ओडिशात 3 रशियन नागरिकांचा मृत्यू, गूढ वाढवणारे 'हे' आहेत अनुत्तरीत प्रश्न

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ज़ुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ओडिशाच्या दक्षिण टोकाला असलेलं रायगडा हे आदिवासी शहर इथल्या शांततेसाठी परिचित आहे.
पण 2022 च्या डिसेंबर महिन्यात या शहराची चर्चा संबंध जगभर होऊ लागली. त्यामागे कारण होतं, इथल्याच साई इंटरनॅशनल हॉटेलमध्ये झालेला दोन रशियन पर्यटकांचा मृत्यू.
आणि चर्चेला आणखीनच हवा मिळाली 3 जानेवारी रोजी. या शहरापासून काही मैलांवर असलेल्या पारादीप बंदरात एका मालवाहू जहाजात आणखी एका रशियन नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि खळबळ माजली.
आता या संपूर्ण घटनाक्रमात प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे, पर्यटकांची ये जा कमी असणाऱ्या ओडिशासारख्या राज्यात दोन आठवड्यात तीन रशियन पर्यटकांचा मृत्यू झालाच कसा?
शिवाय या लोकांच्याही मनात बरेच प्रश्न घोळू लागले. त्यापैकीच एक म्हणजे या पर्यटकांच्या मृत्यूमागे काही कनेक्शन आहे का?
पण पोलिसांनी मात्र या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
राज्याच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "या लोकांच्या मृत्यूमध्ये काही कनेक्शन असल्याचं आतापर्यंतच्या तपासात तरी उघड झालेलं नाहीये."
या पोलीस अधिकाऱ्याने पुढे असंही सांगितलं की, भलेही आत्ता तपास सुरू आहे. पण मालवाहू जहाजातील मृत रशियन व्यक्तीचा आणि रायगडातील दोन रशियन व्यक्तींच्या मृत्यूचा काहीएक संबंध नाहीये.
रायगडा शहरात तणावपूर्ण वातावरण...
या मृत्यूने रायगडा शहरात खळबळ माजली असून संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. हॉटेल कर्मचारी, पोलीस डिपार्टमेंट आणि सरकारी डॉक्टरांना माध्यमांशी बोलायला जणू बंदी घातली असावी अशी परिस्थिती आहे.
बीबीसीने काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांनी भीतीपोटी आपली नाव छापू नये अशी विनंती केली.
शहराच्या मुख्य बाजारपेठेत आदिवासी कलाकृतींची विक्री करणारे ऋषभ साहू सांगतात की, त्यांच्या गावात अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू घडल्याच्या घटना खूपच कमी आहेत. शिवाय परदेशी लोकांचे मृत्यू झाल्याच्या घटनाही कमी आहेत.

फोटो स्रोत, ANI
ते सांगतात, "मीडियाच्या सततच्या कव्हरेजमुळे आम्ही त्रस्त झालोय. या मृत्यूच्या चौकशीतून काय निष्पन्न होईल याची आम्हाला चिंता लागून राहिली आहे. या सगळ्याची आम्हाला सवय नाहीये. हे सगळं लवकर संपायला हवं, जेणेकरून आम्हाला पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येईल."
विकास पटनायक चहाची टपरी चालवतात, त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचं चांगलं आकलन आहे. हॉटेल साई इंटरनॅशनलपासून त्यांचा चहाचा स्टॉल फार दूर नाहीये. या साई इंटरनॅशनल मध्येच पावेल आणि व्लादिमीर मृतावस्थेत सापडले होते.
विकास सांगतात की, या रशियन नागरिकांच्या मृत्यबद्दल बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे विश्वास नक्की कोणत्या गोष्टींवर ठेवायचा हे कळत नाहीये.
ते पुढे सांगतात की, "आम्ही आमच्या मोबाईल फोनवर स्थानिक नेटवर्क (टीव्ही चॅनेल) पाहतो. यावर आम्हाला वेगवेगळे तर्क असलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. नक्की कोणत्या कोणत्या तर्कावर विश्वास ठेवायचा निश्चित नाही. आम्हाला आता या गोष्टीचा कंटाळा आलाय, हे लवकर संपायला हवं."
1 ते 1.5 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरातील लोकांना प्रसारमाध्यमांच्या गर्दीची सवय नाहीये. त्यात या रशियन नागरिकांच्या चर्चेचं मोहोळ लोकल टीव्ही चॅनेलपासून सोशल मीडियापर्यंत पसरलंय. त्यामुळे इथले लोक थोडेसे अस्वस्थ झालेले दिसतात.
राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेचं 16 सदस्यीय पथक या दोन्ही मृत्यूंचा तपास करत आहे. या पथकाच्या सूचनेवर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांपासून ते रुग्णालयातील डॉक्टरांपर्यंत कोणीही माध्यमांशी बोललेलं नाही. प्रशासनाने देखील यावर मौन बाळगलंय.
बीबीसीने शहराचे जिल्हाधिकारी स्वधादेव सिंग आणि पोलिस प्रमुख विवेकानंद शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.
अजूनही न सुटलेलं मृत्यूचं कोडं...
65 वर्षीय पावेल अँटोव्ह हे रशियन खासदार तसंच उद्योगपती होते.
रशियन माध्यमांतील वृत्तानुसार, ते मॉस्कोच्या पूर्वेकडील व्लादिमीर शहरातील लोकप्रिय नेते होते.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पावेल यांनी पुतीन यांच्यावर टीका केली होती. पण नंतर पावेल यांच्यावरच टीका झाल्यावर त्यांनी माफी मागत आपलं लिखाण हटवलं होतं.
मागच्या वर्षी रशियाने जूनमध्ये युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यावेळी कीव्हमधील रहिवासी भागात हल्ल्यात बळी पडलेल्या एका मुलीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढत असल्याचं दिसत होतं. मुलीच्या वडिलांचाही मृत्यू झाला होता.
यानंतर पावेल यांचा एक मॅसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर लीक झाला होता. यात त्या ढिगाऱ्याचा उल्लेख करताना पावेल म्हणाले होते की, "खरं सांगायचं तर याला अतिरेकी हल्ल्याखेरीज दुसरे काहीही म्हणणं कठीण आहे."

फोटो स्रोत, ZUBAIR AHMED/BBC
त्यानंतर त्यांनी हा मॅसेज डिलीट केला आणि आपण राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक आहोत असं म्हटलं. तसंच त्यांनी या युद्धाचं देखील समर्थन केलं.
24 डिसेंबरला हॉटेल साई इंटरनॅशनलच्या पहिल्या मजल्यावरील टेरेसवर पावेल यांचा मृतदेह सापडला होता. त्याआधी काही तास पावेल यांनी आपल्या 61 वर्षीय मित्र व्लादिमीर बेदेनोव्ह यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते.
व्लादिमीर बेदेनोव्ह यांचा ही मृत्यू याच हॉटेलमध्ये 22 डिसेंबर रोजी झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं.
या फळीत तिसरे रशियन नागरिक होते मिलियाकोव्ह सर्गेई. यांचं वय 51 वर्षं असून 3 जानेवारीला मालवाहू जहाजावर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यु झाला.
सर्गेई हे एमबी अल्डनाह जहाजाचे चीफ इंजिनिअर होते. एमबी अल्डनाह या जहाजावर 23 क्रू मेंबर होते. हे जहाज बांगलादेशातील चितगाव इथून पारादीप मार्गे मुंबईला जात होतं.
उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त...
जेव्हा पावेल खाली पडले तेव्हा त्यांच्या शरीरातून रक्त का आलं नाही?
त्याबाबतचं अधिकृत निवेदन असं आहे की, ते हॉटेलच्या छतावरून खाली पडले. म्हणजे त्यांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू होता. ते हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील छतावरून खाली पडले. यात 20 फुटांचं अंतर होतं.
24 डिसेंबरला संध्याकाळी व्लादिमीर बेदेनोव्हच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून ते हॉटेलमध्ये परत आले. पण कोणीही त्यांना छतावरून उडी मारताना किंवा पडताना पाहिलेलं नाही.
यामागचा आणखीन एक क्लिष्ट पैलू असा आहे की, त्यांची रूम हॉटेलच्या पहिल्या भागात होती. मात्र त्यांचा मृतदेह हॉटेलच्या शेवटच्या भागात आढळून आला.
त्यामुळे जर अँटोव्हने उडी मारलीच असेल तर हॉटेलच्या दुसऱ्या भागातून का मारली? याचं गूढ अजून उलगडलेलं नाहीये.
अँटोव्ह यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांचे टुरिस्ट गाईड जितेंद्र सिंह यांनी मीडिया आणि पोलिसांना सांगितलं की, "आम्ही लॉबीमध्ये बसलो होतो, तेव्हा हॉटेलमधला एक मुलगा धावत आला आणि म्हणाला की ते (अँटोव्ह) चिडलेत."

फोटो स्रोत, RANJAN RATH
"त्यांनी त्या मुलाला लाथ मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. त्यानंतर आम्ही त्यांना सगळीकडे शोधायचा प्रयत्न केला, मात्र ते आम्हाला काही सापडले नाहीत. शेवटी पहिल्या मजल्यावरच्या टेरेसवरून ते खाली पडल्याचं आम्हाला दिसलं. आम्ही ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं."
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, अँटोव्हचा मृत्यू अंतर्गत रक्तस्त्रावामुळे झाला असून हा अपघात असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
राज्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे माजी संचालक आणि फॉरेन्सिक सायन्समधील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. बसंत कुमार दास यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टची तपासणी केली आणि सांगितलं की,
"जखमांचं स्वरूप आणि परिणाम पाहता मृत व्यक्ती 20-25 फूट उंचीवरून खाली पडली असेल यात शंका नाही.
एवढ्या उंचीवरून पडून देखील बाह्य रक्तस्त्राव का झाला नाही याविषयी ते सांगतात की, "त्यांच्या बहुतेक जखमा या छातीत होत्या. डोक्याला दुखापत झाली असती, तर बाह्य रक्तस्त्राव झाला असता. पण रिपोर्ट मध्ये म्हटलंय त्याप्रमाणे अंतर्गत रक्तस्राव खूप झालाय."
मृत्यू कसा झाला?
क्राइम ब्रँचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीशी बोलताना सांगितलं की, यात कोणतीही गडबड झालेली नाही.
त्यांनी पुढे सांगितलं की, "पावेल अँटोव्ह यांच्या मृत्यूमागे काही संशयास्पद घडलेलं नाहीये. पण या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी तपास पूर्ण होण्याची वाट पाहावी लागेल."
"हे प्रकरण परदेशी नागरिकांशी संबंधित असल्याने आम्ही प्रत्येक अंगाने तपासणी करतोय. राज्य पोलिसांच्या क्राईम ब्रांच विभागाचे 16 सदस्यीय पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे."
हॉटेलमधील 50 कर्मचाऱ्यांसोबतच या परदेशी नागरिकांची आणि मृत्यूच्या वेळी हॉटेलमध्ये थांबलेल्या इतर लोकांची चौकशी सुरू आहे.
तसेच या दोन्ही रशियन नागरिकांचे फोन आणि लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. तपास पथकाने टूरिस्ट गाईड आणि टूर ग्रुपचा भाग असलेल्या आणखीन एका रशियन जोडप्याची चौकशी केली आहे.

अँटोव्हचा व्हिसेरा ठेवला नाही?
अशा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होऊन देखील पावेल अँटोव्हचा व्हिसेरा ठेवला नाही, याबद्दलही आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेत.
तेच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या इतर दोन रशियन नागरिकांचा व्हिसेरा ठेवण्यात आला आहे.
संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालेल्या अँटोव्हचा व्हिसेरा ठेवला नाही, यावर डॉ. दास यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
स्थानिक पोलिसांच्या चुकीमुळे हे घडलं असल्याचं वरिष्ठ अधिकार्यांनी मान्य केलंय. पण यामागे कोणताही विशिष्ट हेतू नसून, अनावधानाने या गोष्टी घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मृत व्यक्तीला विष देण्यात आलं होतं का? यासाठी व्हिसेरा तपासला जातो.
डॉ. दास सांगतात, "पावेल अँटोव्हचा व्हिसेरा ठेवायला हवा होता, कारण ते परदेशी नागरिक होते. शिवाय संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला होता. आज जगात 30,000 प्रकारचे विष आहेत. आणि याचा शोध लावण्यासाठी भारतात अत्याधुनिक मशिन्स आहेत."

फोटो स्रोत, RANJAN RATH
मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्कारावरून प्रश्नचिन्ह
पावेल अँटोव्ह आणि त्यांचे मित्र व्लादिमीर बेदेनोव्ह यांच्यावर थोड्या गडबडीनेच अंत्यसंस्कार करण्यात आले. तेच पारादीप बंदरात मालवाहू जहाजावर मृतावस्थेत सापडलेल्या सर्गेई मिलियाकोव्ह यांचा मृतदेह रशियाला पाठवण्यात आला.
या दोन्ही रशियन नागरिकांच्या कुटुंबाच्या परवानगीने त्यांच्यावर दाहसंस्कार करण्यात आल्याची माहिती तपासावर देखरेख करणाऱ्या क्राईम ब्रांचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
त्यांनी सांगितलं की, "आम्ही अँटोव्हची मुलगी, माजी आणि सध्याची पत्नी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी दिलेल्या संमतीचा व्हीडिओ रेकॉर्ड केला. आपल्या मृत्यूनंतर आपल्यावर दाहसंस्कार करावेत अशी माझ्या वडिलांची इच्छा होती असं अँटोव्हच्या मुलीने सांगितलं. अँटोव्हच्या आईचे सुद्धा दाहसंस्कार करण्यात आले असल्याचं तिने यावेळी सांगितलं."
व्लादिमीर बेदेनोव्ह यांच्या मुलाने देखील अंत्यसंस्कार करण्यास संमती दिली. त्यांना कुटुंबीयांचीही तशी लेखी संमती घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
मिलियाकोव्ह सर्गेई यांच्यावर अंत्यसंस्कार का केले नाही?
यावर त्या अधिकाऱ्याने सांगितलं की, रायगडा येथील मृतांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे मिलियाकोव्ह सर्गेई यांचे अंत्यसंस्कार भारतात न करता, त्यांचा मृतदेह रशियाला परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दफनविधी न करता मृतदेहांवर दाहसंस्कार का केले?
पावेल अँटोव्ह आणि त्यांचे मित्र व्लादिमीर बेदेनोव जन्माने ख्रिश्चन होते. आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये दफनविधी केला जातो, त्यांना भडाग्नी दिला जात नाही.
मग पावेल आणि बेदेनोव यांच्या मृतदेहांवर दाहसंस्कार का केले?
हाच प्रश्न काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी एका ट्विटमध्ये विचारला होता. यावर भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलंय.

फोटो स्रोत, RANJAN RATH
कोलकात्यातील रशियन दुतावासाचा हवाला देत त्यांनी ट्वीट केलंय की, "कोलकातास्थित रशियाचा वाणिज्य दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयाने या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कोणताही गुन्हेगारी पैलू समोर आलेला नाही."
हे रशियन नागरिक रायगडा शहरात कशासाठी आले होते?
हे रशियन नागरिक पर्यटनासाठी ओडिशात आले होते. त्यांनी डिसेंबर महिन्यात अनेक ठिकाणांना भेटी दिल्या होत्या.
या टुरिस्ट ग्रुपमध्ये पावेल अँटोव्ह, व्लादिमीर बेदेनोव्ह यांच्या व्यतिरिक्त, एक रशियन जोडपं देखील होतं. जितेंद्र सिंह या ग्रुपचे टुरिस्ट गाईड होते. ते अनुवादकाचं काम सुद्धा करत होते.
राज्य सरकार मधील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आदिवासी परंपरांनी समृद्ध असलेल्या ओडिशाच्या आदिवासी गावांमुळे त्यांच्या जीवनशैलीमुळे या भागातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळतं.
या दोन रशियन पर्यटकांनी 21 डिसेंबरला रायगडा येथील हॉटेल साई इंटरनॅशनलमध्ये चेक इन केलं. दुसऱ्या दिवशी ते जयपूर या आदिवासी पर्यटन स्थळाला भेट देणार होते. त्यांचं बुकिंग फक्त एक दिवसाचं असल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने दिली.

फोटो स्रोत, ANI
हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी (22 डिसेंबर रोजी) पावेल अँटोव्ह त्यांच्या रूममधून घाबरून बाहेर आले. त्यांनी आपला मित्र व्लादिमीर सोफ्यावरून पडला असल्याचं सांगितलं. त्यांच्या मित्राला तातडीने शासकीय दवाखान्यात नेण्यात आलं मात्र तिथे त्यांना मृत घोषित केलं गेलं.
हॉटेलमधील एक वरिष्ठ कर्मचारी सांगतात की, "मी आत गेलो तेव्हा पाहिलं की, व्लादिमीर सोफा आणि टेबलमध्ये अडकले होते. त्यांचं डोकं मागच्या बाजूला झुकलं होतं तर शरीर ताठरलेल्या अवस्थेत होतं. टेबलावर दारूच्या बाटल्या आणि जेवणाची ताटं पडली होती. तिथं दुसरं काही घडल्याचं मला दिसलं नाही."
या प्रकरणाची चौकशी करणारे क्राईम ब्रांचचे अधिकारी, व्हिसेरा रिपोर्टचा अभ्यास करून आणि घटना घडली तेव्हा हॉटेलमध्ये उपस्थित असलेले कर्मचारी आणि इतर लोकांची चौकशी करून आपला रिपोर्ट सादर करतील अशी शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








