पार्किन्सनचा अंदाज व्यक्त करणारं स्मार्टवॉच तुम्ही पाहिलंय का? महत्त्वाची माहिती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डेव्हिड कॉक्स
- Role, बीबीसी न्यूज
स्मार्टवॉच हे आजच्या काळातील लोकप्रिय आणि बहुउद्देशीय गॅझेट झालं आहे.
स्मार्टवॉचमध्ये आपल्या शरीराची प्रचंड माहिती गोळा होते. आता स्मार्टवॉचमधील तंत्रज्ञानाचा पूर्वी कधीही झाला नव्हता असा वापर केला जातो आहे.
पॅट्रिक स्कोएकर, सीएचयूव्ही (CHUV) युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये मुख्य भूलतज्ज्ञ (अॅनेस्थेसिओलॉजिस्ट) आहेत.
सर्वसाधारणपणे शस्त्रक्रिया करताना रुग्णाला गुंगीचं इंजेक्शन दिलं जातं. पॅट्रिक यांना देखील सर्वसाधारण अॅनेस्थेशिया देऊन दीर्घकाळ चालणारी शस्त्रक्रिया करताना निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीची जाणीव आहे.
शस्त्रक्रिया करताना वेगानं झालेल्या रक्तस्त्रावामुळे रुग्णाला शॉक बसू शकतो. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील रक्तप्रवाहात अचानक आणि धोकादायक स्वरुपाची घट होऊ शकते.
त्याचबरोबर अनेक तासांच्या अॅनेस्थेशिया किंवा गुंगीच्या इंजेक्शनमुळे रुग्णाला फुफ्फुसाच्या गंभीर स्वरुपाच्या समस्या उद्भवू शकतात.
ही एक गुंतागुंतीची स्थिती असते. शस्त्रक्रियेनंतर पहिल्या सहा दिवसांमध्ये मृत्यू पावणाऱ्या एकूण रुग्णांपैकी जवळपास एक चतुर्थांश रुग्णांचा मृत्यू यामुळेच होतो.
अशा प्रकारच्या शोकांतिका घडण्यामागचं कारण म्हणजे रुग्णांच्या शरीरामध्ये असलेले छुपे दोष किंवा कमकुवतपणा जे समोर आलेले नसतात किंवा तपासणीतून उघड झालेले नसतात.
मात्र जर रुग्णांवर मोठ्या किंवा गंभीर स्वरुपाच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी हॉस्पिटल्सना अशा प्रकारच्या गोष्टी चटकन माहित करून घेता आल्या किंवा तपासता आल्या आणि त्यांचा खर्चदेखील कमी असला तर?


पॅट्रिक स्कोएकर आणि त्यांचे सहकारी एक खास चाचणी करत आहेत.
त्यामध्ये रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वीच्या काही आठवड्यांमध्ये तपासण्या करताना आणि इतर मार्गदर्शन होत असताना स्मार्टवॉच बांधले जाणार आहेत. हे स्मार्टवॉच मॅसिमो डब्ल्यू 1 (Masimo W1)म्हणून ओळखलं जातं.
त्या कालावधीत या स्मार्टवॉचमध्ये रुग्णांची जी माहिती गोळा केली जाईल त्याचा उपयोग त्यांच्या शरीराचं आणि आरोग्याच्या स्थितीचं मूल्यमापन करण्यासाठी केला जाणार आहे.

आरोग्यासंदर्भात इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

डब्ल्यू 1 स्मार्टवॉचमुळे ह्रदयाचे ठोके, श्वसनाचा दर, रक्तातील ऑक्सिजन, नाडीचे ठोके आणि अगदी शरीरातील पाण्याची पातळी या सर्व गोष्टींची माहिती सातत्यानं मिळते. वैद्यकीय स्तरावर आवश्यक असलेली अचूकता या माहितीमध्ये असते.
पॅट्रिक स्कोएकर माहितीच्या विविध स्तरांचा उल्लेख "डीजिटल ट्विन" असा करतात आणि त्यांना वाटतं की या माहितीमुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो.
ते पुढे म्हणतात, "शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांची मिळवलेल्या माहितीचा उपयोग आम्ही शस्त्रक्रियेआधी किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या आरोग्यविषयक संभाव्य गुंतागुंतीचा अंदाज लावण्यासाठी आणि त्यावर प्रतिबंधात्मक पावलं उचलण्यासाठी करणार आहोत."
स्मार्टवॉच आणि गंभीर आजारांवरील प्रतिबंधात्मक उपचार
स्मार्टवॉचच्या बाजारपेठेची कशी भरभराट आणि विस्तार होत आहे याचं हे फक्त एक उदाहरण आहे.
काही विश्लेषकांच्या अंदाजानुसार 2027 पर्यंत जगभरातून 40 कोटींपेक्षा अधिक स्मार्टवॉचची विक्री होईल. यातून प्रतिबंधात्मक आरोग्याचं एक नवीन धाडसी युग सुरू होईल.
मॅसिमो, अॅपल, सॅमसंग, विथिंग्ज, फिटबिट आणि पोलर या सर्वच ब्रॅंड्सनी असे स्मार्टवॉच विकसित केले आहेत, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात माहिती रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्मार्टवॉच मधील या माहितीमुळे झोपेची गुणवत्ता, रक्तदाब, ह्रदयाच्या ठोक्यांच्या लयीतील बदल आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी यासारख्या गोष्टींचं मोपमाप करणं शक्य आहे.
यातून तुमचं ह्रदय आणि फुफ्फुसांचं आरोग्य कसं आहे, ते कशाप्रकारे कार्य करत आहेत हे कळतं. शिवाय ही सर्व माहिती रिअल टाईममध्ये ट्रॅक करता येते.
गोसिया वामिल या लंडनमधील मायो क्लिनिक हेल्थकेअरमध्ये ह्रदयरोगतज्ज्ञ आहेत.
त्या म्हणतात की स्मार्टवॉचमुळे मिळणाऱ्या या माहितीचा उपयोग डॉक्टरांना फक्त संभाव्य आजार किंवा आरोग्य समस्यांसंदर्भात सावध करण्यासाठीच नाही तर आरोग्याच्या या समस्यांवर लवकर पावलं उचलण्यास देखील मदत होते.
"अधिकाधिक रुग्ण या प्रकारची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या स्मार्टवॉचचा वापर करून नंतर त्याची प्रिंट आऊट काढून ते आम्हाला दाखवू इच्छितात. मग त्या माहितीचा वापर करून आम्ही त्यात अधिक तपासणी करून आरोग्यविषयक समस्यांची खातरजमा करू शकू," असं वामिल म्हणतात.
आतापर्यंत याचा सर्वाधिक वापर ह्रदयाच्या आरोग्याशी संबंधित गोष्टींमध्ये करण्यात आला आहे.
या वर्षी एप्रिल महिन्यात एका अभ्यासात आढळून आलं की स्मार्टवॉचवर घेण्यात आलेल्या इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG)ची मोजणी - ह्रदयाच्या कार्यक्षमतेविषयी आणि आरोग्याविषयीची इलेक्ट्रिकल उपकरणांद्वारे घेण्यात आलेली नोंद - 50 ते 70 वर्षे वयोगटातील लोकांचे ह्रदयाचे अतिरिक्त ठोके विश्वसनीय रित्या नोंदवू शकतात.
हा अॅट्रियल फायब्रिलेशनसारख्या अधिक गंभीर आरोग्य स्थितीचा किंवा आजाराचा इशारा असू शकतो. यात ह्रदयाचे ठोके अनियमितपणे पडतात किंवा कोणत्याही चेतावणी शिवाय ह्रदयाच्या धडधडण्याची गती नियंत्रणाबाहेर वाढते.
इतर संशोधनातून आढळून आलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम अॅपलच्या स्मार्टवॉच वरील ईसीजी नोंदींचा वापर करून लो इजेक्शन फ्रॅक्शन असलेल्या लोकांना ओळखू शकतात. यात प्रत्येक वेळेस जेव्हा ह्रदय धडधडतं तेव्हा ते किती रक्त फेकतं आहे हे लक्षात येतं.

फोटो स्रोत, Getty Images
हे हृदयविकाराशी संबंधित चेतावणी देणारं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. याची अचूकता 88 टक्के असते.
वामिल म्हणतात की मशीन लर्निंग तंत्रज्ञान आणि स्मार्टवॉचचा वापर करून मिळवलेल्या माहितीचा संयोग हा ह्रदयविकाराच्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी क्रांतिकारक ठरू शकतो.
स्मार्टवॉच च्या वापरातील फायद्याबद्दल वामिल म्हणतात, "कार्डिओलॉजी क्लिनिकमध्ये छाती धडधडण्याची तक्रार करणारे रुग्ण आम्ही पाहतो. अशावेळी मग आम्ही त्यांच्या छातीवर ते चिकटणारे टेप लावायचो आणि 24 तासात त्यांचा ईसीजी रेकॉर्ड करायचो."
"अनेकदा, या 24 तासांच्या कालावधीत रुग्णांमध्ये काहीही लक्षण आढळून येत नाही. मात्र स्मार्टवॉचमुळे रुग्णांना जेव्हा केव्हा त्या प्रकारची लक्षणं जाणवतात, ते फक्त त्यांच्या स्मार्टवॉचचं बटण दाबून ईसीजीची नोंद घेऊ शकतात आणि ती आम्हाला दाखवू शकतात."
वामिल पुढे सांगतात की तंत्रज्ञानाच्या विकासातून मिळणाऱ्या या प्रकारच्या सुविधांमुळे आधीच प्रतिबंधात्मक उपचार केले जात आहेत. यामुळे ज्या रुग्णांना ह्रदयाच्या अनियमित ठोक्यांची लक्षणं जाणवत आहेत, त्यांना रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या देणं ह्रदयरोगतज्ज्ञांना शक्य होतं. यातून ह्रदयविकाराचा झटका टाळता येतो.
अनेकदा टाईप 2 मधुमेह असणाऱ्या रुग्णांना ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित गुंतागुंतीला सामोरं जावं लागतं. स्मार्टवॉचद्वारे मिळणाऱ्या या माहितीमुळे अशा प्रकारच्या समस्या टाळता येतील का हे जाणून घेण्यात देखील वामिल यांना रस आहे.
वामिल पुढे म्हणतात, "मधुमेह असणाऱ्या लोकांचं आयुर्मान कमी असतं कारण त्यांच्यात ह्रदयाशी निगडीत समस्या निर्माण होण्याचा धोका कितीतरी अधिक असतो."
"मला वाटतं की भविष्यात स्मार्टवॉचद्वारे मिळणाऱ्या माहितीचा वापर, प्रारंभिक लक्षणं शोधून भविष्यात येऊ शकणाऱ्या ह्रदयविकाराच्या झटक्याच्या धोक्याबद्दल रुग्ण आणि डॉक्टरांना सावध करण्यासाठी केला जाऊ शकतो."
न्यूरोलॉजिकल समस्यांचा अंदाज वर्तवणं
मात्र स्मार्टवॉचचा बराचसा उपयोग ह्रदयाशी निगडीत समस्यांपलीकडे देखील होऊ शकतो. जुलै 2023 मध्ये कार्डिफ विद्यापीठातील संशोधकांनी एक अभ्यास प्रकाशित केला.
यात त्यांनी एक आठवड्यासाठी स्मार्टवॉच बांधण्यास दिलेल्या 1,00,000 लोकांकडून गोळा केलेल्या माहितीचा वापर केला होता. या अभ्यासात दिसून आलं की एखाद्या व्यक्तीला पार्किन्सन आजार झाल्याचं निदान होण्याच्या सात वर्षे अगोदर त्या आजाराची लक्षणं कळणं शक्य आहे.
स्मार्टवॉचमधील मोशन सेन्सर्सचा वापर करून त्या व्यक्तीच्या चालण्याच्या पॅटर्नमधील सूक्ष्म बदल किंवा अनियमितता शोधून हा अंदाज वर्तवण्यात आला होता.
सिंथिया सॅंडर या संशोधनाचं नेतृत्व करत होत्या. त्यांना वाटतं की स्मार्टवॉचवर नोंदल्या जाणाऱ्या झोपेची गुणवत्तेसारख्या इतर माहितीचं एकत्रीकरण करून या प्रकारच्या लक्षणांचा अंदाज आणखी लवकर वर्तवणं शक्य आहे.
कारण ज्या लोकांना पार्किन्सनचा आजार होतो, त्यांच्या झोपेची गुणवत्ता खालावलेली असते किंवा त्यांना शांत गाढ झोप येत नसते.

फोटो स्रोत, Getty Images
सँडर म्हणतात, "पार्किन्सनच्या आजारात त्याचं निदान एका प्रदीर्घ टप्प्यात होतं. जेव्हा शरीराच्या हालचाली, शरीराचा तोल किंवा चालण्यातील बदलासारखी लक्षणं ठळकपणे किंवा स्पष्टपणे दिसू लागतात."
"आम्हाला असं आढळून आलं की किरकोळ किंवा हलक्या स्वरूपाच्या शारीरिक हालचाली करताना शरीराची हालचाल मंदावणं हे या आजाराचं सर्वात सूचक लक्षण आहे. त्या व्यक्तीला मात्र स्वत:मध्ये होणारा हा बदल लक्षात येत नाही इतका तो सूक्ष्म स्वरुपात असतो."
सँडर यांना वाटतं की या माहितीचा वापर लवकरच वैद्यकीय चाचण्यांमध्ये लोकांना सहभागी किंवा नियुक्त करताना केला जाऊ शकतो. पार्किन्सनवरील प्रभावी उपचार इतके सोपे नाहीत यासाठीच्या कारणांपैकी एक म्हणजे रुग्णाला हा आजार झाल्याचं निदान बऱ्याच उशीरा होतं.
ते अशा टप्प्यावर होतं जेव्हा मेंदूचं आधीच लक्षणीय नुकसान झालेलं असतं. सुरूवातीच्या टप्प्यात जर या आजाराचं निदान झालं तर आजाराची वाढ कमी करणं किंवा आजार बरा करणं शक्य होऊ शकतं.
"स्मार्टवॉचच्या माहितीवर आधारित प्रारंभिक तपासणी किंवा स्क्रीनिंग सुविधांमुळे लोकांमधील या आजाराचं निदान लवकर होऊ शकतं. यातून संभाव्यरित्या न्युरोप्रोटेक्टिव्ह उपचाराच्या चाचण्या यशस्वीपणे करता येतील अशी आम्हाला आशा आहे," असं सँडर म्हणतात.
या नव्या तंत्रज्ञानाबाबत अशीही आशा आहे की स्मार्टवॉचमुळे लवकरच एक दिवस ज्या लोकांना अपस्मारसारखा गंभीर आजार असेल त्यांना फिट किंवा झटके येण्याबाबतची चेतावणी आधीच देऊन मदत करता येऊ शकेल.
अपस्मार झालेल्या लोकांसाठी पडणे आणि झटके आल्यामुळे होणारे गंभीर अपघात या खूपच धोकादायक बाबी असतात.
क्वीन्सलँड ब्रेन इन्स्टिट्युटमधील आयलीन मॅकगोनिगल म्हणतात, "ज्यांना अपस्मार झालेला आहे त्यांच्यासाठी कधीही झटके येण्याबद्दलची अनिश्चितता हा जगण्यातील सर्वात कठीण भाग असतो. अर्थात झटके येण्याचा अंदाज व्यक्त करणं हे अद्याप प्रारंभिक टप्प्यावर आहेत."
संशोधनासाठी डिझाइन करण्यात आलेलं खास एम्पॅटिका स्मार्टवॉच चं खास प्रतिरुप झटके येण्याचा अंदाज वर्तवण्यात मदत करू शकतं की नाही यामध्ये मॅकगोनिगल यांना स्वारस्य आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्मार्टवॉच कडून मिळालेली माहिती
एका चालू संशोधन प्रकल्पात त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अल्गोरिदमचा वापर विविध प्रकारच्या माहितीच्या मिश्रणावर करत आहेत.
यात हृदयाचे ठोके, त्वचेचं तापमान, शरीराच्या हालचालींचे पॅटर्न आणि घामामुळे त्वचेच्या इलेक्ट्रिकल कंडक्टन्समधील बदल यांचा समावेश आहे.
या घटकांमुळे शरीराच्या स्वायत्त मज्जासंस्थेतील बदल दिसून येतात. या सर्व घटकांची मोजणी स्मार्टवॉचद्वारे केली जाऊ शकते.
मॅकगोनिगल म्हणतात की, "झटके येण्यापर्यंतच्या तासांमधील पॅटर्नचं विश्लेषण करण्याचं आमचं उद्दिष्टं आहे. अपस्मारशी संबंधित संशोधक आणि डॉक्टर्स यांना झटके कधी येणार याचा अंदाज रुग्णांना वर्तवता आला पाहिजे किंवा त्याचा अंदाज त्यांना आला पाहिजे असं वाटतं."
"यामुळे झटक्यांमुळे पडणे किंवा दुखापत होण्यासारखे धोके कमी करण्यासाठी औषधांची बदलती मात्रा आणि दररोजच्या क्रियांमधील बदल या घटकांसह परिस्थितीनुसार उपचार करता येतील," असं त्या पुढे म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शक्तीशाली अल्गोरिदम आणि अचूक मोजमाप करण्यासाठी परिधान करण्यायोग्य उपकरणं, यांच्या एकत्रित परिणामातून काय साध्य करता येईल याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
मात्र त्याचबरोबर काही डॉक्टर्स चुकीच्या संभाव्य निष्कर्षांबद्दल देखील सावध आहेत. त्याशिवाय स्मार्टवॉच च्या अती वापरामुळे रुग्णांच्या चिंतेत वाढ होऊ शकते. तसंच आधीच ताणाखाली असलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या संसाधनांवर आणखी ताण पडू शकतो.
जेरेमी स्मेल्ट, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल एनएचएस फाऊंडेशन ट्रस्टमध्ये थोरॅसिक सर्जन (छातीतील अवयांचं शल्यविशारद) आहेत.
ते म्हणतात, "तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्राला अनेक मार्गानं मदत करतं आहे. आजारांचं लवकर निदान करणं हा त्यातील एक आहे. मात्र त्याचबरोबर यामुळे लोकांचा जीव देखील वाचू शकतो."
जेरेमी पुढे म्हणतात, "इतर तंत्रज्ञानांप्रमाणेच स्मार्टवॉचची देखील चाचणी घेतली पाहिजे आणि ते पडताळून पाहिले पाहिजेत. चुकीच्या निष्कर्षांमुळे चिंता निर्माण होईल आणि यामुळे लोक गरज नसतानादेखील डॉक्टर्सकडे जाऊ लागण्याची शक्यता आहे."
"मात्र ज्यांना आजार आहेत किंवा आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असू शकते. यातून लवकरच निदान व उपचार केल्यानं आरोग्य सेवांशी निगडीत खर्च वाचू शकतो."
मात्र स्मार्टवॉच अधिक अत्याधुनिक होत असताना, त्यांचे उत्पादक मानवी शरीराबद्दल परिणामकारक माहिती मिळवण्याचे जास्तीत जास्त मार्ग शोधत आहेत. यातून संभाव्य प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधांची यादी वाढतच जाणार आहे.
मॅसिमोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जो किआनी त्यांच्या कंपनीच्या स्मार्टवॉचसाठी पुढील शक्यतांवर आधीच लक्ष केंद्रित करत आहेत: ती म्हणजे दम्याचा झटका किंवा अटॅक वर्तवता येणं.
किआनी म्हणतात, "श्वासोच्छवासाशी निगडीत गोष्टींचं मोजमाप आमच्याकडे आहे. तुम्हाला श्वास घेण्यास केव्हा त्रास होतो हे आम्ही सांगू शकतो. कारण श्वासोच्छवासाचा दर वाढला की नाडीचा वेग देखील वाढतो...तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न संबंधित अवयव करत असतात."
ते सांगतात, "गंमतीची गोष्ट म्हणजे गेल्या 50 ते 60 वर्षांपासून आपल्याकडे घरात थर्मामीटर असतं. तुम्ही आजारी आहात की नाही, तुम्हाला ताप आला आहे की नाही हे कळण्यासाठी (तुम्ही आजारी असताना) याची मदत होते."
"आता आपल्याकडे स्मार्टवॉचकडून मिळालेली समृद्ध माहिती असणार आहे. ज्यामुळे लोकांना आपत्कालीन विभागात दाखल होण्याची गरज पडणार नाही आणि तरीदेखील आरोग्याची योग्य ती काळजी घेता येईल," असं किआनी म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











