नोकरी सोडून पुण्याचं हे जोडपं लडाखमध्ये पायी का फिरतंय?

निखिल आणि परिधी सावळापूरकर

फोटो स्रोत, PAri and Purkar

फोटो कॅप्शन, निखिल आणि परिधी सावळापूरकर
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पुण्यातल्या पाषाण भागात घर. कॉर्पोरेट जॉब. पाच दिवस काम, दोन दिवस सुट्टी. सुट्टीच्या दिवशी खरेदी, भटकंती, सोशल मीडिया असं सगळं साजेसं सुरू.

आटपाट नगरी वाटावं अशा आयुष्यात थोडं थांबून वेगळं काहीतरी करावं असा विचार अनेकांच्या मनात येतो. पण फारच थोडेजण ते प्रत्यक्षात आणू शकतात. पुण्यातल्या निखिल आणि परिधी या जोडप्याने पूर्ण विचाराअंती लडाख पायी फिरायचं ठरवलं. योगायोग म्हणजे जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने त्यांच्या भटकंतीचं वर्तुळ पूर्ण होत आहे.

निखिल आणि परिधी मुळचे मध्यप्रदेशातले. पुण्यात एमबीए करताना ते भेटले. भेटीचं मैत्रीत, मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. दोघं 2016 मध्ये विवाहबद्ध झाले. उच्चशिक्षित निखिल-परिधी कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होते.

फिरायच्या निमित्ताने लडाखने त्यांना भुरळ घातली होती. कामानिमित्ताने परिधी इंडोनेशियात तर निखिल घरी पुण्यात असं समीकरण होतं. तेवढ्यात लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनच्या काळात फोनवर बोलताना काहीतरी वेगळं करूया असा विचार त्यांच्या मनात आला.

लडाखमध्ये मुशाफिरी करूया असं वाटलं. पण ही मुशाफिरी गाडी किंवा बाईकवर न करता पायी चालत करूया यावर दोघांचं एकमत झालं.

लॉकडाऊनुळे समस्त जग वर्क फ्रॉम होम करत होतं. आपण या पर्वतराजीत जाऊन तिथून काम करूया असाही विचार मनात डोकावला पण इतक्या नितांत सुंदर जागी कामात लक्ष लागेल का? असंही वाटून गेलं.

रारंगढांगांने नटलेला लडाख पालथा घालायचा विचार पक्का झाला. या अनोख्या मुशाफिरीसाठी कदाचित नोकरी सोडावी लागेल किंवा मोठा ब्रेक घ्यावा लागेल यावर विचार झाला. मोहिमेवरून कधी परत येऊ, परत आल्यावर लगेच नोकरी स्वीकारू का, याच क्षेत्रात काम करत राहणार का असे सगळे भुंगे डोक्यात येऊन गेले.

आपापल्या क्षेत्रात दशकभर काम केलंय, पुरेशा अनुभव गाठीशी आहे. ही मोहीम फत्ते करू. काम करणाऱ्याला काम मिळतं. परत आल्यावर परिस्थिती पाहून निर्णय घेऊन असं दोघांनी ठरवलं.

लडाख हा हाय अल्टिट्यूड म्हणजे समुद्रसपाटीपासून प्रचंड उंचीवर असणारा भाग आहे. हवा विरळ होत जाते. श्वास घेताना दम लागतो. लडाख पायी फिरणं खायचं काम नाही याची जाणीव दोघांना होती. त्यासाठी दोघांची तयारी सुरू झाली.

त्यासाठी त्यांनी अशा वातावरणाचे ट्रेक केले. असं वातावरण झेपतंय का याची चाचपणी केली. हे जमू शकतंय याचा अंदाज आल्यानंतर मोठ्या वजनाच्या बॅगा घेऊन चालता येतंय का ही परीक्षा द्यायची होती. यासाठी या द्वयीने भन्नाट कल्पना शोधली. पाषाण परिसरात निखील-परिधी अकराव्या मजल्यावर राहतात.

लडाख

फोटो स्रोत, Pari and Purkar

फोटो कॅप्शन, ही मोहिम सुरू झाल्यापासून हा तंबू म्हणजे या दोघांचं घर झालं आहे.

चालायचं आणि उंचीवरल्या प्रदेशात चालायचं आहे याचा सराव होण्यासाठी दोघांनी 5 किलो वजनाच्या बॅगसह अकरा मजले चढायला सुरुवात केली. मोठ्या संकुलांमध्ये जिने असतात पण बहुतांश माणसं लिफ्टचाच वापर करतात.

निखिल-परिधीच्या बिल्डिंगमध्ये परिस्थिती वेगळी नव्हती. टीशर्ट-ट्रॅकपँट आणि पाठुंगळीवर भलीमोठी सॅक अशा पेहरावात दोघं आपापल्या नोकरीचं वेळापत्रक सांभाळून अकरा मजल्यांचं गणित सोडवून लागले.

सुरुवातीचे दिवस

हा सराव कठीण होता. अकरा मजले चढल्यावर पायात गोळे यायचे. धाप लागायची. कपडे घामाने ओलेचिंब व्हायचे. लिफ्ट सुरू असताना लेकाला आणि सुनेला अकरा मजले चढून आलेलं पाहणं निखिलच्या आईसाठी त्रासदायक अनुभव होता. हे दोघं हा खटाटोप कशासाठी करत आहेत याची कल्पना त्यांना होती. पण आईचं काळीज काळजी करतंच.

एकदम भसकन काहीही करायला घेतलं तर बेत फसू शकतो हे दोघांना माहिती होतं. म्हणूनच त्यांनी डॉक्टरांचा, न्यूट्रिशनिस्ट, जिमट्रेनर यांचा सल्ला घेतला. अतिउंच भागात गिर्यारोहण करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

त्या भागात वावरताना काय करावं, काय करू नये हे समजून घेतलं. पाठीवर किती किलो वजन ठेऊन चालता येईल याची माहिती करून घेतली. मॅरेथॉनला धावणारी मंडळी 6 महिने आधी सराव सुरू करतात तसं या जोडगोळीने चालायचा सराव सुरू केला.

आपापल्या नोकऱ्यांची व्यवधानं असल्याने झूम मीटिंगांमध्ये उपस्थित असताना ते चालण्याचा सराव करत. सुरुवातीला दोन तीन किलोमीटरची रेंज होती. ती त्यांनी हळूहळू पाच-सहा किलोमीटरपर्यंत नेली.

कामंधामं, घरच्या जबाबदाऱ्या, नातेवाईक, मित्रमैत्रिणी हे सगळं असतानाही त्यांनी चालण्याच्या सरावाची तीव्रता वाढवत नेली आणि लडाख मोहिमेसाठी सिद्ध झाले.

निखिल आणि परिधी

फोटो स्रोत, Pari and Purkar

सराव ठीकेय पण एकदा प्रत्यक्ष छोटी मोहीम सर होतेय हे बघण्यासाठी दोघांनी योजना आखली. पाषाण ते सिंहगड किल्ला पायी जायचं. गड चढायचा. वर जाऊन तंबू ठोकायचा, मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी यायचं. सिंहगडाच्या दिशेने जाताना परिधीची तब्येत बिघडली. चालणं त्रासदायक होत असल्याने नाईलाजास्तव रिक्षाने सिंहगड पायथा गाठला.

तिथे थोडा वेळ आराम करून चालत गडाचा माथा गाठला. गडाच्या एका टोकाला एक कुटुंब राहत होतं. त्यांच्या घराच्या आसपास तंबू ठोकला. गडचढाई, तंबू उभारणी यामुळे दोघांना पटकन झोप लागली.

रात्री वाऱ्याने आपले रंग दाखवले. मोठा आवाज होऊन तंबू त्यांच्याच डोक्यावर येऊन विसावला. झोपेत त्या दोघांना नेमकं काय झालंय तेच कळलं नाही. झालेला प्रकार लक्षात आल्यावर दोघंही खळखळून हसले.

फजिती तर झालीय हे दोघांना कळलं. पण या प्रकाराने ते खचून गेले नाहीत. सिंहगड माथ्यावर असं झालं, लडाखला तर पर्वतरांगा आहेत, वाऱ्याचा वेग तिथे जास्त असू शकतो याची दोघांना कल्पना आली.

लडाखची ही पायी भटकंती खर्चिक असणार नव्हती कारण ही जोडगोळी कुठूनही कुठेही जायला चारचाकी गाडी किंवा बाईक वापरणार नव्हते. त्यामुळे स्वत:ची गाडी आणणे किंवा भाड्याने गाडी मिळवणे, सर्व्हिसिंग, पार्किंग, इंधन हे सगळे प्रश्न निकाली निघाले.

हॉटेल किंवा होमस्टेमध्ये राहायचं तर बऱ्यापैकी पैसे लागले असते, पण तंबूत मुक्काम करणार असल्याने सोपं झालं. या मोहिमेसाठी म्हणून खूप पैसे लागणार नव्हते. पण ज्या नोकरीमुळे सेव्हिंग्ज खात्यात होते त्या नोकरीचं काय करायचं हा यक्षप्रश्न होता.

स्टार्टअप कन्स्ल्टंट म्हणून काम करणाऱ्या परिधीने सुरुवातीला ब्रेक घेण्याचा विचार केला पण लडाख मोहीम नेमकी कधी संपणार असं काही नक्की नव्हतं. तिने नोकरी सोडायचा निर्णय घेतला. निखिलच्या कंपनीत प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन कारणांसाठी सबॅटिकल मिळते.

छंद-एखादं वेड जोपासण्यासाठी सुट्टी मिळते. निखिलने तशी सुट्टी घेतली. पण परतणार कधी याची खात्री नसल्याने त्याने नोकरीला रामराम ठोकला. नोकरीतून पैसा मिळतोय पण व्हॅल्यू अडिशन काहीच होत नाहीये हा दोघांचाही सूर होता. करिअर रिस्टार्ट करूया या विचारातून दोघांनीही राजीनामा दिला.

नोकरी सोडल्यावर दोघांना लडाखवारी अक्षरक्ष: दिसू लागली. चालण्याचा सराव, वजन पाठीवर घेऊन चालणं, तंबूबांधणी याचे डेमो सुरू होते. लडाखवारीची कल्पना डोक्यात आल्यापासून मायनस 365 नावाचा व्हॉट्सअप ग्रुप काढला. या ग्रुपवर ते दोघेच आहेत. लडाखवारीसंदर्भात ताळमेळ राहावा, काय करायचं, काय नाही हे पक्कं व्हावं, वाचताना-कुणाशी बोलताना काही नवं कळलं तर दुसऱ्यालाही ते कळावं यासाठी हा ग्रुप.

लडाख

फोटो स्रोत, Pari and Purkar

फुप्फुसांची कसोटी पाहणाऱ्या प्रदेशात ते जवळपास आठ दहा महिने असणार होते. पण त्यांचं जायचं ठरत होतं तेव्हा फुप्फुसांवर आक्रमण करणारा आजार जगभर थैमान घालत होता. जगाला विळखा घालणाऱ्या या आजारामुळेच लॉकडाऊन लागलं.

या लॉकडाऊनदरम्यानच या जोडीला लडाखभ्रमंतीचं सुचलं. जाण्यायाधी कोरोना टेस्टपासून ब्लडप्रेशरपर्यंत सगळ्या तपासण्या झाल्या. सगळं व्यवस्थित आहे याची खातरजमा झाली. ताप-सर्दी-खोकलापासून बेसिक आजारांसाठी औषधांची पेटी भरली गेली. सतत चालल्यामुळे, वजनाचा भारा असल्यामुळे काय त्रास होऊ शकतो याचा अंदाज घेतला.

मोहिमेत ब्रेक

गावोगावी चालत जाऊन फिरंती असल्याने लडाखचे नकाशे त्यांनी कोळून प्यायले. कुठून कसं जायचं याचा कच्चा आराखडा तयार केला. या सगळ्या प्रयत्नांची परिणती 26 जून 2021 रोजी झाली. दोघं पुण्याहून मनालीला पोहोचले. वाहनाशी संपर्क मागे ठेवला आणि त्यांनी चालायला सुरुवात केली.

22 जुलै 2021 ला त्यांनी या मोहिमेची सुरुवात केली...

लडाखवारीचं वेड अंगी भिनलं असलं तरी घरच्यांना विसरून चालणार नव्हतं. निखिलच्या बहिणीचंच लग्न असल्याने त्यांनी पुण्याला परतायचा निर्णय घेतला. 19 नोव्हेंबरला ते जबलपूरला गेले. तिथे लग्नाची तयारी, लगबग, प्रत्यक्ष लग्न, पाहुणेमंडळी हे सगळं त्यांनी पुरेपूर अनुभवलं आणि 22 मार्चला ते पुन्हा लडाखमधल्या त्याच गावी परतले जिथे त्यांनी ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला होता.

पायाला चाळ लावून केलेल्या या मनमुराद भटकंतीत काय गवसलं यावर त्यांचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. शहरी वातावरणात अनुभवता येणार नाही अशी शांतता अनुभवली.

निसर्गाची उत्तुंग, विलक्षण रुपं अनुभवली. पर्वतरांगांची भव्यता जवळून न्याहाळली. शून्य प्रदूषण, गर्दीगोंगाट नाही असं निखळ जग बघितलं. उरात भरून घ्यावी इतकी स्वच्छ हवा साठवून घेतली.

आपण आपल्या कोशात दंग असतो. आपल्याच देशात इतकं वेगळं जग आहे याची जाणीव या मोहिमेने करून दिली. पहाडांमधली माणसं भरभरून प्रेम करतात असं ऐकलं होतं.

ते आम्ही याचि देही याचि डोळा अनुभवलं. आम्ही जिथे गेलो तिथे आमचं स्वागत झालं. सुरक्षेच्या दृष्टीने गावात, वस्तीजवळ तंबू उभारायचो. लोकांनी आनंदाने परवानगी दिली. जिथे तंबूत राहणं कठीण होतं तिथे गावकऱ्यांनी हक्काने आसरा दिला.

लडाख

फोटो स्रोत, PAri and Purkar

निखिल-परिधीचं हे चालणं म्हणजे रोबोटिक मोहीम नाहीये. यादरम्यान त्यांनी ट्रेक केले. काही गावांमध्ये मनसोक्त वेळ घालवला. त्यांच्या सणांमध्ये सहभागी झाले. लडाखी माणसं जे खातात तेच खाल्लं.

बराच काळ व्यतीत केलेल्या एका गावातल्या कुटुंबाने या दोघांना त्यांची पद्धतीची नावं दिली आहेत. ते गाव सोडून आता बरेच महिने झाले पण त्यांचा नियमित फोन येतो असं निखिल-परिधी सांगतात.

गाडी वापरायची नाही, तंबूतच राहायचं या बरोबरीने या जोडगोळीने काही संकल्प केले होते. ते म्हणजे प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही. प्यायच्या पाण्याचं काय असा प्रश्न समोर होता. चालायचं असल्याने रोज तीन चार लिटर पाणी लागणार. 9 महिने, रोज 8 लिटर पाणी विकत घ्यायचं तर प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा एक डोंगरच उभा राहिला असता.

हे ओळखून या जोडीने स्थानिक मंडळी जे पाणी पितात तेच पाणी प्यायचं ठरवलं. वाटेत पाणी संपलं तर गाव येण्याची वाट पाहायची किंवा एखादा ओढा लागतोय का पाहायचं असं ठरवलं. हा संकल्प अमलात आणणं अवघड होतं पण त्यांनी करून दाखवलं. आपल्या मोहिमेमुळे निसर्गावर अतिक्रमण व्हायला नको यावर दोघे ठाम होते.

पुढे काय?

अकराव्या मजल्यावर सुशेगात असलेले हे दोघं रोज 10 ते 15 किलोमीटर चालत आहेत. रोज एवढं चालायचं असं टार्गेट निश्चित नाहीये. निसर्गाच्या कलेकलेने त्यांची वाटचाल सुरू आहे.

चांगली माणसं भेटल्याने कधीही वाईट अनुभव आला नाही, भीतीही वाटली नाही, असं ते आवर्जून सांगतात. मनाली ते श्रीनगर हा पायी प्रवास आज पूर्ण होणार आहे. खारदुंगला, सियाचेन, कारगिल, द्रास हे प्रदेश चप्पनचप्पा पायी फिरून अनुभवले आहेत.

एरव्ही स्मार्टवॉचवर दहा पावलंही मोजणाऱ्या या जोडगोळीने 3183 किलोमीटर एवढं प्रचंड अंतर पायी पार केलं आहे. अविस्मरणीय असा सूर्योदय, संध्याछायी अस्ताला जाणारा सूर्योदय, मुंबईपुणेकरांसाठी अप्राप्य अशी हिमवृष्टी, पर्वतरांगांमध्ये बरसणारा पाऊस, निसर्गाचे उत्कट रंग, झाडंपानं, वेलीवनस्पती असं सगळे सम्यक अनुभव त्यांच्या मनात आणि कॅमेऱ्यात साठलेत.

परत आल्यावर लडाखवारीच्या अनुभवाचं प्रदर्शन करायचं त्यांच्या डोक्यात आहे. दिवसभर चालल्यानंतर रात्री गरम पाण्यात पाय सोडून बसणं हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा क्षण झाला आहे.

पूर्वीची कोणताही ओळख नसतानाही आपलंसं करणारे असंख्य गावकरी आता त्यांच्या आयुष्याचा भाग झालेत. लडाखी पद्धतीचं खाणंपिणं तर त्यांच्या अंगवळणी पडलंय.

याबरोबरीने त्यांनी स्थानिकांच्या भाषेतले काही शब्दही शिकून घेतलेत. दुर्गम भागात नेटवर्क नसल्याने अनायासे डिजिटल डिटॉक्सही झाला आहे.

मागची पिढी नेहमी भविष्याचा विचार करते असं परिधी सांगते. त्यात चूक काही नाही पण थोडं वर्तमान समरसून जगूया या विचारातून लडाखवारीची कल्पना सुचली. जाण्यामागे अध्यात्मिक वगैरे विचार नव्हता.

पर्यावरणाला धक्का न लावता सकस काहीतरी करायचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणलं आहे. पर्यटन दिनाच्या निमित्ताने पुण्यातल्या पाषाणपासून लडाखमधल्या पहाडोंपर्यंतची ही मुशाफिरी बाकी चाकरमान्यांसाठी प्रेरणादायी ठरावी असं या दोघांना वाटतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)