महायुतीचा दणदणीत विजय, 237 जागांवर मविआच्या मतांच्या टक्केवारीत मोठी घट

- Author, जास्मिन निहालानी
- Role, बीबीसी डेटा व्हिज्युलायजेशन टीम
सत्ताधारी महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 पैकी तब्बल 234 जागा जिंकत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला.
मराठा आरक्षण आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह महत्त्वाची आव्हानं असतानाही महायुतीने हा विजय मिळवला. या विजयात महायुती सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणाऱ्या लाडकी बहिण योजनेची भूमिका महत्त्वाची राहिली.
132 जागांवर विजय मिळवत भाजप राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला. यासह भाजप विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक 145 जागांपासून केवळ 13 जागा दूर राहिला.
दुसरीकडे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 जागा आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या.
महायुतीचा विजय केवळ महाराष्ट्रातील एका विभागापुरता मर्यादित नाही. खान्देश, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या राज्याच्या पाचही विभागात महायुतीला 50 टक्के किंवा त्याहून अधिक मते मिळाली. आधी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या विदर्भात भाजपला 62 पैकी 38 जागा मिळाल्या.
या निवडणुकीत काँग्रेसची आतापर्यंतची सर्वांत वाईट कामगिरी दिसली. त्यांना केवळ 16 जागांवर विजय मिळाला. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचाही पराभव झाला.
एकूण लढवलेल्या जागा आणि त्यात विजय मिळालेल्या जागा यांचा विचार केला, तर ऐंशीच्या दशकात काँग्रेसचा स्ट्राईक रेट 50 टक्के होता.
तो 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 30 टक्के झाला आणि 2024 च्या निवडणुकीत अगदी 16 टक्क्यांवर घसरला. याउलट 2019 च्या निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट 64 टक्के होता. 2024 मध्ये भाजपचा स्ट्राईक रेट सुधारून 88.6 इतका झाला.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 20 जागा आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 10 जागा मिळाल्याने ते स्वतःच्या पक्षाला मूळ पक्ष सिद्ध करण्यात अपयशी ठरले.
6 महिन्यांआधी महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला होता. यात काँग्रेसला लढवलेल्या 17 जागांपैकी 13 ठिकाणी विजय मिळाला होता. म्हणजे काँग्रेसचा स्ट्राईक रेट 76 टक्के होता.
याच निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने लढवलेल्या 21 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवला होता.
मविआला ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळाला, तेथील विधानसभा मतदारसंघांचा विचार केला, तर त्याची संख्या 153 होते. विधानसभा निवडणुकीत मविआला या 153 पैकी केवळ 41 जागांवर विजय मिळाला.
मविआला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी याची तुलना केली, तर तब्बल 237 मतदारसंघांमध्ये मविआच्या मतांमध्ये घट झाली आहे.


याउलट महायुतीने लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत 201 मतदारसंघात मतांची टक्केवारी वाढवली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मविआच्या मतांमध्ये सर्वाधिक घट झाली. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार शोभा बच्चाव 96 टक्के मतं घेऊन जिंकल्या होत्या.
मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला अगदी 5 टक्के मतंही मिळाली नाहीत. या मतदारसंघात ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा केवळ 162 मतांच्या फरकाने विजय झाला.

काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणात घटली असा आणखी एक मतदारसंघ म्हणजे वरोरा. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी 57 टक्के मतं घेत विजय मिळवला होता.
मात्र, विधानसभा निवडणुकीत वरोरा मतदारसंघात 33 टक्के मतं घेत भाजप उमेदवार करण देवतळे यांचा विजय झाला. काँग्रेस 12 टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी फेकली गेली. या मतदारसंघात काँग्रेसच्या मतांमध्ये 45 टक्क्यांची घट झाली.
विशेष म्हणजे काँग्रेसचा 18 बालेकिल्ल्यांपैकी 11 ठिकाणी दारुण पराभव झाला. यातील 7 ठिकाणी भाजपचा विजय झाला, तर प्रत्येकी 2 ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) विजय झाला.
संगमनेरमध्ये तब्बल 39 वर्षे आमदार राहिलेल्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या (शिंदे गट) अमोल खताळ या नवख्या उमेदवाराने पराभव केला. येथे थोरातांना 46 टक्के मतं मिळाली.
काँग्रेसचा देवळीतही पराभव झाला. या ठिकाणी रणजित कांबळे 1999 पासून आमदार होते. त्यांचा भाजप उमेदवार राजेश बकाणे यांनी पराभव केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











