'आयुष्यातला तो कठीण काळ होता; गांजा आणि दारूचं व्यसन कसं लागलं ते कळलंच नाही'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रवी प्रकाश
- Role, बीबीसी हिंदीसाठी
पाटण्यात राहणारी संजना (नाव बदललेलं आहे) फक्त 22 वर्षांची आहे.
इंजिनियर असणारी संजना म्हणते की, "मी शिकत असताना एका रिलेशनशिपमध्ये होते. माझं ब्रेकअप झालं आणि मी छोट्या छोट्या गोष्टींवर रडायला लागले. मला प्रचंड राग यायचा. माझं अभ्यासात अजिबात लक्ष लागायचं नाही."
"प्रत्येक गोष्टीत मी गोंधळून जायचे. माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात कठीण काळ होता. हळूहळू मी माझ्या मित्रांसोबत गांजा आणि दारू प्यायला लागले. त्यानंतर या गोष्टींचं व्यसन नेमकं कधी आणि कसं लागलं तेच मला कळलं नाही."
संजना म्हणते की "त्याआधी मी कधीच दारू प्यायले नव्हते किंवा गांजा घेतला नव्हता. पण हे सगळं एवढ्या वेगात घडत गेलं की थोडासा ताण आला तरी मी दारू किंवा गांजाचं व्यसन करायला लागले."
"मग घरच्यांपासून लपून मी माझ्या घरी परत यायचे आणि झोपी जायचे. अनेक महिने हा प्रकार असाच चालत राहिला. खाण्यापिण्याचा विचारही डोक्यात येत नव्हता ना त्याची कधी गरज वाटायची."
संजनाने सांगितलं की," माझ्या मित्रांकडून माझ्या आई वडिलांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी मला समजावून सांगण्याचे प्रयत्न केले."
"त्यांना मला होत असलेला त्रास समजला होता त्यामुळे त्यांनी माझ्यावर उपचार केले. माझे समुपदेशन करण्यात आले आणि त्यानंतर माझ्या पुनर्वसनासाठी उपचार सुरू झाले."
संजना म्हणते की, "अनेक महिने घेतलेल्या उपचारानंतर मी ही व्यसनं सोडू शकले. आता मी नोकरीसाठी पुण्याला जाणार आहे. माझ्या आयुष्याची ही नवी सुरुवात आहे."
संजना ही काही एकमेव तरुणी नाहीये. तिच्यासारख्या अशा अनेक तरुण मुली आहेत ज्या कधी त्यांच्या भावनांवर नियंत्रण न ठेवू शकल्याने तर कधी मित्रांच्या दबावाला बळी पडून एखाद-दुसऱ्या व्यसनाच्या विळख्यात अडकल्या आहेत."
काय असते व्यसन? व्यसन कशाप्रकारचे असते?
पाटण्यातल्या एका प्रमुख व्यसनमुक्ती केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टर प्रतिभा म्हणतात की, बहुतांश प्रकरणामध्ये व्यसन अगदीच नकळत लागते. आपण एखाद्या व्यसनाला बळी पडलोय हे लक्षातही येत नाही.
बीबीसीसोबत बोलताना डॉक्टर प्रतिभा म्हणाल्या की, "अनेकवेळा लोकांना वाटते की सगळं काही त्यांच्या नियंत्रणात आहे आणि त्यांना कसलंही व्यसन जडणार नाही पण व्यसनाच्या विळख्यात अडकण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. लोक असा विचार करतात की मी एकदा दारू पिऊन बघीन किंवा फक्त एकदा गांजा घेऊन बघेन आणि नंतर सोडून देईन."
"पण हळूहळू हे करण्याची इच्छा वाढू लागते आणि इच्छेचं रूपांतर व्यसनात कधी होतं हे कळतही नाही. असे असले तरी व्यसन सोडणे देखील फारसे अवघड नाहीये. तुमच्या कुटुंबाची साथ असेल तर केवळ काही महिन्यांचे समुपदेशन आणि उपचार करून तुम्ही व्यसनांना सोडचिट्ठी देऊ शकता."

फोटो स्रोत, RAVI PRAKASH
लंडनच्या किंग्ज कॉलेजमधल्या प्राध्यापक शेली मार्लो यांनी दावा केला आहे की, पुरुषांपेक्षा महिलांना व्यसनाचा धोका जास्त असतो.
स्वतःचेच उदाहरण देऊन त्या म्हणतात की, त्या 25 वर्षांच्या होत्या तेंव्हा त्यांना एक व्यसन जडले होते त्यानंतर त्यांना उपचार घ्यावे लागले.
शेली मार्लो जुगार आणि नशेच्या आधीन झालेल्या महिलांना या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी मदत करण्याचे काम करतात.
त्या सांगतात की, "जर महिलांना एखादे व्यसन जडले तर त्यांना कसलीही मदत मिळत नाही. त्यांच्यावर लागलेला व्यसनांचा 'कलंक' त्यांना सहन करावा लागतो."
भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये, 18 ते 75 वयोगटातील 15 कोटींहून अधिक लोकांना दारूचे व्यसन होते.
याशिवाय इतरही काही व्यसनं लोकांना जडली होती. यामध्ये महिलांची संख्या नेमकी किती होती हे या सरकारी आकड्यांवरून तर कळत नाही पण ही आकडेवारी नक्कीच चिंताजनक म्हणावी लागेल.
भारत सरकारतर्फे अशा लोकांसाठी 'नशामुक्त भारत अभियान' चालवले जात आहे.
महिलांच्या मनात असणारा संकोच आता कमी झालाय का?
पाटण्यातील सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर बिंदा सिंग यांचे असे मत आहे की आजही महिलांच्या मनात व्यसनांच्या बाबतीत असणारी जागरूकता फारच कमी आहे.
व्यसनांबाबत असणाऱ्या त्यांच्या मनातला अवघडलेपणा अजूनही कमी झालेला नाही आणि ही व्यसनं काही केवळ दारू, सिगरेट किंवा गांजाची नसतात. सोशल मीडियाच्या वापराचे वाढते व्यसन आणि अधिक स्वच्छतेचे व्यसन यामुळे देखील महिलांच्या दैनंदिन कामावर आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहेत.
त्या म्हणतात की सध्या मी अशा एका महिलेचे समुपदेशन करते आहे जिला तिचे घर अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याचे व्यसन जडले आहे.
समजा तिच्या घरी कोणीही पाहुणे आले की ते गेल्यावर लगेचच ती संपूर्ण घर घासून पुसून स्वच्छ करायला घ्यायची. अगदी काहीही घडलं की लगेच स्वच्छता करण्याचं हे व्यसन होतं. मात्र तिच्या या व्यसनामुळे त्रासलेला तिचा नवरा तिला माझ्याकडे घेऊन आला.

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टर बिंदा सिंग यांनी बीबीसीला सांगितले की, "पाटणा, रांची, रायपूर, वाराणसीसारख्या (टियर टू) छोट्या शहरांमध्ये व्यसनांच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येणाऱ्या पुरुष आणि महिलांच्या संख्येमध्ये मोठी तफावत आहे. एका सरासरीनुसार व्यसनांच्या तक्रारी घेऊन आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक दहा रुग्णांमध्ये केवळ एक महिला असते."
"हो पण दिल्ली, मुंबई, पुणे, लखनौ सारख्या शहरांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. कोणतीही अशी सवय जिच्यावर तुमचे नियंत्रण राहत नाही ती व्यसन असते. यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. जेवढ्या लवकर तुम्ही डॉक्टरकडे जाल तेवढ्या लवकर तुम्ही बरे व्हाल हे समजून घेणे गरजेचे आहे."
मोठ्या शहरांमध्ये काय परिस्थिती आहे?
मुंबईतील महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या एका व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रातील डॉक्टर आशा लिमये म्हणतात की, महानगरातल्या स्त्रिया लहान शहरांतल्या महिलांपेक्षा अधिक जागरूक असतात. त्या त्यांच्या समस्या सांगतात आणि त्यामुळे लवकर बऱ्या होतात.
रांचीमध्ये असणाऱ्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्रीच्या ड्रग्ज व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. रोशन व्ही खानंदे सांगतात की, छोट्या शहरांमध्येही व्यसनाला बळी पडणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे.
त्यामध्ये 18 ते 28 वयोगटातील मुलींची संख्या अधिक आहे. त्यांना दारू, गांजा, ड्रग्ज किंवा डेंड्राइट्स, व्हाईटनर, मादक गोळ्या इत्यादींचे व्यसन आहे.
ते म्हणतात की कमी प्रमाणात का असेना पण मुली व्यसनमुक्ती केंद्रात मदत घेण्यासाठी येत आहेत ही अत्यंत चांगली बाब आहे.
अजूनही हे प्रमाण प्रत्येक 15 रुग्णांमागे एक महिला असे आहे. मात्र त्यांच्या इथे न येण्यामागे व्यसनांच्या बाबतीत असणारा सामाजिक कलंक देखील कारणीभूत आहे.
व्यसने पुन्हा पुन्हा जडू शकतात
रांचीमधील व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख सिस्टर अॅना बर्के सांगतात की, अनेक वेळा लोक व्यसनातून मुक्त झाल्यानंतर पुन्हा पुन्हा व्यसनांच्या विळख्यात अडकतात.
विशेषतः दारू आणि सिगारेटच्या बाबतीत हे घडते. आमच्यासमोर बऱ्याचवेळा अशी प्रकरणे येतात, ज्यामध्ये आम्हाला रुग्णांचे पुन्हा समुपदेशन करावे लागते. कारण त्यांनी पुन्हा ड्रग्ज घेणे सुरू केले असते.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH
व्यसनांपासून कसे वाचावे?
तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास, तुमची अडचण तुमच्या कुटुंबाला किंवा मित्राला सांगावी.
कोणतेही व्यसन छोटे किंवा मोठे नसते. काही लोकांना केवळ 30 एमएल दारू पिल्यानंतरही व्यसन जडू शकते तर काहींना अधिकची दारू पिल्याने दारूचे व्यसन लागते.
कोणत्याही अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी चर्चा केल्याने तुम्ही व्यसनांपासून स्वतःला वाचवू शकता.
या सगळ्या खबरदाऱ्या घेऊनही जर एखाद्या गोष्टीचे व्यसन लागले तर काही महिन्यांच्या उपचार आणि समुपदेशनाने व्यसनांपासून सुटका मिळू शकते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








