हे '4 शोध' तेव्हा अयशस्वी मानले गेले, पण खरंतर त्यांनीच जग बदललं

तुम्हाला माहिती आहे का जगभरातील लाखो लोकांचा जीव वाचवणारा पेसमेकर अयशस्वी शोधाचा परिणाम आहे?
लाइटचा बल्ब किंवा प्रिंटिंग प्रेससारखी यशस्वी कल्पना जग बदलू शकते,असं म्हटलं जातं खरं पण कधी कधी असं होतं की अयशस्वी कल्पनाही जग बदलून टाकतात.
इतिहासात हे फक्त एकदाच घडलेलं नाही, तर असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा अयशस्वी कल्पनांनी जग बदलले आहे. ते संशोधन त्या काळात यशस्वी झालं नाही पण या शास्त्रज्ञांच्या अपयशानेच खरं जग बदललं.
माऊस कोणी बनवला?
1960 साली स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करणार्या डग्लस एंजेलबार्ट यांना वाटले की सध्या ज्या पद्धतीने लोक संगणक वापरत आहेत तो तितका प्रभावी नाही.
त्याकाळी 'माऊस' हे सध्याच्या व्हिडीओ गेम्समधील जॉयस्टिकसारखे उपकरण असायचं. हे वापरणे तितके सहज आणि सोपे नसायचं.
यावर उपाय शोधण्यासाठी एंजेलबार्टने 'बग' नावाचं उपकरण तयार केलं. ज्यामध्ये दोन वर्तुळाकार चाकांचा समावेश होता, जे संगणकावर दिसणारा कर्सर नियंत्रित करत असे.
ही एक अद्भुत कल्पना होती. 1966 मध्ये नासाने एंजेलबर्टच्या या नव्या शोधाचा वापर केला आणि तो खूप प्रभावशाली मानला गेला.

दोन वर्षांनंतर एंजेलबार्टने सहशोधकर्ता बिल इंग्लिश सोबत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक हजार लोकांसमोर एक उपकरण प्रदर्शित केलं. त्याला माऊस म्हणून संबोधण्यात आलं. नव्या तंत्रज्ञानाच्या युगात या कार्यक्रमाची बरीच चर्चा झाली.
एंजेलबार्ट आणि बिल इंग्लिश यांना वाटलं की त्यांच्या हाती खजिना लागला आहे. पण काही काळातच त्यांचा हा आनंद नाहीसा झाला. पाच वर्षांत एंजेलबार्टला गुंतवणूक मिळणे बंद झालं.
त्याच्या टीममधील बहुतेक सदस्यांनी स्टॅनफोर्ड सोडलं. सोडून जाणाऱ्यामध्ये बिल इंग्लिश यांचाही समावेश होता, जे त्यांनतर झेरॉक्समध्ये काम करू लागले.
1979 साली एका व्यक्तीने झेरॉक्सचे संशोधन केंद्र पाहण्यासाठी त्याच्याकडे असलेले झेरॉक्सचे शेअर्स दिले.

शेअर्स देणारा हा माणूस दुसरा कोणी नसून स्टीव्ह जॉब्स होता. त्याच्या कंपनीचे नाव होते ॲपल होते. याच झेरॉक्सच्या संशोधन केंद्रातूनच हा माऊस बाहेर आला.
स्टीव्ह जॉब्सला ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी आपल्या अभियांत्रिकी टीमला सांगितलं की, ते सध्या जे काही करत आहेत ते थांबवून माऊसला नव्याने बनवून ॲपलचे उत्पादन म्हणून पुन्हा सादर करावं.

माऊसचं मूळ पेटंट स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटकडे होते. याचा अर्थ एंजेलबार्टला माऊसच्या शोधातून काहीही मिळालं नाही.
एंजेलबार्टची विचारसरणी काळाच्या आधीची असली तरी प्रत्यक्षात माऊस घरोघरी पोहचवण्यासाठी कदाचित स्टीव्ह जॉब्स सारख्या माणसाची आवश्यकता होती, जो स्वप्न पाहता पाहता ते प्रत्यक्षात देखील उतरवेल.

बुलेटप्रुफ साहित्य कोणी बनवलं?
आपण अनेकदा पाहिलं असेल की एखाद्या महत्त्वाच्या मोहिमेत सहभागी होण्यापूर्वी बंदुकीची गोळी लागू नये म्हणून सशस्त्र दलाचे जवान बुलेटप्रूफ जॅकेट घालतात.
हे अशा प्रकारचं जॅकेट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरलं असेल आणि ते कोणी बनवलं असेल असा कधी विचार केला आहे का?

याचं उत्तर आहे स्टेफनी कोवलेक. या एक अतिशय हुशार रसायनशास्त्रज्ञ होत्या, ज्यांना कापड आणि धाग्यात विशेष रस होता.
स्टेफनी कृत्रिम फायबरच्या क्षेत्रातही संशोधन करत होती. त्यांनी स्टीलपेक्षा मजबूत आणि फायबरग्लासपेक्षा हलका असा उपाय शोधून काढला.

त्याचा हा अविष्कार आपल्याला केवलर म्हणून माहीत आहे. आजच्या जगात हे टायर, हातमोजे, बुलेटप्रूफ जॅकेट,स्पेस सूट आणि स्पेसक्राफ्टमध्ये देखील वापरलं जातं.
पण जेव्हा स्टेफनीने हे स्फटिकाच्या आकाराचे द्रावण तयार केलं, तेव्हा तिच्या सहकाऱ्यांनी ते बनवण्याच्या प्रक्रियेत तिला सहकार्य करण्यास नकार दिला.

हे द्रावणाची मजबुती दिसावी यासाठी हे यंत्रात घालून फिरवावे लागणार होतं पण असं केल्याने हे द्रावण त्यांच्या यंत्रात अडकू शकेल असे त्यांच्या मित्रांना वाटलं होतं.
3डी व्हिडिओ हेडसेट कोणी बनवला?
तंत्रज्ञानाच्या जगात आजकाल ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीची चर्चा सुरू आहे. पण हेडसेटशिवाय या दोन्ही तंत्रज्ञानाची कल्पना करता येईल का?
हेडसेटची सुरुवात एका अशा माणसापासून झाली, ज्याने सिनेमाचं जग बदलण्यासाठी एक नव्हे तर दोन शोध लावले. पण दोन्ही मध्ये तो यशस्वी झाला नाही.
हा माणूस म्हणजे मॉर्टन हेलिग. ज्याने 1957 मध्ये चित्रपट पाहणाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी सेन्सोरामा नावाचे उपकरण तयार केलं. हे एक 3डी व्हिडिओ मशीन होते. ज्यामध्ये हलत्या खुर्च्या आणि हवा देणारी मशीन होती. त्याचा उद्देश होता की सिनेमाप्रेमींना त्यांच्या जागेवर स्क्रीनवर दिसणार्या दृश्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता.

उदाहरणार्थ, एखाद्या चित्रपटाच्या दृश्यात एखादी व्यक्ती बाइक चालवताना दिसत असेल तर पाहणाऱ्या व्यक्तीला हलती खुर्ची आणि त्याच्या चेहऱ्यावरचा येणारा वारा याच्या माध्यमांतून हे दृश्य जाणवू शकते.
हेलिगला स्वतःच्या या शोधाबद्दल खूप आशा होत्या. त्यांनी हे उपकरण कार उत्पादक असलेल्या हेन्री फोर्ड यांना विकण्याची ऑफरही दिली. पण फोर्ड यांनीही इतरांप्रमाणेच हे मशीन विकत घेण्यास नकार दिला. सेन्सोरामा शेवटी हेलिगच्या बागेत पडून खराब झाला.
याच्या तीन वर्षांनंतर हेलिगने 3डी व्हिडिओ हेडसेट टेलीस्फेअर मास्कचे पेटंट घेतलं. जे 3डी व्हिडीओ हेडसेट होता. सध्या व्हर्च्युअल रिअॅलिटीचा उद्योग 170 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे. पण दुर्दैवाने हेलिग या उद्योगाचा भाग होऊ शकले नाहीत कारण 1997 मध्येच त्यांचे निधन झालं.
पेसमेकर बनवणारा व्यक्ती
आजच्या जगात पेसमेकर हे एक असे उपकरण आहे जे लाखो लोकांचे प्राण वाचवत आहे. पण त्याच्या शोधाची कहाणी खूपच रंजक आहे.
याचा शोध विल्सन ग्रेटबेचने लावला. ज्याला हृदयाचे ठोके ऐकायचे होते. मात्र या प्रयत्नात तो अपयशी ठरला.

जेव्हा त्याने हृदयाच्या विद्युत लहरी ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा या प्रक्रियेत त्याने चुकीच्या रोधकाचा वापर केला. त्यामुळे विद्युत लहरींची नोंद करण्याऐवजी त्या यंत्रातून विद्युत लहरी निघू लागल्या.
अशा प्रकारे त्याने चुकून पेसमेकरचा शोध लावला. या उपकरणाने गेल्या साठ वर्षांत लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. ग्रेटबेचची कंपनी अजूनही जगभरात वापरल्या जाणार्या 90 टक्के पेसमेकर उपकरणांसाठी बॅटरी बनवत आहे. आपल्या एका चुकीने जगभरातील लाखो लोकांना दीर्घायुष्य देणारे ग्रेटबेच स्वतःही वयाच्या 92 व्या वर्षापर्यंत जगले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








