'संविधानाचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी'- वर्षा गायकवाडांचा परभणी प्रकरणावर प्रश्न

फोटो स्रोत, Amol Langar
परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीच्या अपमानाच्या प्रयत्नानंतर शहरात तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर शहरात शांततामय मार्गाने निषेध म्हणून बंद पाळण्यात यावा, असे आवाहन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.
"दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पण माझी सर्व समाजबांधवांना विनंती आहे की, सर्वांनी शांतता पाळावी," असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी? असा संतप्त सवाल करत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी करावी आणि या प्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी", अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती बसवण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी (10 तारखेला ) एका व्यक्तीने राज्यघटनेच्या प्रतिकृतीला सुरक्षित ठेवण्यासाठी लावण्यात आलेली काच फोडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला.
सदर व्यक्तीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहे, अशी माहिती परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.


या घटनेनंतर शहरात तसेच जिल्ह्यातील पाथरी आणि जिंतूर या ठिकाणी देखील तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी निदर्शनं झाली तसेच काही ठिकाणी टायर जाळून निषेधही नोंदवण्यात आला. काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलक करत आहेत.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, पुन्हा संविधानाची प्रतिकृती लावण्यात येईल असे सांगितले आहे.

फोटो स्रोत, Amol Langar
दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी गावडे यांनी केले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे नेते विजय वाकोडे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे कुणीही आक्रमक भूमिका घेऊ नये, असे आवाहन विजय वाकोडे यांनी केले आहे.

फोटो स्रोत, Amol Langar
आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस व जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असून त्यामुळे कोणीही आक्रमक भूमिका घेऊ नये, असे आवाहन भारतीय रिपब्लिकन पक्षाने ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांनी केले आहे.
शहरात कडक बंदोबस्त
शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी दोनवेळा फोनवर संपर्क साधला आहे. तसेच आंबेडकरी वस्त्यांमध्ये सुरू असलेले कोंबिग ऑपरेशन तातडीने थांबविण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व समाजकंटकांना अटक करा, अन्यथा तर पुढील दिशा ठरवली जाईल असा इशारा ॲड. आंबेडकर यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळ तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली आहे.पोलिसांनी संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने जनतेला अश्वासित करावे, की या प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











