MRI स्कॅन करण्यासाठी गेलेल्या महिलेचा मशीनमध्येच मृत्यू; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

एमआरआय मशीन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इतिकाल भवानी
    • Role, बीबीसी तेलुगू

एमआरआय स्कॅन करण्यासाठी गेलेल्या महिलेचा मशीनमध्येच मृत्यू झाल्याची घटना आंध्र प्रदेशातल्या एलुरूमध्ये 4 फेब्रुवारी रोजी घडली आहे.

एलुरू जिल्ह्यातील प्रथिकोल्लंका येथे राहणाऱ्या 60 वर्षीय नल्लागाचु रामथुलसम्मा या महिलेला एमआरआय स्कॅन करताना त्यांचा जीव गमवावा लागला.

स्कॅनिंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे रामथुलसम्मा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

एलुरू पोलिसांनी या प्रकरणात संशयास्पद मृत्यूची तक्रार दाखल केली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

नेमकं काय घडलं?

60 वर्षीय नल्लागाचु रामथुलसम्मा यांना काही काळापासून किडनीचा त्रास सुरू होता. त्यामुळं त्यांचं डायलिसीस सुरू होतं. डायलिसीस सुरू असताना त्यांना चक्कर येत होती. म्हणून डॉक्टरांनी त्यांना एमआरआय स्कॅन करायला सांगितला.

त्यानंतर रामथुलसम्मा यांचे पती कोटेश्वरा राव हे त्यांना घेऊन एलुरू शहरातल्या सुश्मिता डायग्नॉस्टिक्स सेंटरमध्ये गेले. त्या ठिकाणी एमआरआय सुरू असताना रामथुलसम्मा यांचा मृत्यू झाला. तपासणी करण्यासाठी एमआरआय मशीनमध्ये गेलेल्या रामथुलसम्मा मृतावस्थेतच मशीनमधून बाहेर आल्या.

मृत रामथुलसम्मा यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तपासणी केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला.

एमआरआय

फोटो स्रोत, Getty Images

रामथुलसम्मा यांना हृदयाचा आजार होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या हृदयात एक पेसमेकर देखील बसवण्यात आलेलं होतं. त्यांनी पेसमेकर बसवल्याची कल्पना दिलेली होती. मात्र, तरीही त्यांना एमआरआय करण्यासाठी पाठवण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

एलुरू टू शहराचे पोलीस निरीक्षक रमणा म्हणाले, "मृत महिलेचा पोस्टमॉर्टेम अहवाल आलेला नाही. एकदा तो अहवाल आला की, या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि त्याला कोण जबाबदार असू शकतं, हे आम्हाला कळेल."

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रामथुलसम्मा यांच्या मृत्यूबाबत बीबीसीने एलुरू जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. आर मालिनी यांच्याशी संपर्क साधला,

डॉ. मालिनी यांनी सांगितलं की, अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीचे नातेवाईक, डायग्नॉस्टिक्स सेंटरचे व्यवस्थापक आणि रामथुलसम्मा यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधला आहे.

डॉ. मालिनी म्हणाल्या, "नातेवाईकांच्या मते रामथुलसम्मा यांच्या हृदयात तीन वर्षांपूर्वी पेसमेकर बसवलेलं होतं. मागच्या पाच महिन्यांपासून त्यांचं डायलिसिस सुरू होतं. डायलिसीस करणाऱ्या डॉक्टरांकडे त्यांनी तक्रार केली होती की, त्यांना सतत चक्कर येत आहे."

"त्यानंतर त्या डॉक्टरांनी त्यांना डोक्याची तपासणी करण्यासाठी एमआरआय स्कॅन करून घेण्याचा सल्ला दिला. त्यांच्या हृदयात पेसमेकर असल्यानं तपासणी करण्याआधी हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला देखील घेण्यात आला होता. त्यानंतरच त्या तपासणी करण्यासाठी गेल्या."

"एमआरआय सुरू असताना रामथुलसम्मा यांच्या बाजूला त्यांचे पती उभे होते. मशीनमध्ये जात असताना रामथुलसम्मा या व्यवस्थित झोपत नव्हत्या. त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांनी पतीला त्यांचे पाय नीट पकडायला सांगितले."

"पती कोटेश्वर राव यांनी मला सांगितलं की, काहीवेळानंतर त्यांच्या पत्नीचं शरीर थंड पडलं आणि त्यामुळे ते जोरात ओरडले. मशिनमधून बाहेर आल्यानंतर रामथुलसम्मा यांच्या शरीराची कसलीही हालचाल होत नव्हती," असं डॉक्टर मालिनी यांनी सांगितलं.

डॉ. मालिनी म्हणाल्या की, एमआरआयची खोली साऊंडप्रूफ (ध्वनीरोधक) असल्याने त्यांना काहीही ऐकू आलं नाही, असं कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं.

एलुरू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

फोटो स्रोत, https://gmceluru.ap.gov.in/

डॉ. मालिनी यांनी सांगितलं, "स्कॅनिंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, त्यांच्या इमारतीत वरच्या मजल्यावर एक रेडिओलॉजिस्ट आहेत. मात्र, कुटुंबीयांनी दावा केला की तिथे फक्त एक टेक्निशियन बसलेला होता."

या तपासणी केंद्राला नोटीस बजावल्याची माहिती डॉ. मालिनी यांनी दिली आहे. तसेच रुग्णाच्या मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच कळेल हेही त्यांनी स्पष्ट केलं.

त्या म्हणाल्या, "कर्मचाऱ्यांनी चूक केली आहे. एमआरआय सुरू असताना रुग्ण अस्वस्थ झाला, तर तपासणी लगेच थांबवावी लागते. एमआरआय स्कॅनच्या मार्गदर्शक सूचनांमध्येच याचा उल्लेख आहे. या नियमाचं पालन करण्यात आलेलं नाही."

या प्रकरणात आरोप लावण्यात आलेल्या सुश्मिता डायग्नोस्टिक सेंटरला बीबीसीने संपर्क साधला. मात्र, त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. तो मिळाल्यानंतर इथे लगेच अपडेट करण्यात येईल.

पेसमेकर असेल तर एमआरआय करू नये का?

पेसमेकर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. हे उपकरण सूक्ष्म विद्युत लहरींचा वापर करून हृदयाचे ठोके नियंत्रित करतं.

मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) ही एक मोठ्या ट्यूबच्या आकाराची मशीन आहे. ही मशीन रेडिओ लहरी आणि संगणकाच्या मदतीने रुग्णाच्या विविध अवयव आणि उतींचे (टिश्यू) फोटो घेतं.

एमआरआय मशीनमध्ये एक उच्चक्षमतेचं मोठं चुंबक असतं. यामुळे शरीराभोवती एक मोठं चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) तयार होतं. यामुळेच एमआरआय स्कॅनला जाण्यापूर्वी तुमच्या अंगावरील धातूच्या वस्तू, दागिने, पर्स, बेल्ट इत्यादी काढून ठेवायला सांगतात.

पेसमेकर

फोटो स्रोत, Getty Images

आधीचे पेसमेकर बसवलेले असतील, तर एमआरआय करता यायचा नाही. मात्र मागील दशकात तंत्रज्ञानात प्रगती होऊन नवे पेसमेकर तयार झाले. हे पेसमेकर शरीरात असतील तरी एमआरआय करता येऊ लागला. त्यामुळे आता अशा रुग्णांना एमआरआय चाचणी करण्यातील अडथळा दूर झाला आहे.

एमआरआय मशीनला चालणारं पेसमेकर जरी बसवलेलं असलं, तरी ही चाचणी करताना मात्र डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली केली पाहिजे. यासोबतच, अचानक काही समस्या निर्माण झाल्यास तात्काळ उपचार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी देखील तयार असायला हवेत.

एमआरआय करताना कोणते धोके होऊ शकतात?

मागच्या दशकभरापासून एमआरआय चाचणीचे महत्त्व वाढले आहे. अमेरिका, ब्रिटन आणि जपानमध्ये एमआरआय करताना काही अपघात देखील झाले आहेत.

बहुतांश प्रकरणांमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत असे अपघात झाले आहेत. मात्र अनेक संशोधनांमधून एमआरआयमुळे मृत्यू होत असल्याची प्रकरणं फार क्वचितच घडतात हे स्पष्ट झालं आहे. अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की, प्राणघातक अपघातांचे प्रमाण खूप कमी आहे.

वेगवेगळ्या देशांमध्ये झालेली संशोधनं आणि अहवालांमधून हे समोर आलं आहे की, अशा अपघातांची बहुतेक प्रकरणं ही अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांमुळे घडतात. तसेच रुग्णांनी ही तपासणी करण्याआधी पुरेशा चाचण्या न केल्यामुळं किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्याचे संपूर्ण तपशील न सांगितल्यामुळंही घडतात.

एमआरआय

फोटो स्रोत, Getty Images

एमआरआय स्कॅन करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

एमआरआय स्कॅन करण्यापूर्वी पेसमेकर आणि मेटॅलिक इंट्राओक्युलर फॉरेन बॉडीज (IOFB) सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे असलेल्या व्यक्तींनी रेडिओलॉजिस्टला माहिती द्यावी.

न्यूरोस्टिम्युलेशन उपकरणे, श्रवणयंत्र, बुलेट, पेलेट्स, सेरेब्रल आर्टरी एन्युरिझम क्लिप्स आणि मॅग्नेटिक डेंटल इम्प्लांटची माहिती आधीच द्यावी.

तुम्हाला कृत्रिम अवयव बसवले असतील, आययुडी (गर्भाशयात बसवलं जाणारं यंत्र) बसवलं असेल, कानात किंवा नाकात दागिना बसवला असेल तरीही तुम्ही त्याबाबत माहिती दिली पाहिजे.

एमआरआय स्कॅन बघताना डॉक्टर

फोटो स्रोत, Getty Images

कधीकधी तुमच्या शरीरावर एखादा टॅटू असेल, तर त्याच्या शाईमध्ये धातूचे अंश असू शकतात.

एमआरआय करत असताना तुम्हाला अस्वस्थ वाटू लागल्यास किंवा अचानक गरम वाटू लागल्यास तात्काळ सांगितलं पाहिजे.

(स्रोत: नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन, एनएचएस)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.