Organ Donation: अवयवदान करायचंय? 9 मु्द्यांमध्ये समजून घ्या प्रक्रिया

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पुण्यात एका महिलेने पैशांसाठी किडनी विकण्याचं प्रकरणं समोर आलंय. एजंटच्या सांगण्यावरून या महिलेने 15 लाख रूपये मिळतील म्हणून किडनी विकली. पण, एजंट फरार झाला.

तर, व्हॉट्सअपवर किडनी दान करायची आहे, संपर्क करा असे फॉरवर्ड मेसेज तुम्ही अनेकवेळा पाहिले असतील.

अवयवदान कायद्यानुसार, अवयवांची खरेदी-विक्री अवैध आहे. भारतात अवयवदान प्रक्रिया केंद्र सरकारच्या कायद्यानुसार पार पडते.

अवयवदान प्रक्रिया कशी असते? अवयवदान कोणाला करता येतं? मेंदू मृत होणं म्हणजे काय? अवयवदान प्रक्रियेशी संलघ्न डॉक्टर आणि तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

1.अवयवदान म्हणजे काय?

एस.एल.रहेजा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. संजिथ श्रीधरन अवयवदानाची व्याख्या सोप्या शब्दात समजावून सांगतात. "जेव्हा एखादा व्यक्ती किंवा त्याचा जवळचा नातेवाईक (मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचा) अवयवदान करून, गरजू व्यक्तीला, ज्याला जगण्यासाठी अवयवांची गरज असते, मदत करतात." याला अवयवदान म्हणतात.

18 वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकतो. व्यक्ती जिवंत असताना स्वत: निर्णय घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असेल तर, त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

2.अवयवदानाचे प्रकार कोणते?

अवयवदानाचे दोन प्रकार आहेत. जिवंत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान ज्याला Living Donor Organ Donation म्हणतात. आणि ब्रेन डेड, मृत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान याला Deceased Donor Organ Donation असं म्हटलं जातं.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, जिवंत असताना आपण एक किडनी (Kidney), पॅनक्रियास किंवा स्वादुपिंडाचा तुकडा (Pancreases) आणि यकृताचा (Liver) एक छोटा भाग दान करू शकतो.

स्वादुपिंडाचा छोटा तुकडा कापल्यानंतरही स्वादुपिंडाचं कार्य सुरळीत सुरू रहातं. तज्ज्ञांच्या मते, यकृत असा एकमेव अवयव आहे, ज्याचा भाग कापून घेतल्यानंतर काही कालावधीनंतर तो पुन्हा वाढतो. अवयवदाता आणि रुग्ण दोघांच्या शरीरात यकृताचा भाग हळूहळू वाढत जातो.

आपण अवयवदान करणार का?

फोटो स्रोत, Roberthyrons

फोटो कॅप्शन, आपण अवयवदान करणार का?

जिवंत असताना अवयवदान करणाऱ्यांमध्ये अत्यंत जवळचे नातेवाईक (Near Related Donors) आणि Non-near relative donors किंवा सोप्या भाषेत लांबचे नातेवाईक असे दोन प्रकार आहेत.

  • अत्यंत जवळच्या नातेवाईकांमध्ये- पती, पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि नातू किंवा नात यांचा समावेश होतो
  • Non-near relative donors मध्ये काका, मामा, त्यांची मुलं येतात. हे अवयवदाते गरजू व्यक्तीवरचं प्रेम किंवा आत्मियता असल्यामुळे अवयवदान करू शकतात.

ब्रेन डेड ज्याला सामान्य भाषेत मेंदू मृत झालेला व्यक्ती आणि मृत व्यक्तींचं अवयवदान करता येतं.

3.स्वॅप ट्रान्सप्लांट (Swap Transplant) म्हणजे काय?

भारतात अवयवदानासाठी केंद्र सरकारची नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (National Organ and tissue Transplant Organization) ही संस्था काम करते.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, स्वॅप ट्रान्सप्लांट म्हणजे दोन विविध कुटुंबातील व्यक्तींमध्ये करण्यात आलेलं अवयवदान.

NOTTO च्या माहितीनुसार, काहीवेळा अवयवदानासाठी गरजू व्यक्तीच्या कुटुंबातील लोक तयार असतात. मात्र, रक्तगट मॅच न झाल्यामुळे किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे अवयवदान करू शकत नाहीत. त्याचवेळी असंच एक दुसरं कुटुंबही असतं. मग ही दोन कुटुंब एकत्र येऊन आपल्या व्यक्तीचे प्राण वाचवतात. पहिल्या कुटुंबातील व्यक्ती दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तीला अवयवदान करू शकतो आणि दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तीकडूनही तसंच केलं जातं. तज्ज्ञ सांगतात, पती-पत्नीमध्ये स्वॅप ट्रान्सप्लांट केल्याची बरीच उदाहरणं आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, अवयवदान करूनही पटकावली तीन पदके

ट्रान्सप्लांट ऑफ ह्युमन ऑर्गन अॅक्ट 1994 नुसार स्वॅप ट्रान्सप्लांटला कायदेशीर मान्यता आहे.

4.जिवंत आणि मृत व्यक्ती कोणते अवयव दान करू शकतो?

तज्ज्ञ सांगतात, मेंदू मृत झालेला ज्याला वैद्यकीय भाषेत ब्रेन डेड म्हणतात. हा रुग्ण हृदय, यकृत, किडनी, स्वादुपिंड, कॉर्निया, फुफ्फुस, त्वाचा आणि हाडांचं दान करू शकतो.

तर जिवंतपणे एक किडनी, यकृत आणि स्वादुपिंडाचा भाग डोनेट करता येतो.

काही लोक मृत्यूनंतर आपला देह दान करतात. देहदानानंतर हा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वापरात येतो. तर, कुटुंबातील व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक डोळे, त्वचा आणि हाडं दान करू शकतात.

5.ब्रेन डेड किंवा मेंदू मृत होणं म्हणजे काय?

फोर्टिस रुग्णालयाचे ट्रान्सप्लांट फिजिशिअन डॉ. अतुल इंगळे सांगतात, "मेंदूला कामयची किंवा कधीच न बरी होणारी इजा," म्हणजे ब्रेन डेड होणं. रस्ते अपघात, डोक्याला लागलेला जबर मार आणि मेंदूतील एकादी रक्तवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मेंदूला कामयची इजा होते.

मेंदू आपल्या शरीराचं कंट्रोल सेंटर आहे. शरीरातील प्रत्येक अवयवाचं नियंत्रणं मेंदूकडून केलं जातं. मेंदू काम करत नसेल तर जगणं शक्य नाही. शरीरातील विविध प्रणाली मेंदूला इजा झाल्यामुळे हळूहळू बंद पडू लागतात.

रुग्णाचा "मेंदू मृत झाला आहे का नाही. हे एक खास टेस्ट केल्यानंतर समजतं." या चाचणीला वैद्यकीय आणि कायदेशीर मान्यता आहे, डॉ. इंगळे पुढे सांगतात. रुग्णाचा मेंदू मृत झाला असेल तर, त्याच्या कुटुंबाला याबाबत डॉक्टर माहिती देतात. आणि त्यानंतर, अवयवदान प्रक्रियेबाबत माहिती दिली जाते.

मेंदू मृत झालेला व्यक्ती दोन किडनी, यकृत, स्वादुपिंड, फफ्फुस, हृदय, आतडं, डोळे आणि टिश्यूचं दान करून 6 ते 9 गरजूंचे प्राण वाचवू शकतो.

नागपूरच्या झोनल ट्रान्सप्लांट समन्वय समितीच्या को-ऑर्डिनेटर वीणा वाठोरे ब्रेन डेथबाबत अधिक माहिती देतात. "ब्रेन स्टेम डेथ म्हणजे, स्टेमचं कार्य बंद होणं. ही एक अपरिवर्तनीय स्थिती आहे. ज्यात व्यक्तीचा मृत्यू होतो." भारतात याला ब्रेन डेथ म्हणतात. ब्रेन स्टेम डेड व्यक्ती श्वास स्वत: श्वास घेऊ शकत नाही.

किडनी

फोटो स्रोत, Getty Images

ब्रेन डेथ घोषित करण्यासाठी तीन पॅरामिटर असतात. त्या पुढे सांगतात, "चेतना नष्ट होणं म्हणजे कोमा, ब्रेनस्टेम रिफ्लेक्सची अनुपस्थिती आणि श्वसनक्रिया (उत्स्फूर्त श्वासोच्छवासाची अनुपस्थिती)." या चाचण्या किमान 6 ते 12 तासांच्या अंतराने वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमकडून दोन वेळा केल्या जातात.

रुग्णाला ब्रेन स्टेम डेथ कोण घोषित करतं,

  • रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर,
  • रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, ब्रेन डेथ प्रमाणित करण्यासाठी चार डॉक्टरांचं पॅनल एकत्रितपणे चाचण्या करतं
  • योग्य प्राधिकरणाद्वारे नियुक्त केलेल्या डॉक्टरांच्या पॅनलमधून डॉक्टरांचे नामनिर्देशन केलं जातं
  • न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, इंटेन्सिव्हिस्ट यांना योग्य प्राधिकरणाद्वारे नियुक्त केलेल्या पॅनलमधून नामांकित केलं जाईल

रुग्णालयात उपचार घेताना एखादा रुग्ण ब्रेन डेड झाल्यास, रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर कुटुंबाला ब्रेन स्टेम डेथ समजावून सांगतात.

6.अवयवदानाची प्रक्रिया कशी असते?

अवयवांची तातडीने गरज असलेला रुग्ण, रुग्णालयात आल्यानंतर त्याची सर्वप्रथम तपासणी केली जाते. चाचणीनंतर या व्यक्तीवर उपचार शक्य नसतील तर, त्याला अवयव प्रत्यारोपणासाठी गरजू रुग्ण समजलं जातं. त्यानंतर या रुग्णासाठी दाता शोधण्याचं काम सुरू होतं.

रहेजा रुग्णालयाचे डॉ. श्रीधरन सांगतात, "एखादा व्यक्ती अवयवदान करण्यास सक्षम आहे का नाही. हे वैद्यकीय तज्ज्ञांची टीम ठरवते." मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे अवयव त्याच्या कुटुंबीयांनी दान केल्यानंतर गरजूंना देण्यासाठी एक प्रक्रिया पाळली जाते.

अवयवदान प्रक्रियेशी जोडलले तज्ज्ञ सांगतात, अनेकांना अवयवदान करण्याची इच्छा असते. पण, अवयवदानाबाबत योग्य माहिती नसल्याने लोक पुढे येत नाहीत.

ट्रान्सप्लॅंट

फोटो स्रोत, Getty Images

नानावटी रुग्णालयाच्या ट्रान्सप्लांट सर्जरी विभागाचे संचालक डॉ. अनुराग श्रीमल सांगतात, "रक्तगट, क्रॉसमॅच आणि HAL चाचणी करून दाता शोधण्याचं काम सुरू होतं." सर्वप्रथम जवळच्या नातेवाईकांचा अवयवदानासाठी विचार केला जातो. जर, जवळचे नातेवाईक तयार नसतील तर, काका, चुलत भाऊ-बहीण यांचा विचार होतो.

अवयव प्रत्यारोपणासाठी दाता मिळाल्यानंतर पुन्हा वैद्यकीय तपासण्या सुरू होतात. डॉ. श्रीमल पुढे म्हणाले, "फिटनेस चाचणी, हृदय आणि मानसिक चाचणी केली जाते." सर्व तपासण्यांनंतर फिटनेस प्रमाणपत्र मिळालं की, प्रत्यारोपणाच्या परवान्यासाठी प्रोसेस सुरू होते.

अवयव प्रत्यारोपणाचा परवाना असलेल्या प्रत्येक रुग्णालयात ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी असते. त्याचसोबत ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटरही असतो. "रुग्णालयाची कमिटी अवयवदाता आणि अवयवांची गरज असलेल्यांमध्ये आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना, याची खातरजमा करते.

डॉ. श्रीमल म्हणाले, "जवळच्या व्यक्तीने अवयवदान करण्याची इच्छा दर्शवल्यास रुग्णालयातील समिती अंतीम निर्णय घेते. पण, इतर अवयव प्रत्यारोपणात राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीकडून परवानगी घ्यावी लागते." तर, रुग्ण बाहेरील राज्यातून असेल तर, रुग्णालयाला काही कागदपत्र रुग्ण रहात असलेल्या राज्याला द्यावी लागतात.

तज्य सांगतात, भारतात अवयवदानाला चालना मिळावी यासाठी चार प्रमुख गोष्टी करणं गरजेचं आहे.

  • ब्रेन डेड किंवा मेंदू मृत झालेल्या रुग्णांची वेळीच नोंद व्हायला हवी
  • अवयवदान प्रक्रिया पारदर्षक झाली पाहिजे. अवयवांची गरज असलेल्यांची ऑनलाईन वेटिंगलिस्ट असली पाहिजे.
  • ब्रेन डेडे बाबत लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे. लोकांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे

वीणा वाठोरे पुढे सांगतात, "अवयवदानासाठी संमती मिळाल्यानंतर, अवयव पुनर्प्राप्तीची (Retrieval) प्रक्रिया केली जाते. अनेक रुग्णालयं मृत दात्यांकडून अवयव पुनर्प्राप्तीचं काम करतात." त्यानंतर, प्रत्यारोपण संघ (Zonal Transplant Coordination Committee) हे सुनिश्चित करतं की, दान केलेले अवयव प्राप्तकर्त्यासोबत शक्य तितक्या लवकर सामायिक केले जातील.

केंद्र सरकारची नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन भारतात अवयवदानाबाबत सर्वोच्च संस्था आहे.

7.अवयवदान प्रक्रियेतील आव्हानं काय?

भारतात अवयवदानाचा टक्का अत्यंत कमी आहे. याचं प्रमुख कारण अवयवदानाबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज आणि अवयवदानाबाबत नसलेली जनजागृती.

केंद्रीय आरोग्य महासंचलनालयाच्या वेबसाईटवर अवयवदान प्रक्रियेतील प्रमुख आव्हानं काय याची माहिती देण्यात आलीये.

  • अवयवांची उपलब्धता आणि त्याच्या तुलनेत प्रचंड मागणी
  • सरकारी रुग्णालयात अत्याधुनिक साधनांची नसणारी उपलब्धता
  • लोकांना अजूनही ब्रेन डेड (मेंदू मृत होणं) म्हणजे काय याबाबत योग्य माहिती नाही
  • रुग्णालयाकडून ब्रेन डेड रुग्णांबाबत माहिती उपलब्ध न होणं
  • अवयवांच्या व्यापारावर नियंत्रण आणि कंट्रोल

8.भारतातील अवयवदानाची परिस्थिती काय?

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, भारतात 10 लाखांमागे फक्त 0.80 लोक अवयवदान करतात. अवयवदात्यांच्या तुलनेत अवयवांची मागणी प्रचंड जास्त आहे.

National Organ and tissue Transplant Organization च्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी 5 लाख रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते. फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. अतुल इंगळे म्हणतात, "भारतात दररोज योग्य वेळी अवयव न मिळाल्यामुळे 17 रुग्णांचा मृत्यू होतो."

भारतात मेंदू मृत झालेल्या रुग्णांमध्ये अवयवदानाचं प्रमाण 10 लाख लोकांमागे फक्त 0.34 एवढं आहे. याच्या तुलनेत स्पेनमध्ये 35.1 आणि अमेरिकेत हे प्रमाण 21.9 आहे. भारतातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील फक्त 13 राज्यात अवयवदान केलं जातं.

स्वेच्छेने अवयवदाता म्हणून नोंद केंद्र सरकारच्या नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या www.notto.nic.in या संकेतस्थळावर जाऊन करता येते.

9.पैसे घेऊन अवयवदान करता येत नाहीत

पैसे घेऊन किडनी विक्रीची घटना काही दिवसांपूर्वी पुण्यात घडली होती. अवयवदान हे स्वेच्छेने करता येतं. अवयवदान करताना पैसे घेणं कायद्याने गुन्हा आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार, अवैध पद्धतीने अवयवदान केल्यास एक ते तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. तर, 5 लाख रूपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

अवैध अवयवदानाचा गुन्हा कोणावर दाखल होतो

  • अवयवांचा पुरवठा किंवा अवयव मिळवून देतो असं सांगणाऱ्याला
  • पैसे घेऊन अवयव देणाऱ्या व्यक्तीला शोधून काढणाऱ्यावर
  • अवैध अवयवदानाबाबत चर्चा घडवून आणणाऱ्यासाठी, दोन पक्षांमध्ये मध्यस्ती करण्यासाठी
  • पैशांसाठी अवयवदान करणाऱ्यांना जाहिरात देणाऱ्यांवर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)