‘कसबा पॅटर्न’ महाविकास आघाडी राज्यस्तरावर राबवू शकेल?

फोटो स्रोत, FACEBOOK
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
नुकत्याच पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार आश्विनी जगताप विजयी झाल्या. पण कसब्यातल्या निकालाची सर्वत्र जास्त चर्चा झाली.
यामागचं कारण म्हणजे की, कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय महाविकास आघाडीसाठी दिलासादायक ठरला.
2 मार्चला पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यानंतर 8 मार्च रोजी बातम्या समोर आल्या की, महाविकास आघाडीकडून पुढील दोन महिन्यात राज्यभर संयुक्त सभा घेण्यात येणार आहेत.
या सभांना महाविकास आघाडीमधले प्रमुख नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, शरद पवार संबोधित करतील अशीही माहिती समोर आली.
पण राज्यभरातल्या महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कसब्यातल्या पॅटर्न महाविकास आघाडी राज्यभर राबवू शकेल का?, महाविकास आघाडी समोर कोणती आव्हानं आहेत? नेत्यांनी एकत्र घेतलेल्या सभांमुळे कार्यकर्त्यांची एकत्र मोट महाविकास आघाडी एकत्र बांधू शकेल का? अशा काही मुद्द्यांना या लेखातून स्पर्श करण्याचा प्रयत्न करुया.
कसब्यात काय झालं?
कसबा पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर ही जागा महाविकास आघाडी एकत्र लढेल हे स्पष्ट झालं. कसब्याची जागा काँग्रेसला तर चिंचवडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली.
पण चिंचवडमध्ये मात्र महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते राहुल कलाटे यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा होती.
उमेदवारी न मिळाल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली.
वंचित बहुजन आघाडीने राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला. याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांवर झाल्याचं जाणकार सांगतात.

फोटो स्रोत, FACEBOOK
तर कसब्यातून मात्र बंडखोरी होऊ न देण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली. काँग्रेसच्या इच्छूक उमेदवाराने अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यात काँग्रेसला यश आलं.
यामुळे कसब्यामध्ये थेट भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली.
याशिवाय कसब्यामधून काँग्रेसने स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली.
संपुर्ण कसबा मतदारसंघात जनसंपर्क असलेल्या रवींद्र धंगेकरांच्या रुपाने कसब्यात काँग्रसने चांगला उमेदवार दिला, अशी जनभावना निर्माण झाली.
रविंद्र धंगेकर यांनी आधी शिवसेना आणि मनसेमध्ये काम केलेलं असल्याने, त्यांची स्वतःची कसब्यात मोठी ताकद होती.
एकीकडे कसब्यात भाजपचा जोरदार प्रचार सुरु असताना, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते एकत्रितपणे प्रचारात उतरल्याचे बघायला मिळाले.
भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरिष्ठ नेते प्रचारात होते तर महाविकास आघाडीकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांनी रोड शो आणि सभा घेतल्या.

फोटो स्रोत, Getty Images
‘विजयासाठी विरोधकांची एकजूट आवश्यक’
कसब्यातले नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या एकजुटीचा उल्लेख केला.
कसब्याच्या निकालामुळे विरोधकांसाठी कोणता पर्याय समोर आला आहे हे ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी स. का. पाटील आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या लढतीचाही उल्लेख त्यांनी केला.
“कसब्याच्या निकालाने एक गोष्ट नक्की दाखवली आहे. ती म्हणजे, विरोधक जर एकजिनसीपणाने एकत्रित झाले तर आपण जिंकू शकतो. साधारणपणे 30 वर्ष भाजपचा बालेकिल्ला, भुईसपाट करुन आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वास केवळ पुणेकरांनाच नाही, केवळ महाराष्ट्रातल्या जनतेला नाही तर देशातल्या जनतेला दिलेला आहे. पुढची दिशा दाखवलेली आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यावेळी तिथे उपस्थित असलेले पुण्यातील काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांच्याशी बोलताना ठाकरे म्हणाले की “मोहनराव आता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आता पुढच्या निवडणुका सगळ्यांनी एकत्रितपणे याचप्रकारे काम करुन जिंकूया ही अपेक्षा करतो.”
महाविकास आघाडीत एकजूट दिसते?
उद्धव ठाकरे यांच्याकडून एकसंघपणाची जरी भाषा असली तरीही नुकत्याच घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या एकसंघपणाचा विचार करावा लागेल.
नुकत्याच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्याचे निकाल जाहीर झाल्यानंतर नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयावरुन भुवया उंचावल्या. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागा लढवल्या. त्यापैकी राष्ट्रवादीचे 7 उमेदवार निवडून आले. यानंतर राष्ट्रवादीने एनडीपीपी आणि भाजपच्या सरकारला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला.
यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. ‘पन्नास खोके, नागालँड ओके’ अशा घोषणा विधिमंडळात ऐकू आल्या.
नागालँडविषयी विचारल्यावर ‘आमचा पाठिंबा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे. भाजपसाठी आम्ही सरकारमध्ये नाही,’ अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
तर दुसरीकडे महाराष्ट्रातूनच महाविकास आघाडीची मते फुटल्याचं समोर आलं.
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताबदल झाल्याच्या बातम्या आल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जवळपास 5 मते फुटून भाजप नेते शिवाजी कर्डीले तिथे विजयी झाले.
याशिवाय काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याआधी स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसने स्वबळावर लढवण्यासंदर्भात विधानं केली आहेत.
या घडामोडींवर भाष्य करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात, “नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा देणं हे राष्ट्रवादीचं कंपलशन होतं. काही वेळेला राजकीय पक्षांना ते पूर्ण करावे लागतात. त्याचा मोठ्या आघाड्यांवर परिणाम होत नाही. जर नागालँडमध्ये ते भाजपसोबत गेले नसते तर त्यांचा पक्ष फुटला असता.”
“ते आमदार बरोबर राहिले नसते. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. त्यामुळे काही सत्ताबदल झाला असं नाही. निवडून आलेले आमदार स्वतसोबत ठेवण्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला. तेवढा समजूतदारपणा हा मोठ्या आघाडीमधल्या नेत्यांमध्ये असतो. या एका मुद्द्यावरुन बेबनाव होईल असं वाटत नाही. स्थानिक पातळीवरची बंडखोरी रोखणं हेच मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असेल.”
वरिष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या मते तीनही पक्ष विरोधात असल्याने त्यांना राजकारणात व्यावहारिक दृष्टीकोन ठेवणं गरजेचं आहे.
“जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा भाई जगताप ते नाना पटोले यांचा वेगळा सूर होता. सरकारमध्ये असताना वेगळा सूर आळवला जाऊ शकतो कारण तेव्हा वेगळी ताकद असते. विरोधात असताना ताकद कमी झालेली असते. त्यावेळी तुम्हाला तडजोड करत, लवचिकपणा ठेवून प्रॅक्टिकल राजकारणच करावं लागतं. मला वाटतं की, महाविकास आघाडीच्या तीनही घटकांना हे कळून चुकलं आहे की ते एकसंघ राहिले तर टिकू शकतील,” असं सुधीर सुर्यवंशी यांनी सांगितलं.
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणती आव्हानं असतील?
2019 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यावर हे तीन राजकीय पक्ष एकत्र आले. त्यानंतर पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढल्याचं दिसलं.
पण सार्वत्रिक निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाताना सगळ्यात मोठं आव्हान हे जागावाटपाचं असेल तज्ज्ञांचं मत आहे.
पोटनिवडणुकांमध्ये जागा कुणी लढवायची हा मुद्दा नसतो. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी जागावाटपाचा तिढा महाविकास आघाडी कसा सोडवते हे बघणं महत्त्वाचं असेल.

फोटो स्रोत, ASHISH SHELAR/TWITTER
“कुठल्याही आघाडीतला सगळ्यात मोठी अडचण असते ता म्हणजे जागावाटपची. आता पुढच्या वेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत ठाकरे शिवसेना हा नवीन पार्टनर असणार आहे. ठाकरेंच्या निवडून आलेल्या जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आलेल्या जागा कोणत्या सोडायच्या, सगळ्या 55-56 जागा सोडायच्या की त्यांच्याकडे जे लोकप्रतिनिधी राहिले आहेत त्या जागा सोडायच्या हा मुद्दा असणार आहे.”
“जागावाटप करताना तिथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची काय भुमिका असेल हे पण महत्त्वाचं ठरेलं. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुका ह्या खूप वेगळ्या असतात. एका पोटनिवडणुकीवरुन सार्वत्रिक निवडणुकीचे आराखडे बांधलं जाऊ शकत नाही,” असं अभय देशपांडे यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीला स्थानिक पातळीवर बंडखोरी रोखता येईल?
कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकांमधून बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला फटका बसू शकतो हे समोर आलं. यामुळे पक्षाच्या नेत्यांनी कितीही एकत्र राजकीय सभा घेतल्या किंवा दौरे केले तरीही स्थानिक पातळ्यांवर बंडखोरी थोपवणं हे मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असले असं विश्लेषकांचं मत आहे.
“बंडखोरी होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. बंडखोरी झाली की त्याचा फायदा भाजपला होईल. चिंचवडवरुन हे स्पष्ट झालं आहे. किंवा नगरमध्ये जे पाहायला मिळालं ते ही याचचं उदाहरण आहे. राजकारणात 2 अधिक 2 चारच होतात असं नाही. त्यामुळे धंगेकर यांच्यासारखे चांगले उमेदवार महाविकास आघाडीला द्यावे लागतील. ते त्यांना शोधावे लागतील. तीन पक्ष एकत्र आले म्हणजे विजय नक्की आहे असं होणार नाही,” असं वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी सांगितलं.
शिवसेनेची पारंपारिक मतं काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जातील?
बंडखोरी रोखण्यासोबत मतांचं विभाजन न होऊ देणं हे महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचं ठरेल.

फोटो स्रोत, Getty Images
आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मते शिवसेनेला जाऊ शकतील कारण शिवसेनेने भाजपविरोधात ठोस भूमिका घेतली आहे. पण ठाकरे शिवसेनेची जी पारंपरिक उजव्या बाजूकडे झुकणारी मते आहेत ती, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडे जातील का? असा प्रश्न पुढे येतो. कसब्यात ती गेली. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. पण कसब्यात भाजपकडूनही काही चुका झाल्या होत्या. उमेदवार चांगला असेल तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला नक्की होईल,” असं अभय देशपांडेंनी सांगितलं
नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक
महाविकास आघाडीच्या नेत्यांमधली एकजूट फक्त दिसून उपयोग नाही तर ग्राऊंडवरच्या कार्यकर्त्यांमध्येही ती परावर्तीत झाली तरच महाविकास आघाडीला फायदा होऊ शकेल असं तज्ज्ञ सांगतात.
तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केलं तरच त्याचं मतांमध्ये रुपांतर होताना दिसेल असं सुधीर सुर्यवंशी सांगतात.
“जोपर्यंत कार्यकर्त्यांचे जोपर्यंत सूर जुळत नाही, तोपर्यंत मते ट्रांसफर होत नाहीत. कसब्यामध्ये ते जेलींग होताना दिसले. शिवसेना (ठाकरे) कार्यकर्ते इर्षेने पेटून प्रचार करत होते. बरेच वेळा उमेदवार दिला जातो पण मित्र पक्षाचे मते ट्रांसफर होत नाहीत. यामुळे पराजय होतो. जे चिंचवडमध्ये दिसलं. म्हणून महाविकास आघाडी जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणण्यात यशस्वी झाले, चांगले उमेदवार आयडेंटीफाय करण्यात यशस्वी झाले, तरच त्यांना महाराष्ट्रात चांगली संधी मिळू शकेल,” असं सुधीर सुर्यवंशी यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








