शिवसेनेच्या शाखांवर कोणाचा हक्क? शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेंची शिवसेना-ठाकरे गटांत संघर्ष

शिवसेना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेना
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, मुंबई

शिवसेनेच्या शाखा नेमक्या कोणाच्या? शिवसेनेच्या शाखेत ठाकरे गटाचे कार्यकर्ते बसणार की शिंदेंच्या शिवसेनेचे? कोणती शाखा कोणाची हे कसं ठरवणार? असे अनेक प्रश्न आजही शिवसैनिकांच्या मनात कायम आहेत. याबाबत आजही अस्पष्टता आहे आणि म्हणूनच शाखांवरून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये वारंवार संघर्ष होताना दिसतोय.

ठाण्यात सोमवारी (6 मार्च) रात्री शिवाई नगरची शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. हा संघर्ष एवढा वाढला की पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

शिवसेनेच्या शाखेला टाळं लावल्यावरून आणि शाखेत कोण बसणार यावरून हा वाद झाल्याची शक्यता आहे. तर यापूर्वी लोकमान्य नगर आणि कोपरी भागातल्या शाखा ताब्यात घेण्यावरून असाच संघर्ष झाल्याचं समोर आलं होतं.

शिवसेना कोणाची हा राजकीय संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहचला आहे. याबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला शिवसेनेची ओळख असलेल्या शिवसेनेच्या या शाखांवर कोणाचं वर्चस्व अधिक यासाठी दोन्ही गटात चढाओढ सुरू झाल्याचं दिसून येतं. हे राजकारण नेमकं काय आहे? आणि शिवसेनेसाठी शाखा इतक्या महत्त्वाच्या का आहेत? जाणून घेऊया.

ठाण्यात काय घडलं?

होळीच्या दिवशी म्हणजे 6 मार्च रोजी संध्याकाळी ठाण्यातील शिवाई नगर येथील शिवसेनेच्या शाखेत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पोहचले.

याचवेळी याठिकाणी ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा जमले. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे की, या शाखेला टाळं लावलं होतं. परंतु ही शाखा आमची आहे.

दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाने शाखेला लावलेलं टाळं तोडण्यावर आक्षेप घेतला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना टाळं तोडण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या 67 पैकी 66 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

फोटो स्रोत, Thane Shivsena

फोटो कॅप्शन, ठाणे महानगरपालिकेच्या 67 पैकी 66 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

सर्वोच्च न्यायालयातून अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत शाखा बंद ठेवा, अशी मागणी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

तर माध्यमांशी बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले, “आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्याचा कारभार एकनाथ शिंदे चालू ठेवला. ही शाखा प्रताप सरनाईक यांनी बांधलेली आहे. इथे 99 टक्के शिवसैनिक आमचे आहेत. मी जिल्हा प्रमुख आहे. सर्वोच्च न्यायालयाने शाखा त्यांना द्या असं सांगितलेलं नाही.

कायदा आम्हालाही कळतो. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला परवानगी मिळालेली आहे. ही शाखा आमची आहे. परंतु शाखेला ह्यांनी लॉक लावलं होतं. आमच्या घरात बसायला ह्यांची परवानगी लागेल का?”

दरम्यान, शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटात तणावाचं वातावरण निर्माण होत असल्याने ठाण्यातील प्रत्येक शाखेबाहेर पोलिसांनी सुरक्षा द्यावी आणि पोलीस तैनात करावेत अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी यापूर्वीच केली आहे.

खासदार संजय राऊत

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, खासदार संजय राऊत

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटाकडून (शिवसेना) शाखा ताब्यात घेण्याची शक्यता ठाकरे गटातील नेत्यांनी वर्तवली आहे.

यापूर्वी अनेकदा माध्यमांशी बोलताना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील नेत्यांनी ‘आम्हाला शिवसेनेची मालमत्ता, संपत्ती, शाखा, निधी असं काहीच नको आहे, आम्ही कशावरही दावा सांगणार नाही,’अशी प्रतिक्रिया दिली होती.

‘आम्ही पुन्हा मिळवू’

शिवसेनेच्या शाखा बळकवण्याचा प्रयत्न केवळ ठाण्यापुरताच मर्यादित असून त्यांच्या गटाचं अस्तित्त्व सुद्धा ठाण्यापुरतच आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला हे शोभणारं नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “पोलीस आणि सत्तेचा गैरवापर करून जे काही बळकवलं जात आहे ते आम्ही पुन्हा मिळवू. ना तुमची सत्ता राहील ना तुमची दादागिरी. त्यांच्या गटाचं अस्तित्त्व केवळ ठाण्यापुरतच आहे. पोलिसांच्या आडून हल्ले केले जात आहेत. हे सगळं फार काळ टिकणार नाही.”

ते पुढे म्हणाले, “ठाण्यात जे काही सुरू आहे ते थांबवा. भाजप तुमचा वापर करत आहे हे तुम्हाला भविष्यात कळेल. हे सगळं मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणारं नाही,” असंही राऊत म्हणाले.

शाखांचा जन्म कसा झाला?

मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी म्हणून 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेचा विस्तार मात्र शिवसेनेच्या शाखांमुळे झाला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर त्यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

सुरुवातीला मुंबईत मराठी माणसं एकवटली आणि बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी, कार्यकर्ते म्हणून काम करण्यासाठी नाक्यानाक्यावर तरुण जमायाला सुरूवात झाली. या जमलेल्या कार्यकर्त्यांसाठी, समर्थकांसाठी कार्यालये हवीत यादृष्टीने शाखा अस्तित्त्वात आल्याचं जाणकार सांगतात.

शिवसेनेची शाखा (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेनेची शाखा (प्रातिनिधिक फोटो)

याला 1968 साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचीही पार्श्वभूमी आहे. मुंबईत कानाकोपऱ्यात शिवसेनेचे कार्यकर्ते असावेत आणि शिवसेना घराघरात पोहचावी यासाठी पक्षाला शाखांची मदत झाली. शिवसेनेचे नगरसेवक निवडून आल्यानंतर याच शाखांमध्ये बसून स्थानिकांची कामं केली जायची. मग यानंतर शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, विभागीय नेते, उपनेते अशीही संघटनात्मक पदं अस्तित्त्वात आली.

राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाखा सुरू झाल्या. यामुळे शिवसेनेचा विस्तार झाला. पक्ष तळागाळत पोहोचवण्यासाठी शाखांची मदत झाली.

केवळ शिवसेना वाढवण्यासाठीच शाखांची संकल्पना कामी आली नाही तर शाखांनी शिवसेनेचे नेते सुद्धा घडवले. शाखांमध्ये बसल्यामुळे, पक्षाचं कामकाज केल्यामुळे, ते जवळून पाहता येणं शक्य झाल्यामुळे आणि त्यातून प्रेरणा मिळाल्यानेही स्थानिक मराठी माणसांमधून पक्षाचं काम करण्यासाठी मोठ्या संख्येने इच्छुक पुढे येऊ लागले. आणि यातूनच शिवसेनेचे नेते सुद्धा घडले जे भविष्यात महापौर, आमदार, खासदार आणि मंत्री झाले.

शाखांवर वर्चस्व का हवंय?

सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येण्यापूर्वीच शिंदे आणि ठाकरे गाटच्या कार्यकर्त्यांकडून विविध शाखांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचं कामकाज अनेक वर्षांपासून जवळून पाहिलेले संदीप प्रधान सांगतात, “शाखा या शिवसेनेची ओळख आहेत. शिवसेनेच्या शाखा या कायम शिवसैनिकांच्या जवळ राहिल्या आहेत. त्यांचं शाखांशी भावनीक नातं तर आहेच परंतु स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यात शाखांची मोठी भूमिका राहिली आहे. या शाखांच्या माध्यमातूनच शिवसेनेचे काम आतापर्यंत चालत आलेलं आहे.

कोणालाही कोणत्याही वेळेत मदत लागली तर शाखेतली मुलं किंवा कार्यकर्ते पोहचतात. शाखांच्या माध्यमातूनच पक्षाचं कामकाज अजूनही लोकांच्या डोळ्यासमोर आहे. हेच कारण आहे की शिवसेना कोणाची या भांडणात शाखा सुद्धा दोन्ही गटांसाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.”

शिवसेनेची शाखा पक्षाची ओळख आहे. (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेनेची शाखा पक्षाची ओळख आहे. (प्रातिनिधिक फोटो)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पूर्वीच्या काळी शिवसेनेच्या शाखेतून अगदी भावाभावाची भाडणं, उसणे पैसे वसूल करणं, जमिनीचे आणि घराचे वाद सोडवणं, मुलीला कोणी त्रास देत असल्याचा निवाडा करणं, हॉस्पिटलचा खर्च अशी कित्येक कामं जणून समांतर सत्ता सुरू असल्याप्रमाणे शाखेत चालयाची असंही संदीप प्रधान सांगतात. यामुळे शाखा ही शिवसेनेची घराघरात पोहचलेली ओळख आहे.

दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या सर्व शाखा मोक्याच्या ठिकाणी आहेत. म्हणजे दर्शनीय भागात आहेत. त्या प्रत्यक्षात कोणाच्या मालकीच्या आहेत यापेक्षा त्या कोणत्या गटाच्या ताब्यात येतात हे राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण एवढ्या शाखा पुन्हा कशा उभारणार? त्यासाठी प्रत्येक ठिकाणी दर्शनीय भागात जागा मिळेलच असं नाही आणि शाखा म्हणजे त्या लोकांच्यामध्ये, वस्तीजवळ असणं गरजेचं आहे जेणेकरून लोक लगेच शाखेत पोहचू शकतील.

संदीप प्रधान सांगतात, “आता न्यायालयाच्या निवाडा येण्यापूर्वी जेवढ्या शाखा ताब्यात घेतील तेवढा त्यांना फायदा होईल. उद्या निकाल त्यांच्या विरोधात लागला तर त्यांना याचा फायदा होईल. हा सुद्धा त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो.”

शिवसेनेच्या शाखा कोणाच्या?

मुंबईत शिवसेनेच्या 227 शाखा आहेत. तर MMR रिजनमध्ये ठाण्यासह जवळपास 500 शाखा आहेत. एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा दोन गटात विभागले गेले आहेत.

दादरची शिवसेना शाखा शिवाई ट्रस्टच्या अंतर्गत आहे. जी अधिकृतपणे पक्षाकडून चालवली जाते. पण इतर शाखा या भाडेतत्वावर किंवा कुणाच्या तरी मालकीच्या आहेत. त्या शाखेतील जे शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झाले आहेत त्या शाखा त्या त्या गटाकडे जाऊ शकतात.

या शाखांची मालकी कोणाकडे द्यायची की प्रत्येक शाखेचा निर्णय त्या कार्यालयाच्या मालकी हक्कानुसार स्वतंत्र होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापर्यंत वाट पहावी लागेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)