कुर्ला बस अपघात : 'लोकांना वाचवायला गेलो, तर तिथं माझा मुलगा पडला होता'

मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस रोडवर सोमवारी (9 डिसेंबर) रात्री भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 43 लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघाताच्या वेळी बसने बाजारपेठेतील अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत काही रिक्षांचा चक्काचूर झाला. या बसचा ड्रायव्हर संजय मोरे याला अटक करण्यात आलेली आहे.
105,108,118 कलमा अंतर्गत ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती डीसीपी गणेश गावडे यांनी दिली आहे.
कुर्ला बस अपघात प्रकरणी कोर्टाने आरोपी संजय मोरे याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चालक संजय मोरे हा एक डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचे वय 54 वर्षे असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपी चालकाने याआधी कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आलेलं आहे. अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण? याबद्दल पोलीस तपास सुरू आहे. गाडी चालवताना तो दारूच्या नशेत नसल्याच वैद्यकीय तपासणीत समोर आलं आहे.

या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले.
जखमींना तातडीने जवळच असलेल्या भाभा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास कुर्ला पोलीस करत असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. "त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो", असेही त्यांनी म्हटले आहे.
या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "या अपघातातील बस चालक हा कंत्राटी असून चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मोठी वाहन चालवण्याचा अनुभव नसताना या ड्रायव्हरला काम मिळाले कसे, एवढी मोठी बस चालवायला देताना आधी तपासले नव्हते का ड्रायव्हर बस चालवू शकतो का? या अक्षम्य कारभार साठी बेस्ट प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Facebook पोस्ट समाप्त
या अपघातावर माध्यमांशी बोलताना स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले, "कुर्ला स्टेशन येथून बेस्टची इलेक्ट्रिक बस निघाली. थोड्या अंतरावर आल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि रस्त्यावरील नागरिक, गाड्या यांना उडवत बस डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आली. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे."
"बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. त्याआधी अपघातात जखमींना वाचवणं आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करत आहोत."
'आमची आई गेली, सरकार ते भरून देणार का?'
या भीषण अपघातात 63 वर्षीय कनीस फातमा अन्सारी यांचा मृत्यू झाला आहे.
कनीस या कुर्ला पश्चिम परिसरातील एका रुग्णालयात काम करायच्या. रोज आठ वाजता त्या सायंकाळी रात्रपाळीच्या शिफ्टला कामाला जायच्या .
नऊ वाजता कुर्ला पश्चिम आंबेडकर परिसरामध्ये झालेल्या या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं कुटुंब बाबू कसाई गल्ली कुर्ला पश्चिम पाईप लाईन रोड परिसरात राहतं.
कनीस फातमा यांची मुलगी झैनब यांनी बीबीसी मराठीला अपघाताबाबत सांगितलं.
त्या म्हणाल्या की, "माझी आई देसाई नर्सिंग होमकडे कामावर गेली होती. त्यावेळी बसने तिला उडवलं. अपघातानंतर एक फोन आला आणि समोरील व्यक्तीने हा फोन कुणाचा आहे असं विचारलं. मी त्याला म्हणाले की माझ्या आईचा फोन आहे. तर तो व्यक्ती म्हणाला की तुमच्या आईचा मृत्यू झाला आहे."

झैनब पुढे म्हणाल्या, "आई रोज आठ वाजता कामावर जाते. पण कालच ती नऊ वाजता गेली. रोजच्या वेळेवर गेली असती तर कदाचित असं झालंच नसतं."
कनीस फातमा यांची मुलगी मेहरून निशा म्हणाल्या की, "या परिसरात फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर चालायला जागा नसते, बस वेगाने धावत असतात यावर नियंत्रण असायला हवं. सामान्य माणसांना चालायला जागाच नाही. सरकारने कारवाई केली पाहिजे. त्या रस्त्यावरून लहान लहान मुलं जातात. आता आमची आई गेली ती तर काही येणार नाही, सरकार भरून देणार आहे का?"
'अपघातात सापडलेल्या लोकांना वाचवायला गेलो, तर तिथं माझा मुलगा पडला होता'
या अपघातात मृत पावलेल्या शिवम कश्यपचे वडील बाबुलाल कश्यप म्हणाले की, "अपघात झाला तेव्हा मी जवळच होतो. मोठा आवाज झाल्यावर मी लगेच तिथे गेलो, तर तिथे माझा मुलगा शिवम बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. मी त्याला उचलून घेऊन दवाखान्यात नेलं. तिथे त्याचा मृत्यू झाला. माझा मुलगा तेरावीत शिकत होता."

शिवम कश्यपच्या वडिलांचे मित्र शरफुद्दीन बाबर म्हणाले की, "ज्या ठिकाणी अपघात झाला तिथून आमचं दुकान शंभर मीटर अंतरावर आहे. अपघात झाल्यावर लोकांची मदत करण्यासाठी आम्ही तिथे गेलो, दुसऱ्या लोकांना उचलत असताना आम्हाला आमचाच मुलगा (शिवम) तिथे पडलेला दिसला. सरकारने दिलेल्या पाच लाखांमध्ये काय होणार आहे? पण यापुढे असा अपघात घडू नये यासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे."
'आमचं जायच ते गेलं, 5 लाखाच काय करायचं?'
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अनम शेखचे मामा असगर शेख म्हणाले की, "माझी भाची पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. ती 20 वर्षांची होती. काल कामानिमित्ताने ती बाहेर गेली होती. कुर्ला स्थानकात आल्यानंतर रिक्षा मिळत नसल्याने घरी आणायला येण्यासाठी तिने वडिलांना कॉल केला. वडील कुर्ला स्टेशन परिसरातून गाडीवरून घरी नेत असताना हा अपघात झाला. यात अनम हिचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी आहेत."

असगर शेख म्हणाले की, "त्यांच्या कुटुंबात चार सदस्य होते. त्या चालकावर कारवाई व्हायला पाहिजे. अनमचे वडील रुग्णालयात आहेत आणि त्यांना अजूनही माहिती नाही. आता आमचं नुकसान व्हायचं ते झालंय तर मदत म्हणून मिळालेल्या पाच लाखांचं आम्ही काय करायचं?"
'बेस्ट'च्या व्यवस्थापकांनी काय माहिती दिली?
कुर्ला बस अपघात प्रकरणी बेस्ट व्यवस्थापक अनिल डिग्गीकर म्हणाले की, "कुर्ल्यात घडलेली घटना अतिशय दुःखदायक आहे. बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का हे तपासलं जात आहे. ब्रेक किती कार्यक्षम होते हेही तपासलं जात आहे. यावरून चालकाचं नियंत्रण सुटलं की गाडीत काही बिघाड आहे हे स्पष्ट होईल. चालक संजय मोरे हे पूर्वी एमपी इंटरप्रायजेसमध्ये काम करत होते, त्याआधी हंस इंटरप्रायजेसमध्ये दोन वर्षे काम केलं होतं. इलेक्ट्रिक गाड्या चालवण्याचं त्यांनी जे प्रशिक्षण घेतलं होतं ते पुरेसं होतं? ते योग्य होतं का? याचा तपास आम्ही करत आहोत. चालकांना रस्ता सुरक्षेचं प्रशिक्षण पुरेसं आणि योग्य होतं का हेही तपासतो आहोत. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची आम्ही काळजी घेत आहोत."
कंत्राटी चालकांबाबत बोलताना डिग्गीकर म्हणाले की, "बेस्टकडे असणाऱ्या ३२०० गाड्यांपैकी २२०० गाड्या या कंत्राटी पद्धतीने चालवल्या जातात. यापैकी बेस्टमध्ये कायमस्वरूपी काम करणारे काही चालक आहेत आणि काही चालक हे कंत्राटी पद्धतीने घेतले जातात. ते घेत असताना देखील त्यांना पंधरा दिवसांचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रशिक्षणात उत्तीर्ण झाल्यानंतर आम्ही कंत्राटी पद्धतीने नोकरी देत असतो. प्रशिक्षणाचा कालावधी वाढवण्याची गरज आहे का हेही आम्ही तपासणार आहोत."

अनिल डिग्गीकर पुढे म्हणाले की, "बेस्टचा स्वतःचा ताफा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संघटना आणि बेस्टमध्ये करार झाला आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारसोबत चर्चा करून हा ताफा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वेट लीज ऑपरेटर्सची बैठक घेऊन आम्ही कोणत्या सुधारणा करता येतील हे पाहणार आहोत. यामध्ये गाडीची अवस्था आणि प्रशिक्षणामध्ये बदल करणार आहोत."
डिग्गीकर यांनी सांगितलं की, "आमच्या तांत्रिक समितीतले अभियंते गाड्यांच्या तांत्रिक बाबींमध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का? हे तपासणार आहेत. चालकांना आठ तासांची ड्युटी दिली जाते, मात्र कुणी यापेक्षा जास्त काम करत असेल तर आम्ही चौकशी करून कारवाई करू. कुर्ला अपघातातील चालकालाही आठ तासांसाठीच काम दिलेलं होतं. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना अपघात लवादामार्फत जास्तीत जास्त मदत करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."
'बेस्ट'कडून समिती स्थापन, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर
बेस्टतर्फे एक पत्रक काढून कुर्ला अपघाताच्या चौकशीसाठी आणि तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी कुर्ला पश्चिम बसस्थानकातून अंधेरी पूर्व बसस्थानकडे जाणाऱ्या बसचा कुर्ला येथे अपघात झाला. या अपघातात एकूण 49 नागरिक गंभीर जखमी झाले असून, सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

या अपघाताच्या चौकशीसाठी मुख्य वाहतूक व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना बेस्टतर्फे दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच जखमींच्या औषधोपचाराचा खर्च देखील मुंबई महानगरपालिका आणि बेस्टतर्फे केला जाईल.
'अपघातात तीन पोलीस जखमी'
"या अपघातात तीन पोलीसही जखमी झाले आहेत. ही अत्यंत गंभीर दुर्घटना आहे. आम्ही जखमींना सर्वोतपरी मदत करू. त्यांना वाचवणं हेच पहिलं काम आम्ही करू," असंही आमदार कुडाळकर यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











