लहान वयात मेकअपचा वापर? हे असू शकतात धोकादायक परिणाम

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
"पार्टीसाठी मी तयार होतेय...चला तुम्हाला आजचा मेकअप दाखवते. सगळ्यात आधी..."
इन्स्टाग्रामवर स्क्रोल करताना सुरू झालेल्या एका GRWM (Get Ready With Me) व्हीडिओवर मी थांबले. कारण - हे सगळं दाखवणारी 9 - 10 वर्षांची लहान मुलगी होती.
स्क्रीनवरची मुलगी सराईतणे मेकअप करत होती. अगदी एका फटक्यात आयलाईनर लावण्यापासून ते दोन आयशॅडो 'ब्लेंड' करून इफेक्ट साधण्यापर्यंतच सगळं तिने केलं.
कार्यक्रमांना, सणांना अगदी बर्थ डे पार्टीला मेकअप करून आलेल्या लहान मुली तुम्हीही पाहिल्या असतील. 3-4 वर्षांच्या मुलींच्या हातावर नेल पॉलिश लावण्यापासून ते त्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलींनी लिपग्लॉस, ब्लश लावणं अगदी सर्रास पहायला मिळतं.
पण या प्रॉडक्ट्सचे लहान मुलींच्या त्वचेवर, शरीरावर आणि हॉर्मोन्सवर परिणाम होऊ शकतात. शिवाय या सगळ्यामुळे स्वतःच्या दिसण्याबद्दल, शरीराबद्दलच्या काही समजुतींना आकार मिळतो, ते वेगळंच.
नवजात बाळांच्या त्वचेची काळजी
बाळ जन्माला आलं की तेलाने मालिश करून आंघोळ घालण्याची पद्धत चालत आलीय.
बाळाच्या वजनानुसार आता डॉक्टर्स मालिश करण्याबाबत, बाळाला पूर्ण आंघोळ घालण्याबद्दलचा सल्ला देतात.
डॉ. तन्वी वैद्य या डर्मेटॉलॉजिस्ट आहेत. त्या सांगतात, "नवजात बाळांना फक्त मॉईश्चरायझर पुरेसं असतं. पूर्वी तेल लावायचे. मी म्हणेन की चांगल्या दर्जाचं मॉईश्चरायझर लावलेलं चांगलं. लहान बाळांना अगदी टाल्कम पावडर वगैरेही लावू नये. त्यामुळे त्वचेचं इन्फ्लमेशन (दाह) वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ते टाळावं. डायपर रॅशसाठीही टाल्कम पावडर वापरू नये. बेसिक डायपर क्रीम्स पुरेशी असतात."
लहान बाळांसाठी सुगंध नसलेली उत्पादनं शक्यतो वापरावीत, असं डॉक्टर्स सांगतात.
अगदी लहान मुलींच्या हाताला गंमत म्हणूनही नेलपॉलिश लावू नये. कारण या वयात नखं चावण्याची, पटकन तोंडात बोटं घालण्याची सवय असते, ज्याद्वारे शरीरात रसायनं जाऊ शकतात.
कॉस्मेटिक्स आणि स्किनकेअर उत्पादनांचा वापर
प्राथमिक - माध्यमिक शाळांमध्ये असणाऱ्या वयोगटातल्या मुला-मुलींच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची?
बालरोग तज्ज्ञ डॉ. गीतांजली शहा सांगतात, "15 वर्षांखालच्या मुलांसाठी स्किन केअर रूटीनची गरज नाही आणि तसा सल्लाही दिला जात नाही. फक्त उन्हात खेळताना सनस्क्रीन किंवा कोरड्या त्वचेसाठी मॉईश्चरायझर वापरणं पुरेसं आहे. शिआ बटर, पॅराफिन, ग्लिसरीन हे प्रकार सुरक्षित असतात. म्हणजे 12-15वर्षांच्या Sensitive Skin असणाऱ्या मुलांसाठी बेबी प्रॉडक्ट्स वापरणं सुरक्षित असतं. कारण ती नवजात बाळाच्या त्वचेसाठी तयार करण्यात आलेली असतात."
या वयोगटासाठी चांगलं मॉईश्चरायझर आणि गरज पडल्यास सनस्क्रीन पुरेसं असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. 12 वर्षांखालील लहान मुलांसाठी फिजीकल किंवा मिनरल बेस सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला दिला जातो.
6 महिन्यांपेक्षा अधिक वयाच्या बाळांसाठी हे वापरण्याजोगं असतं. पण त्यांच्यासाठीही रोज जसं मोठे स्किनकेअरसाठी सनस्क्रीन वापरतात, तशी गरज नसते.
12 वर्षाखालील मुलांसाठी रोज सनस्क्रीन वापण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. मुलं बीचवर जात असतील किंवा दुपारच्या वेळी बाहेर उन्हात खेळत असतील तर त्यांच्यासाठी सनस्क्रीन वापरावं. कारण यावेळी सनबर्नचा धोका असतो.


स्किनकेअर 'रूटीन' किती गरजेचं?
सोशल मीडियावर सध्या स्किनकेअर रूटीन दाखवणारे, म्हणजे त्वचेची काळजी घेण्यासाठी, ती चांगली दिसावी यासाठी कोणकोणती उत्पादनं रोज वापरावीत हे सांगणारे अनेक व्हीडिओ पहायला मिळतात. सोशल मीडियावरचे हे व्हीडिओ, उत्पादनांच्या जाहिराती पाहून या गोष्टी वापरण्याचा मोह होतो.
मग अशावेळी टीनएजर्सनी ही उत्पादनं वापरावीत का? डॉ. तन्वी वैद्य सांगतात, "खरं सांगायचं झालं, तर बाजारात आता असणारी बहुतेक प्रॉडक्ट्स ही Anti-Aging आहेत. आणि या वयात जिथे मुळात एजिंगच सुरू झालेलं नाही, तिथे ही प्रॉडक्ट्स वापरण्यात अर्थच नाही. आणि अशा गोष्टी वापरल्याने वा जास्त वापरामुळे उलट त्वचेचं नुकसान होतं. Retinoid सारखी अँटी एजिंग प्रॉडक्ट्स वयाच्या पंचविशीनंतर वापरण्याचा सल्ला आम्ही देतो. टीनएजर्सना याची गरजच नसते. यामुळे त्वचा Over Exfoliate होते, त्वचेच्या Barrier चं नुकसान होतं. आणि असं केल्याने त्वचा Sun Sensitive होते, तिला उन्हाचा त्रास होतो. परिणामी तुम्ही अधिक टॅन होता आणि इतरही त्रास होतात."
गोरं होण्याच्या ध्यासापायीही अनेक क्रीम्स वापरली जातात. सहज उपलब्ध असणाऱ्या क्रीम्सपैकी अनेक क्रीम्स ही स्टीरॉईड बेस्ड असतात. वापरणारी व्यक्ती चेहऱ्यावर स्टीरॉईड्स लावत राहते.
यातून TSDF म्हणजे Topical Steroid Damaged face चा त्रास निर्माण होतो. यामुळे Acne चं प्रमाण वाढतं. चेहरा लाल होतो, चेहऱ्यावरची लव - केसांचं प्रमाण वाढतं.

फोटो स्रोत, Getty Images
मेकअपचा लहान वयात सातत्याने वापर केला, तर त्याचेही परिणाम त्वचेवर पहायला मिळतात. फाऊंडेशन किंवा इतर उत्पादनांमधल्या लेड (Led)मुळे त्वचेवरील छिद्रं (Pores) बंद वा Clog होतात.
अनेक उत्पादनांवर Safer Formula किंवा Non-Toxic लिहीलेलं असलं, तरी त्यात लेड असू शकतं. अशा उत्पादनांचा दीर्घकाळ वा सातत्याने वापर केला जाणं चांगलं नाही.
शिवाय या उत्पादनांमध्ये असणाऱ्या रंगांचं Pigmentation त्वचेवर राहतं. आणि त्यातून समस्या निर्माण होतात. त्यामुळे या गोष्टींचा वापर टाळायला हवा.
डॉ. गीतांजली शहा सांगतात, "लोक विचारतात, आम्ही नैसर्गिकरित्या तयार केलेली उत्पादनं वापरू शकतो का? तुम्ही कोरफड म्हणजे अॅलो व्हेरा थेट वापरू शकता. पण रूज - मेकअपसारख्या गोष्टी नैसर्गिक असू शकत नाहीत. त्यामध्ये नैसर्गिक घटक वापरलेले असले तरी इतर काय गोष्टी आहेत, हे पहायला हवं."
सौंदर्य प्रसाधनांचा शरीरावर - मनावर होणारा परिणाम
कुतुहल म्हणून उत्पादनं, सौंदर्य प्रसाधनं वापरून पाहणं ही सुरुवात असते. पण या उत्पादनांवर अवलंबून राहणं, किंवा ठराविक गोष्टी केल्याशिवाय आपण चांगलं दिसत नाही अशी भावना यातून मुलींच्या मनात तयार होणं हे त्यांच्यासाठीच धोक्याचं असतं.
सोशल मीडियामुळे तयार झालेल्या सौंदर्याच्या कल्पना, त्यातून निर्माण होणारा दबाव यासगळ्यांमुळे उत्पादनांचा लवकर वापर सुरू करण्याकडे कल असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
डॉ. तन्वी वैद्य सांगतात, "ही क्रीम्स लावू नका, असं म्हणणं सोपं आहे. पण या मुलींवर जे प्रेशर असतं, ते आपण विचारात घ्यायला हवं. सोशल मीडिया आणि त्यातही त्यांची पिढी ज्या इन्फ्लुएन्सर्सकडे पाहते, त्यातून त्यांच्या मनात काही संकल्पना तयार झालेल्या असतात. सोशल मीडियावर फोटोंसाठी फिल्टर्स वापरले जातात. त्यामुळे खरं पहायचं तर त्यांनी Imperfect Skin म्हणजे सदोष त्वचा पाहिलेलीच नसते. त्यामुळे या गोष्टी आपण नॉर्मलाईज करणं खूप गरजेचं आहे. आयुष्यात इतर अनेक गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत हे पटवून, सौंदर्याविषयीच्या कल्पनांबद्दल त्यांचं काऊन्सेलिंग करणं गरजेचं आहे. या गोष्टींबद्दल शाळा - कॉलेज - घरात बोललं जाणं गरजेचं आहे."
घरी गप्पा मारताना काही गोष्टींबद्दल जागरूकता निर्माण करणं किंवा काही गोष्टी कशा सामान्य आहेत, सर्वांच्याच बाबत घडतात हे सांगणं महत्त्वाचं ठरू शकतं. म्हणजे टीनएजर्सना चेहऱ्यावर मुरूम येणं ही या वयात होणारी सामान्य गोष्ट आहे, प्रत्येकाला या वयात कधी ना कधी हा त्रास होतच असतो, सगळ्या मुलींच्या चेहऱ्यावर लव (Facial Hair) येते.
तुम्ही टीव्हीवर ज्यांना पाहता, त्यांनी चेहऱ्यावरची ही लव काढलेली असते - हे सांगितलं गेलं पाहिजे. शिवाय कोणत्या समस्यांसाठी उपचार घेणं शक्य आहे, हे देखील माहिती असायला हवं. म्हणजे Acne म्हणजे चेहऱ्यावरच्या मुरुमांसाठी उपचार उपलब्ध आहेत आणि जर ते योग्य वेळी घेतले तर चेहऱ्यावर त्यामुळे खड्डे पडत नाहीत किंवा व्रण येत नाहीत, अशा गोष्टी मुलांना माहिती असतील, तर त्याबद्दलचे समज वा गंड मनात तयार होणार नाहीत.
शाळा - कॉलेजमध्ये शारीरिक बाबींवरून होणारं Bullying किंवा दिला जाणारा त्रास याबद्दल पालकांनी मुलांशी बोलावं आणि अशा गोष्टींना सामोरं जाण्याचा योग्य मार्ग त्यांना शिकवावा.

फोटो स्रोत, Getty Images
मालाडला राहणाऱ्या धनश्री पाटकर यांना दोन मुली आहेत. मोठी 13 वर्षांची तर धाकटी 9. जाहिरातींपेक्षा मैत्रिणींमधल्या चर्चा आणि एका कुणी वापर केल्यानंतर इतर जणींना आपण यात मागे पडतोय असं वाटण्याची भावना जास्त असल्याचं त्या म्हणतात.
त्या सांगतात, "ग्रूपमधल्या वा वर्गातल्या दोघींनी एखादी वस्तू वापरल्यानंतर ती आपणही करायला हवी असं इतर जणींना वाटायला लागतं. एखाद्या ट्रेंडचा आपण भाग असायला हवं, ही भावना या पिढीमध्ये खूप तीव्र आहे. त्यामुळे अशावेळी ती वस्तू वा उत्पादन खरंच गरजेचं आहे का, यासाठी इतके पैसे खर्च करणं योग्य आहे का, हे दरवेळी पटवून - समजून देण्यात खूप श्रम जातात. पण मग हळुहळू हा विचार करण्याची सवय त्यांनाही लागते."
मेकअपचा सातत्याने वापर करत राहिल्यास त्यातलं नाविन्य वा कुतुहल संपून ती गरज बनते. ठराविक उत्पादनं वापरल्यानंतर आणि ठराविक गोष्टी केल्यानंतरच आपण छान दिसतो, घराबाहेर पडायचं असेल तर त्यासाठी कायम ठराविक पद्धतीने दिसणं गरजेचं आहे, अशा संकल्पना लहान मुलींच्या मनात तयार व्हायला लागतात.
टीनएजर मुलींमध्ये या काळात शरीरात होणाऱ्या बदलांसोबतच, यामुळे मानसिक घालमेल तयार होते. स्वतःच्या दिसण्याबद्दलच्या, शरीराबद्दलच्या आणि सौंदर्याबद्दलच्या चुकीच्या संकल्पना यातून तयार होतात.
डॉ. गीतांजली शहा सांगतात, "Glossy is good असं काहीसं चित्र त्यांच्या मनात निर्माण होतं. मग मेकअपशिवाय या मुली कुणाला भेटायला तयार होत नाहीत. या परिस्थितीत आपण आईला याबद्दल सजग करणं गरजेचं आहे. कारण घरी एक आणि बाहेर दुसरं असं आयुष्य वा व्यक्तिमत्त्वं या मुलींनी जगणं योग्य नाही. Precocious Puberty म्हणजे लहान मुलांच्या शरीरामध्ये वेळेआधीच बदल व्हायला लागणं. अशा मुलांमध्ये मग वयात येण्याची प्रक्रिया फार लवकर आणि वेगाने होते. मेकअप, सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामुळे चांगलं दिसण्याबद्दलचं आग्रही वागणं, शरीर वा चेहरा एका ठराविक पद्धतीने असावा अशा संकल्पना तयार होतात. यातून मानसिकरित्या या मुली लवकर वयात येतात. हल्ली मुली वयात येण्याचं वय 9 ते 12 वर्षं इतकं खाली आलेलं असताना मेकअपचा जास्त वापर Precocios Puberty निर्माण करू शकतो. फक्त कॉस्मेटिक्सच्या वापरातून Puberty म्हणजे वयात येण्याची प्रक्रिया लवकर होत नाही. पण या कॉस्मेटिक्सच्या वापरामुळे होणारे मानसिक बदल शारीरिक बदलांसाठी कारणीभूत ठरू शकतात. याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक संतुलन ठेवणाऱ्या हॉर्मोन्सवर होतो."
लहान मुलींच्या अंगावरची लव काढण्यासाठी काहीही करू नये. लहान वयात रेझर वापरून लव काढायचा प्रयत्न केल्यास कापलं जाण्याचा धोका असतो. 12 वर्षांखालील मुलींनी वॅक्सिंगही अजिबात करू नये. डॉ. तन्वी म्हणतात, "12 वर्षांवरच्या मुलींनीही चेहऱ्यावरची लव काढल्याने चेहऱ्यावर पुरळ, मुरुम येतात. वॅक्सिंग करणं हे रेझर वापरणं - शेव्हिंगपेक्षा चांगलं असल्याचं पार्लर्समध्ये सांगितलं जातं. शेव्हिंगने त्वचा काळी होते, लव जाडी होते, हे सगळे गैरसमज आहेत. त्यामुळेच शेव्हिंग आणि वॅक्सिंगपैकी शेव्हिंगचा पर्याय डर्मेटोलॉजिस्टकडून सुचवला जातो. लेझर रिडक्शनसारख्या पर्यायांचा वापर 18 वर्षांनंतरच करावा. कारण तोपर्यंत हॉर्मोनची पातळी स्थिरावलेली असते."

फोटो स्रोत, Getty Images
उत्पादनं निवडायची कशी
- कोणत्याही एका कंपनीचं उत्पादन आहे म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवू नका. त्याबद्दलचा थोडा अभ्यास करा.
- लहान मुलांसाठी म्हणून जाहिरात करण्यात येणाऱ्या उत्पादनांचं चमचमत्या पॅकेजिंगमध्ये, कार्टून्सचे, पऱ्यांचे किंवा प्रसिद्ध कॅरेक्टर्सचे फोटो वापरून मार्केटिंग केलं जातं. पण ती कोणती कंपनी आहे, हे तपासायला हवं. फक्त त्यावर लहान मुलांशी संबंधित फोटो आहेत, याचा अर्थ हे उत्पादन सुरक्षित आहे, असा होत नाही. त्यामुळे हे तपासणं खूप गरजेचं आहे.
- सौंदर्य प्रसाधन वापरायचं असेल तर शक्य तितक्या कमी कालावधीसाठी आणि मोजक्या निमित्तांना वापरा. म्हणजे घरातल्या कार्यक्रमांसाठी मेकअपची गरज नाही. पण स्टेज परफॉर्मन्ससाठी काही तासांपुरता मेकअप वापरता येईल.
- मेकअप हा चेहरा खुलून दिसण्यासाठी असून चेहऱ्यातल्या चुका सुधारण्यासाठी नाही, हे ठसवा.
- मेकअप केला, तर तो नीट कसा काढायचा हे पण शिकवा. नुसतं पाण्याने धुवून चालणार नाही. हा मेकअप काढण्यासाठी योग्य Cleanser वापरणं गरजेचं आहे.
- लहान मुलांसाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांना सुगंध (Fragrance) नसेल, तर उत्तम. ही उत्पादनं non comedogenic म्हणजे त्वचेवरची छिद्रं (Pores) बंद न करणारी असावीत.
- लहान मुलींसाठी डोळ्यांना मेकअप (Eye Makeup) करू नये. कारण त्या डोळे चोळण्याची शक्यता असते. लहान मुलांचे डोळे अगदी संवेदनशील असतात आणि त्यात मेकअप जाणं चांगलं नाही.











