणासाठी जात असताना मित्राच्या बहिणीच्या लग्नाला हरयाणाला गेलो. पण नंतर आपल्याला लष्करात घेण्यात आलं नाही", असं शिंदेंनी सांगितलं.

फोटो स्रोत, FACEBOOK
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पिता-पुत्र काल (5 मे) एबीपी माझाच्या कट्ट्यावर आले होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही आठवण सांगितली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं होतं. लखनऊला त्यासाठी ट्रेनिंगला जायचं होतं. माझा एक मित्र होता हरी परमार नावाचा. त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी त्याने मला आमंत्रण दिलं होतं आणि त्याला आपण येणार असल्याचं सांगितलं होतं. मग लखनऊला जाताना अचानक ते आठवलं आणि आपण ट्रेन बदलली. दिल्लीला जाऊन तिथून हरियाणातील रोहतकला लग्नाला गेलो.”
“लग्न झाल्यानंतर दोन-चार दिवसानंतर मी लखनऊमधील ट्रेनिंग सेंटरला गेलो. पण आर्मीवाल्यांनी आपल्याला घेतलं नाही. पुन्हा नवीन वॉरंट आणण्यासाठी पाठवलं. मग परत इकडे आलो. तर त्यावेळी आपल्याकडे दंगल सुरू होती. आर्मीमध्ये सैनिक झालो नाही तरी शिवसैनिक मात्र झालो,” असं शिंदे यांनी म्हटलं.
4. नीरज चोप्राला सलग दुसऱ्यांदा डायमंड लीगचं विजेतेपद
ऑलंपिक 2020 मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राची देदीप्यमान कामगिरी सुरूच आहे. यंदा दोहा येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत भालाफेकीतील जेतेपद त्याने कायम राखले. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर लांब भालाफेक केल्यामुळे त्याच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.

फोटो स्रोत, BEN STANSAL
9 सप्टेंबर 2022 रोजी नीरज चोप्राने डायमंड लीगचं विजेतेपद पटकावलं होतं. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. आता सलग दुसऱ्यांना नीरजने हे विजेतेपद पटकावलं.
ऑलंपिकशिवाय नीरजने आशिया स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे. ही बातमी लोकमतने दिली.
5. द केरला स्टोरी चित्रपटाचे निर्माते ‘तो’ दावा हटवणार
केरळमधून 32 हजार मुली गायब झाल्याचा आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा सोशल मीडियावरून काढून टाकण्याबाबत द केरला स्टोरीच्या निर्मात्यांनी सहमती दर्शवली आहे.
या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी हा दावा हटवण्याचं कोर्टात मान्य केलं.
विशेष म्हणजे, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. ती मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, हा चित्रपट अखेर 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








