शरद पवारांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी टिकणार का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
- Reporting from, नवी दिल्ली
महाविकास आघाडी एकसंध आहे आणि ती पुढेसुद्धा कायम राहील असा दावा महाविकास आघाडीतल्या तिनही घटक पक्षांकडून सतत केला जात आहे.
पण, त्याचवेळी तिनही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी. उद्धव ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस असे संघर्ष किंवा वाक्युद्ध सध्या जोरदार रंगताना दिसत आहेत.
अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये रंगलेला कलगीतुरा सर्वांनी पाहिलाच आहे. त्याने लोकांचं मनोरंजन तर केलंच पण, त्यातून महाविकास आघाडीतल्या भेगाच समोर आल्या आहेत.
2 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर तर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
1 मे रोजी महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना अजित पवार सभेला आलेत आणि ते भाषणही करणार असं म्हणून तेव्हा सुरू असलेल्या अजित पवारांच्या भाजपकडे जाण्याच्या वावड्यांना स्वतः संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला होता.
पण 2 मेच्या घडामोडीनंतर मात्र 5 मे रोजी लिहिलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात त्यांनी स्वतःच हा मुद्दा खणून काढत राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट भाजपच्या उंबरठ्यावर असल्याचा आरोप केला आहे. अर्थात यावेळी त्यांनी अजित पवार यांचं नाव घेणं मात्र टाळलं आहे.
पण, आता काय स्टँपपेपरवर लिहून देऊ का की मी राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत सोडणार नाही, असं खुद्द अजित पवार यांनीच स्पष्ट केलं होतं. हेही विशेष.

फोटो स्रोत, ANI
एकिकडे अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचं चित्र असताना शरद पवार यांच्या पुस्तकामुळे उद्धव ठाकरेसुद्धा त्यात ओढले गेले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकातून नाराजी व्यक्त केली आहे. पण, संजय राऊत यांना मात्र तो मजकूर अप्रस्तुत वाटतोय.
“2 दिवस लोक पुस्तक वाचतात, नंतर ते ग्रंथालयात जातं, जाऊ द्या...,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत माझ्याकडून महाविकास आघाडीच्या एकीला तडा जाईल असं काही होणार नाही, असं स्पष्टीकरण दिलंय.
तिकडे काँग्रेसच्या गोटात आणखीनच गोंधळ सुरू आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर बोलताना, “जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी मजबूत आहे,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच आघाडी तुटू शकते असं सूचित केलंय.

फोटो स्रोत, ANI
निपाणीतल्या एका सभेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे, पुढे काय होईल माहिती नाही, असं वक्तव्य करून पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वेगळीच राळ उडवून दिली आहे.
दुसरीकडे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात मात्र अपमानास्पद वक्तव्यांची स्पर्धाच लागली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना
“संजय राऊतांनी चोंबडेगिरी थांबवावी,” असं नाना पटोले म्हणाले. तर त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी “चाटूगिरी कोण करतं हे कळेलंच”, असं म्हटलंय.
शिवाय “नाना पटोले यांना त्यांचा पक्षाच कुणी गांभीर्यानं घेत नाही आणि त्यांच्यापेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात,” अशी टीकासुद्धा संजय राऊत यांनी केलीय.
मुळात हे मानअपमान नाट्य सुरू झालं ते महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांबाबत नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे.

फोटो स्रोत, Getty Images
या पुढच्या सभा आता पुढे ढकलण्यात आल्याचा दावा नाना पटोले यांनी केला होता. त्यांच्याच दाव्याची री पुढे ओढत आता उद्धव ठाकरे यांनीही उन्हामुळे सभा पुढे ढकलत असल्याचं जाहीर केलं आहे.
कारण जरी उन्हाचं देण्यात आलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडी आणि येत्या 15 मेच्या आधी कुठल्याही क्षणी येऊ घातलेला सुप्रीम कोर्टाचा निकाल या निर्णायाच्या मुळाशी आहे हे कुणाच्याही सहज लक्षात येऊ शकतं.
गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक चकमकी आणि मानअपमान नाट्यात महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाली आहे का? ही वज्रमूठ आता संपुष्टात येईल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
महाविकास आघाडीचं अस्तित्व कधीपर्यंत?
महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा सर्वत्र एकच प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे – हे सरकार कधीपर्यंत टिकेल? त्यावर सर्व सर्व राजकीय विश्लेषकांचं उत्तर असायचं ते म्हणजे – जोपर्यंत शरद पवार यांच्या मनात आहे तोपर्यंत...
पण प्रत्यक्षात नेकमं काय घडलं ते वेगळं सांगायची गरज नाही. शरद पवारांची इच्छा असतानाही उद्धव ठाकरेंनी शस्त्र टाकली आणि सरकार पडलं.
त्यामुळे आतासुद्धा महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार? या प्रश्नाला जसं शरद पवार यांच्या राजीनाम्याला जोडून पाहिलं जात आहे तसंच ते तिनही पक्षांच्या नेत्यांच्या वाटचालीवरूनसुद्धा जोखलं जात आहे.
महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार हे येणाऱ्या परिस्थितीवरच अवलंबून असल्याचं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांना वाटतं. पण त्यांच्या समोर सध्या तरी ‘भांडा पण नांदा’ असाच पर्याय असल्याचं ते अधोरेखित करतात.

फोटो स्रोत, ANI
ते सांगतात, "एक वेळ होती जेव्हा शिवसेनाबरोबर असलेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुगीची स्थिती होती. पण, आता मात्र उद्धव ठाकरे यांचा गट कामाचा नाही अशी भावना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये आहे. पण सध्याची राजकीय स्थिती पाहाता त्यांच्यावर एकत्र राहाण्याची राजकीय अपरिहार्यता आहे. ते एकत्र राहिले तर ते भाजपसारख्या अजस्त्र शक्तीचा सामना करू शकतील.”
“नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी होत राहतील. ते भांडतील. जागावाटपावरून धुसफूस होत राहील. पण निवडणूक मात्र ते एकत्रच लढतील. तरच ते टिकू शकतील याची त्यांना जाणीव आहे,” असं उन्हाळे पुढे सांगतात.

फोटो स्रोत, ANI
सकाळ माध्यम समूहाचे संचालक आणि संपादक श्रीराम पवार हे संजीव उन्हाळे यांच्या मताशी सहमती दर्शवतात.
"महाविकास आघाडीच मुळात एका राजकीय गरजेतून निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आधीपासून एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव होता. पण शिवसेना त्यात सहभागी होणं एक मोठा बदल आहे," असं मत ते नोंदवतात.
बीबीसी मराठीशी बोलताना पवार यांनी सांगितलं, “भाजपचं एक प्रकारचं दडपण या तिन्ही पक्षांवर आहे. भाजपची वाढ झपाट्याने होत आहे. त्यांच्याकडे सत्ता गेली तर आपलं अस्तित्व संपुष्टात येईल अशी भीती तिनही पक्षांना होती. त्यामुळे ते एकत्र आले. पण आता सत्ता गेल्यानंतरच्या काळातही तिनही पक्षांसाठी समान धोका एकच आहे. तिघं मिळून कदाचित महाराष्ट्र जिंकू शकता. ते एकत्र लढतात तेव्हा भाजपच्या पराभवाची शक्यता वाढते हे आपण पाहिलं आहे.”
“आज तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी म्हटलंय की आघाडीला तडा जाणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की भाजपसमोर त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणं कठीण आहे. पण, तिन्ही पक्षांच्या नेत्यांना हे वारंवार सांगावं लागतंय त्यातूनच त्यांच्यात मतभेद आहेत हे स्पष्ट होतंय,” असं पवार सांगतात.
या पक्षांमध्ये वौचारीक साम्य कमी आहे. पण तरीही आघाडी पुढे चालण्याची शक्यता जास्त आहे. कारण प्रत्येकाला आपआपल्या पक्षाच्या भवितव्याची चिंता आहे, असं पवार यांना वाटतं.
त्याचवेळी शरद पवार यांच्या राजीनाम्याचा मात्र महाविकास आघाडीवर नक्की परिणाम होईल, असं पवार यांना वाटतं.
ते सांगतात, “शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपद सोडल्यामुळे मात्र महाविकास आघाडीच्या अडचणीत भर पडू शकते. पवार राजकारणातून खरंच दूर झाले तर मात्र आघाडी आधी होती तशीच चालेल याची खात्री नाही.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








