'बटेंगे तो कटेंगे प्रचाराने ध्रुवीकरण झालं', शरद पवार निकालावर नेमकं काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. निकालानंतर एक दिवसाने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पवारांनी असा निकाल लागण्याच्या कारणांवर भाष्य केलं. तसेच भविष्यात त्यांची काय राजकीय रणनीती असेल हेही नमूद केलं.
निकालाच्या कारणांवर बोलताना शरद पवार म्हणाले, "बटेंगे तो कटेंगे या प्रचारामुळे निश्चितपणे धार्मिक ध्रुवीकरण झालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जे वक्तव्य केलं त्यामागे ध्रुवीकरण व्हावं असा हेतू असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे."
"महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले. असं असूनही हा निकाल लागला आहे. या निकालात लाडकी बहीण योजनेचा परिणामही दिसतो आहे. याशिवाय काही प्रवृत्तींनी निवडणुकीला धार्मिक वळण देण्याचाही प्रयत्न केला. त्याचाही निकालावर प्रभाव पडला असावा," असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
"अजित पवार यांच्या विधानसभा निवडणुकीत जास्त जागा आल्या आहेत. हे अमान्य करायचं काही कारण नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे," असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावरील दाव्याला प्रत्युत्तर दिलं.
"बारामतीकरांनी लोकसभेला आम्हाला कौल दिला आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना कौल का दिला याबाबत चौकशी करावी लागेल," असंही शरद पवारांनी नमूद केलं.
'युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुकला का?'
युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुकला का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, "बारामतीतून कुणी तरी उभं राहावं लागणार होतं. त्या मतदारसंघाचा थेट माझ्याशी संबंध होता. त्यामुळे तेथून उमदेवारच उभा केला गेला नसता, तर महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला असता. त्यामुळे कुणीतरी बारामतीतून निवडणूक लढवणं गरजेचं होतं."
"आम्हाला माहिती होतं की, अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही. अजित पवार यांचं गेले अनेक वर्षे बारामतीतील सत्तेत असलेलं स्थान आणि दुसरीकडे युगेंद्र पवारसारखा तरुण अशी ही लढत होती. याची आम्हाला कल्पना होती," असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.


महाविकासआघाडीला ओबीसी समाजाच्या नाराजीचा फटका?
विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीला ओबीसी समाजाच्या नाराजीचा फटका बसल्याचीही चर्चा आहे. याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, "ओबीसी समाजाची निकालात काय भूमिका होती याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यांचे काही प्रश्न असू शकतात. एकेकाळी ओबीसी समाजाची महत्त्वाची मागणी मंडल आयोगाची होती. मंडल आयोगाचा निर्णय मी घेतला होता."
"देशातील अनेक राज्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली नाही. त्यावेळी मंडलची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. याशिवाय ओबीसी आरक्षणाचा निर्णय देखील माझा होता. त्याचाही ओबीसी समाजाला फायदा झाला. यात धनगर आणि इतर समुहांच समावेश आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या मनात आम्हा लोकांविषयी वेगळी भावना असेल, हे आम्हाला पटत नाही," असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
'निकालाने धक्का बसला का? पुढची रणनीती काय?'
निकालाने धक्का बसला का? पुढची रणनीती काय? या प्रश्नांवर शरद पवार म्हणाले, "निकाल काल लागला आणि आज मी कराडमध्ये आहे. असा निकाल लागल्यानंतर एखादा नेता घरीच बसला असता. मात्र मी काही घरी बसणार नाही. मी पुन्हा एकदा आमचं काम करणाऱ्या तरुण पिढीचा आत्मविश्वास वाढवेल. ही कर्तुत्ववान पिढी उभी केली पाहिजे. हाच माझा कार्यक्रम राहील."
मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही याविषयी विचारलं असता शरद पवार म्हणाले, "मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही आणि आमचेही दहाच आमदार निवडून आले आहेत. विरोधकांनी देखील आमचे केवळ 10 आमदार निवडून येतील असा अंदाज लावला नव्हता."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











