पृथ्वीवर येताना यानाचे भाग निकामी होत गेले आणि अंंतराळातच त्याचा मृत्यू झाला...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जोनो नमारा
- Role, बीबीसी रील
अंतराळात जाणारी पहिली व्यक्ती आपल्याला माहीत असते. पण अंतराळात मरण पावलेली पहिली व्यक्ती कुणाच्या लक्षात असेलच असं नाही. किंवा अशी कुणी व्यक्ती अंतराळात मृत्युमुखी पडल्याचंही कुणाच्या गावी नसेल.
अंतराळातच मृत्यू झालेल्या या व्यक्तीचं नाव होतं व्लादिमीर कोमारोव्ह.
सोयुझ-1 सोबत गेलेल्या या अंतराळावीराच्या मृत्यूने संपूर्ण सोव्हिएत युनियनला धक्का बसला होता.
काहीजण असं म्हणतात की, हे मिशन सुरू होण्यापूर्वीच कोमारोव्हला माहिती होतं की, हे अंतराळयान क्रॅश होऊन हे मिशन अयशस्वी होईल.
पण मग पुढे काय झालं? हे व्लादिमीर कोमारोव्ह नक्की कोण होते? हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
व्लादिमीर कोमारोव्ह यांचा जन्म 16 मार्च 1927 रोजी रशियातील मॉस्कोमध्ये झाला होता.
त्यांचे वडील मजूर म्हणून काम करायचे. पण कोमारोव्ह यांना मात्र लहानपणापासूनच गणिताची आवड होती. विमानांबाबत एकप्रकारचं कुतुहल त्यांच्या मनात होतं.
कोमारोव्ह यांनी पुढे वैमानिक बनण्याचं शिक्षण घेतलं आणि सोव्हिएत युनियनमधील सर्वोत्कृष्ट वैमानिकही बनले.
चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्याची स्पर्धा
स्पेस बॉफिन्स पॉडकास्टचे पत्रकार रिचर्ड हॉलिंगहॅम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, कोमारोव्ह यांचं त्यांच्या देशावर निस्सीम प्रेम होतं. शिवाय ते एक उत्तम पायलट देखील होते. त्यामुळेच सोव्हिएत युनियनच्या दोन महत्वकांक्षी स्पेस प्रोजेक्टसाठी त्यांची निवड करण्यात आली.
1960 च्या दशकात अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये शीतयुद्ध सुरू झालं. अंतराळ संशोधन क्षेत्रातही या दोन देशांची स्पर्धा सुरू झाली.
याच नादात अमेरिका आणि सोबतच सोव्हिएत युनियनमध्ये चंद्रावर माणूस पाठवण्याची स्पर्धा लागली. आपल्याच देशाचा माणूस चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार याची चढाओढ या देशांमध्ये लागली.

फोटो स्रोत, Getty Images
पण कितीही झालं तरी या चढाओढीत सोव्हिएत युनियन पुढे होती. पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह पाठवण्याची पहिली कामगिरी सोव्हिएत युनियननेच केली होती. त्यांच्या या पहिल्या उपग्रहाचं नाव ‘स्पुटनिक’ असं होतं.
शिवाय, सोव्हिएत युनियनने ‘लायका’ नावाची कुत्रीही स्पेसशिपमधून अंतराळात पाठवली होती.
सोव्हिएत युनियनच्या तुलनेत अमेरिकन स्पेस प्रोग्राम पिछाडीवर होता.
युरी गागारीन यांनी दिलेलं कोमारोव्ह यांना प्रशिक्षण
युरी गागारीन हे पहिले अंतराळवीर व्लादिमीर कोमारोव्ह यांना प्रशिक्षण देणार होते.
अंतराळात जाण्यासाठी देण्यात येणारं प्रशिक्षण खूप कठीण असतं. त्यांना एका आयसोलेशन चेंबरमध्ये ठेवण्यात आलं. त्या चेंबरमध्ये गेफोर्स (गुरुत्वाकर्षण शक्ती) लागू करण्यात आलेली असते. याव्यतिरिक्त फक्त कुऱ्हाड सोबतीला देऊन त्यांना घनदाट जंगलात सोडलं गेलं.
प्रतिकूल परिस्थितीत कसं टिकून राहायचं याचं कठोर प्रशिक्षण देण्यात आलं.
जर स्पेसशिप एखाद्या जंगल भागात कोसळलं तर प्रसंगी कसा तग धरून राहता येईल, यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं.
1964 मध्ये व्लादिमीर कोमारोव्ह यांनी त्यांची पहिली अंतराळ मोहीम 'वॉशेड-1' यशस्वीपणे पूर्ण केली.
वॉशेड-1 या स्पेसशीपमधून तीन माणसं अंतराळात पाठवण्यात आली होती. विशेष म्हणजे माणसांना घेऊन जाणारं हे पहिलं स्पेसशिप होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या वॉश्ड -1 विषयी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे या मिशनमध्ये काम करणाऱ्या एका इंजिनीअरलाही या स्पेसशिपमधून अंतराळात पाठवलं होतं.
रिचर्ड हॉलिंघम सांगतात की, जर मिशन दरम्यान काही एरर आले तर ते दुरुस्त करण्यासाठी म्हणून या इंजिनिअरला स्पेसशिपसोबत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कोमारोव्ह यांनी अंतराळात घेतली भरारी
कोमारोव्ह यांच्या स्पेसशिपने अंतराळात भरारी घेतली आणि त्याच्य दुसऱ्याच दिवशी लिओनिड ब्रेझनेव्ह यांची कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
त्यांनी सोयुझ स्पेस प्रोग्राम नावाचा आणखी एक नवा स्पेस प्रोग्राम आखला. त्यांना कोमारोव्हला सोयुझ-1 च्या कक्षेत पाठवायचं होतं. त्यानंतर आणखी दोन रॉकेट अंतराळात पाठवण्याची योजना होती.
म्हणजे हे दोन स्पेसशीप अवकाशात झेपावतना वेगवेगळे झेपावणार होते. आणि नंतर एका कक्षेत येऊन भेटणार होते. आणि कोमारोव्ह त्या दुसऱ्या स्पेसशिपमधून जाणार होते. त्यानंतर पृथ्वीवर परतणार होते. पण मिशन जसजसं जवळ येऊ लागलं तसतसं सोयुझ -1 मध्ये फॉल्ट असल्याचं समजलं.
1967 मध्ये लाँच होणाऱ्या या स्पेसशिपने घोळ घातला होता. स्पेस क्राफ्टच्या लाँचला परवानगी मिळत नव्हती. पण त्याचवर्षी म्हणजे 1967 मध्ये सोव्हिएत क्रांतीचा 50 वा वर्धापन दिन होता. या निमित्ताने सोयुझ मिशन लाँच करण्याचा दबाव वाढू लागला.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकेची देखील तीच गत होती. त्यांच्या 'अपोलो मिशन'मध्येही काहीतरी गडबड झाली होती.
रिचर्ड सांगतात की, अपोलोसाठी काम करणाऱ्या अनेक इंजिनिअर्सशी मी बोललो. तोपर्यंत अपोलो पूर्णपणे तयार झालं नव्हतं. लॉन्च पॅडवरच तीन अंतराळवीर अडकले होते. कॅप्सूलला आग लागल्याने या तिघांचाही मृत्यू झाला होता.
पण खूप गोष्टी वादातीत होत्या तरी देखील सोयेझ-1 स्पेसशिप अंतराळात सोडण्याची तारीख ठरवण्यात आली.
23 एप्रिल 1967 रोजी सोयेझ-1 अंतराळात प्रक्षेपित करण्यात आलं.
रिचर्ड सांगतात, "सोयुझ-1 अंतराळात सोडण्यात आलं तेव्हा त्यात बिघाड आहे हे कोमारोव्हला देखील माहीत होतं. जेव्हा स्पेसशिप पृथ्वीच्या कक्षेत दाखल झालं तेव्हा त्याचे एक एक पार्टस निकामी होऊ लागले. विशेष म्हणजे स्पेसशीपला वीज पुरवठा करणारी सौर पॅनेल बंद पडले."
शेवटी सोयुझ-2 चं लाँचिंग रद्द करण्यात आलं आणि कोमारोव्हला पृथ्वीच्या कक्षेत परत घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रिचर्ड सांगतात, "पृथ्वीवर परतत असताना कोमारोव्हचं रॉकेट निकामी झालं. गुरुत्वाकर्षण शक्ती लागू झाल्याबरोबर ते जमिनीच्या दिशेने येऊ लागले. पण पृथ्वीच्या दिशेने येत असताना अंतराळ यानाला आग लागली. रेट्रो रॉकेटमधील दोषांमुळे स्पेसशिपला आग लागली होती."
अंतराळात मृत्युमुखी पडणारी पहिली व्यक्ती
असं म्हणतात की, पृथ्वीच्या दिशेने येत असताना कोमारोव्हने पृथ्वीवर ग्राउंड कंट्रोलशी कॉन्टॅक्ट केला होता. यावेळी त्यांनी सोव्हिएत युनियनला खडे बोल सुनावले. आणि चुकांमधून धडा घ्या असं सांगितलं होतं.
पण हे खरं असण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण पृथ्वीच्या सर्वात वरच्या वातावरणातून प्रवास करत असताना एखाद्याचं बोलणं ऐकू येण्याची शक्यता फारच कमी असते. शिवाय, जेव्हा ते जमिनीच्या दिशेने येत होते तेव्हा परिस्थिती गंभीर होती, अशा स्थितीत ओरडण्याची त्यांची मानसिकता असेल असं वाटत नाही, असं मत रिचर्डने व्यक्त केलं.
कोमारोव्ह यांच्या मृतदेहाविषयीही वादविवाद आहे. कोमारोव्ह यांच्या मृतदेहाच नेमकं काय झालं याविषयीही अनेक मतमतांतरे आहेत.
मात्र, 26 एप्रिल 1967 रोजी मॉस्कोच्या रेड स्क्वेअरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images
अंतराळात विश्वात खळबळ माजवणाऱ्या गोष्टी 1967 मध्ये घडल्या. 1967 च्या जानेवारी महिन्यात अपोलो-1 ला आग लागली आणि तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोयुझ-1 मिशनमध्ये कोमारोव्हला आपला जीव गमवावा लागला.
रिचर्ड सांगतात, कोमारोव्ह हे अंतराळात मरण पावणारे पहिली व्यक्ती होते. त्याच्या मृत्यूनंतर, दोन्ही देशांनी अंतराळ मोहिमांबाबत जास्तीची खबरदारी घेतली.
अमेरिकेचं अपोलो - 15 स्पेसशिप अंतराळात झेपावलं, तेव्हा त्यावर अंतराळ मोहिमेत मृत्युमुखी पडलेल्या अंतराळवीरांची नावं लिहिण्यात आली होती. यात कोमारोव्ह यांचंही नाव होतं.
अमेरिकन अंतराळवीरांनी सोव्हिएत युनियनच्या अंतराळवीरांना वाहिलेली ही श्रद्धांजली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








