सेक्सचा आनंद वाढवण्यासाठीच्या गोळ्यांचे लागले व्यसन, बॉयफ्रेंडला वाचवायला गेली आणि स्वतःच नशेच्या गर्तेत अडकली

दोन व्यक्ती किस करत असताना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दिनुक हेवाविथारणा
    • Role, बीबीसी सिंहला

"मला अशा गोष्टींची सवय नव्हती. परंतु, माझ्या एक्स बॉयफ्रेंडमुळे मी पहिल्यांदा याचा अनुभव घेतला."

27 वर्षीय नाओमी 'बीबीसी सिंहला'शी बोलताना व्यथित होऊन सांगत होती.

साधारण एक वर्षापूर्वी 'आइस ड्रग' म्हणून ओळखलं जाणारं 'मेथॅम्फेटामाइन'चं व्यसन लागल्याचं नाओमीनं यावेळी सांगितलं.

आपल्या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली की, "सेक्सदरम्यान मला आणि माझ्या प्रियकराला ड्रग्ज घ्यावे लागायचे. ड्रग्ज घेतले नाही तर आम्हाला काहीच करता यायचं नाही."

(या लेखात अनुभवकर्त्यांच्या विनंतीनुसार त्यांची खरी नावं न वापरता काल्पनिक नावांचा वापर करण्यात आलेला आहे.)

ग्राफिक्स
ग्राफिक्स

केमसेक्स (Chemsex) म्हणजे काय?

संभोगापूर्वी लैंगिक ताकद वाढावी, यासाठी ड्रग्ज किंवा औषधांचा वापर करणं म्हणजेच 'केमसेक्स' होय, असे लैंगिकरोग तज्ज्ञ डॉ. विनो धर्मकुलसिंघे यांनी 'बीबीसी सिंहला'ला सांगितलं.

डॉ. धर्मकुलसिंघे म्हणतात, ''संभोग करण्यापूर्वी कोणतेही रासायनिक पदार्थ किंवा ड्रग्ज घेतल्यास आपण त्याला केमसेक्स (Chemsex) म्हणतो. अनेक लोक याचा उपयोग लैंगिक सुख किंवा ताकद वाढवण्यासाठी करतात.'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय मान्यता असलेली औषधे किंवा परवानगी नसलेली ड्रग्ज किंवा रसायनं असू शकतात. बरेच लोक याचा वापर पार्ट्यांमध्ये करतात. कारण अशा ठिकाणी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याचे प्रमाण जास्त असते. अशा लैंगिक संबंधातून संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते.

"काही समूहांना याबद्दल जागरुक केलं जात आहे. सध्या श्रीलंकेत याबद्दल डेटा गोळा करण्याचा एक कार्यक्रम या वर्षी सुरू होईल."

सेक्सची प्रक्रिया दीर्घ काळ चालावी, यासाठी युरोपियन देशातील लोक केमसेक्सचा अवलंब मोठ्या प्रमाणात करतात, असं 25 जून 2024 रोजी केंब्रिज विद्यापीठानं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आलं आहे.

संशोधनात असंही दिसून आलं आहे की, समलैंगिक समुदायासह विविध समुदायांमध्ये केमसेक्स किंवा लैंगिक प्रक्रियेसाठी ड्रग्ज घेण्याची प्रवृत्ती जास्त आहे.

13 नोव्हेंबर 2024 रोजी यूएन एड्स, एचआयव्ही/एड्स (UNAIDS, HIV/AIDS) वरील संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त कार्यक्रमाद्वारे प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 2023 पर्यंत आशिया-पॅसिफिक देशात सुमारे 43% एचआयव्हीबाधित (HIV) पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुषच असल्याचे आढळून आले आहे.

त्याच वेळी, असे पुरावे आहेत की, या समुदायात केमसेक्सचा वापर देशांनुसार 3% ते 31% पर्यंत आहे. परंतु अहवालात असं म्हटलं आहे की, केमसेक्सचा वापर इतर लोक जरी करत असले तरी सामरिटॅन समुदायामध्ये याचं प्रमाण जास्त आहे.

'मी त्याला वाचवण्यासाठी आले अन् मलाच व्यसन लागलं'

'बीबीसी सिंहला'च्या वृत्तानुसार, नाओमीप्रमाणेच या देशातील तरुण आणि प्रौढ लोक लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी बऱ्याच काळापासून आईस ड्रग्जबरोबरच विविध केमिकल ड्रग्जचा वापर करतात.

नाओमीने प्रियकराबरोबर आलेले अनुभव कथन केले.

''माझा प्रियकर जेव्हा दुसऱ्या देशात वास्तव्यास होता, तेव्हा त्याला आईस ड्रग्ज घेण्याची सवय लागली होती. त्यावेळी तो दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. नंतर तो श्रीलंकेत आला आणि त्यानं आईस ड्रग्ज घेणं बंद केलं. त्यावेळी आम्ही दोघं केवळ चांगले मित्र होतो.''

बेडवर झोपलेला पुरुष आणि एक महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

"दरम्यान, माझ्या प्रियकराच्या मैत्रिणीनं अचानक दुसऱ्या मुलाशी लग्न केलं. त्याचा धक्का त्याला बसला आणि नैराश्यातून त्यानं आईस ड्रग्जचे सेवन करण्यास सुरुवात केली.''

''मी त्याला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु केला. कारण तो माझा चांगला मित्र होता. त्याला या व्यसनातून आपण बाहेर काढू शकू असा मला विश्वास होता. या काळात त्याचं मन वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कालांतराने आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो.''

"मी दारु आणि सिगारेट सारख्या गोष्टींचे सेवन करत असले तरी आईस ड्रग्ज घेण्याची सवय मला नव्हती. एक दिवस त्यानं मला आईस ड्रग्ज घेण्याचा सल्ला दिला. मीही उत्सुकतेने ते घेतलं," असं ती म्हणाली.

'सेक्स करताना वेगळाच अनुभव येतो'

नाओमीनं सांगितलं की, आईस ड्रग्ज घेऊन संभोग करताना तिला अभूतपूर्व अशा संवेदना जाणवल्या. थकवा जाणवला नाही. मग त्यानंतर तिनेही या ड्रग्जचे सेवन करण्यास सुरुवात केली.

"जेव्हा-जेव्हा मी आणि माझा प्रियकर भेटत असू तेव्हा आम्ही हे ड्रग्ज घ्यायचो. सुरुवातीला तो ड्रग्ज घेऊन घरी यायचा. आईस ड्रग्ज घेऊन सेक्स केल्यावर आम्हाला प्रचंड आनंद मिळत असत."

''या ड्रग्जमुळे सेक्स करण्याची आमची क्षमता वाढली होती. याचं सेवन केल्यावर मी वेगळ्याच दुनियेत जात. ''

पाठमोरी व्यक्ती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'मी आणि माझ्या बॉयफ्रेंडने या ड्रग्जचा वापर सुरु केला. हे ड्रग्ज घेतल्यानंतर संभोग करताना आम्हाला जबरदस्त अनुभव यायचा. '

"साधारण एक वर्षापासून, आम्हाला आईस ड्रग्ज घेऊन लैंगिक संबंध ठेवण्याचं व्यसन जडलं होतं. शेवटी शेवटी तर आम्ही अशा टप्प्यावर पोहोचलो होतो की हे ड्रग्ज आमच्यासाठी जीव की प्राण झाले होते. ''

''काही काळानंतर, माझ्या बॉयफ्रेंडला हे ड्रग्ज मिळत नव्हते. मग तो यासाठी माझ्याशी संपर्क साधायचा. झालं असं की, मी त्याला यातून बाहेर काढण्यासाठी आले होते. नंतर मीच या व्यसनात गुरफटून गेले. ''

"कालांतराने तर तो केवळ या ड्रग्जसाठीच माझ्याकडे येऊ लागला. हे ड्रग्ज त्याला मिळाले नाही तर तो बैचेन होत असत,'' असं ती म्हणाली.

'मग मला गांभीर्य समजलं'

नाओमीनं पुढं सांगितलं की, कालांतराने तिच्या प्रियकराची वागणूक पूर्णपणे बदलली. तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाला.

''ड्रग्ज घेतल्यानंतर काही काळानं मला आणि माझ्या बॉयफ्रेंडला अशक्तपणा जाणवू लागला. याचे सेवन केल्यानंतर एक दिवस तरी तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही. नशेचा अंमल राहतो.

''आमच्या दोघांची प्रकृती खालावली. आमचं वजन कमी झालं. आम्हाला काही झालंय का, असं आमचे मित्र आम्हाला सातत्याने विचारु लागले.

''मी ड्रग्ज घेण्यास सुरुवात केल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर लैंगिक संबंध ठेवणं कठीण जाऊ लागलं. शेवटी लैंगिक उत्तेजक संबंधित ड्रग्ज घेतल्यानंतरही माझ्या प्रियकराला लैंगिक संबंध ठेवता येत नव्हते.''

हातात गोळ्यांचं पाकीट घेऊन झोपलेली मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'कालांतराने ड्रग्ज घेतल्यावर काहीही खायची इच्छा व्हायची नाही. शरीरावर नशेचा अंमल असायचा. '

''माझा प्रियकर घरी गेल्यावर आठवडाभर खोलीतून बाहेर येत नाही, असे त्याच्या मित्रांनी मला सांगितलं. त्यावेळी मग मला याचं गांभीर्य समजू लागलं. मग माझ्याही लक्षात येऊ लागलं की, ज्यावेळी मी एकांतात बसलेले असते. त्यावेळी मला कुठंतरी रेडिओ सुरु आहे, असे भास होत आहेत. ''

"त्यानंतर माझ्या प्रियकराच्या नाकातून वारंवार रक्त येऊ लागलं. मी त्याला अनेकदा डॉक्टरांकडे जाण्यास सांगितलं. पण त्याला ते आवडत नसत. तो खूप हट्टी होऊ लागला होता. सातत्याने तो माझ्याशी भांडत आणि माझ्यावर संशय घेत.

शेवटी त्यानं मला न सांगता देश सोडण्याचा निर्णय घेतला. मला मानसोपचार तज्ज्ञाकडे समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं. आता हळूहळू मी पूर्वपदावर येत आहे,' असे नाओमीनं सांगितलं.

'लैंगिक आजार होण्याची शक्यता जास्त असते'

"जे लोक ड्रग्जचे सेवन करतात ते असुरक्षित लैंगिक संबंध ठेवतात. यामुळे एचआयव्ही आणि हिपॅटायटीसबी सारखे लैंगिक संक्रमित रोग होण्याची शक्यता जास्त असते," असे डॉ. निमाली जयसूर्या यांनी 'बीबीसी सिंहला'शी बोलताना सांगितले.

"ही यंत्रणा आता श्रीलंकेतही उपलब्ध असल्याची माहिती आहे. परंतु आमच्याकडे याबाबतचा कोणताही डेटा नाही. हेरॉइनचे व्यसन असलेल्या लोकांच्या विरुद्ध, 20 ते 40 वयोगटातील सुशिक्षित लोक देखील आईस ड्रग्जचे सेवन करुन स्वतःचा जीव धोक्यात घालतात."

पार्टीचं दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'एकदा ड्रग्जचे सेवन केल्यावर न थकता सलग 7-8 तास मी नाचत असत.'

'...म्हणून मला ड्रग्जची सवय जडली'

'बीबीसी सिंहला'शी बोलताना योमल या 26 वर्षीय तरुणाने सांगितले की, एकदा तो एका म्युझिक कॉन्सर्टला गेला होता. त्यावेळी त्याला ड्रग्ज घेण्याचा मोह झाला.

''मी अशा क्षेत्रात काम करतो की मला अनेकदा वेगवेगळ्या म्युझिक कॉन्सर्टला हजेरी लावावी लागते. अशा मैफिलींनंतर होणाऱ्या पार्टीत ड्रग्जचा वारेमाप वापर होतो. मीही अशाच पार्टीमध्ये याचा अनुभव घेतला आहे.

"जेव्हा मी अशा प्रकारच्या ड्रग्जचे सेवन करत. त्यावेळी साधारणपणे अर्ध्या तासानंतर माझ्या शरीरावर त्या ड्रग्जचा प्रभाव जाणवू लागायचा."

''अशावेळी मी 7-8 तास न थांबता डान्स करायचो. त्यानंतर माझ्या मैत्रिणीसोबत सेक्सही करत. त्यावेळी अजिबात थकवा जाणवत नसे. पण नंतर मला याचे दुष्परिणाम जाणवू लागले. या ड्रग्जच्या प्रभावामुळे अनेकवेळा माझं शरीर थरथरु लागायचे. पुढचे एक ते दोन दिवस काहीच खायची इच्छा व्हायची नाही." असं योमलनं म्हटलं.

'आता मी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय'

दरम्यान, 'बीबीसी सिंहला'ने केलेल्या तपासणीत सापडलेल्या 36 वर्षीय पथुम नावाच्या आणखी एका व्यक्तीने लैंगिक क्षमता वाढण्यासाठी विविध ड्रग्जचा वापर केल्याचं सांगितलं.

"माझ्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत. मला दोन मुलं आहेत. माझ्या मित्रानं मला पहिल्यांदा या ड्रग्सबाबत माहिती दिली. तुला जर जास्त वेळ संभोग करायचा असेल तर हे ड्रग्ज घेऊ शकतो, असं त्यानं मला सांगितलं."

''मग मी माझ्या मित्रासोबत एक दिवस हे ड्रग्ज घेतले. मग एका स्पा मध्ये गेलो. मी आईस ड्रग्ज आणि पार्ट्यांमध्ये वापरले जाणारे काही ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली. साधारणपणे महिन्यातून एक किंवा दोनदा मी याचा वापर करु लागलो.''

रक्ताचे नमुने घेत असताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बहुतेक वेळा, एचआयव्ही आणि हिपॅटायटीस बी सारखे संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते.

"आता मी ती सवय मोडण्याचा प्रयत्न करत आहे. याचे दुष्परिणाम मला जाणवू लागले आहेत. कारण आता माझ्या बोलण्याच्या पद्धतीत फरक पडला आहे. या ड्रग्जचे सेवन केल्यावर मला झोप येत नाही. माझी बायको मला डॉक्टरांकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी जात नाहीये.''

"मला माहीत आहे की, जर मी डॉक्टरांकडे गेलो तर त्यांना सेक्स पॉवर वाढवण्यासाठी मी ड्रग्ज घेतो, हे समजेल."

"आता मी यातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे," असे पथुम म्हणाला.

मादक पदार्थांच्या सेवनामुळे जास्त वेळ सेक्स करण्यास मदत होते का?

लोक केवळ 'अंधश्रद्धा आणि त्या संबंधीच्या चर्चांमुळे' संभोग कालावधी लांबवण्यासाठी ड्रग्ज घेण्याकडे आकर्षित होतात, असे राजरता विद्यापीठाचे वरिष्ठ व्याख्याते डॉ. मनोज फर्नांडो म्हणाले.

ते पुढे म्हणतात की, मानसिकदृष्ट्या कमकुवत लोकांकडून ड्रग्जचा वापर होणे सामान्य आहे.

''अंधश्रद्धेमुळे त्यांना अशाप्रकारे ड्रग्ज घेण्याचा मोह होतो. लैंगिक ताकद वाढते याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पण प्रत्येक ड्रग्जला याच्याशी जोडले गेले आहे.

हेरॉइन आणि आईस असल्याने, बहुतेक ड्रग्सबाबत काही सामान्य समजुती आहेत. यामुळे लैंगिक ताकद वाढते आणि आनंद मिळतो, असे बोलले जाते.

"काही लोकांना मानसिक दबावामुळे ड्रग्ज घेण्याचा मोह होतो. यामागचे एक कारण म्हणजे ड्रग्जचे आकर्षण. जसे आपण चित्रपटांमध्ये पाहतो, ड्रग्ज घेणारे लोक ते घेण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला ते जातात. तसंच, अनेक लोक त्यांच्या मित्रांच्या आग्रहामुळे अंमली पदार्थांचे सेवन करतात.''

"औषधांमध्ये लैंगिक प्रक्रिया दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता नसते. अशा प्रकारचे ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की, तो बराच काळ सेक्स करत आहे. ही सर्व मानसिक प्रक्रिया आहे.''

"जे लोक हे ड्रग्ज घेतात त्यांना लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळं त्यांना असं वाटतं की, सुरुवातीला लागणारा जास्तीचा वेळ त्यांचा संभोगात गुंतलेला आहे. परंतु सत्य हे आहे की आईस किंवा हेरॉईन किंवा इतर ड्रग्ज लैंगिक प्रक्रिया लांबवू शकत नाहीत," असे डॉ मनोज फर्नांडो म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)