लसूण कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करतो का? जाणून घ्या लसणाचे आरोग्यासाठी फायदे

लसूण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी फूड

लसणामुळे सर्दी बरी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो, शरीरातील चरबी (कोलेस्टेरॉल) नियंत्रित राहते असं म्हटलं जातं.

पण, हे समज वैज्ञानिक कसोट्यांवर खरे उतरले आहेत का? जेवणात लसूण किती प्रमाणात वापरायचा?

जर तुमचा अशा गोष्टींवर विश्वास असेल, तर पुढच्या वेळी सर्दी झाल्यावर तुम्ही लसूण खाऊ शकता. पण लसूण नाकात तेवढा घालू नका.

लसूण हा फक्त सर्दीवरच गुणकारी आहे असं नाही तर अनेक आजारांवर गुणकारी आहे असं म्हटलं जातं. पण या गोष्टी खऱ्या आहेत का? आज तेच पाहूया.

लसूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

ब्रिटिश डायटेटिक असोसिएशनचे प्रवक्ते बाल आहारतज्ञ बही व्हॅन डी बोअर सांगतात की, "लसणामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक आणि सल्फरचे प्रमाण जास्त असते. मॅग्नेशियम, मँगनीज, लोह मध्यम आहेत. ही एक अप्रतिम भाजी आहे."

कच्च्या लसणात ॲलिसिन मुबलक प्रमाणात असते. हे एक सल्फर कंपाऊंड आहे ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.

ते आरोग्यासाठी नक्कीच चांगले आहे. हे केवळ पोषक तत्वंच पुरवत नाही तर प्रीबायोटिक फायबरचा एक उत्तम स्रोत देखील आहे. आपल्या आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचे पोषण करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे.

"आतड्यातील या चांगल्या बॅक्टेरियांना पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी फायबरची आवश्यकता असते."

लसूण कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करतो का?

इराणमधील 2016 च्या एका अभ्यासात, सहभागींनी 20 ग्रॅम लसूण आणि एक चमचा लिंबाचा रस यांचे मिश्रण आठ आठवडे दररोज घेतले. त्याचे परिणाम सकारात्मक आले. या प्रयोगात कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब दोन्ही कमी झाल्याचं दिसून आलंय.

त्याच वर्षी प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असा दावा करण्यात आलाय की लसूण रक्तदाब कमी करू शकतो.

मात्र, आपण स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा अभ्यास लक्षात घेतला तर आपल्याला याच्या नेमकं उलटं उत्तर मिळतं. या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 2007 मध्ये एक शोधनिबंध प्रकाशित करून लसूण कोलेस्टेरॉल कमी करतो हा समज दूर केला.

"कोलेस्टेरॉलचं सौम्य प्रमाण असलेल्या 200 निरोगी प्रौढांनी सहा महिने लसूण खायला दिला. मात्र त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉल कमी झाल्याचं दिसलं नाही.

त्यांना प्रतिदिन लसणाची एक पाकळी देण्यात आल्याचं प्राध्यापक गार्डनर यांनी स्पष्ट केलं."

लसूण खाल्ल्यामुळे कॅन्सर बरा होतो हे कितपत खरंय?

फोटो स्रोत, Getty Images

प्राध्यापक गार्डनर यांनी हा अभ्यास लिहिण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

गार्डनर सांगतात, "आमच्या अभ्यासात 200 लोकांनी सहभाग घेतला होता. सलग सहा महिने हा अभ्यास सुरू होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने या अभ्यासासाठी अनुदान दिलं होतं.

गार्डनर म्हणाले की, आमचा अभ्यास अत्यंत अचूकतेने केला गेलाय. तरीही हे समज खरे असतील तर ते जाणून घेणं मनोरंजक आहे.

लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे सर्वमान्य आहे. परंतु कोणत्याही व्यापक अभ्यासाद्वारे त्यांची पुष्टी करणं हे मोठं आव्हान असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

लसूण कर्करोगावर गुणकारी आहे का?

नॉर्वे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मेरीट ओटरली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कर्करोगाच्या संशोधनाचा भाग म्हणून लसणावर संशोधन केलं आहे.

ते सांगतात की,"या अभ्यासात आम्हाला असं आढळलं की ताज्या हिरव्या लसणातील घटक सेल्युलर तणाव यंत्रणा उत्तेजित करण्यासाठी उपयुक्त आहेत. पेशींच्या प्रथिने उत्पादनात किंवा प्रथिनांच्या नूतनीकरणात समस्या असलेल्या पेशी नष्ट करणं महत्त्वाचं आहे असं आम्हाला वाटतं."

मेरीट ऑटरली यांच्या टीमने ताजे लसूण आणि इथेनॉल वापरून लसणाचा अर्क तयार केला. विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये हे फायदेशीर असल्याचं त्यांना आढळून आलं.

"अनेक शास्त्रीय अभ्यास आहेत जे कोलन, रेक्टल, स्तन आणि प्रोस्टेट सारख्या कर्करोगांवर फायदेशीर प्रभाव दर्शवतात. आम्ही उंदरांवर लसणाच्या अर्काची चाचणी केली. आणि या अर्काचा कर्करोग विरोधी प्रभाव दिसून आला."

मात्र या निकालांसाठी देखील काही अटी लागू होतात. जसं की लसणाचं मिश्रण हे द्रव स्वरूपातील असायला हवं. जर ते गोठलं किंवा कोरडं झालं तर त्याचा प्रभाव दिसून येणार नाही.

लसूण खाल्ल्यामुळे कॅन्सर बरा होतो हे कितपत खरंय?

फोटो स्रोत, Getty Images

दुसरं म्हणजे, हा अभ्यास मानवांवर नव्हे तर प्राण्यांवर करण्यात आला आहे. मात्र ऑटरली यांचा ठाम विश्वास आहे की मानवांमध्येही समान परिणाम मिळू शकतात.

कच्चा लसूण, लसूण अर्क किंवा ॲलिसिन वापरून 83 मानवी चाचण्या करण्यात आल्या. याच्या पुनरावलोकनात कर्करोगासह अनेक परिस्थितींवर फायदेशीर प्रभाव दिसून आला.

"दर आठवड्याला कच्च्या लसणाच्या दोनपेक्षा जास्त पाकळ्या खात असलेल्यांवरही अनेक अभ्यास करण्यात आलेत. अशा खाद्यपदार्थांमुळे कर्करोगाचा धोका कमी असल्याचे आढळून आलंय."

त्यामुळे सर्दी बरी होते का?

यावर काही तज्ज्ञांनी संशय व्यक्त केलाय, मात्र काही अभ्यासात असं सांगण्यात आलंय की, लसणामुळे सर्दी बरी होते. वेस्टर्न सिडनी विद्यापीठाचे प्राध्यापक मार्क कोहेन यांनी यावर संशोधन केलं आहे.

त्यांनी नमूद केलंय की, हे निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, लसूण उपयुक्त ठरू शकतो असं त्यांचं मत आहे.

सर्दीचं संक्रमण रोखण्यासाठी लसणाच्या वापराचे समर्थन करणारे पुरावे आहेत. लसणामध्ये प्रतिजैविक, विषाणू विरोधी आणि बुरशी विरोधी गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे. लसणाच्या विषाणू विरोधी गुणधर्मांवर केलेल्या अभ्यासात असं दिसून आलंय की, लसणात खूप सारे विषाणू विरोधी तत्व असून आणि ते पेशींमध्ये विषाणूचा प्रवेश रोखू शकतात.

जेवणात लसणाचा वापर किती प्रमाणात असावा?

जर आरोग्यदायी फायदे असतील तर, तुमच्या आहारात लसूण असावा

असं व्हॅन डी बोअर म्हणतात. एखादी पाकळी पुरेशी नसली तरी, आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या जेवणात लसूण असावा असं ते सांगतात.

जेवणात अधिक लसूण कसा वापरावा यासाठी आम्ही शेफ लिनफोर्ड यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणाले, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आहारात लसणाचा वापर करू शकता. जर तुम्हाला लसणाची चव आवडत असेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकात लसूण पेस्ट वापरू शकता. पेस्ट बनवल्याने लसणाचे सर्व घटक आपल्या शरीरात जातात.

पण जर तुम्हाला केवळ लसणाची चव हवी असेल तर लसणाच्या पाकळ्या ऑलिव्ह ऑईलमध्ये तळून घ्या आणि नंतर काढून टाका. लसणाच्या चवीच्या तेलाने स्वयंपाक केल्याने लसणाची चव येते.

जर तुम्हाला तुमच्या सॅलडमध्ये लसणाची चव हवी असेल तर सॅलडच्या भांड्याच्या आतील बाजूस लसणाच्या पाकळ्या चोळून घ्या.

लसूण सामान्य तापमानात ठेवला पाहिजे. जर लसूण मऊ पडला असेल किंवा तो तपकिरी झाला असेल तर लसणाची पाकळी खराब झाली आहे असं समजा. तो स्वयंपाकात वापरू नका.

लसूण प्रत्येकासाठी चांगला असतो का?

लसूण खाल्ल्याने काही लोकांच्या पोटाच्या समस्या वाढू शकतात.

व्हॅन डी बोअर सांगतात, दुर्दैवाने काही लोकांसाठी, विशेषतः इरिटेबल बोवेल सिंड्रोमसाठी लसूण त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे आयबीएस असलेल्या मुलं आणि प्रौढांना याचा त्रास होत असेल तर आहारात लसूण वापरणं टाळा.

लसणाची चव आणखी चाखण्यासाठी, स्वयंपाक करताना लसूण-इन्फ्युज्ड तेल वापरणं हा एक चांगला पर्याय आहे. या पद्धतीमुळे आयबीएस असलेल्या लोकांना याचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.