You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दर दोन दिवसाला एका वाघाचा मृत्यू; मृत वाघांची संख्या 22; जबाबदार कोण?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
नवीन वर्ष सुरू होताच वाघांच्या मृत्यूची मालिका सुरू झाली आहे. दर दोन दिवसाला एका वाघाचा मृत्यू होत आहे. गेल्या 22 दिवसांत राज्यात तब्बल 11 वाघांचा मृत्यू झाला आहे.
जानेवारी महिन्यातच देशभरात 20 वाघांचा मृत्यू झालाय. त्यापैकी 11 वाघ एकटे महाराष्ट्रातले आहेत. पण, महाराष्ट्रातच इतक्या वाघांचा मृत्यू होत असताना वनविभाग इतकं शांत कसं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाघांचे मृत्यू कमी व्हावेत यासाठी वनविभाग काही करतंय की नाही? या मृत्यूंकडे गांभीर्यानं पाहिलं जातंय की नाही? वाघांच्या मृत्यूची कारणं काय आहेत? वाघांच्या मृत्यूंसाठी जबाबदार कोण? जाणून घेऊयात.
पण, त्याआधी जानेवारी महिन्यात किती वाघांचा कुठे आणि कसा मृत्यू झालाय त्यावर एक नजर टाकूयात.
1) 2 जानेवारी 2025 रोजी ब्रम्हपुरी वनविभागात सिंदेवाहीजवळील लाडबोरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळून आला होता. हा वाघ वयोवृद्ध असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं होतं.
2) 6 जानेवारी 2025 रोजी भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात पाचरा इथं वाघाचे चार तुकडे करून फेकल्याचं समोर आलं होतं. शिकारीसाठी वाघाची हत्या झाली असून वाघाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीनं आरोपींनी मृतदेहाचे चार तुकडे केले होते. यानंतर तीन आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.
3) 7 जानेवारी 2025 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागाअंतर्गत उकणी कोळसा खाण परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आला. या वाघाचे दोन मुख्य दात आणि 12 नखं गायब होते. त्यामुळे वाघाची शिकार करण्यात आली का? असा संशय व्यक्त केला जातोय.
4) 8 जानेवारी 2025 रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात देवलापार वनपरिक्षेत्रात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागानं वर्तवला होता.
5) 9 जानेवारी 2025 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मूल बफर झोनमध्ये मादी शावकाचा मृतदेह आढळून आला. वाघांच्या लढाईत हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
6) 14 जानेवारीला गोंदियात वनपरिक्षेत्रात कोहका-भानपूर परिसरात वाघाचा मृत्यू झाला होता. हा वाघ टी-14 चा बछडा होता. या वाघाची फुफ्फुसं निकामी झाली होती आणि यकृत सुद्धा खराब झालं होतं. त्यामुळे या वाघाचा मृत्यू झाल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं होतं.
7) 15 जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या वाघाचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं.
8) 19 जानेवारीला बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गावर सिंदेवाहीजवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला होता. हा वाघाचा अपघाती मृत्यू होता. त्यामुळे वाघांच्या कॉरीडॉरचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला.
9) 20 जानेवारीला ताडोबा बफरमधील शिवनी वनपरिक्षेत्रात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. हा वाघ आधीच जखमी झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असं वनविभागाकडून सांगण्यात आलं.
10) 22 जानेवारीला पेंच व्याघ्रप्रकल्पातील नागलवाडी बफर झोनमध्ये वाघ मृतावस्थेत आढळला. हा वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तसेच सर्व अवयव शाबूत होते. हा मृत्यू नैसर्गिक कारणामुळं झाल्याचं प्राथमिक कारण वनविभागानं सांगितलं. मात्र, वाघाचा मृतदेह कुजेपर्यंत वनविभागाला कसं काहीच समजलं नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
11) 22 जानेवारीला वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेत्रात गिरड इथं ट्रकच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला. हा मादी बछडा होता. हा वाघाचा दुसरा अपघाती मृत्यू आहे.
वाघांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
असं असलं तरी, वाघांचे इतके मृत्यू होत असतानाही वन विभाग नेमकं काय करतंय? त्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवण्यात येतील? या प्रश्नांवर वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तर दिलं. वाघांच्या मृत्यूची कारणंही त्यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितली. मात्र, या मृत्यूला कोण जबाबदार आहे? यावर त्यांनी उत्तर दिलं नाही.
लोकसत्ताच्या ज्येष्ठ पत्रकार राखी चव्हाण वाघांच्या मृत्यूला वन पर्यटन जबाबदार असल्याचं सांगतात.
राखी चव्हाण म्हणाल्या, "वनविभागाला वाघांचं रक्षण करण्यापेक्षा, त्याच्या रक्षणाची काळजी वाहण्यापेक्षा पर्यटन महत्त्वाचं वाटतं. कारण, आतापर्यंत वनविभागानं व्याघ्रदर्शनावर बक्कळ पैसा मिळवला. पण, त्याच वाघांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी किती प्रयत्न केले याचा विचार करावा लागेल."
"वनखात्यानं निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जंगलात हॉटेल्स आणि रिसॉर्टला परवानगी दिली. त्याचठिकाणी पर्यटकांचा धुडगूस, रात्रीच्या मेजवान्या यामुळे वाघांसह इतर वन्यप्राणी विचलित होतात आणि शांत क्षेत्र शोधण्यासाठी पायपीट करतात. हीच जोखीम वाघांच्या जीवावर उठते. त्यामुळे पर्यटनाचे नियम कडक करण्याची गरज आहे."
राखी चव्हाण या स्वतः वन्यजीवप्रेमी असून गेल्या 18 वर्षांपासून त्या जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणविषयक प्रश्न आपल्या लेखणीतून मांडतात.
शिवाय त्या वाघांच्या कॉरीडॉरचाही प्रश्न उपस्थित करतात. वाघांची संख्या वाढल्यानं त्यांचं जंगल आणि आजूबाजूच्या परिसरात फिरणं सुद्धा वाढतंय. त्यानुसार त्यांचा कॉरीडॉर निश्चित करण्याची जबाबदारी वनखात्याची असते. पण, या कॉरीडॉरच्या क्षेत्रात विकास प्रकल्प राबवून वन्यप्राण्यांकडं दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर मुद्दा राखी चव्हाण मांडतात.
राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते हे सुद्धा वनपर्यटनाला वाघांच्या मृत्यूंसाठी जबाबदार धरतात. याशिवाय लोकप्रतिनिधींचा वनखात्यावर दबाव असल्याचंही ते नमूद करतात.
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "लोकप्रतिनिधींकडून वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पर्यटनासाठी दबाव असतो. माझ्या भागात पर्यटन सुरू करा, असा तगादा लोकप्रतिनिधी लावतात आणि वनाधिकारी सुद्धा स्थानिक नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचतात. या वनपर्यटनामुळे वाघ विचलित झाले आहेत. त्यांना शांतपणे जगायला जागा कुठे राहिली आहे?"
"वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर पर्यटन, गायी वाटप असली कामं सोपवली जातात. पण, तो कर्मचारी गस्त कधी घालणार? गस्त घालायला वेळ नसल्यानं वाघांचा मृत्यू होतो, तरी वनविभागाचं दुर्लक्ष होतं. सगळं मनुष्यबळ त्या पर्यटनात व्यस्त असतं. पर्यटनासाठी वनाधिकारी आणि कर्मचारी नेमलेले नसतात."
वाघांना त्याच्या संरक्षित क्षेत्रात शिकार मिळत नाही. तसेच या पर्यटनामुळं वाघांचं आयसोलेशन संपलं आहे. वाघिणीला बछडे झाले की तिला तिच्या बछड्यांसोबत राहूच दिलं जात नाही. पर्यटनामुळं त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप झाला आहे. हे वेळीच थांबवलं नाही, तर विदर्भात एकही वाघ उरणार नाही," अशीही भीती ते व्यक्त करतात.
या बातम्याही वाचा:
वाघांच्या मृत्यूबद्दल वनविभाग खरंच गंभीर आहे का?
22 वाघांमध्ये दोन वाघांचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळला. पेंच व्याघ्रप्रकल्पात नागलवाडीजवळ झालेल्या वाघाचं लिंग कोणतं आहे हे सुद्धा समजू शकत नव्हतं इथपर्यंत तो वाघ कुजलेला होता. वाघ कुजून त्याचा वास येईपर्यंत वनविभागाला ते समजत कसं नाही? वनविभाग खरंच याकडे गांभीर्यानं बघतंय का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
तर वन्यजीव अभ्यासक राजेश रामपूरकर म्हणतात, "वाघाचा मृत्यू होतो आणि वनविभागाला कुजल्यावर समजतं हे खरंच गंभीर आहे. यात वनविभागाची चूक आहेच. मात्र, वनविभागात कर्मचारी नाहीत हे मुख्य कारण आहे. वनक्षेत्र मोठं असतं आणि त्यात फक्त एक वनरक्षक असतो. वनविभागात नव्यानं भरती करून गस्त वाढवणं गरजेचं आहे. तरंच वाघांचं संरक्षण होऊ शकेल."
तसेच जंगलात होणारा विकास म्हणजेच रिसॉर्ट, रेल्वेलाईन, महामार्ग हे सुद्धा वाघांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं राजेश रामपूरकर यांना वाटतं. ते म्हणतात, "या विकासकामांमुळं वाघांचे कॉरीडॉर ब्रेक झाले आहेत. त्यामुळं वाघानं भ्रमण कसं करायचं हा प्रश्न आहे. त्याकडं वनविभागानं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे."
डॉ. राजेश रामपूरकर हे वन्यजीव अभ्यासक असून ते वन्यजीव, व्याघ्रप्रकल्प, वनविभाग यावर लिखाणही करतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांचं 'कांतार-वनसंवर्धनात माध्यमांची भूमिका' हे पुस्तकही प्रकाशित झालंय.
कुंदन हाते वनाधिकाऱ्यांच्या कामावर बोट ठेवतात. "प्रत्येक अधिकाऱ्याला फिल्डवर म्हणजेच जंगलात किती वेळ राहायला पाहिजे हे नेमून दिलेलं असतं. पण, वनाधिकारी कधी फिल्डवर दिसतच नाहीत. त्यांना एसीमधून बाहेर पडायचं नसतं. मग वनकर्मचाऱ्यांवर दबाव कसा राहील?" असाही सवाल कुंदन हाते उपस्थित करतात.
वाघांच्या मृत्यूची प्रमुख कारणं काय?
या 11 मृत्यूंमध्ये दोन वाघांची शिकार झाल्यानं, तर दोन वाघांचा उपासमारीनं मृत्यू झालाय. मात्र, वाघांचे मृत्यू का वाढलेत? त्यांच्या मृत्यूची कारणं काय आहेत?
यामध्ये मानव-वन्यजीव संघर्ष हे प्रमुख कारण असल्याचं वन्यजीव अभ्यासक डॉ. राजेश रामपूरकर यांना वाटतं. ते म्हणतात, "मानव-वन्यजीव संघर्षामुळं लोकांमध्ये आधीच आक्रोश असतो. बाहेरचे शिकारी सध्या तरी दिसत नाही. मात्र, या संघर्षामुळं स्थानिक लोकांकडून वाघांच्या शिकारीचं प्रमाण वाढलंय."
दुसरं कारण म्हणजे जंगलाला लागून असलेल्या शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी शेताभोवती विद्युतप्रवाह असलेलं कुंपण लावतात. त्यामध्ये अडकूनही वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो. मात्र, वाघ शेताकडे जाऊच नये यासाठी वनविभागानं उपाययोजना करायला हव्यात, असंही मत ते मांडतात.
तसेच जंगलात वाघांसाठी पुरेशी शिकार नसणं, त्याच्या शोधात जंगलाच्या बाहेर पडणं हेच वाघाच्या जीवावर बेतत असल्याचं दिसतंय. कारण, या 11 वाघांमध्ये दोन वाघांचा अपघाती मृत्यूही झाला आहे. त्यामुळं वनविभागानं वाघांसाठी शिकार वाढवणं गरेजचं आहे.
गेल्या 5 वर्षांत किती वाघांचा मृत्यू?
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं दिलेल्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या वाढलेली होती. एकट्या 2023 मध्ये देशभरात 178 वाघांचा मृत्यू झाला. हे गेल्या 12 वर्षांतले सर्वाधिक वाघांचे मृत्यू होते. पण, 2024 मध्ये वाघांच्या मृत्यूंची संख्या झपाट्यानं घटली असून 99 वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात गेल्या 12 वर्षांत मध्य प्रदेशात सर्वाधिक 355 वाघांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्र वाघांच्या मृत्यूमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून इथं 261 वाघांचा मृत्यू झालाय. तसेच कर्नाटकमध्ये 179, उत्तराखंड 132 आणि तमिळनाडूमध्ये 89 वाघांचा मृत्यू झालाय.
- वर्ष 2020 - 106 वाघांचा मृत्यू
- वर्ष 2021 - 127 वाघांचा मृत्यू
- वर्ष 2022 - 121 वाघांचा मृत्यू
- वर्ष 2023 - 178 वाघांचा मृत्यू
- वर्ष 2024 - 99 वाघांचा मृत्यू
पण, वाघांचे हे मृत्यू रोखण्यासाठी वनविभाग काही करतंय की नाही? वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत याबद्दलची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "अपघात आणि शिकारीमुळं होणारे मृत्यू थांबवण्याचे निर्देश वनाधिकाऱ्यांना दिले आहेत. 11 वाघांमध्ये तीन वाघांचे शिकारीमुळं मृत्यू झाले आहेत. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे."
तसेच विजेच्या धक्क्यामुळं वाघांचा मृत्यू होऊ नये यासाठी अभ्यासपूर्ण उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. विद्युत प्रवाहामुळं वाघांचे मृत्यू होऊ नये यासाठी वनविभाग आणि महावितरण संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाय करत आहे. गस्त वाढवण्याचेही आदेश दिलेले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)