'घरातल्याच लोकांनी मतदान केलं नाही का?' ईव्हीएमवर कोणी काय घेतले आक्षेप?

“घरातल्याच लोकांनी मतदान केलं नाही का?” ईव्हीएमवर कोणी काय घेतले आक्षेप?

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर आणि राज ठाकरे
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं असून महाविकास आघाडी 49 जागांवर अडकली आहे. एकट्या एकनाथ शिंदेंना जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षाही कमी जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. विरोधकांकडून ईव्हीएमवर आक्षेप घेतले जात आहेत.

काही मतदारसंघातल्या उमेदवारांनीही ईव्हीएमवर आक्षेप घेऊन कुठं शून्य मतं मिळाली, तर कोणी स्वतःच्या मतदान केंद्रात घरातील लोकांची मतं मिळाली नसल्याची तक्रार केली आहे. ईव्हीएमबद्दल कोणी काय काय आक्षेप घेतले आणि त्यावर निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हटलं? पाहुयात.

'मला माझ्या पत्नी आणि आईनेच मतदान केलं नाही का?'

मनसेचे दहीसर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनीही ईव्हीएमच्या मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे.

"मी ज्या मतदान केंद्रात मत दिलं, जिथं राहतो तिथून मला फक्त दोनच मतं मिळाली आहेत. माझ्या घरात माझी आई, माझी मुलगी, माझी बायको आणि मी असे चार मतदार आहोत. पण, माझी आई, बायको किंवा मुलीनं मला मतं दिलं नाही का? माझ्या कार्यकर्त्यांनी मतं दिलं नाही का?"

असा सवाल त्यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमधून उपस्थित केला आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर आक्षेप घेतला होता. पण, आम्हाला अटक करण्याची भाषा बोलली गेली. त्यामुळे आम्ही बाहेर पडल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय.

कुणाल पाटलांच्या गावात त्यांना शून्य मतं मिळाली? खरं काय?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील यांना त्यांच्या धुळे ग्रामीण मतदारसंघातील अवधान गावात शून्य मतं मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या गावात कुणाल पाटील यांचं चांगलं वर्चस्व असताना असं कसं झालं? असा सवाल या व्हिडिओतून उपस्थित करण्यात आला होता.

डॉ. संग्राम पाटील यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत नक्कीच घोटाळा असल्याचं म्हटलं होतं. त्यावर धुले जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून ट्विट करत उत्तर देण्यात आलं आहे.

कुणाल पाटलांच्या गावात त्यांना शून्य मतं मिळाली? खरं काय?

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, कुणाल पाटलांच्या गावात त्यांना शून्य मतं मिळाली असा व्हीडिओ व्हायरल झाला होता

06-धुळे ग्रामीण विधानसभा निवडणुकीत अवधान येथे एकूण 4 मतदान केंद्र असून त्यांचे क्रमांक 247, 248, 249 आणि 250 आहेत. त्याठिकाणी कुणालबाबा रोहिदास पाटील यांना अनुक्रमे 227, 234, 252 आणि 344 इतकी मते मिळाल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी, धुळे ग्रामीण यांनी दिली आहे.

सदरचा व्हीडिओ निश्चित कुठला आहे याची खात्री होत नाही. तसेच धुळ्यात असे कुठलेही आंदोलन झालेले नाहीत. तसेच सुरूही नसल्याचे धुळे ग्रामीण मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर यांनी कळविले आहे, असं उत्तर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे.

याबाबत आम्ही माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले, "त्या लोकांचं म्हणणं होत की कमी मतं मिळाली. शून्य मतं मिळाली हे चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावर टाकण्यात आलंय. पण जवळपास प्रत्येक मतदान केंद्रात 20 टक्के मत कमी मिळाले, असं कुणाल पाटील यांनी स्पष्ट केलं."

राजेसाहेब देशमुख यांचाही ईव्हीएमवर आक्षेप

तसेच परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध राजसाहेब देशमुख अशी लढत झाली. यात शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला. त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला असून काही मतदारसंघात फेरमतमोजणी करण्याची मागणी केली आहे.

बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले, “परळी विधानसभा मतदारसंघातल्या लिमगाव इथं लोकसभेला आम्हालाच मताधिक्क्य होतं. विधानसभेलाही तिथला सरपंच ज्याचा गावावर चांगला प्रभाव आहे तो आमच्याकडून होता. आम्ही गावात जाणार आहे हे कळताच तिथं अख्खं गाव एकत्र जमत होतं. त्या गावात मला फक्त 19 मतं पडली. त्या गावातून 1000 मतं पडायला पाहिजे होती. ईव्हीएममध्ये नक्कीच घोळ आहे.”

तसंच आमच्याकडे बोगस मतदानही झाल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे ते सांगतात, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आम्हाला अजूनही काहीच उत्तर मिळालं नाही.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे हे देखील ईव्हीएम मशिनवर आक्षेप नोंदवतात. अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे आर्वी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होत्या. त्यांच्याविरोधात भाजपकडून सुमीत वानखेडे यांनी लढत दिली.

अमर काळे बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “लोकसभेला मी चांगल्या मतांनी निवडून आलो. लाडकी बहीण योजनेचा प्रभाव विधानसभेला होता. पण, इतका नव्हता की माझ्या स्वतःच्या गावातच अत्यंत कमी मतं मिळतील. माझं वाठोडा गाव आहे. त्याचं आता पुनर्वसन झालं आहे. या गावात 60 टक्के काँग्रेस आणि 40 टक्के भाजप होतं. पण, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे सगळे लोक आमच्याकडे आले. दोन-तीन घरं फक्त विरोधात होती. आम्हाला या गावात चांगली मतं मिळायला पाहिजे होती. पण, अत्यंत कमी मतं मिळाली. हे कसं शक्य आहे?”

पुढे ते म्हणतात, आम्हाला भाजपचे काही नेते म्हणायचे आम्ही या बूथवरून, त्या बूथवरून इतक्या मार्जिनने समोर राहू आणि अगदी तितक्याच मार्जिनने भाजपचा उमेदवार समोर आहे. इतका अचूक अंदाज कसा काय असू शकतो असा सवालही ते उपस्थित करतात.

त्यांनी निवडणूक आयोगाकडे अद्याप तक्रार केलेली नाही. पण, सगळा विरोधी पक्ष मिळून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करत असल्याचं ते सांगतात.

कोणत्या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा कमी मतं?

विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि ईव्हीएममधून मोजलेली मतं यामध्ये तफावत असल्याचं समोर आलं होतं.

अक्कलकुवा, नवापूर, साक्री, शिरपूर, चोपडा, भुसावळ, जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, अकोट, अकोला पश्चिम, मोर्शी, वर्धा, सावनेर, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, कामठी आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, वणी, नांदेड दक्षिण, मुखेड, कळमनुरी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, घनसावंगी, बदनापूर औंरगाबाद पश्चिम, गाणगापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, सिन्नर, निफाड, नालासोपारा, वसई, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मीरा भाईंदर, ओवळा माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी, दिंडोशी, चारकोप, विलेपार्ले, चांदीवली, सायन कोळीवाडा, मुंबावेदी, पनवेल, कर्जत, अलिबाग, आंबेगाव, शिरुर, इंदापूर, बारामती, मावळ, कोथरुड, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अदहमपूर, औसा, तुलजापूर माढा, सोलापूर शहर मध्य, कोल्हापूर उत्तर, खानापूर अशा 76 मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा कमी मतं मोजणी झाल्याची माहिती लोकमतने दिली होती.

काही असेही मतदारसंघ आहेत जिथं प्रत्यक्ष मतदानापेक्षा जास्त मतं मोजली गेली. यामध्ये आमगाव, उमरखेड, लोहा, देगलूर, हिंगोली, औरंगाबाद पूर्व, वैजापूर, मालेगाव मध्य, कळवण, चांदवड, दिंडोरी, बोईसर, भोसरी, परळी, करमाळा, सोलापूर दक्षिण, कागल, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले या मतदारसंघाचा समावेश आहे.

निवडणूक आयोगानं काय दिलं स्पष्टीकरण

महाराष्ट्रात 504313 मतं अतिरिक्त मोजल्याचा दावा आणखी काही मीडिया रिपोर्टमधून करण्यात आला आहे. त्यावर राज्य निवडणूक आयोगानं एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे.

पण, मीडिया रिपोर्टमध्ये पोस्टल बॅलेटची मतं दाखवली नाहीत त्यामुळे मतांमध्ये तफावत दिसत असल्याचं निवडणूक आयोगानं त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ईव्हीएम आणि पोस्टल बॅलेट अशी दोन्ही मतं असतात आणि फक्त ईव्हीएमची मतं पकडली तर ती तफावत दिसते, त्यात पोस्टल बॅलेटची मतं गणली गेली आकेडवारी बरोबर येते, असा खुलासा निवडणूक आयोगानं केला आहे.

तसेच लोकमतच्या वृत्ताबद्दल सुद्धा निवडणूक आयोगानं त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. तो संवाद त्यांनी निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, एखाद्यावेळी ईव्हीएममध्ये बिघाड होऊन डिस्ल्पे जातो. अशावेळी ते मशिन बाजूला ठेवून अन्य मतमोजणी केली जाते.

संपूर्ण मतमोजणीनंतर क्रमांक एकची मतं मिळालेलं व क्रमांक दोनची मतं मिळालेले उमेदवार यांच्या मतातील फरक हा त्या डिस्प्ले नसलेल्या मशीनमधील मतांपेक्षा कितीतरी जास्त असेल तर त्या मशीनमधील मतं मोजली जात नाही. हा निर्णय उमेदवारांच्या प्रतिनिधींची संमती घेतल्यानंतरच केला जातो. डिस्प्ले नसलेल्या मशिनमधील मतं मोजण्याचीही सुविधा असते. या मशीनमधील व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी केली जाते, असं राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)