आझाद मैदानः 1857चं स्वातंत्र्ययुद्ध, मराठा मोर्चा ते शपथविधीचा साक्षीदार

आझाद मैदान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आझाद मैदानावर आलेल्या एका आंदोलकाचे संग्रहित छायाचित्र
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्राचं नवं सरकार आता स्थापन होत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आता शपथ घेतील. राजभवनात शपथ घेण्याचा रिवाज असला तरी आता गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची पद्धती सुरू झाली आहे.

राजभवनाच्या दरबार हॉलपेक्षा मोकळ्या विस्तीर्ण मैदानावर शपथ घेणं किंवा त्यानिमित्तानं शक्तिप्रदर्शन करणं हे आता हळूहळू रुढ झालं आहे.

वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क यांच्यापाठोपाठ आझाद मैदानही या यादीत आलं आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं नवं सरकार या आझाद मैदानावर शपथ घेत आहे. याच आझाद मैदानाची ही माहिती.

नवाब मलिकांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातून काढून टाकावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानाजवळ केलेले आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवाब मलिकांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातून काढून टाकावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानाजवळ केलेले आंदोलन

खेळ किंवा शहर-गावातली मोकळी जागा एवढी मुख्य ओळख मैदानांची असली तरी तिथं होणाऱ्या सभा, मेळावे, सण, प्रदर्शनं, सर्कस किंवा तत्सम मेळे यामुळेही शहरातली मैदानं ओळखली जातात. विशेषतः राजकीय सभांमुळे मोठ्या शहरातली मैदानं प्रसिद्ध होतात.

दिल्लीतलं तालकटोरा स्टेडियम, रामलीला मैदान राजकीय कारणांमुळे, सभांमुळे कानावर येत असतं. मुंबईतही तसंच आहे. शिवसेनेचे दसरा मेळावे शिवाजी पार्कवर होत असल्यामुळे त्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कारही इथं झाले आहेत. शिवसेना फुटण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्रित सरकार स्थापन केलं ते याच शिवाजी पार्कवर.

इथंच महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळानं शपथ घेतली होती. शिवाजी पार्कबरोबर मुंबईतलं दुसरं मैदान चर्चेत असतं ते म्हणजे आझाद मैदान.

आझाद मैदान असं नाव असलं तरी हे मैदान राजकीय सभा, मोर्चे, आंदोलनं, उपोषणं यांच्यापासून कधीच आझाद झालेलं दिसत नाही. याचं कारण या मैदानाचं स्थान.

मुंबईत ते ही जिथं राज्याचे महत्त्वाचे निर्णय अशा भागात, समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, हाकेच्या अंतरावर हायकोर्ट, सगळी कार्यालयं आणि सगळी मुंबई आणि महाराष्ट्र चालवणाऱ्या मंत्रालय, विधानसभेच्या अगदी जवळ असणारं हे मैदान. अशा जागेवर असलेलं मैदान राज्यकर्त्यांचं लक्ष वेधून घ्यायला, आपल्या मागण्या मांडायला आणि प्रवासासाठी सोयीस्कर आहे.

रस्ता ओलांडला की रेल्वेनं भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जायला रेल्वेचा स्वस्त मार्ग उपलब्ध असल्यामुळे गर्दी जमवण्यासाठी अगदी सोपं.

मुंबईचा जुना नकाशा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईचा जुना नकाशा

परंतु आज हे शहराच्या सर्वात गजबजलेल्या जागी असलं तरी ते एकदम ऐतिहासिक जागेवर आहे याची फारशी माहिती आपल्याला नसते.

बऱ्याचदा मैदानं तिथं होणाऱ्या सभांमुळे, कामामुळे आणि भाषणांमुळे इतिहासात नोंदली जातात परंतु हे मैदान आधीच ऐतिहासिक जागेवर आहे. त्याच जागेवर पुन्हा पुन्हा नवे इतिहास रचले गेलेत, लिहिले गेले आहेत.

जरा खरवडून तर पाहा...

आझाद मैदान वर पाहिल्याप्रमाणं महत्त्वाच्या जागी आहे, हे तर समजलं. पण त्याहून हा सगळा भाग गेल्या चारपाचशे वर्षांचा इतिहास अंगावर घेऊन चालणारा आहे हे रोजच्या कामाच्या गडबडीत इथं येणाऱ्या कोणाच्याच लक्षात येत नाही.

इथला एखादा कोपरा जरा खरवडला तर हा इतिहास भळाभळा वाहू लागेल असा हा भाग आहे.

एस्प्लांड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एस्प्लांड

एकेकाळी पोर्तुगीज आणि नंतर मुंबई किल्ल्यावर इंग्रजांचं राज्य होतं. मुंबई बंदरातून त्यांचा सर्व व्यापार चाले.

1612 साली सुआलीचे (स्वाली) युद्ध झाल्यावर ब्रिटिश मुंबईत उतरले. त्यांना मुंबईचं महत्त्वही समजलं. त्यांना नाविक तळासाठी जागाही हवी होती. त्यामुळे मुंबई पोर्तुगीजांकडून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले.

शेवटी 1661 साली इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरिन यांच्या विवाहाच्या निमित्ताने दोन्ही देशांमध्ये करार झाला.

या विवाहाच्या करारात मुंबई ब्रिटिशांना देण्यात यावी असं निश्चित झालं आणि मुंबई ब्रिटिशांकडे आली.

मराठ्यांची भीती

ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईचा ताबा घेतल्यानंतर इथल्या व्यापाराला आणि बेटांना आकार द्यायला सुरुवात केली. 1685 साली कंपनीनं आपला कारभार सूरतमधून मुंबईत आणला. 1715 साली चार्ल्स बूनने मुंबईत आल्यावर शहराभोवती तटबंदी बांधली. संरक्षणासाठी तोफांची वगैरे योजना केली.

ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईचा ताबा घेतल्यानंतर इथल्या व्यापाराला आणि बेटांना आकार द्यायला सुरुवात केली. 1685 साली कंपनीनं आपला कारभार सूरतमधून मुंबईत आणला. 1715 साली चार्ल्स बूनने मुंबईत आल्यावर शहराभोवती तटबंदी बांधली. संरक्षणासाठी तोफांची वगैरे योजना केली.

ब्रिटिशांचे सर्व व्यवहार मुंबईच्या फोर्टमध्येच होत असे. या फोर्टभोवती त्यांनी तटबंदी बांधली होती आणि प्रत्येक कोपऱ्यावर फ्लॉवर ट्री, किंग्ज, चर्च, मूर, रॉयल असे बुरुजही बांधले होते. परंतु अजूनही ब्रिटिशांना पुरेसं सुरक्षित वाटत नव्हतं. याला आणखी एक कारण झालं ते म्हणजे मराठ्यांची वसईची मोहीम.

मुंबई किल्ला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबई किल्ला

मराठ्यांनी पोर्तुगीजांशी लढाई करुन वसई ताब्यात घेतल्यावर ब्रिटिशांना त्यांची धास्ती वाटू लागली. मुंबईच्या उंबरठ्यावर मराठे आल्याचं पाहून ब्रिटिशांनी आता संरक्षणासाठी काहीतरी करायला हवं याचा विचार सुरू केला. वसईनंतर मराठे वांद्रे आणि कुर्ल्यापर्यंत दक्षिणेस सरकले होते.

त्यामुळे कंपनीने सर्वांत आधी कॅ. जेम्स इंचबर्डला चिमाजीअप्पांची भेट घेण्यासाठी वसईला पाठवण्यात आले. चिमाजी अप्पांनी सांगितलेल्या 15 अटी घेऊन इंचबर्ड मुंबईला परतला असे गोविंद सखाराम सरदेसाई यांनी 'मराठी रियासत'च्या तिसऱ्या खंडात लिहून ठेवले आहे.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

त्यानंतर कॅप्टन गोर्डननेही साताऱ्याला जाऊन छ. शाहू महाराजांची भेट घेतली. इंचबर्ड आणि पहिले बाजीराव यांचीही पुण्यात भेट झाली. पण ब्रिटिशांच्या मनातली भीती कमी झाली नाही.

त्यांनी मुंबई फोर्टभोवती खंदक खणायला घेतला. तेव्हाच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या खंदकासाठी पैसे उभे केले. ही रक्कम 30 हजार इतकी हती. खंदक खणायला एकूण खर्च 2.5 लाख इतका झाला.

मुंबईतले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे ते पहिले प्रकरण असावे.

एस्प्लनेड

हा खंदक आजच्या महात्मा गांधी रस्ता आणि दादाभाई नौरोजी रस्त्याच्या मध्ये होता. इतकं होऊनही कंपनी आपला फोर्ट सुरक्षित करतच राहिली.

बुरुज वाढवले, नौदल वाढवले, देशी लोकांची फौजेत भरती करुन घेतली, बोटी बांधायला सुरुवात केली. यावरुन कंपनीने आपला किल्ला मराठे आणि इतरांपासून वाचवण्याचा किती प्रयत्न केला ते दिसून येतं. किल्ल्याच्या तटबंदीला बंदुकीच्या नळ्या घालून त्या वापरता येतील यासाठी लांब छिद्रांची योजना करण्यात आली होती.

किल्ला आणि खंदकाच्या जवळ थोडी मोकळी जागा ठेवण्यात आली होती. त्याला एस्प्लनेड असं म्हणत. जर मराठे आलेच तर बंदुकीच्या टप्प्यात राहातील आणि गोळ्या झाडता येतील अशी ती योजना होती.

मुंबई किल्ल्याची तटबंदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबई किल्ल्याची तटबंदी

कालांतराने मुंबई वेगानं बदलत गेली. याच परिसरात आता महात्मा गांधी रस्ता, आझाद मैदान आहे. आजही सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या एका भिंतीला या फोर्टचा एक तट दिसतो.

अमेरिकन यादवीच्या काळात भारतातल्या कापसाला मागणी वाढली आणि मुंबई बंदराला मोठं महत्त्व प्राप्त झालं. मुंबईत भरपूर पैसा आला मग फोर्टची तटबंदी 1860 पासून पाडायला सुरुवात झाली.

तिकडे खंदकात पाणी साचून डास आणि रोगराई वाढायला लागल्यावर खंदक ही बुजवला गेला. एस्प्लनेडच्या जागेवर क्रॉस, ओव्हल, कुपरेज आणि आझाद ही मैदानं आजही आहेत. क्रिकेटपासून अनेक खेळ इथं खेळले जातात.

मुंबईची तटबंदी पाडल्यावर

मुंबईची तटबंदी पाडल्यावर समोरच्या एस्प्लनेडच्या मोकळ्या जागेवर भराभर नव्या इमारती उभ्या राहू लागल्या. ससून मेकॅनिक्स इन्स्टिट्यूट म्हणजे आजची डेव्हिड ससून लायब्ररी, एलफिन्स्टन कॉलेज, मुंबई विद्यापीठ, हायकोर्टाची इमारत उभी राहिली.

तसेच एकेकाळचं व्हीटी- व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आजचं सीएसएमटी- छत्रपती शिवाजी महाराजा टर्मिनस स्थानक आकाराला आलं, मग ही रांग थेट क्रॉफर्ड मार्केटच्या इमारतीपर्यंत गेली. पुतळे, शिल्पांनी मुंबई सजून गेली.

ओव्हल मैदान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ओव्हल मैदान. समोर मुंबई विद्यापीठ आणि हायकोर्ट

एस्प्लनेडबद्दल मुंबईतील इतिहासाचे प्राध्यापक ओंकार साळुंके यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली. ते म्हणाले, “मुंबई किल्ल्याची तटबंदी पाडल्यावर किल्ल्याच्याभोवती सुमारे 1000 यार्ड रुंदीची जागा तयार झाली, त्या परिसराला एस्प्लांड म्हणत.

"वस्तीचं संरक्षण करण्यासाठी या जागेचा वापर व्हावा असा मूळ उद्देश असला तरी इथं गुरं चरणं, खेळ, मोकळ्या जागेत फिरण्यासाठी म्हणून वापर होऊ लागला. याच जागेवर बँडस्टँड आहे. सध्या बँडस्टँड कुपरेजवर आहे. या काळात इथं विहिरीही खणल्या गेल्या त्यातली भिका बेहराम विहीर आजही अस्तित्वात आहे", साळुंके सांगतात.

1857 चं बंड आणि आझाद मैदान

1855 साली मुंबई पोलिसांच्या सुपरिटेंडंट पदावर चार्ल्स फोर्जेट यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या कारकीर्द सुरू असतानाच भारतात 1857चं स्वातंत्र्ययुद्ध झालं होतं. त्याचे पडसाद मुंबईतही उमटले होते.

याच कालावधीत जगन्नाथ म्हणजे नाना शंकरशेट यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु फोर्जेट यांनी तपास करून नानांचा बंडाशी काही संबंध नसल्याचं सिद्ध केलं. यावेळेस मुंबईत जॉन एलफिन्स्टन गव्हर्नर होते. (त्यांच्या नावाने स्टेशनही होतं, आता त्या स्टेशनचं नाव प्रभादेवी झालं आहे.)

फोर्जेट वेषांतर करुन मुंबईत फिरत असत. बंडाची जराजरी कुणकुण लागली की ते सर्वांना सावध करत असत. इतकेच नव्हे तर पोलीस कार्यालयाजवळ एक वधस्तंभ उभारुन कोणी बंडाचा विचार केला तरी त्याला मारलं जाईल त्यांनी लोकांना सांगितलं. फोर्जेटनी 'अवर रिअल डेंजर इन इंडिया' नावाचं पुस्तकही लिहिलं होतं.

नाना शंकरशेट

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, नाना शंकरशेट

1857 च्या बंडाच्या संशयाच्या वातावरणात फोर्जेट यांनी कसं काम केलं याची माहिती 'मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा' या पुस्तकात माधव शिरवळकर यांनी दिली आहे.

मुंबईतल्या शिपायांमध्येही बंडाची खलबतं होतं आहेत. तसेच गंगाप्रसाद केडीया नावाच्या देवदेवस्की करणाऱ्या माणसाच्या घरात त्याची चर्चा होते हे फोर्जेटला समजलं होतं.

बंडात सहभागी झालेल्यांना तोफेच्या तोंडी देताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बंडात सहभागी झालेल्यांना तोफेच्या तोंडी देताना

लष्करी अधिकारी बॅरो यांच्याबरोबर वेषांतर करून फोर्जेटनी त्याच्या घरी भेट दिली. त्यांची सर्व चर्चा ऐकली आणि शेवटी गंगाप्रसाद केडीया व सय्यद हुसेन या दोघांना पकडलं आणि त्यांना लगेचच 13 ऑक्टोबर 1857 रोजी फाशी देण्यात आली. आज मुंबईत जेथे आझाद मैदान आहे तेथेच ही फाशी देण्यात आली.

फोर्जेटनी वेषांतर करुन सुरक्षा व्यवस्था भेदता येते हे दाखवण्यासाठी परळच्या गव्हर्नर हाऊसमध्ये सकाळी 6 वाजता गव्हर्नरच्या बेडरुमपर्यंत येऊन दाखवलं होतं. त्यांच्या नावाने आजही मुंबईत फोर्जेट हिल रोड आहे.

विक्रमवीरांचं आझाद मैदान

आझाद मैदान हे विक्रमवीराचं मैदान आहे. गर्दीचे विक्रम इथं होतात तसे खेळाचे विक्रमही इथं झाले आहेत. शालेय क्रिकेटमधील मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते ती म्हणजे हॅरिस शिल्ड स्पर्धा.

या स्पर्धेत सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी यांनी 664 धावांची विक्रमी भागीदारी केली ती याच मैदानावर केली. त्यानंतर या स्पर्धेत पृथ्वी शॉ, सर्फराज खान यांनीही विक्रमी खेळी केली आहे.

शेतकरी ते मराठा आंदोलन

शेतकरी, कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन असो वा राजकीय पक्षांची एकमेकांविरोधातली आंदोलनं. प्रत्येक आंदोलनासाठी आझाद मैदान ही हक्काची जागा असते.

शेकडो किलोमीटर पायी प्रवास करुन शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन इथंच विसावलेलं होतं आणि राज्यातले अनेक मराठा मोर्चे इथंच विसर्जित झाले होते.

आझाद मैदानावर आंदोलनासाठी आलेल्या महिला आणि मागे मेट्रोचं काम सुरू असलेली सूचना देणारा फलक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आझाद मैदानावर आंदोलनासाठी आलेल्या महिला आणि मागे मेट्रोचं काम सुरू असलेली सूचना देणारा फलक

आजही वेगवेगळ्या संघटना इथं आंदोलन, उपोषण करत असतात. आता या मैदानाच्या खाली मेट्रोही धावणार आहे. आझाद मैदान या सगळ्यांना सामावून घेतं आणि आपल्या इतिहासाच्या बुकात हळूच नोंद करत राहातं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)