सिगारेट ओढणाऱ्याच्या शेजारी थांबल्याने कॅन्सर होतो का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिराज
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे' हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार आणि अर्धांगवायूसारखे आजार होतात.
सिगारेटच्या पाकिटांवर धूम्रपानाचे धोके मोठ्या अक्षरात छापलेले असतात. तसेच, तंबाखूच्या सवयीमुळे होणारे नुकसान आपण टीव्हीवर आणि सिनेमागृहांमध्ये जाहिरातीच्या रुपात पाहतच असतो.
पण जे खऱ्या आयुष्यात कधीही सिगारेट पीत नाहीत त्यांनाही धूम्रपानामुळे अशा आजारांचा फटका बसतो यावर तुमचा विश्वास बसेल का? धूम्रपान करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्याने असे आजार होऊ शकतात. याला सेकंड हँड स्मोकिंग किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी 80 लाख लोक तंबाखूशी संबंधित सवयींमुळे मरतात. तंबाखूजन्य पदार्थांच्या थेट वापरामुळे 70 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर 10 ते 13 लाख लोकांचा मृत्यू पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होतो. यात बहुतांश महिला असतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, तंबाखूची कोणत्याही प्रकारची सवय प्राणघातक असते.
याव्यतिरिक्त, तंबाखूची सवय ही जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे.
सिगारेट ओढणाऱ्या प्रत्येकाला हे माहीत आहे की याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होणार आहे. पण धुम्रपान न करणाऱ्यांना त्यांच्या शरीरावर याचा परिणाम होतो हे माहीत आहे का? यातून स्वतःचा बचाव कसा करायचा, सुरक्षित कसं राहायचं?
पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे काय?
मद्रासमधील अपोलो कॅन्सर सेंटरचे फिजिशियन आणि वरिष्ठ सल्लागार अजय नरसिंहन सांगतात की, "जर एखादी व्यक्ती थेट सिगारेट ओढत असेल तर ते सक्रिय धूम्रपान आहे, परंतु एखादी व्यक्ती त्याच्या शेजारी उभी राहून तो धूर श्वसनाद्वारे घेत असेल तर त्याला निष्क्रिय धूम्रपान किंवा पॅसिव्ह स्मोकिंग असं म्हणतात.
"सिगारेट ओढणाऱ्याचं जितकं नुकसान होत असतं तितकंच नुकसान बाजूला उभं राहून श्वासोच्छवास करणाऱ्याचं होत असतं. साहजिकच पतीला सिगारेटचं व्यसन असेल तर त्याच्यासोबत राहणाऱ्या पत्नीलाही धोका असतो."

फोटो स्रोत, Getty Images
"सिगारेटचा धूर हानिकारक आहे हे जाणून न घेता वर्षानुवर्षे श्वसन केलं जातं. शोकांतिका अशी आहे की हे सर्व निष्क्रिय धूम्रपान करणारे सिगारेटचे दुष्परिणाम त्यांच्या स्वत:च्या कोणत्याही दोषाशिवाय सहन करतात," असं डॉ. अजय नरसिंहन म्हणाले.
पॅसिव्ह स्मोकिंगच्या समस्या काय आहेत?
वैद्यकीय भाषेत सांगायचं तर तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, तीव्र श्वसन समस्या, हृदयविकार, पक्षाघात, घशाचा कर्करोग, दमा इत्यादी आजार होतात.
कर्करोगतज्ज्ञ अनिता सांगतात की, जर कुटुंबातील कोणी सिगारेट ओढत असेल तर त्याचा त्याच्या कुटुंबावर गंभीर नकारात्मक परिणाम होतो.
त्या पुढे सांगतात की, "काही महिन्यांपूर्वी एक महिला माझ्याकडे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी आली होती. ती 45 वर्षांची आहे. स्कॅनमध्ये फुफ्फुसातील एडेनोकार्सिनोमा (कर्करोग) आढळून आला. धक्कादायक म्हणजे तिने तिच्या संबंध आयुष्यात कधीही धूम्रपान केले नव्हते. पण तिच्या नवऱ्याला धूम्रपानाची सवय होती. नवरा जास्त वेळ घरात घालवायचा आणि धूम्रपान करायचा.
"अनेक वर्षांपासून या सिगारेटचा धूर घेतल्याने तिला श्वसनाचा त्रास झाला. पण तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही."

फोटो स्रोत, Getty Images
"एक दिवस, श्वास घेण्यास खूप त्रास होत असल्याने तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. मग ती माझ्याकडे आली. तुमच्या पत्नीच्या कॅन्सरला तुम्हीच कारणीभूत आहात असं मी तिच्या पतीला सांगितल्यावर ते गप्प राहिले. जगभरात, अनेक महिला ज्यांनी आयुष्यात कधीही सिगारेटला स्पर्श केला नाही त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग, पक्षाघात आणि हृदयविकाराचा धोका होतो. याचं कारण त्यांच्या शेजारी असलेले लोक सिगारेट ओढत असतात. सर्व धूम्रपान करणारे कोणताही पश्चाताप न करता सिगारेट ओढतात." असं डॉ. अनिता सांगतात.
"कोरोनाच्या काळात अनेक लोक त्यांच्या घरात बंदिस्त होते. अनेक घरांमध्ये पती सिगारेट आणि बिडी ओढत असताना त्यांच्या बायका आणि मुलं त्यांच्या शेजारी उभे राहून बोलत. पण ते किती धोकादायक आहे हे त्यांना माहीत नाही. म्हणूनच प्रत्येकाने निष्क्रिय धुम्रपानाबद्दल जागरूक असलं पाहिजे." असं त्या स्पष्ट करतात.
डॉ. अजय नरसिंहन म्हणतात, "विशेषतः लहान मुलांसाठी, सिगारेटच्या धुरामुळे शरीरावर प्रचंड परिणाम होतो. धूरातील निकोटीनचे रेणू फुफ्फुसात जातात आणि श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम करतात."
किती धोका?
आम्ही अद्यार कॅन्सर सेंटरचे सायको-ऑन्कॉलॉजीचे प्राध्यापक सुरेंद्रन वीरैया, यांच्याशी अनैच्छिक धुराच्या इनहेलेशनच्या समस्यांबद्दल आणि ज्या लोकांना त्याचा त्रास होतो त्यांनी वैद्यकीय मदत घ्यावी याबद्दल बोललो.
यावेळी वीरैया यांनी सांगितलं, "तंबाखूशी संबंधित आजारांची लक्षणे दिसत असली, तरी आपल्याला वाईट सवयी नाहीत याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. म्हणूनच अनेक निष्क्रिय धूम्रपान करणारे रोग वाढल्यानंतरच डॉक्टरांना भेटतात.
"तंबाखूमुळे निघणारा धूर रेस्टॉरंट असो, घर असो, ऑफिस कुठेही असलो तरी हा धूर हवेत विरतो असं सर्वांना वाटतं.
"उदाहरणार्थ रेल्वेत धूम्रपान बंदी आहे. पण काही लोक टॉयलेटमध्ये जाऊन सिगारेट ओढतात. ते बाहेर पडल्यावरही धुरातील विषारी रेणू तिथेच असतात. याचा अर्थ धुरातून बाहेर पडणारे विष आपल्या नकळत सर्वत्र पसरतात. बऱ्याच लोकांना हे समजत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे सांगता तकी, "कोणत्याही गर्भवती महिलेने हा धूर घेतला तर त्याचा थेट परिणाम गर्भावर होतो. या प्रदीर्घ इनहेलेशनमुळे, महिना पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती होते. अनेक समस्या असलेली मुलं जन्माला येतात. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगापासून ते हृदयविकारापर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्ही सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीसोबत असाल तर तुम्ही त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नक्कीच घेऊन जावे."
यावर उपाय काय?
पॅसिव्ह स्मोकिंगबद्दल जागरूकता निर्माण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
सुरेंद्रन वीरैया म्हणतात, "सिगारेट ओढणे ही चांगली गोष्ट नाही हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. मुले आणि महिलांनी याबाबत काळजी घ्यावी. धुम्रपानाच्या धोक्यांबाबत शास्त्रीय पुरावे असले तरी लोकांमध्ये याबाबत जागरूकता नाही."
"सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घालणारे कायदे आहेत, परंतु त्यांचे सहज उल्लंघन केले जाते. त्यामुळे प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे. प्रत्येकाला स्वच्छ हवा घेण्याचा अधिकार आहे. आपण तंबाखूमुक्त भारताकडे वाटचाल केली पाहिजे," असंही वीरैया म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
कायदा काय सांगतो?
2014 मध्ये, भारताने तंबाखू उत्पादनांच्या वापरावर कायदा लागू केला. यानंतर सिगारेटच्या पेटीवर 'धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे' असे शब्द लिहिले.
मात्र, सरकारी आदेशाविरोधात सिगारेट उत्पादकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय कायम ठेवला होता.
धूम्रपानाच्या सवयीला आळा घालण्यासाठी विविध प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाण्यावर, सिगारेट ओढण्यावर बंदी, तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी, 18 वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, शाळा-महाविद्यालयांजवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे.











