वयाच्या चौथ्या वर्षी सुंता करताना गंभीर संसर्गात गमावले लिंग, 20 व्या वर्षी यशस्वी प्रत्यारोपण

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका 20 वर्षीय तरुणावर शस्त्रक्रिया करून यशस्वीरीत्या लिंग प्रत्यारोपण करण्यात आलं आहे.
    • Author, अमरेंद्र येरलगड्डा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एका 20 वर्षीय तरुणावर शस्त्रक्रिया करून यशस्वीरित्या लिंग प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. वयाच्या चौथ्या वर्षी सुंता करताना गंभीर संसर्ग होऊन त्याला लिंग गमवावं लागलं होतं.

हैदराबादच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि या तरुणाच्या विनंतीवरून बीबीसीने त्याची ओळख गोपनीय ठेवली आहे.

हा तरुण मूळचा सोमालियातील असून 2022 च्या अखेरीस तो शस्त्रक्रियेसाठी हैदराबादमधील मेडिकव्हर रुग्णालयात दाखल झाला होता.

डॉक्टरांनी सांगितलं की, हा तरुण रुग्णालयात आला तेव्हा त्याला लिंग नव्हतं. त्यामुळे त्याने शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाशी संपर्क साधला.

"त्या तरुणानं आम्हाला सांगितलं की, तो 4 वर्षांचा असताना त्याच्या लिंगाला संसर्ग झाला होता. त्यामुळे संसर्ग वाढू नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून लिंग काढून टाकले," माधापूरमधील मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉ. दसारी मधु विनय कुमार यांनी बीबीसीला सांगितले.

सुंता खूप काळजीपूर्वक केली पाहिजे. ती योग्यरीत्या केली गेली नाही, तर संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे लिंग काढावं लागू शकतं, असंही डॉक्टरांनी नमूद केलं.

वयाच्या चौथ्या वर्षी संसर्गामुळे शस्त्रक्रिया काढल्यापासून सोमालीयाच्या या तरुणाला लिंग नव्हते. त्याला मूत्रविसर्जन करता यावं यासाठी अंडकोषांजवळ एक विशेष मार्ग तयार करण्यात आला होता. त्यामुळे त्याची मूत्रविसर्जनाची अडचण तात्पुरती दूर झाली.

असं असलं तरी वय वाढल्यानंतर प्रौढ अवस्थेत त्याला लघवी करण्यास त्रास होत होता.

याशिवाय लग्न करून परिपूर्ण जीवन जगता यावं म्हणून त्याला लिंग प्रत्यारोपणही करायचे होते, अशीही माहिती डॉक्टरांनी दिली.

दोन टप्प्यात लिंग शस्त्रक्रिया

या तरुणावर दोन टप्प्यात लिंग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

वरिष्ठ सल्लागार मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. रवी कुमार म्हणाले की, "या तरुणावर प्रथम मूत्रमार्ग बाहेर पडतो त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आली."

त्यानंतर त्याच भागात लिंग तयार करून त्याचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. ही शस्त्रक्रिया डॉ. दसारी मधु विनय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हे करताना सर्वात आधी हाताची त्वचा, रक्तवाहिन्या, चरबी आणि नसा (रेडियल धमनी) गोळा करण्यात आल्या. हे सर्व लिंगासारख्या एका नळीमध्ये बसवण्यात आले.

हे नळीसदृश लिंग मूत्रमार्गाजवळ बसवण्यात आले. तसेच तेथे रक्तवाहिन्या व त्वचा जोडण्यात आली. याला मायक्रोव्हस्क्युलर सर्जरी म्हणतात, असं डॉक्टरांनी सांगितलं.

शस्त्रक्रिया झाली तो तरुण आणि डॉक्टरांचं पथक
फोटो कॅप्शन, या तरुणावर दोन टप्प्यात लिंग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

या शस्त्रक्रियेत रक्तवाहिन्या पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. लिंगात एक धमनी आणि चार शिरा प्रत्यारोपित केल्या जातात.

ही शस्त्रक्रिया दीड वर्षांपूर्वी झाली आणि ती करण्यासाठी सुमारे 10 तास लागले, अशी माहिती विनय कुयार यांनी दिली.

"सामान्यपणे मांडीतून त्वचा, चरबी आणि रक्तवाहिन्या घेता येतात. त्यामुळे लिंगातील चरबी अधिक ठळक दिसते. म्हणूनच आम्ही हाताची (फोरआर्म) त्वचा घेतली," डॉ. विनय कुमार यांनी बीबीसीला सांगितलं.

शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी या तरुणाला एक वर्ष निरीक्षणाखाली ठेवलं. आता त्याची तपासणी केली असता त्याच्या लिंगाला संवेदना जाणवत आहेत.

"शस्त्रक्रियेनंतर मुतखड्यामुळे तरुणाला संसर्ग झाला. त्याच्यावर काही किरकोळ शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या. त्यामुळे त्याला संवेदना जाणवायला इतका वेळ लागला," अशी माहिती डॉ. विनय कुमार यांनी बीबीसीला दिली.

लाल रेष
लाल रेष

शस्त्रक्रियेनंतर सामान्यपणे लैंगिक संबंध ठेवता येणार

तीन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांनी या तरुणाच्या शरीरात पेनाइल इम्प्लांट बसवले. यामुळे आता तो सामान्यपणे लैंगिक संबंध ठेऊ शकेल, असे डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

या शस्त्रक्रियेनंतर हा तरुण सोमालियाला गेला आहे. आता तो दोन वर्षांनी लग्न करणार आहे, असं डॉ. विनय कुमार यांनी नमूद केलं.

बीबीसीने या तरुणाशी बोलण्यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र, तो माध्यमांशी बोलण्यास तयार नाही.

"या तरुणाला इंग्रजीही येत नाही. तो फक्त सोमाली बोलू शकतो. आम्ही त्याच्याशी अनुवादकाच्या मदतीने बोललो," अशी डॉक्टरांनी सांगितले.

'वीर्यस्खलन नाही'

"तरुणाच्या लिंगात पेनाइल इम्प्लांट असल्यामुळं तो सामान्यपणे लैंगिक संबंध ठेवू शकतो. मात्र त्याचं वीर्यस्खलन होणार नाही," असंही डॉक्टरांनी नमूद केलं आहे.

डॉक्टर म्हणाले, "लहानपणी लिंगात संसर्ग झाल्यानं त्याच्या सेमिनल वेसिकल्सचं नुकसान झालं. यामुळं वीर्य उत्पादनावर परिणाम झाला."

या तरुणाला बाळ हवं असेल, तर त्याला आयव्हीएफची मदत घ्यावी लागेल.

या शस्त्रक्रियेचा खर्च किती?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या प्रकारच्या शस्त्रक्रिया सामान्यतः जन्मतः महिलांचं शरीर असलेल्या आणि पुरुष होण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींवर केल्या जातात.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अशा शस्त्रक्रियेसाठी 10 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.

"या शस्त्रक्रिया ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांकडून केल्या जातात ज्यांना पुरुष बनायचे आहे. या शस्त्रक्रिया भारतात दिल्ली आणि मुंबईत केल्या जात आहेत. परंतु, हे उदाहरण काहीसे दुर्मिळ आहे," डॉ. विनय कुमार म्हणाले.

त्यांनी सांगितले की, जर कर्करोग किंवा अपघातासारख्या कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत लिंग काढावं लागलं, तर या प्रकारची शस्त्रक्रिया करता येते.

अशा शस्त्रक्रियेसाठी 10 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. जर लिंगाला कोणताही संसर्ग झाला नसेल, तर ही शस्त्रक्रिया 5 ते 8 लाख रुपयांमध्ये करणं शक्य आहे, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)