शरद पवार यांची मारकडवाडीला भेट, EVM च्या साशंकतेबाबत गावकऱ्यांशी चर्चा

- Author, सुनील उंबरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीला भेट दिली.
अभिरूप मतदानाचा प्रयत्न केल्यामुळे या गावाच्या काही दिवसांपासून माध्यमात चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार उत्तमराव जानकर यांना त्यांच्याच गावात अपेक्षेप्रमाणे मतदान न मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी EVM वर शंका उपस्थित केली होती. त्यांनतर गावकऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदान घेऊन चाचपणी करावी अशी घोषणा केली होती. पण प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर हे मतदान झाले नाही.
त्यानंतर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज (8 डिसेंबर) मारकडवाडीला भेट दिली आहे. त्यांच्याच गावात गावकऱ्यांना जमावबंदी लागू करण्यात आली होती यावरुन शरद पवार यांनी प्रशासनावर टीका केली आहे.

सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी EVM मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला आणि EVM ची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला. या घटनेनं राज्यसह देशभरात मारकडवाडी चर्चेच्या केंद्रस्थानी आली.
ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे, अशी विनंती मारकडवाडीचे सरपंच व्ही. जी. मारकड यांनी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली आहे. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.
त्यानंतर मारकरवाडीमध्ये प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रितीनेच पूर्ण करण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर ( राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट) यांनी हे मतदान थांबवण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. येत्या काही दिवसांमध्ये आपण हा विषय निवडणूक आयोगासमोर मांडणार आहोत असं त्यांनी सांगितलं.
या निर्णयानंतर मारकडवाडीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याशिवाय गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.
ही बातमीही वाचा : EVM वरील शंका कुशंकांबाबत निवडणूक अधिकारी आणि संगणकतज्ज्ञांना काय वाटतं?
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय म्हटलं?
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकवाडीमध्ये प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रितीनेच पूर्ण करण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी एक अधिकृत पत्र काढून दिलं आहे.
या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, "मारकडवाडी येथे मतदान केंद्र क्र. 96, 97 आणि 98 अशी तीन केंद्रे येतात. या तीनही मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही. मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांचे 'पोलिंग एजंट' उपस्थित होते आणि त्याच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही.
त्याचप्रमाणे मतमोजणीच्या वेळी देखील उमेदवाराचे 'काउंटिंग एजंट' उपस्थित होते. त्यांच्याकडूनही मतमोजणी दरम्यान किंवा नंतरही कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही. तसेच फेरमतमोजणीची कोणतीही मागणी झाली नाही. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पारदर्शकपणे पार पडल्यानंतरच निकाल घोषित झाला आहे."

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "निवडणुकीशी संबंधित प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींना सहभागासाठी नियमानुसार वेळोवेळी कळवले गेले होते. यानुसार उमेदवारांचे प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागीसुद्धा झाले होते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकीपूर्वी आणि मतदानाच्या दिवशी मतदानापूर्वी चाचणी मतदानही घेतले गेले.
"मतदानयत्रांच्या फर्स्ट लेवल चेक (FLC) आणि कामिशनिंग ह्या टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चाचणी मतदान घेतले आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान यंत्रावर 50 मताची चाचणी घेतली गेली. या कोणत्याही टप्प्यावर संबंधिताकडून कोणत्याही तक्रारी वा आक्षेप नोंदवले गेलेले नाहीत. प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करून प्रक्रिया पूर्ण केली आहे."
पुढे विजया भांगळालकर सांगतात की "सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पार पडल्यानंतर वेळेनुसार तक्रार करणे अपेक्षित होते. तशी तक्रार आलेली नव्हती. त्यानंतर ही अभिरूप मतदानाची मागणी आली आहे. त्यामुळे ही मागणी फेटाळण्यात लावण्यात आली आहे. ही मागणी कायद्याच्या चौकटीत नाहीये आणि अशी मागणी प्रशासनाकडे आलेलीच नसल्यामुळे हे पूर्ण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मारकडवाडीत नेमकं काय घडलं?
आज 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतपत्रिकेनी मतदान घेण्याचे ग्रामस्थांनी निश्चित केले होते. त्यानुसार मतदान केंद्र, मतपत्रिका आदी तयारी ग्रामस्थांनी केली होती.
मात्र गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त, गावातील प्रमुख नागरिकांना नोटीस आणि त्याशिवाय जमावबंदी आदेश लागू केल्याने, गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर EVM मशीन बाबत अनेक ठिकाणी शंका उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले.
EVM बाबत पराभूत उमेदवार अधिक आक्षेप घेत असताना माळशिरस विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी व त्यांच्या मतदारांनी EVM बाबत आक्षेप घेतला आहे.
आमदार जानकर हे एक लाख मताधिक्याने निवडून येणे अपेक्षित होते, असा त्यांच्या समर्थकांचा दावा होता. मात्र ते फक्त 13 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या गावात गेल्या तीन निवडणुकात उत्तम जानकर यांना लीड मिळाले होते पण या निवडणुकीत तसे न झाल्यामुळे हे मतदान घ्यावे असे गावकऱ्यांचे म्हणणे होते.
या निवडणुकीत जानकर यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विजय सिंह मोहिते पाटील हे जानकर यांच्या सोबत होते. त्यामुळे मारकडवाडी गावातून जानकर यांना 80 टक्के मतदान होणे अपेक्षित होते.
मात्र या गावात जानकर हे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या पेक्षा दीडशे मतांनी मागे होते. त्यामुळे मतपत्रिकेतून मतदान घेऊन हे तपासण्यात यावे असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. मात्र नंतर तो मागे घेण्यात आला.

जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे EVM मधील दोष कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
झालेल्या निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मते तर जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत. या मतदानावर गावकऱ्यांना शंका होती.


मतदानाची शहानिशा करण्यासाठी जानकर गटाने स्वखर्चाने गावात मतपत्रिकेतून मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिलं होतं.
प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












