खिशातच मोबाईलचा स्फोट होऊन मुख्याध्यापकाचा मृत्यू, जाणून घ्या बॅटरीचा स्फोट का होतो?

मोबाईल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मोबाईलमुळे एका मुख्याध्यापकाला प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सिरेगावबांध इथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

मुख्याध्यापकाने मोबाईल खिशात ठेवला होता . या स्फोटात मुख्याध्यापक गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली आहे. सुरेश संग्रामे असं मृत शिक्षकाचं नाव आहे तर नत्थु गायकवाड असं जखमीचं नाव आहे.

सुरेश संग्रामे कुरखेडा तालुक्यातील कसारी जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते.

हे दोघेही एका कार्यक्रमासाठी जात असताना अचानक संग्रामे यांच्या खिशातल्या मोबाईलचा फोनचा स्फोट होऊन कपड्याला आग लागली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

त्या आगीत भाजल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर बाईकवर मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

सुरेश भिकाजी संग्रामे हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वडसा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.

नत्थु यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

फुटलेला मोबाईल

फोटो स्रोत, ARIEL GONZALEZ

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश संग्रामे हे मुख्याध्यापक असून ते आणि त्यांच्या बहिणीचे पती नथू यांच्यासोबत साकोलीहून सानगडी गावाकडे जायला निघाले होते.

सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गाडी अर्जुनी मोरगाव हद्दीतील सेरेगावबांध इथ पोहचली असता त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. यात ते गाडीवरून कोसळले.

दोघांनाही साकोली इथं रुग्णालयात नेण्यात आलं. त्यात सुरेश यांना मृत घोषित करण्यात आलं तर त्यांचे नातेवाईक नथू यांच्यावर भंडाऱ्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत सुरेश यांच्या मृतदेहाची प्राथमिक चौकशी केली असता त्यांच्या डाव्या बाजूचा भाग जळालेला आढळून आलं. याच भागात शर्टच्या खिशात मोबाईल ठेवलेला होता आणि त्याच मोबाईलचा स्फोट झाला.

हा मोबाईल Nothing phone 1 नावाचा होता, अशी माहिती अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी बीबीसी माराठीसोबत बोलताना दिली.

लिथियम बॅटरीचा स्फोट का होतो?

मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम बॅटरीचा स्फोट का होतो, हे जाणून घेण्याआधी या बॅटरीज कसे काम करतात? हे आपण समजून घेऊया. लिथियम बॅटरीमध्ये तीन घटक असतात कॅथोड, अ‍ॅनोड आणि लिथियम

कॅथोड आणि अ‍ॅनोड हे इलेक्ट्रोलाइट नावाच्या सेंद्रिय द्रवाने वेगळे केलेले असतात. तसेच या दोन्हींमध्ये एक सच्छिद्र विभाजक (सेपरेटर) असतं.

बॅटरीमध्ये वापरलं जाणारं लिथियम या सेपरेटरमधून कॅथोड आणि अ‍ॅनोडमधल्या द्रवात फिरत असतं.

क्विक चार्ज (Quick Charge)

मोबाईलमधली लिथियम बॅटरी खूप वेगाने चार्ज झाली तर, बॅटरीमध्ये असणाऱ्या लिथियमचं तापमान वाढतं. यामुळे अ‍ॅनोडवर लिथियम जमा होऊन शॉर्ट सर्किट होऊ शकतं.

केंब्रिज विद्यापीठातील ऊर्जा साठवण तज्ज्ञ प्रोफेसर क्लेअर ग्रे म्हणतात, "सामान्यतः मोबाईलमध्ये चार्जिंगचं व्यवस्थापन करण्यासाठी एक बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम असते. बॅटरी चार्ज होण्याचा वेग नियंत्रित रहावा यासाठी बॅटरी ऑप्टिमाइज (व्यवस्थापित) केलेल्या असतात. जर तसं केलं नाही, तर लिथियम बॅटरीमध्ये असलेल्या अ‍ॅनोडवर लिथियमचे अणू साचण्याची प्रक्रिया (लिथियम प्लेट) होऊ शकतो.

यामुळेच अनेक मोबाईल चार्ज करायला खूप वेळ लागतो असं त्या म्हणतात.

मोबाईल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

शॉर्ट सर्किट होण्याची आणखीन दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे बॅटरी बनवताना सर्किटमध्ये धातूचे लहान तुकडे आलेले असतात. दुसरं कारण म्हणजे बॅटरी सील करत असताना त्यामध्ये छोटी छिद्रे राहतात. पहिल्यांदा ही छिद्रे दिसत नाहीत, पण हळूहळू जेव्हा बॅटरी चार्ज होते, तेव्हा ती दिसू लागतात. कारण, बॅटरीमध्ये वापरलेले अनेक घटक (मटेरियल) आकुंचन आणि प्रसरण पावत असतात.

यासोबतच अधिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी एकापेक्षा अधिक बॅटरीचे पॅक (संच) बनवणं देखील धोकादायक असू शकतं. 12 सेल असणाऱ्या बॅटरी लॅपटॉपसाठी अनेकदा वापरल्या जातात, हे योग्य नाहीये.

ग्रे म्हणतात, "तुम्ही जितकी जास्त ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. तेवढा धोका वाढत असतो."

या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

मोबाईल दुरुस्त करणाऱ्या गीक स्क्वाड कंपनीने (Geek Squad) बीबीसीला सांगितलं, "बॅटरीच्या काही लक्षणांवरून बॅटरीचा स्फोट होणार असल्याचं लक्षात येऊ शकतं."

गीक स्क्वाडच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, "बॅटरी निरुपयोगी होण्याआधी ती काही ठिकाणी फुगलेली दिसू शकते. बॅटरीमधले सेल तुटू शकतात."

"मात्र प्रत्येकवेळी बॅटरी फुगेल असं नाही. अनेकदा बॅटरी सामान्य तापमानापेक्षा अधिक तापते. मात्र यातही गंमत अशी आहे की, आजकाल कुठलाही फोन काही ठराविक काळानंतर गरम होतच असतो. त्यामुळे फोन गरम झाला की तो फुटणारच आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही."

मात्र तरीही अशी कोणतीही लक्षणं दिसल्यास त्या बॅटरीचा वापर थांबवला पाहिजे असं गीक स्क्वाडने नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)