वॅगनर ग्रुप : अपराध्यांची टोळी जिचं अस्तित्व रशियाने नाकारलं, ती बनली युक्रेनमध्ये पुतिन यांची ढाल

वागनर ग्रुपचं सेंट पीटर्सबर्गमधलं कार्यालय

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, वागनर ग्रुपचं सेंट पीटर्सबर्गमधलं कार्यालय
    • Author, एलिजावेटा फोश, ओल्गा इवशिना आणि सेनिया शुर्मानोवा
    • Role, बीबीसी रशिया

रशियन उद्योगपती येवगेनी प्रिगोझिन यांनी आपल्या पदरी 'वॅगनर ग्रुप' नावाची एक आर्मी बाळगली होती. ही आर्मी कित्येक वर्ष प्रसिद्धच्या झोतापासून लांब आपलं अस्तित्व नाकारत होती. किंबहुना रशियाच्या सर्वोच्च नेतृत्वाने देखील वेळोवेळी या आर्मीचं अस्तित्व नाकारलं होतं.

पण रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मात्र या आर्मीने युद्धात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.

तुरुंगवास भोगलेल्या यातल्या काही सैनिकांना रशियन मेडल्स मिळाले.

2022 वर्ष संपताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाच्या दक्षिणेकडील काही प्रांतांना भेटी दिल्या. आणि या दौऱ्यात त्यांनी देशासाठी सेवा बजवलेल्या अधिकाऱ्यांना मेडल्स देऊन त्यांचा सन्मान केला.

सन्मान मिळवलेल्या अधिकाऱ्यांच्या गर्दीत एक दाढीवाला तरुण होता. इतर सैनिक आणि अधिकऱ्यांपेक्षा वेगळा पोशाख केलेल्या या तरुणाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. त्याच्या पोशाखावरून तो वॅगनर ग्रुपचा सैनिक असल्याचं समजत होतं.

मार्शल आर्ट्समध्ये पारंगत असलेल्या या तरुणाचं नाव आइक गॅसपारियन होतं. ऑक्टोबर 2019 मध्ये मॉस्कोमधील एक कॅफे लुटल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

त्यानंतर त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

वॅगनर ग्रुपशी संबंधित टेलिग्राम चॅनेलवर असलेल्या व्हिडिओत हा तरुण दिसला होता. या व्हिडिओत गॅसपारियन, रियाझान शहरातील तुरुंगातून बाहेर आल्यानंतर युद्धासाठी युक्रेनमध्ये पोहोचल्याचं सांगताना दिसतोय.

तो 40 हजार रशियन कैद्यांपैकी एक आहे. अमेरिकेच्या मते हे कैदी युक्रेनमध्ये तैनात करण्यात आलेत. ते वॅगनर ग्रुपच्या 10,000 भाडोत्री सैनिकांपैकी आहेत.

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 'रशिया बिहाइंड बार्स' नावाच्या एका मानवाधिकार गटाने जो डेटा गोळा केला होता त्यात आणि या माहितीत साधर्म्य आढळतं. या मानवाधिकार गटाने युद्धात रशियन कैद्यांच्या सहभागाची माहिती गोळा केली होती.

भरपूर पैसे आणि अॅडव्हेंचर

या वॅगनर ग्रुपचे संस्थापक असलेल्या येवगेनी प्रिगोझिन यांनी मागच्या वर्षी ग्रुपच्या भरतीसाठी रशियामधील तुरुंगांना भेट दिली होती.

जे कैदी रशियन युद्धात सहभागी होतील त्यांचे क्रिमिनल रेकॉर्डस् हटवू, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.

पण नंतर जी माहिती समोर आली त्यानुसार, या कैद्यांना युक्रेनमधील सर्वात धोकादायक आघाड्यांवर पाठवण्यात आलं होतं. या युद्धात बरेच जण मारले गेले.

युक्रेनच्या लष्कराने म्हटलंय की, वॅगनर ग्रुपच्या अनेक कैद्यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं, त्यातले बहुतांश मारले गेले.

पण वॅगनर ग्रुपने नेहमीच कैद्यांचा भरणा केलेला नाहीये.

वागनर पीएमसीचे सैनिक आयकॉम गॅसपरयान यांना सरकारी सन्मान प्रदान करताना पुतीन

फोटो स्रोत, KREMLIN.RU

फोटो कॅप्शन, वागनर पीएमसीचे सैनिक आयकॉम गॅसपरयान यांना सरकारी सन्मान प्रदान करताना पुतीन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या ग्रुपची स्थापना 2014 साली करण्यात आली. 2015 - 16 पासून या ग्रुपच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थक फुटीरतावाद्यांना मदत करण्यासाठी या मिशनरी गटाची स्थापना करण्यात आली होती.

पण नंतर या ग्रुपच्या कारवाया पूर्व युरोपच्या बाहेर पसरल्या. सुदान, सीरिया, लिबिया आणि आफ्रिकन खंडातील अनेक देशांमध्ये वॅगनर ग्रुपचे भाडोत्री सैनिक दिसले होते.

या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी दिलं जाणारं आमिष म्हणजे भला मोठा पगार आणि अॅडव्हेंचर.

या ग्रुपच्या एका माजी सैनिकाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "रशियाच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी काही लोक या संघटनेत सामील झाले."

युक्रेनचं युद्ध सुरू होण्यापूर्वी या ग्रुपमध्ये सामील होणारे लोक लहान लहान गावांमधून यायचे. या गावांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळणं कठीण असायचं. त्यामुळे ते हा ग्रुप जॉईन करायचे.

वॅगनर ग्रुपमध्ये काम करणाऱ्यांना 1500 डॉलर (सुमारे 1.22 लाख रुपये) पगार मिळायचा. जर एखादा सैनिक युद्धभूमीवर लढायला गेल्यास त्याला 2000 डॉलर (1.6 लाख रुपये) मिळायचे.

सीरियाच्या युद्धात वॅगनर ग्रुप राष्ट्राध्यक्ष असद यांच्या बाजूने लढला होता. लिबियातील संयुक्त राष्ट्र समर्थित सरकारच्या विरोधात जनरल हफ्तारला मदत करण्यासाठी त्यांनी युद्धात सहभाग घेतला होता.

एका अंदाजानुसार, 2014 ते 2021 दरम्यान 15,000 लोक वॅगनर ग्रुपमध्ये सामील झाले होते आणि तरीही ही संख्या मर्यादित होती.

पण रशियन लोकांना या ग्रुपविषयी जास्त माहिती नसल्याचं दिसतं. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मात्र या ग्रुपचा प्रभाव आणि दर्जा दोन्ही वाढला.

वॅगनर ग्रुप

फोटो स्रोत, T.ME/PRIGOZHIN_HAT

येवगेनी प्रिगोझिन कोण आहेत?

युक्रेन युद्धापूर्वी, रशियन अधिकाऱ्यांनी वॅगनर ग्रुपचं अस्तित्व नाकारलं होतं.

रशियाने जगाच्या इतर भागात आपला प्रभाव वाढवण्यासाठी या भाडोत्री सैनिकांचा वापर केल्याचं नाकारलं आहे. अधिकाऱ्यांनी नेहमीच सांगितलं की, रशियात अशा खासगी संघटनांवर बंदी आहे, आणि अशा संघटनेत सामील होणं हा दंडनीय गुन्हा आहे.

उद्योगपती असलेल्या येवगेनी प्रिगोझिन यांनीच या संघटनेची स्थापना केलीय अशा आशयाच्या बातम्या दिल्यामुळे अनेक पत्रकारांवर खटले भरण्यात आलेत.

2019 मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना सीरियातील रशियन सैनिकांबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी पुतिन म्हणाले होते की, काही प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज तिथं काम करतायत, रशियन सरकारचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही.

2020 मध्ये पुतीन यांना लिबियातील रशियन सैनिकांबद्दल विचारलं असता, त्यावेळीही त्यांनी हेच उत्तर दिलं होतं.

पण रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या. रशियन सैन्य युक्रेनमध्ये आपलं उद्दिष्ट साध्य करण्यात अयशस्वी ठरलं तेव्हा येवगेनी प्रिगोझिन रशियन सैन्यावर टीका करू लागले. यावेळी त्यांनी वॅगनर ग्रुपशी असलेल्या संबंधांवर उघडपणे भाष्य केलं.

अखेर, 2022 च्या सप्टेंबर महिन्यात त्यांनीच या संघटनेची स्थापना केल्याचं मान्य केलं.

युक्रेनचं सोलेदार शहर ताब्यात घेण्यात वॅगनरच्या सैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचा दावा त्यांनी केला.

वॅगनर ग्रुप

फोटो स्रोत, TASS

एका वॅगनर सैनिकाने या लढाईचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता जो व्हायरल झालाय. या घटनेनंतर युक्रेनमधील रशियन ऑपरेशनचे कमांडर आणि जनरल स्टाफ जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्यावर जोरदार टीका झाली.

तज्ञांच्या मते, वॅगनरच्या एका सैनिकाचा सन्मान करून त्याच्याशी हस्तांदोलन करून पुतीन यांनी या ग्रुपचा उत्साह वाढवला, शिवाय दुसऱ्या बाजूला या ग्रुपला शांत करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

या ग्रुपवर युद्ध गुन्ह्यांचेही आरोप करण्यात आलेत. हे आरोप युक्रेन, लिबिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकने केले आहेत.

गौरवशाली नायक

2022 च्या ऑगस्ट महिन्यात, रशियातील एका सरकारी टीव्ही चॅनेलने एका व्यक्तीविषयी रिपोर्ट पब्लिश केला होता. यात म्हटल्याप्रमाणे, "या व्यक्तीने युद्धात जाण्यासाठी स्वतःहून अपील केलं होतं आणि तो युद्धात मारला गेला."

या रिपोर्टमध्ये पुढे असंही म्हटलं होतं की, या हिरोने स्वत:ला उडवून त्याच्यासह तीन युक्रेनियन सैनिकांना ठार केलं होतं.

या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, हा हिरो 26 वर्षांचा असून त्याचं नाव कॉन्स्टँटीन टुलिनोव्ह असं होतं. तो यापूर्वी गाड्या चोरी, दरोडे आणि अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये त्याला दोषी ठरविण्यात आलं होतं. युद्ध सुरू झालं तेव्हा तो तुरुंगात होता.

सैनिक होण्याचा अनुभव नसतानाही त्याने युद्धात सामील होण्यासाठी अपील केलं असल्याचा दावा या रिपोर्ट मध्ये करण्यात आलाय.

वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगिननी प्रिगोझिन यांचं लिक झाले व्हीडिओतील दृश्यं. यामध्ये ते कैद्यांना संबोधित करत आहेत.

फोटो स्रोत, VIDEO

फोटो कॅप्शन, वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगिननी प्रिगोझिन यांचं लिक झाले व्हीडिओतील दृश्यं. यामध्ये ते कैद्यांना संबोधित करत आहेत.

यानंतर, 2019 मध्ये रशियन मानवाधिकार मीडिया संस्था गुलागु डॉट नेटने एक व्हीडिओ व्हायरल केला होता. यात टुलिनोव्ह दुसऱ्या कैद्यासोबत गैरवर्तन करताना दिसला होता.

टुलिनोव्हची ज्या तुरुंगातून सुटका झाली होती त्या तुरुंगाकडून बीबीसीने प्रतिक्रिया मागवली होती, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

बीबीसीने टुलिनोव्हच्या आईशी संपर्क केला. त्या सांगतात, आपला मुलगा युद्धात सामील होण्यासाठी स्वेच्छेने गेला असल्याचं मला माहिती होतं.

त्या पुढे सांगतात की, "मातृभूमीच्या रक्षणासाठी निघाल्याचं त्याने मला सांगितलं होतं आणि त्याने स्वतः युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतला होता."

'जगातील सर्वात अनुभवी सेना'

येवगेनी प्रिगोझिन मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणाले होते की, त्यांनी 2014 मध्ये वॅगनर ग्रुपची स्थापना केली होती. हा ग्रुप रशियन लोकांच्या रक्षणासाठी तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय त्यांनी आपल्या ग्रुपचं वर्णन 'रशियाचा आधारस्तंभ' असं केलं होतं.

ऑक्टोबरच्या सुरूवातीला रशियन सरकारने त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. ते एक खरे देशभक्त असून देशासाठीच त्यांचा जीव तळमळतो असं सरकारने म्हटलं होतं.

एका महिन्यानंतर येवगेनी प्रिगोझिन यांच्या मूळ गावी म्हणजे सेंट पीटर्सबर्ग इथं वॅगनर सेंटर सुरू करण्यात आलं.

हे सेंटर आलिशान असं ऑफिस कॉम्प्लेक्स आहे. इथं रशियाची युद्ध क्षमता वाढवण्यासाठी आयटी, मीडिया आणि मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिलं जातं. शिवाय शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांना शैक्षणिक प्रशिक्षण दिलं जातं.

तुलिनोव

फोटो स्रोत, GULAGU.NET

फोटो कॅप्शन, तुलिनोव

पूर्वी रशियाची सरकारी वृत्तसंस्था या वॅगनर ग्रुपबद्दल फारसं बोलल्याचं दिसत नाही. मात्र आता दिवसाला कैद्यांच्या भरतीचे रिपोर्ट दिले जातात.

रशियाच्या सरकारी न्यूज चॅनेल, एनटीव्हीने वॅगनर ग्रुपवर 'जगातील सर्वात अनुभवी सैन्य' अशा आशयाची न्यूज स्टोरी चालवली होती.

मागच्या आठवड्यात, येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियन संसदेचे स्पीकर व्याचेस्लाव व्होलोडिन यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात "भरती केलेल्या कैद्यांविषयी निरुपयोगी माहिती शोधून त्यांना गुन्हेगार म्हणून चित्रित केलं जातंय." अशी पत्रकारांची तक्रार केली होती.

त्यांनी या पत्रात कायदा आणखीन कडक करून वॅगनर ग्रुपमध्ये भरती झालेल्या लोकांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल लिहिणाऱ्या मीडियावर बंदी घालण्याचं सुचवलंय.

विशेष म्हणजे व्होलोडिनने या सूचना स्वीकारल्या आहेत. आणि रशियन दंड संहितेत संभाव्य सुधारणांसाठी संसदीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी रशियन संसदेचे प्रमुख व्होलोडिन म्हणाले की, "आपल्या देशाचं रक्षण करणारा प्रत्येकजण खरा हिरो आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)