क्रॉनिक फटिग सिंड्रोमः तुम्हाला सतत दमल्यासारखं वाटतं का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
तुम्ही सतत दमलेली माणसं पाहिली आहेत का? अनेक माणसं सतत थकलेली किंवा कितीही आराम केला तरी थकल्यासारखी असतात. त्यांना दररोज भरपूर थकवा जाणवत असतो. साधारणपणे झोप पूर्ण झाल्यावर सकाळी बहुतांश लोकांना ताजंतवानं वाटत असतं पण काही लोकांना तसं जाणवत नाही. किती झोपलं तरी थकवा कायम आहे असं वाटतं असतं आणि तो असतोही.
सततचा थकवा आणि झोप, विश्रांती न झाल्यामुळे या लोकांच्या मनस्थितीवरही परिणाम झालेला दिसून येतो. चिडचिडेपणा किंवा अंगदुखल्यासारखं वाटत राहातं.

फोटो स्रोत, Getty Images
या लोकांपैकी काही जणांना क्रॉनिक फटिग सिंड्रोम असण्याची शक्यता असते. क्रॉनिक याचा अर्थ दीर्घकाळ किंवा जुनाट अशा अर्थाने आणि फटिग म्हणजे थकवा.
एखाद्या व्यक्तीला काही महिने किंवा वर्षं अशी स्थिती जाणवत असेल, सतत थकवा वाटत असेल तर अशा व्यक्तीने आपली तपासणी करुन घेणं आवश्यक आहे.
ही स्थिती कोणाच्याही जीवनात येऊ शकते. मुलांनाही याचा त्रास होऊ शकतो.
त्यातही महिलांचे प्रमाण जास्त असते. विशी आणि चाळीशीत याचं प्रमाण जास्त दिसतं.
क्रॉनिक फटिग सिंड्रोमची लक्षणं
सतत दमल्यासारखं वाटणं हे क्रॉनिक फटिग सिंड्रोमचं मुख्य लक्षण आहे. याबरोबरच इतरही काही लक्षणं आहे.
भरपूर वेळ झोपूनही किंवा आराम करुनही दमल्यासारखं वाटणं
- व्यायाम किंवा शारीरिक हालचाल केल्यावर शरीराची स्थिती पूर्ववत होण्यासाठी दीर्घकाळ आराम करावा लागणं
- झोप न येणं किंवा रात्री सतत जाग येणं.
- मूडवरती परिणाम, मूड स्विंग्ज होणं, विचार करताना अडथळे येणं, एखादी गोष्ट आठवताना अडथळा येणं, अभ्यास किंवा कामात, संभाषणात एकाग्र होता न येणं
अशा काही गोष्टी रोजच्या आयुष्यात दिसून येतात.
युकेच्या एनएचएस या आरोग्यसेवेने काही इतर लक्षणंही सांगितली आहेत. त्यानुसार क्रॉनिक फटिग सिंड्रोम असणाऱ्या लोकांना स्नायू किंवा सांधे दुखण्याचा त्रास होऊ शकतो. त्यांचं डोकं दुखू शकतं, घसा बसणे, फ्लूसारखी लक्षणं,
आजारी पडल्यासारखं वाटणं किंवा हृदयाचे ठोके वेगानं पडणं असे त्रास होऊ शकतात.
ही लक्षणं दिवसांनुसार वेगवेगळी असू शकतात. किंवा एका दिवसात ती बदलूही शकतात.
कधी एखादं लक्षण जास्त गंभीर दिसतं तर कधी दुसरं.

फोटो स्रोत, Getty Images
क्रॉनिक फटिग सिंड्रोमची कारणं अनेक असू शकतात. काही कुटुंबातील जनुकांमुळे हा दोष त्या कुटुंबात अनुवंशिक असू शकतो. तसेच काही विशिष्ट संसर्गांमुळे त्याची लक्षणं बळावू शकतात.
काही लोकांची प्रतिकारक्षमता कमी असते त्यांच्यावरही याचा परिणाम सर्वात आधी आणि जास्त होतो.
संप्रेरकांतील असमतोल हेसुद्धा याचं एक कारण आहे. संप्रेरकातील पातळी वरखाली होण्यामुळे अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं.
उपचार
क्रॉनिक फटिग सिंड्रोमची लक्षणं ही इतर अनेक आजारांसारखी आहेत. त्यामुळे आपल्याला नक्की कशाचा त्रास होतोय याची तपासणी करणं गरजेचं आहे.
आपल्याला वाटणारी दीर्घकाळची लक्षणं डॉक्टरांना सांगितली पाहिजेत. आपल्या आजाराचं निदान डॉक्टरांनाच करुन द्यावं. कोणताही निर्णय स्वतःच घेऊ नये.
क्रॉनिक फटिग सिंड्रोमच्या रुग्णांची लक्षणं, त्यांचं वय, काम हे पाहून डॉक्टर औषधं तसेच कॉग्नायटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे सीबीटीसारखी उपचारपद्धती सुचवतात.
काही लोकांना त्यांची ऊर्जा नक्की कशामध्ये जातेय हे पाहून त्यानुसार त्यांच्या दिवसभरातल्या कामाचं नियोजन करण्यास सांगतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याद्वारे दिवसभरातल्या कामांचं, हालचालींचं तसेच व्यायामाचं नियोजन केलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
हा त्रास कोणत्या अन्नघटकाच्या कमतरतेमुळे होत आहे का हे सुद्धा पाहिलं जातं. त्यानुसार त्या अन्नघटकाचा आणि औषधांचा वापर केला जातो. यातील रुग्णांना काही जीवनशैली बदल करण्यास सांगितले जातात.
ज्या रुग्णांना झोप येण्यात किंवा सलग झोप येण्यात अडथळे येत असतात अशा लोकांसाठी झोप सुधारण्यासाठी, तिची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच रिलॅक्सेशन, ध्यान, योगनिद्रा, विश्रांती होण्यासाठी काही उपाय सुचवले जातात.
अनेक लोकांना त्यांच्या जीवनविषय दृष्टिकोनात बदल व्हावा, सकारात्मक ऊर्जा मिळत राहावी, मन-शरीर शांत व्हावे यासाठी प्रयत्न करण्यासाठी मदत केली जाते.
तज्ज्ञ सांगतात...
क्रॉनिक फटिग सिंड्रोमबद्दल अधिक माहिती देताना मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटल्स येथे कार्यरत असणाऱ्या रुमेथॉलॉजिस्ट डॉ. दीप्ती पटेल यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.
त्या म्हणाल्या, क्रॉनिक फटिग सिंड्रोमचे एकच एक असे कारण नाही. त्याला जनुकीय कारण असू शकते. काहीवेळेस एखाद्या संसर्गानंतर याची लक्षणं बळावू शकतात तर काहीवेळेस शारीरिक, मानसिक त्रासामुळे त्याची लक्षणं वाढू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
क्रॉनिक याचा अर्थच दीर्घकाळ चालणारं. जर व्यक्तीला सतत दम लागत असेल, थोडीशीही हालचाल झाल्यावर, व्यायाम केल्यावर थकवा येत असेल, सतत वेदना होत असतील अंगावर काहीतरी धातूचा जड कोट घातल्यासारखा ताण येत असेल, झोपेत बिघाड झाला असेल, एकाग्रता कमी होऊन विचारात, निर्णय घेण्यात अडथळे येत असतील या लक्षणांवर लक्ष दिलं पाहिजे. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ही लक्षणं असली तर या आजाराची शक्यता असते.
मात्र याचं निदान नीट होणं आवश्यक आहे. डॉक्टर आधी सर्व चाचण्या करुन घेतात. अॅनिमिया, व्हीटॅमिन वगैरे सर्वच चाचण्या निगेटिव्ह येऊनही जर काही सापडत नसेल तर क्रॉनिक फटिग सिंड्रोमची शक्यता असू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
बहुतांशवेळा आपल्या चाचण्यांचा निकाल निगेटिव्ह येऊनही त्रास होतोय हे रुग्ण स्वीकारत नाहीत. त्यांना तुम्हाला कोणताही मोठा आजार झालेला नाही, कोणताही शारीरिक बिघाड झालेला नाही हे सर्व चाचण्यांतून दिसून आलं आहे ही सकारात्मक बाब असल्याचं पटवून दिलं पाहिजे. मगच ते उपचारांसाठी तयार होऊ शकतील.
या आजारावर एकच उपचारपद्धती नसते. त्या उपचारांमध्ये वेदना घालवण्यासाठी वेदनाशामक औषधं, झोप सुधारण्याची औषधं अशी अनेक औषधं दिली जातात.
ज्या लोकांमध्ये एखाद्या घटनेमुळे, धक्क्यामुळे त्रास वाढला असेल तर अशा लोकांना समुपदेशन आणि औषधं यांची सांगड घालून उपचार केले जातात. त्यामुळे त्या रुग्णाच्या त्रासाची मुख्य कारणं आणि त्याची स्थिती पाहून औषधं दिली जातात.

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळ्या रिलॅक्सेशन थेरपीची क्रॉनिक फटिग सिंड्रोमच्या रुग्णांना कशी मदत होते याबद्ाल पनवेल येथिल मनप्रवाह या संस्थेचे मानसोपचारतज्ज्ञ आणि संमोहनतज्ज्ञ डॉ. सुकुमार मुंजे यांनी अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, “व्यक्तीला आलेला मानसिक, शारीरिक ताण कमी होण्यासाठी हिप्नोथेरपीचा चांगला उपयोग होतो. ताण निर्माण करणारी संप्रेरकं कमी करण्यासाठी याची मदत होते. हिप्नोथेरपीमुळे क्रॉनिक फटिग सिंड्रोमच्या रुग्णाच्या झोपेची गुणवत्ता सुधारता येते. झोपेचं गणित नीट बसवणं, त्याला एकप्रकारची शिस्त येण्यासाठी मदत करणं हे हिप्नोथेरपीच्या मदतीने करता येतं.
त्याचप्रमाणे श्वसनाचे वेगवेगळे व्यायाम, श्वसनपद्धती, ध्यान यामुळेही रुग्णाला मदत होते. रुग्णाने जीवनशैलीतील बदल करावेत यासाठी या रिलॅक्सेशन थेरपींची मदत होते.”
हे ही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








