श्वास घेताना चमकीचा स्क्रू ओढला, पोटात गेल्याचं वाटलं, पण गेला होता फुफ्फुसात आणि...

- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
वर्षा साहू यांच्याकडून दोन महिन्यांपूर्वी अपघातानंच श्वास घेताना नाकातील चमकीचा स्क्रू श्वासनलिकेत ओढला गेला होता. त्यावेळेस त्यांना फारशी चिंता वाटली नव्हती. त्यांना वाटलं होतं की स्क्रू पोटात गेला आहे आणि पचनसंस्थेतून तो शौचावाटे बाहेर पडेल.
मात्र हा धातूचा तुकडा त्यांच्या फुफ्फुसात अडकून बसला होता. त्यामुळे अनेक आठवडे त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यांना श्वास घेण्यासदेखील त्रास होत होता, दम लागत होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यावरच त्यांना आराम मिळाला.
भारतातील बहुतांश विवाहित महिलांप्रमाणेच 35 वर्षांच्या वर्षा साहू देखील नाकातील चमकी घालत होत्या. त्यांच्या लग्नाला 16-17 वर्षे झाली आहेत. तेव्हापासूनच त्या चमकी घालत आहेत. भारतीय परंपरेत चमकी म्हणजे विवाहाचं प्रतीक असतं.
"मला माहित नाही की चमकीचा स्क्रू मोकळा कसा झाला," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
भारतातील पूर्वेकडचं महानगर असलेल्या कोलकाता शहरातून त्या फोनवर बीबीसीशी बोलल्या.
दोन किशोरवयीन मुलांची आई असलेल्या वर्षा म्हणाल्या, "मी गप्पा मारत होते आणि त्याचवेळी मी खोल श्वास घेतला आणि तो स्क्रू आत ओढला गेला. अर्थात तो स्क्रू माझ्या श्वासनलिकेत आत ओढला गेल्याची कोणतीही कल्पना मला नव्हती. मला वाटलं तो माझ्या पोटात गेला आहे."
मेडिका सुपरस्पेशिअॅलिटी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसाच्या विकारांचे तज्ज्ञ असलेल्या डॉ. देबराज जाश यांनी वर्षांच्या यांच्या फुफ्फुसातून मागील महिन्यात तो स्क्रू बाहेर काढला.
वर्षा साहू यांचं प्रकरण हे अत्यंत दुर्मिळ असल्याचा त्यांनी सांगितलं. मागील दशकभरात भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये या प्रकारच्या दोनच प्रकरणांच्या बातम्या आल्या आहेत.

"काहीवेळा आमच्याकडे असे रुग्ण येतात, ज्यात सुकामेवा इत्यादी रुग्णांच्या फुफ्फुसात गेलेले असतात. त्यातही बहुतांश रुग्ण एकतर मुलं असतात किंवा 80 वर्षांपेक्षा अधिक वयाचे वृद्ध असतात. वयाच्या तिशीत असणारी महिला रुग्ण ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे."
वर्षा यांना स्क्रू आत ओढल्यानंतर महिनाभरानं विविध समस्या होऊ लागल्या. त्यांना सतत कफ होऊ लागला. श्वास घेताना दम लागू लागला. न्यूमोनियाची लक्षणं दिसू लागली. त्यांना पूर्वी नाकाला दुखापत झाली होती. हा त्रास त्यामुळेच होत असेल असं वर्षा यांना वाटत होतं.
त्यांनी यावर औषधं घेतली, मात्र त्यांना बरं वाटत नव्हतं. मग त्या श्वसनाशी संबंधित तज्ज्ञाकडे गेल्या. त्यांचं सीटी स्कॅन करण्यात आलं आणि त्यात असं आढळून आलं की त्यांच्या फुफ्फुसात काहीतरी वस्तू आहे. त्यांच्या छातीचा एक्स रे काढण्यात आला आणि त्यात ही वस्तू काय आहे हे दिसून आलं.
डॉक्टरांनी वर्षा यांच्या श्वासनलिकेत आत एक छोटा कॅमेरा असलेला शस्त्रक्रियेचा चिमटा सोडला. मात्र त्यातून ही फुफ्फुसात गेलेली वस्तू काढता आली नाही. त्यानंतर त्यांना डॉ. जश यांच्याकडे पाठवण्यात आलं.
"आम्हाला आधी पेशंटशी बोलावं लागतं, नेमकी समस्या काय आहे, काय उपचार केले जाणार आहेत याची पेशंटला कल्पना द्यावी लागते. पहिला उपचार झाल्यानंतर लगेच दुसरी प्रक्रिया केली जात असल्यामुळे त्या चिंतेत होत्या. मात्र आम्ही त्यांना समजावून सांगितलं की मानवी शरीराची रचनाच अशी काही आहे की तिथे बाहेरील वस्तूंना जागा नसते," असं डॉ. जश सांगतात.
"आम्ही त्यांना समजावून सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत त्यांचं शरीर ती वस्तू स्वीकारणार नाही आणि जर ती वस्तू बाहेर काढली नाही तर त्यांचा न्यूमोनिआ गंभीर होत जाईल," ते पुढं म्हणाले.
डॉ. जश सांगतात की, त्यांनी वर्षा यांना सांगितलं की कदाचित त्यांना गंभीर शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यात फुफ्फुसाचा एक कप्पा बंद करावा लागेल. मात्र याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकत असल्यामुळे डॉक्टरांनी वर्षा यांच्या फुफ्फुसाची परत एकदा पाहणी करण्याचं (फ्रायब्रोप्टीक ब्रोंकोस्कोप) ठरवलं.

नेहमीच्या लवचिक ब्रोंकोस्कोपच्या मदतीनं एखादी धारदार वस्तू फुफ्फुसातून बाहेर काढणं अतिशय कठीण गोष्ट असते. ही वस्तू त्यांच्या फुफ्फुसात दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून होती आणि त्याच्याभोवती पेशींचीदेखील वाढ झाली होती.
"हा स्क्रू फुफ्फुसातून बाहेर काढताना आम्हाला खूपच काळजी घ्यावी लागणार होती. कारण अतिशय अरुंद अशा श्वासनलिकेला तो घासू शकला असता आणि त्यातून रक्तस्त्राव होण्याची भीती होती. असं झालं असतं तर परिस्थितीत खूपच गंभीर झाली असती," असं डॉक्टर पुढे म्हणाले.
वर्षा यांच्यावरील शस्त्रक्रिया जवळपास 30 मिनिटे चालली. शस्त्रक्रिया अतिशय यशस्वी झाली आणि चार दिवसांनंतर वर्षा यांना घरी पाठवण्यात आलं.
"शस्त्रक्रियेनंतर त्या तपासणीसाठी आमच्याकडे आल्या होत्या आणि आता त्या तंदुरुस्त आहेत," असं डॉ. जश म्हणाले.
तुम्ही पुन्हा नाकातील चमकी घातली का? या माझ्या प्रश्नावर वर्षा यांना हसू आलं.
"शक्यच नाही. असं काही होईल याची मी कल्पनादेखील करू शकत नव्हते. मात्र तसं घडलं. आता ते पुन्हा घडू नये असंच मला वाटतं." असं वर्षा म्हणाल्या.











