मृत्यू होण्याआधी माणसाला आपले संपूर्ण आयुष्य पुन्हा दिसतं का?

प्रतिनिधिक छायाचित्र
फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक छायाचित्र
    • Author, अ‍ॅलेसॅन्ड्रा कोरिया
    • Role, बीबीसी न्यूज, ब्राझिल

मृत्यूबद्दलचे गूढ मानवाला अनंत काळापासून आहे. मृत्यूच्या क्षणी, त्याच्या मागे-पुढे नेमकं काय होतं याचं कुतूहल आणि भीती माणसाला नेहमीच असते.

अनेकदा मृत पावणाऱ्या व्यक्तीबद्दलच्या विविध अनुभवांबद्दल बोललं जातं. मात्र एका डॉक्टरनं चक्क यावर अतिशय शिस्तबद्ध संशोधन केलं आहे.

ख्रिस्तोफर केर यांच्या मते मृत्यूपूर्वी दिसणाऱ्या गोष्टी या मृत्यूशय्येवर असणाऱ्या लोकांना खऱ्या वाटत असतात.

एप्रिल 1999 मध्ये अमेरिकन डॉक्टर ख्रिस्तोफर केर यांनी जे पाहिलं त्यामुळे त्यांच्या करियरची दिशाच बदलून गेली.

त्यांची एक रुग्ण, मेरी या हॉस्पिटलमध्ये तिच्या बेडवर झोपलेल्या होत्या. त्यांच्याभोवती त्यांची चार मुलं होती. त्या मरणासन्न अवस्थेत होत्या आणि अचानक विचित्रपणं वागू लागल्या.

70 वर्षांची मेरी बेडवर बसल्या आणि त्यांचे हात अशा काही पद्धतीनं हलवू लागल्या की जणूकाही त्या बाळाला झोका देत आहेत. अर्थात ते बाळ फक्त त्यांनाच दिसत होतं. त्यांनी त्या बाळाला डॅनी म्हणून हाक मारली आणि त्या जणूकाही त्याला मिठी मारत होत्या आणि बाळाचं चुंबन घेत होत्या.

मेरी यांच्या मुलांना हा सर्व प्रकार नीट सांगता येईना, कारण ते डॅनी नावाच्या कोणालाही ओळखत नव्हते.

दुसऱ्या दिवशी मात्र मेरींची बहिण हॉस्पिटलमध्ये आली आणि तिनं सांगितलं की या चार अपत्यांआधी मेरीनं एका बाळाला जन्म दिला होता. त्या बाळाचं नाव डॅनी ठेवण्यात आलं. ते बाळ लगेच दगावलं होतं.

हे दु:ख इतकं तीव्र होतं की तिच्या बाळाबद्दल मेरीनंतर कोणाशीही बोलल्या नव्हत्या.

ख्रिस्तोफर केर यांनी आधी वैद्यकीय प्रशिक्षण घेतलं होतं, नंतर त्यांनी कार्डिओलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केलं होतं आणि नंतर न्यूरोबायोलॉजीमध्ये पीएच.डी केली होती.

रुग्ण

फोटो स्रोत, Getty Images

पण मेरीबाबतची घटना ख्रिस्तोफर यांना इतकी असामान्य वाटली की त्यांनी त्यांच्या करियरची दिशा बदलण्याचं ठरवलं आणि मरणासन्न असलेल्या लोकांच्या अनुभवांचा अभ्यास करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतलं.

'जे रुग्णांसाठी चांगलं तेच त्यांच्या प्रियजनांसाठीदेखील चांगलं,' असं ख्रिस्तोफर केर म्हणतात.

'शांततेची भावना'

ख्रिस्तोफर यांची मेरींशी भेट होऊन आता 25 वर्षे झाली आहेत. आज ते मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या लोकांना अंतिम क्षणांमध्ये दिसणाऱ्या गोष्टी आणि त्यांची स्वप्ने यांचा अभ्यास करणारे जगातील आघाडीचे तज्ज्ञ मानले जातात.

ख्रिस्तोफर सांगतात, सर्वसाधारणपणं मृत्यूच्या काही आठवडे आधी या प्रकारचे अनुभव लोकांना येण्यास सुरूवात होते आणि जसजसा मृत्यू जवळ येत जातो तसतसं या प्रकारच्या अनुभवांचं प्रमाण वाढत जातं.

ख्रिस्तोफर केर सांगतात की त्यांनी पाहिलं आहे की या प्रकारांमध्ये लोक त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण पुन्हा जगतात आणि त्याचबरोबर काही वर्षे अगोदर मरण पावलेले आई, वडील, मुलं आणि अगदी पाळीव प्राणी यांच्याशी बोलतात.

रुग्ण

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या प्रकारची दृश्ये किंवा स्वप्न रुग्णांना अत्यंत खरी, गहन भासतात आणि सर्वसाधारणपणे त्यांच्यामध्ये यातून शांततेची भावना निर्माण होते.

"ही नाती पुन्हा एकदा अत्यंत अर्थपूर्ण आणि सुलभ पद्धतीने या अखेरच्या क्षणी परततात, ज्या पद्धतीनं आयुष्य जगण्यात आलं आहे त्याची खात्री देतात आणि परिणामी त्यातून मृत्यूविषयीची भीती कमी होते," असं केर यांनी बीबीसीला सांगितलं.

हे रुग्ण गोंधळलेले नसतात आणि त्यांच्या शारीरिक आरोग्यात जरी घसरण होत असली तरी भावनिकदृष्ट्या आणि अध्यात्मिकदृष्ट्या ते वर्तमानातच असतात, असं केर आवर्जून सांगतात.

मात्र अनेक डॉक्टर्स या प्रकारच्या संकल्पनेला नाकारतात आणि ते म्हणतात या घटना म्हणजे हॅल्युजनेशन म्हणजे भ्रम किंवा गोंधळाचा परिणाम असतात. त्यांचं म्हणणं आहे की आपण निष्कर्षावर पोचण्याआधी खूप वैज्ञानिक संशोधन होणं गरजेचं आहे.

त्याचा परिणती म्हणून केर यांनी 2010 मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा या विषयासंदर्भात अभ्यास सुरू केला. यात त्यांनी एक औपचारिक सर्वेक्षण सुरू केलं. ज्यात ख्रिस्तोफर हे मरणासन्न अवस्थेत असलेल्या रुग्णांना ते काय पाहत आहेत याबद्दल विचारू लागले.

ख्रिस्तोफर केर यांनी मृत्यूच्या दारात असलेल्या लोकांच्या अनुभवावर अहवाल तयार केले आहेत.

त्यांच्या सर्व्हे किंवा अभ्यासात भाग घेण्याआधी सर्व रुग्णांची तपासणी करण्यात आली. जेणेकरून याची खातरजमा केली जावी की ते रुग्ण गोंधळलेल्या स्थितीत तर नाहीत ना.

या अभ्यासाआधी, या प्रकारच्या अनुभवांबद्दल तिसऱ्या व्यक्तींकडूनच अधिक माहिती मिळालेली होती. या लोकांनी रुग्ण काय पाहत असतील किंवा रुग्णांचा काय अनुभव येतो आहे याबद्दल त्यांना काय वाटतं आहे ते नोंदवलं होतं.

ख्रिस्तोफर केर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ख्रिस्तोफर केर यांनी मृत्यूच्या दारात असलेल्या लोकांच्या अनुभवावर अहवाल तयार केले आहेत.

स्वीडनच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन सह अनेक वैज्ञानिक मासिकांमध्ये केर यांचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत.

केर यांना या अनुभवांचं विश्लेषण करण्यासंदर्भात निश्चित उत्तर अद्याप मिळालेलं नाही. ते म्हणतात, या अनुभवांमागचं कारण शोधणं हा त्यांच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू नाही.

"मला या घटनांमागचा स्त्रोत माहीत नाही आणि ही प्रक्रिया रुग्णांच्या अनुभवांना खोटं ठरवत नाही हे सत्य आहे," असं ते म्हणतात.

अत्यंत गंभीर आजारांना तोंड देत असलेल्या लोकांची काळजी घेणाऱ्या न्यूयॉर्क राज्यातील एका संस्थेचे केर सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

'डेथ इज बट अ ड्रीम: फाईंडिंग होप अॅंड मीनिंग अॅट लाईफ्स एंड' हे केर यांचं पुस्तक 2020 मध्ये प्रकाशित झालं. त्याचा 10 भाषेंमध्ये अनुवाददेखील झाला.

केर सांगतात, रुग्णांना नात्यांबद्दलचे विचार अतिशय अर्थपूर्ण आणि सहजरित्या येतात.

केर यांनी त्यांचा अभ्यास आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी येणाऱ्या या अनुभवांबद्दल बीबीसी न्यूजला सांगितलं.

इतक्या वर्षांमध्ये या अनुभवाबद्दल तुम्हाला काय कळालं?

मला वाटतं मृत्यू होणं ही फक्त शरीराच्या नष्ट होण्यापलीकडची बाब आहे. मृत्यूच्या क्षणी तुम्ही अशा स्थितीत असता जिथे तुमचा आयुष्याबद्दलचा स्पष्ट दृष्टीकोन असतो, या क्षणी तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसू लागतात आणि यात जीवनाला खरोखरंच अर्थपूर्ण बनवणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो.

"मृत्यूमुळे तुम्हाला एक प्रतिबिंब दिसतं. अशा स्थितीत लोक त्यांच्या आयुष्यात असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतात, आयुष्यातील सर्वांत मोठं यशाबद्दल ते विचार करतात. अर्थात ती गोष्ट म्हणजे त्यांची नाती असतात."

"गमतीचा भाग म्हणजे हे सर्व अत्यंत अर्थपूर्णरित्या आणि सहजरितीने त्यांच्यासमोर येतं. यातून जे आयुष्य जगण्यात आलं आहे त्याची अर्थपूर्णता दिसते आणि परिणामी मृत्यूची भीती कमी होते."

हॉस्पिटल

फोटो स्रोत, Getty Images

"आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माणसाला मन हलकं करणाऱ्या, मनावरील तणाव कमी करणाऱ्या गोष्टींचा अनुभव होणं आपल्याला अपेक्षित आहे. ही गोष्ट एरवी फारशी दिसत नाही."

"या क्षणांमध्ये लोकांना एकप्रकारे प्रेम आणि अर्थपूर्णता मिळाल्याचं आपल्याला दिसतं."

तुमच्या अभ्यासानुसार मृत्यूच्या क्षणी येणारे हे अनुभव नेहमी येतात का?

"आमच्या अभ्यासानुसार जवळपास 88 टक्के लोकांनी या प्रकारच्या किमान एकातरी अनुभवाची नोंद केली आहे."

"प्रत्यक्षात नोंदवण्यात आलेल्या प्रमाणापेक्षा याचं प्रमाण 20 टक्क्यांनी अधिक होतं. कारण आमच्या अभ्यासात आम्ही लोकांना याबद्दल दररोज विचारतो."

"मृत्यू ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे या रुग्णांना सोमवारी तुम्ही एखादी गोष्ट विचारल्यास एक उत्तर मिळतं, तर शुक्रवारी तुम्हाला वेगळंच उत्तर मिळू शकतं."

"मृत्यू जसजसा जवळ येत जातो तसतसे या अनुभवांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं."

ज्या पद्धतीनं लोक आपल्याला सोडून जातात तो पुन्हा जोडलं जाण्याचा क्षण असू शकतो.

प्रवासाचा अनुभव

यातील मुख्य मुद्दे काय आहेत?

"जवळपास एक-तृतियांश लोक प्रवासासारखे अनुभव आल्याचं सांगतात. त्यांनी ज्यांच्यावर प्रेम केलं आणि ज्यांना गमावलं अशा लोकांची ते वारंवार आठवण काढतात."

"मृत्यू जवळ येत गेल्यावर गमावलेल्या लोकांना पाहण्याचा अनुभव वाढत जातो. हा त्या व्यक्तीला आलेला सर्वात सुखद अनुभव असल्याचं नोंदवण्यात आलं आहे."

"ते कोणाची स्वप्ने पाहतात तेदेखील लक्षात घेण्यासारखं आहे. ज्या लोकांवर त्यांनी प्रेम केलं, ज्यांनी त्यांना आधार दिला, किंवा ज्यांना या लोकांनी आधार दिला तसेच जे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत अशा लोकांबद्दल मृत्यूशय्येवरील लोकांचं सर्वाधिक लक्ष असतं. ती व्यक्ती आई किंवा वडील, एखादं भावंडं असू शकतात."

"प्रश्नावली मध्ये लोकांनी सांगितलेली जवळपास 12 टक्के स्वप्नं एकतर तटस्थ असतात किंवा त्रासदायक असतात. यातील त्रासदायक स्वप्ने खूपच बदल घडवणारी किंवा अर्थपूर्ण असतात."

"त्यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही वेदना असतात त्यावर या अनुभवांमध्ये लक्ष दिलं जातं."

हॉस्पिटल

फोटो स्रोत, Getty Images

"काही प्रकरणांमध्ये एखादी व्यक्ती युद्धात सहभागी झालेली असते आणि या युद्धात जिवंत राहिल्याचा अपराध बोध त्यांच्या मनात असतो. मात्र मृत्यूच्या समयी येणाऱ्या अनुभवात ते त्यांच्या मृत्यूमुखी पडलेल्या सहकाऱ्यांना पाहतात आणि शांत होतात."

तुम्ही सांगता, की सर्वसामान्यपणं एक चूक केली जाते ती म्हणजे या लोकांना भ्रम होतो आहे असं मानणं. हे अनुभव कशामुळे वेगळे ठरतात?

"आयुष्याच्या अखेर क्षणांमध्ये भ्रम, गोंधळलेली मन:स्थिती सर्रास दिसून येते. मात्र ही गोष्ट त्यापेक्षा खूपच वेगळी आहे."

"लोकांना अत्यंत सुखकारक वाटणाऱ्या, सांत्वन करणाऱ्या, विलोभनीय अनुभवातून लोक बाहेर येत नाहीत. हे अनुभव भीती निर्माण करणारे आणि औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांना किंवा बेडला बांधलेल्या रुग्णांना त्रासदायक असतात..."

"मरणाच्या दारात असणाऱ्या रुग्णांचे अनुभव खरे लोक आणि घटनांवर आधारित असतात. रुग्ण या गोष्टी अतिशय स्पष्टपणे आठवतात आणि त्यांच्यासाठी ते अतिशय सुखकारक आणि सांत्वन करणारे असतात."

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या जवळपास 12 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांना दिसलेल्या गोष्टी तटस्थ किंवा चिंताजनक होत्या.

स्वप्नं

काहीवेळा रुग्ण स्वप्नं पाहतात. मात्र इतर वेळेस ते जागे असतात. या दोन प्रकारच्या अनुभवांमध्ये काही फरक आहेत का?

"सर्व्हेमध्ये आम्ही लोकांना विचारलं की ते झोपलेले होते की जागे होते. आणि हे प्रमाण 50-50 टक्के होते."

"मृत्यूच्या प्रक्रियेत झोपेचं प्रमाण वाढतं, दिवस आणि रात्रीची जाणीव कमी होते. घड्याळाची जाणीव नष्ट होते."

"आणि रुग्ण या गोष्टी वास्तवात असण्याला 10 पैकी 10 गुण देत असल्यामुळं आपल्याला नक्की सांगता येत नाही."

रुग्ण

फोटो स्रोत, Getty Images

केर म्हणतात की मृत्यूच्या दारात असणाऱ्या काही लोकांना अगदी तटस्थ किंवा त्रासदायक स्वप्ने पडतात.

मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अतिशय गंभीर आजार असलेल्या मुलांवरदेखील तुम्ही काम करता. मुलं आणि वयस्क व्यक्तींना मृत्यूसमयी येणाऱ्या अनुभवांबाबत काय फरक असतात?

"मुलं या अनुभवांना अधिक चांगल्या रीतीने सामोरे जातात. कारण ते निरागस असतात. भ्रामक आणि वास्तववाद अशी ते या अनुभवांची विभागणी करत नाहीत. शिवाय त्यांच्या मनात मृत्यूसारख्या संकल्पना नसतात. त्यामुळे ते त्या क्षणामध्ये जगत असतात."

"तुम्हाला असं अनेकदा पाहायला मिळेल की मुलांना येणारे अनुभव अधिक कल्पक आणि रंजक स्वरुपाचे असतात. अंतर्ज्ञानाद्वारे त्यांना याचा अर्थ कळत असतो."

"अनेकदा मुलं मृत्यू पावलेल्या एखाद्या व्यक्तीला ओळखत नसतात, मात्र ते प्राण्यांना ओळखतात. त्यांना ते खूप स्पष्टपणे पाहू शकतात."

केर म्हणतात रुग्ण मृत्यूच्या जसे जवळ जातात तसतसे त्यांना मृत पावलेल्या व्यक्ती अधिकवेळा दिसू लागतात.

कुटुंब

या अनुभवांचा त्या रुग्णांच्या कुटुंब आणि जवळच्या लोकांवर काय परिणाम होतो?

"आम्ही यासंदर्भात दोन शोधनिबंध सादर केले आहेत. त्यात 750 जणांच्या मुलाखती आहेत आणि ते खूपच मनोवेधक आहे. अंतिम बाब अशी आहे की जे रुग्णासाठी चांगलं आहे तेच त्यांच्या प्रियजनांसाठी चांगलं आहे...

हॉस्पिटल

फोटो स्रोत, Getty Images

"दु:खाच्या प्रक्रियेसंदर्भात आम्हाला अभ्यासातून एक वेगळी गोष्ट समोर आली आहे. जे लोक अशा प्रकारच्या गोष्टींना साक्षी असतात ते त्यांचा शोक खूपच चांगल्या रीतीने व्यक्त करतात. कारण या प्रकारचे अनुभव त्यांच्या दृष्टीकोनाला आकार देतात आणि ज्या व्यक्तीला त्यांनी गमावलं आहे त्याची आठवण ते अधिक चांगल्या रीतीने काढतात."

तुम्ही न्यूरोबायोलॉजीमध्ये पीएच.डी केली आहे. मात्र तुम्ही म्हणता की तुम्हाला या गोष्टींचा स्रोत कुठे आहे त्याबद्दल माहीत नाही आणि या गोष्टींची प्रक्रिया नेमकी कशी आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं नाही. एक डॉक्टर म्हणून तुमचा या गोष्टीबद्दल दृष्टीकोन कसा विकसित झाला आहे?

ते फारच नम्रपणे म्हणतात,

"अशी प्रकरणं आहेत ज्यात मी स्वत: साक्षीदार होतो, आणि मी जे पाहिलं ते खूपच गहन होतं."

"मला म्हणायचं आहे की त्यावेळेस रुग्ण इतका स्पष्ट आणि अचूक होता, की मला घुसखोर असल्यासारखं वाटलं."

आपण मृत्यूच्या भौतिक अंगावर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळं आपण त्यातील भावनिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करतो, असं केर म्हणतात.

तुम्ही म्हटलं आहे की या विषयातील सर्वांत आशयपूर्ण चर्चा नेहमीच समाजशास्त्राकडून झाली आहे, वैद्यकशास्त्राकडून नाही. वैद्यकशास्त्राने या विषयाला खूप महत्त्व का दिलं नाही? तुम्ही तुमचा अभ्यास सुरू केल्यापासून मागील दशकांमध्ये त्यात काही बदल झाले आहेत का?

"नाही, मला वाटतं परिस्थिती अधिकच वाईट होत चालली आहे."

"मला समाजशास्त्र आपल्या अस्तित्वाबद्दल आणि जगण्याच्या अर्थाबद्दल प्रश्न विचारतं. समाजशास्त्रामध्ये एक प्रकारचा खुलेपणा आहे."

तुम्ही सांगितलं की इतर डॉक्टरांना पुरावा हवा होता म्हणून तुम्ही तुमच्या संशोधनाची सुरूवात केली.

मात्र तुमच्या कामाची चर्चा वैद्यकीय क्षेत्रापेक्षा प्रसारमाध्यमात अधिक झाली. या विसंगतीकडे तुम्ही कसे पाहता?

"रुग्णांना काय अनुभव येतो आहे हे तरुण डॉक्टरांनी समजून घ्यावं यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. त्यामुळे आम्ही पुरावे गोळा करत गेलो. ते पुरावे आम्ही त्यांना पटतील अशा भाषेत मांडत गेलो."

"मला हे कळत नाही की मी एकप्रकारे छडीचं चुकीचं टोक पकडलं होतं. कारण ते मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांपर्यत पोचलं, त्यावर चर्चा झाली आणि ते जगभरात पोचलं."

"म्हणजे, जे लोक रुग्णांची काळजी घेत आहेत त्यांना या गोष्टीबद्दल फारस थोडी चिंता आहे, मात्र ज्या लोकांची काळजी घेतली जात आहे किंवा जे रुग्णांची काळजी घेण्यात हातभार लावत आहेत किंवा ज्यांना स्वत:च्या मृत्यूबद्दल फक्त कुतूहल आहे असे लोक या आमच्या कामाचं कौतुक करत आहेत. ही विसंगती मजेशीर आहे."