कोरोना : 'आई कोव्हिडने गेली हे माझ्या लहान मुलींना अजून माहितच नाही'

कोरोना

भारतातल्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशातल्या हजारोंनी आपले जिवलग गमावले. यातल्या प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेची परिस्थिती, संसर्गाला तोंड देण्यासाठीची अपुरी तयारी आणि नियोजन न करता सुरू करण्यात आलेली लसीकरण मोहीम यामुळे लोकांना झालेला त्रास या कहाण्यांमधून दिसतो.

अल्तुफ शम्सी यांनी बीबीसीला सांगितलेली त्यांची ही कहाणी...

लाईन

एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत आमचं कुटुंब एक सुखी कुटुंब होतं. मी आणि माझी बायको रेहाब आमच्या तिसऱ्या अपत्याची आतुरतेने वाट पाहत होतो.

आमच्या गायनॅकॉलॉजिस्टने आम्हाला 22 एप्रिलपर्यंत हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं होतं. प्रेग्नंन्सीचा 38वा आठवडा सुरू असल्याने आम्ही दुसऱ्याच दिवशी ऑपरेशनद्वारे बाळाला या जगात आणण्याचा विचार करत होतो.

नियमांनुसार तिने कोव्हिड चाचणी केली पण ही चाचणी पॉझिटिव्ह येणं आमच्यासाठी धक्कादायक होतं. त्या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड पॉझिटिव्ह पेशंट्स घेत नाहीत, हे आम्हाला माहिती होतं. रेहाबच्या प्रेग्नन्सीचा आणखी थोडा कालावधी बाकी असल्याने डिलिव्हरी थोडी पुढे ढकलावी, असं आमच्या गायनॅकॉलॉजिस्टने सुचवलं. रेहाबच्या कोव्हिड उपचारांवर आम्ही लक्ष केंद्रित करावं असं त्यांनी सुचवलं.

काही दिवसांनी रेहाबला प्रचंड ताप भरला आणि 28 एप्रिला तिला आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कोव्हिड हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

रेहाबला देण्यात येणारी औषधं अतिशय स्ट्राँग असल्याने त्याचा परिणाम बाळावर होऊन आम्ही बाळ गमावण्याची शक्यता असल्याचं पुढच्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं. संध्याकाळी तिची तब्येत ढासळली आणि तिला ऑक्सिजन द्यावा लागला. सिझेरियन डिलिव्हरीद्वारे बाळाचा जन्म करण्याचं डॉक्टरांनी ठरवलं.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

या ऑपरेशनदरम्यान भरपूर रक्तस्त्राव झाल्याने तिचा जीव जाण्याचा धोका असल्याचं सांगणाऱ्या कागदांवर हॉस्पिटलने आमच्या सह्या घेतल्या. हे म्हणजे कड्यावरून उडी मारताना आपल्याला काहीच होणार नाही आणि आपण सुरक्षित राहू अशी अपेक्षा करणं होतं.

या सर्जरीनंतर रेहाबला यापेक्षा जास्त गंभीर कोव्हिड उपचारांची गरज असल्याने आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड शोधावा, असंही आम्हाला हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.

तोपर्यंत बाळाची काळजी होतीच, पण आता रेहाबचीही काळजी वाटू लागली.

या सर्जरीसाठीची मानसिक तयारी करत असातानाच एक वाईट बातमी समजली. माझ्या वडिलांनाही कोव्हिड झाला होता. त्यांना दिल्लीतल्या दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांची तब्येत खालावत होती.

माझी आईही पॉझिटिव्ह होती आणि तिला घरीच ऑक्सिजन देण्यात येत होता. आपला नवरा आणि सून दोघेही श्वासाश्वासासाठी झगडतायत, हे तिला माहितंच नव्हतं.

सगळंकाही जणू बिनसत होतं. एकीकडे आयसीयू बेड शोधतानाच दुसरीकडे देवाचा धावा सुरू होता.

29 एप्रिलला आमच्या लेकीचा जन्म झाला. इतर कुठेही बेड मिळू न शकल्याने हॉस्पिटलने रेहाबला तात्पुरत्या आयसीयूमध्ये हलवलं.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

हॉस्पिटलकडे पुरेशा नर्सेस नव्हत्या आणि तोपर्यंत मलाही कोव्हिड झालेला होता. पण तरीही तो धोका पत्करत रेहाबसोबत थांबायचं ठरवलं. तिला औषधं देण्याची मला नर्सेसना सतत आठवण करून द्यावी लागत होती. तिला दुसरीकडे हलवावं असं सतत मला सांगण्यात येत होतं. व्हेंटिलेटर असणारा बेड शोधण्यासाठी मी माझ्या ओळखीच्या सगळ्यांना फोन केला होता.

अखेरीस आयसीयू बेड मिळाला पण तिला तिथपर्यंत नेण्यासाठी अत्यावश्यक सुविधा असलेली अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. तिच्यावरचे उपचार सुरू ठेवावेत अशी विनंती मी हॉस्पिटलला केली आणि त्यांना शक्य त्या सगळ्या गोष्टी ते करत होते.

1 मेचा दिवस मी कधीही विसरणार नाही. अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता. रेहाब ज्या हॉस्पिटलमध्ये होती तिथलाही ऑक्सिजन संपत आल्याचं सांगत त्यांनी मला ऑक्सिजन सिलेंडरचा बंदोबस्त करायला सांगितलं.

दरम्यान माझ्या वडिलांची तब्येत झपाट्याने खालावत असल्याचं माझ्या वडिलांच्या हॉस्पिटलने संध्याकाळी फोन करून सांगितलं. मी तिथे पोहोचेपर्यंत त्यांचं निधन झालं होतं.

मी पुरता सुन्न झालो होतो. समोर त्यांचं निश्चल शरीर होतं तर दुसरीकडे फोनवर रेहाबच्या हॉस्पिटलकडून ऑक्सिजनसाठीचे तातडीचे मेसेज येत होते. माझ्या आईची तब्येतही फारशी बरी नव्हती आणि सात आणि पाच वर्षांच्या माझ्या लेकी आई बाळासोबत घरी का आली नाही, असं सतत विचारत होत्या.

कोरोना

वडिलांच्या निधनाबद्दल आईला सांगणं मला कठीण गेलं. तिचा 42 वर्षांचा साथीदार आता या जगात नाही, हे सांगणं कठीण होतं. ते आमच्या कुटुंबाचा आधार होते.

त्यांचं दफन करून मी पुन्हा रेहाबच्या हॉस्पिटलला पोहोचलो. तिचीही तब्येत खालावलेली होती.

पुढचे 11 दिवस आशा आणि निराशेच्या हिंदोळ्याचे होते. रेहाबची तब्येत काहीशी सुधारली असली तरी ती अजूनही अत्यवस्थ असल्याचं मला रोज सांगण्यात येत होतं. दोन दिवसांनी तिच्या किडनीवर परिणाम झाल्याने तिला डायलिसीसवर ठेवण्यात आलं. पण तिच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी सुधारत होती. त्यामुळेच मी आता दुसरीकडे जावं, असं सांगण्यात आलं. ते तिचा व्हेंटिलेटरही काढणार होते, त्यामुळे मी दोन दिवसांनी आलो तरी हरकत नसल्याचं सांगितलं गेलं.

रेहाबसोबत थांबण्यासाठी मी एका खासगी नर्सची नियुक्ती केली होती. तिची स्थिती स्थिर असल्याचं या नर्सने मला रात्री 8 वाजताच्या सुमारास सांगितलं म्हणून मग आई आणि माझ्या दोन लेकींची चौकशी करण्यासाठी मी घरी गेलो. पण मी ताबडतोब हॉस्पिटलला यावं असं सांगणारा फोन रात्री 11 वाजता आला आणि मी हॉस्पिटलकडे धाव घेतली. पण मी पोहोचेपर्यंत रेहाब या जगात नव्हती.

तिच्या हदयक्रियेमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याचं हॉस्पिटलच्या स्टाफने मला सांगितलं. मी पुरता हादरून गेलो होतो. आतापर्यंत कणखर राहत मी माझ्या कुटुंबाची काळजी घेत होतो, पुढच्याच दिवशी बायकोला भेटण्याची, तिच्यासोबत बोलता येण्याची मला आशा होती. पण आता माझं जगंच कोलमडलं होतं.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गर्भवती महिलांना भारतात लसीकरणाची परवानगी देण्यात आली नाहीय. (प्रातिनिधिक फोटो)

मनात एकच विचार होता....आई पुन्हा कधीच घरी येणार नाही, हे मुलींना कसं सांगायचं. मी हे त्यांना अजूनही सांगितलेलं नाही. त्यांना कसं सांगायचं हेच मला समजत नाही. त्या रोज मला तिच्याबद्दल विचारतात आणि ती अजूनही हॉस्पिटलमध्ये असल्याचं मी त्यांना सांगतो. माझ्या बहिणीच्या मदतीने मी बाळाची काळजी घेतोय.

रेहाब एक अतिशय चांगली व्यक्ती, प्रेमळ आई, बायको, मुलगी आणि सून होती. तिला कसलीच भीती वाटत नसे. तिच्या आत्मविश्वासामुळेच तिने या आजाराशी इतका मोठा लढा दिला. आमचं तान्हं बाळ तिला पाहताही आलं नाही. पण हे बाळ म्हणजे रेहाबने आम्हाला जाता जाता दिलेली भेट आहे. आता मी माझ्या लेकींचा बाबा आणि आई दोन्ही होण्याचा प्रयत्न करतोय, पण रेहाबच्या जाण्याने आयुष्यात झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.

सतत वाटत राहतं, अजून काय केल्याने रेहाबचा जीव मला वाचवता आला असता? जर मला आणखी चांगल्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळवता आला असता, तर ती आज जिवंत असती का?

या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. पण मला ठामपणे असं वाटतं की कोव्हिडच्या लशी सर्वांपर्यंत पोहोचल्या तर रेहाबसारख्या अनेक स्त्रियांचे जीव वाचू शकतील. तिला लस मिळाली असती तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता. पण सरकारने अद्याप गरोदर महिलांना लस देण्याची परवानगी दिलेली नाही आणि म्हणून कोरोनाचा अशा महिलांना गंभीर संसर्ग होण्याचा धोका अजूनही आहेच.

माझ्या आयुष्याचा आधार असलेली माझी बायको गेली, पण मी ज्यातून गेलो ते इतर कोणालाही भोगावं लागू नये.

अलविदा, रेहाब.

(बीबीसीचे प्रतिनिधी विकास पांडे यांनी केलेलं शब्दांकन)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)