प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ, लक्षणं आणि उपचारांबद्दल जाणून घ्या सविस्तर

टेस्ट ट्यूब

फोटो स्रोत, GETTYIMAGES/PETER DAZELEY

    • Author, सुशीला सिंग
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

जगभरात प्रोस्टेट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ होईल, असं लॅन्सेट या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलच्या ताज्या अहवालात म्हटलंय.

लॅन्सेटने आपल्या अहवालात असंही म्हटलंय की, 2020 मध्ये प्रोस्टेट कॅन्सरची 14 लाख प्रकरणं होती. 2040 मध्ये त्यात वाढ होऊन ही प्रकरणं 29 लाख इतकी होतील.

हा कॅन्सर 112 देशांमधील पुरुषांमध्ये अगदी सामान्य झाल्याचं अहवालात म्हटलंय. तसंच, एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी 15 टक्के प्रकरणं ही प्रोस्टेट कॅन्सरची आहेत.

2020 मध्ये, प्रोस्टेट कॅन्सरमुळे 3 लाख 75 हजार पुरुषांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. हे पुरुषांमधील मृत्यूचं पाचवं प्रमुख कारण आहे.

2040 पर्यंत प्रोस्टेट कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 85% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

भारतात प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये सर्वात सामान्य आहे आणि एकूण कर्करोगाच्या प्रकरणांपैकी 3% आहे. दरवर्षी अंदाजे 33 हजार ते 42 हजार नवीन प्रकरणे नोंदवली जातात.

अहवालानुसार, दरवर्षी प्रति एक लाख लोकसंख्येमागे चार ते आठ नवीन प्रकरणांसह प्रोस्टेट कॅन्सरच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

गेल्या 25 वर्षांत, शहरी भागात प्रोस्टेट कॅन्सरची संख्या 75-85 % पर्यंत वाढली आहे. राष्ट्रीय स्तरावर, कॅन्सर रुग्णांची संख्या 30% पर्यंत वाढली आहे.

दिल्लीत राहणारे राजेश कुमार यांना ऑक्टोबर 2022 मध्ये प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं समजलं.

त्यांची पत्नी, रितू मारवाह यांनी बीबीसीशी फोनवर बोलताना सांगितलं की, "माझ्या पतीला लघवी करताना त्रास होत होता. त्यांना वेळ लागायचा. आम्ही दरवर्षी वैद्यकीय तपासणी करतो. या समस्येनंतर आमच्या फॅमिली डॉक्टरांनी आम्हाला अल्ट्रासाऊंड तपासणी करायला सांगितली."

या तपासणीत असं दिसून आलं की, राजेश कुमार यांचं प्रोस्टेट वाढलं आहे आणि डॉक्टरांनी त्यांना प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन किंवा पीएसए चाचणी करा असं सांगितलं.

यानंतर एमआरआय आणि बायोप्सी करण्यात आली आणि तपासात राजेश कुमार यांची प्रोस्टेट कॅन्सरची दुसरी स्टेज असल्याचं समोर आलं.

प्रोस्टेट म्हणजे काय?

प्रोस्टेट ग्रंथी ही पुरुष प्रजनन प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अक्रोडाच्या आकाराची आणि मूत्राशयाच्या खाली स्थित हा भाग वयानुसार वाढतो.

डॉक्टर म्हणतात की, वयाच्या पंचेचाळिशी-पन्नाशीनंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेटशी संबंधित समस्या उद्भवतात. परंतु याचा अर्थ असा नाही की हा कॅन्सरच असला पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला या समस्येचा सामना करावा लागतो असं देखील नाही.

जेव्हा प्रोस्टेट ग्रंथी वाढू लागतो, तेव्हा डॉक्टर पीएसए चाचणीची शिफारस करतात. तपासणीनंतरच कॅन्सरची शंका असल्यास, पुढील तपासण्या केल्या जातात आणि उपचार सुरू केले जातात.

68 वर्षीय राजेश कुमार यांच्यावरही उपचार सुरू झाले आहेत आणि मार्च 2023 मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

'प्रोस्टेट कॅन्सर हळूहळू वाढतो'

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), दिल्ली येथे सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्राध्यापक असलेले डॉ. एस व्ही एस देव यांच्या मते प्रोस्टेट कॅन्सर हळूहळू वाढणारा धोका आहे. सहसा वृद्ध पुरुषांमध्ये आढळणारा एक सामान्य कर्करोग आहे. ज्यामुळे लवकर निदान कठीण होते.

याशिवाय, थायरॉईड कॅन्सर आणि काही प्रकारचे ब्रेस्ट कॅन्सर आहेत जे शरीरात हळूहळू वाढतात.

ते म्हणतात की, पूर्वी ही प्रकरणं भारतात सामान्य नव्हती. त्याचं कारण सरासरी वय कमी म्हणजे 60 वर्षांपर्यंत होतं. पण आता आयुर्मयादा वाढली आहे.

प्रोस्टेट कॅन्सर

फोटो स्रोत, GETTYIMAGES/KATERYNA/SCIENCE PHOTO LIBRARY

डॉ. विक्रम बरुआ कौशिक हे आर्टेमिस हॉस्पिटलचे यूरोलॉजी प्रमुख आहेत.

ते म्हणतात, "जसं लोकांचं सरासरी वय वाढलं, प्रोस्टेट कॅन्सरची प्रकरणं देखील दिसू लागली, परंतु प्रकरणांची संख्या आहे त्यापेक्षा जास्त असू शकते."

डॉक्टर एस व्ही एस देव म्हणतात की, भारतातील कॅन्सर नोंदणीनुसार, गेल्या दशकात प्रोस्टेट कॅन्सरची प्रकरणं वाढली आहेत. परंतु हा आकडा पाश्चात्य देशांच्या तुलनेत दोन-तीन पट कमी आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, हा कॅन्सरचा डेटा कॅन्सरच्या नोंदणीतून येतो. प्रत्येक रुग्णालयातून याची नोंद घेतली जात नाही. अशा परिस्थितीत, प्रोस्टेट कॅन्सरची सध्याची प्रकरणं खूप जास्त असू शकतात.

ते म्हणतात की, प्रोस्टेट कॅन्सरची प्रकरणे कमी आहेत कारण इथे कोणतेही स्क्रीनिंग प्रोग्राम नाहीत आणि त्यामुळे याची माहिती समजत नाही. परंतु पाश्चिमात्य देशांमध्ये रुग्णांची जास्त तपासणी केली जाते.

मात्र, यामुळे झालेल्या मृत्यूंचा अंदाज लावणंही आव्हानात्मक आहे कारण यामुळे झालेल्या मृत्यूंची नोंद कमी ठेवली जाते.

हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे का?

डॉक्टर प्रदीप बन्सल सांगतात की, पुरुषांचं वय जसजसं वाढत जातं, तसं प्रोस्टेट कॅन्सरची जास्त प्रकरणं समोर येतात. याचं कारणही अनुवांशिक आहे. त्याच वेळी, शाकाहारी लोकांच्या तुलनेत मांसाहारी लोकांमध्ये या कॅन्सरचा धोका जास्त असू शकतो.

फोर्टिस हॉस्पिटलमधील यूरोलॉजी, रोबोटिक्स आणि रेनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. प्रदीप बन्सल यांनी सांगितलं की, शाकाहारी लोकांना हा कॅन्सर होणार नाही असं नाही.

प्रोस्टेट कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

हा मुद्दा पुढे घेऊन डॉक्टर एस व्ही एस म्हणतात की, हा कॅन्सर पाश्चात्य देशांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो कारण तो जीवनशैलीशी संबंधित आहे. यामध्ये जंक फूड, धूम्रपान, मद्यपान इत्यादी खाण्याच्या सवयींचा समावेश आहे ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

लॅन्सेट अहवालात असं नमूद केलंय की प्रोस्टेट कॅन्सरचं निदान उशिरा होतं. जगभरात असं आढळून आलंय की कमी किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये उशीरा निदान होणं हे देखील एक कारण आहे.

कॅन्सरची लक्षणं

जर एखाद्याच्या कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असेल तर डॉक्टर तपासणी करण्याचा सल्ला देतात.

प्रोस्टेट कॅन्सरची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याचं डॉक्टर सांगतात.

डॉक्टरांच्या मते, पीएसए पातळी देखील व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते.

अमेरिकन सरकारच्या अधिकृत वेबसाइट नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार, पीएसए पातळी सामान्य किंवा असामान्य नसते. पूर्वी 4.0ng/mL पातळी सामान्य पातळी किंवा त्यापेक्षा कमी सामान्य मानली जायची. पण आता असं आढळून आलं आहे की ज्यांची पातळी यापेक्षा कमी असते त्यांना कॅन्सर दिसून आला आहे. आणि ज्यांची पातळी यापेक्षा जास्त आहे, म्हणजे 10ng/mL पर्यंत आहे त्यांच्यामध्ये कॅन्सर दिसून आलेला नाही.

विषाणू

फोटो स्रोत, GETTYIMAGES/KATERYNA/SCIENCE PHOTO LIBRARY

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्याची लक्षणं दिसत नाहीत, परंतु काही समस्या उद्भवल्यास :

  • वारंवार लघुशंका
  • रात्री मंद प्रवाह
  • लघवीचा स्त्राव येणं
  • लघवीतून रक्तस्त्राव होणं

पीएसए चाचणी केल्यावर जर कॅन्सर आढळून आला आणि तो हाडांमध्ये पसरला असेल तर या समस्या उद्भवू शकतात :

  • पाठदुखी
  • हाड फ्रॅक्चर
  • हाडं दुखणे इत्यादी समस्या उद्भवतात

याबद्दल डॉ. प्रदीप बन्सल म्हणतात, "रुग्णांमध्ये कॅन्सर आढळून येण्याचं प्रमाण 60-75 वयवर्ष आहे. हा कॅन्सर प्रोस्टेटपुरता मर्यादित असेल, तर आम्ही रोबोटिक शस्त्रक्रियेची शिफारस करतो. यातून 10-15 वर्ष आयुष्य वाढतं. पण हा कॅन्सर हाडांमध्ये पसरला तर अवघड आहे, त्यावर वेगळ्या पद्धतीचे उपचार केले जातात."

औषधांची उपलब्धता

रक्त तपासणीद्वारे प्रोस्टेट कॅन्सरचा शोध लावता येतो आणि बहुतांश प्रयोगशाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जर प्रोस्टेट मोठा झाला असेल तर इमेजिंग, अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय देखील केले जाते.

डॉक्टर एस व्ही एस स्पष्ट करतात की, सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णावर रोबोटिक शस्त्रक्रिया करून तो भाग काढून टाकला जातो पण जर पुढची स्टेज असेल तर हार्मोन थेरपी दिली जाते आणि नंतर रुग्णाची स्थिती पाहून उपचार केले जातात.

ते म्हणतात की प्रोस्टेट कॅन्सरचा रुग्ण पाच ते 15 वर्षे जगू शकतो, कारण हा एक असा कॅन्सर आहे ज्यावर उपचार केला जाऊ शकतो.

राजेश कुमार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून ते सामान्य जीवन जगत आहेत.

अनुवांशिक आजार

डॉक्टर म्हणतात की, कॅन्सर हा असा एक आजार आहे जो अनुवांशिक देखील आहे. म्हणजे, जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला कॅन्सर असेल तर पुढच्या पिढीतील सदस्यांना कॅन्सर होण्याची शक्यता असते.

अशा परिस्थितीत एखाद्या कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सर किंवा इतर कोणताही कॅन्सर असल्यास त्यांची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात.

जर कुटुंबातील कोणाला प्रोस्टेट कॅन्सर झाला असेल, तर कुटुंबातील इतर पुरुष सदस्यांनी 45 वर्षानंतर दर दोन वर्षांनी पीएसए चाचणी करून घ्यावी. महिलांनी स्वत: स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करून घ्यावी.

परदेशात काय परिस्थिती आहे?

लॅन्सेटच्या अहवालानुसार, 2020 नंतर पूर्व आशिया, दक्षिण अमेरिका, पूर्व युरोप, उत्तर अमेरिका यांसारख्या देशांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर आणि मृत्यूचं प्रमाण वाढेल.

डॉ. एस व्ही एस देव म्हणतात की, अमेरिका आणि युरोपमधील श्रीमंत लोकांनी आता त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला एक दशक लागेल. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात लोकांनी स्वस्त जंक फूडचं सेवन केलंय, त्याचा परिणाम आता दिसून येतोय.

डॉक्टर विक्रम बरुआ कौशिक म्हणतात की, अमेरिकेत भरपूर स्क्रीनिंग होतं, त्यामुळे जास्त प्रकरणं नोंदवली जातात.

पण या सर्व डॉक्टरांचे म्हणणं आहे की या कॅन्सरवर उपचार शक्य आहे आणि त्याची वाढ मंद असल्याने रुग्णही दीर्घायुष्य असतो.