You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात रेल्वेच्या धडकेत आणखीन एका वाघाचा मृत्यू, एवढे वाघ का मरतायत?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
गेल्या वर्षभरात म्हणजे 2024 मध्ये वाघांच्या मृत्यूंची संख्या घटली होती. पण 2025 या नववर्षात वाघांच्या मृत्यूचं चक्र पुन्हा सुरू झालंय.
जानेवारीच्या पहिल्या 10 दिवसाताच 5 वाघांचा मृत्यू झाला होता. आता रेल्वेच्या धडकेने आणखीन एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 19 जानेवारीच्या सकाळी बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावरील सिंदेवाही-आलेवाही स्टेशन दरम्यान रक्सौन एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला आहे.
मागच्या काही दिवसांमध्ये काही वाघांचा मृत्यू अत्यंत संशयास्पद पद्धतीने झाला आहे, तर भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये शिकारीसाठी वाघांचा मृत्यू झाला.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "या मृत्यूला जे कुणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल."
ताडोबा अभयारण्यातील पर्यटकांच्या हलगर्जीपणाबाबतचा एक व्हीडिओ समोर आल्यानंतर गणेश नाईक यांना त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की, "पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे. परंतु अभयारण्यातील कोणतेही प्राणी किंवा वाघ यांना हानी पोहोचवता कामा नये. फोटो, सेल्फीच्या नादात त्यांना काही इजा होईल, असे करता कामा नये. जे पर्यटक होते, त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. याबाबत वन खातेही पाठपुरावा करेल."
"आगामी काळात राज्य सरकार आणि वन खात्याकडून वाघांच्या संख्येत वाढ करण्यासाठी किंवा जे वाघ जंगलात राहतात ते आपल्याच मॅपिंग किंवा परिसरात राहतील यासाठी प्रयत्न केले जातील. वाघ मानवी वस्तीत येऊन माणसावर हल्ले करणार नाहीत आणि वाघांची संख्या कशी जास्तीत जास्त वाढवता येईल, यासाठी उपाययोजना करणार आहोत," असं गणेश नाईक म्हणाले.
- 10 दिवसांत 5 वाघांचा मृत्यू का झाला?
- शिकारीच्या उद्दिष्टानं वाघांचे मृत्यू होत आहेत का?
- गेल्या 5 वर्षांत किती वाघांचे मृत्यू झाले?
- वनविभाग नेमकं कुठं कमी पडतंय?
या प्रश्नांची उत्तरं आम्ही या निमित्तानं शोधू पाहिली. जाणून घेऊया सविस्तर.
10 दिवसात 5 वाघांचा मृत्यू
1) 2 जानेवारी 2025 रोजी ब्रम्हपुरी वनविभागात सिंदेवाहीजवळील लाडबोरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या वाघाचे सर्व अवयव कायम होते. हा वाघ वयोवृद्ध असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं होतं.
2) 6 जानेवारी 2025 रोजी भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात पाचरा इथं वाघाचे चार तुकडे करून फेकल्याचं समोर आलं होतं. शिकारीसाठी वाघाची हत्या झाली असून वाघाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीनं आरोपींनी मृतदेहाचे चार तुकडे केले होते. यानंतर तीन आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.
3) 7 जानेवारी 2025 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागाअंतर्गत उकणी कोळसाखाण परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या वाघाचे दोन मुख्य दात आणि 12 नखं गायब होते. त्यामुळे वाघाची शिकार करण्यात आली का? असा संशय व्यक्त केला जातोय.
4) 8 जानेवारी 2025 रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात देवलापार वनपरिक्षेत्रात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागानं वर्तवला होता.
5) 9 जानेवारी 2025 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मूल बफर झोनमध्ये मादी शावकाचा मृतदेह आढळून आला होता. वाघाचे सर्व अवयव शाबूत होते. वाघांच्या लढाईत हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
शिकारीमुळे वाघांचा मृत्यू होतोय का?
भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये शिकारीसाठी वाघाची हत्या झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. पण वाघांचे मृत्यू होण्यामागे वाघ शिकार कारणीभूत आहे का? याबद्दल वन्यजीव अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार राजेश रामपूरकर सांगतात, सध्या बाहेरचे शिकारी दिसत नाही. पण स्थानिकांकडून शिकारीचं प्रमाण वाढलेलं आहे.
राजेश रामपूरकर यांचं 'कांतार, वनसंवर्धनात माध्यमांची भूमिका' हे पुस्तकही काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालंय.
या पुस्तकात त्यांनी 2012-2013 या काळात बहेलिया शिकाऱ्यांना कसं पकडण्यात आलं होतं, त्याबद्दल लिहिलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ पहिला बहेलिया शिकारी पकडला होता. मध्य प्रदेशातील कटनी या जिल्ह्यातील हे शिकारी होते, तेव्हापासून शिकाऱ्यांना पकडण्याची मोहिम वनविभागानं हाती घेतली होती.
2012-2013 या काळात 150 शिकाऱ्यांना अटक केली होती. त्यामध्ये 35-36 शिकारी बहेलिया शिकारी होते. वाघांच्या शिकारीसंदर्भातील हे महाराष्ट्रातलं पहिलं प्रकरण होतं जे सीबीआयला सोपवण्यात आलं होतं.
नेपाळमध्ये पळून जात असलेल्या शिकाऱ्यालाही अटक करण्यात आली होती. तेव्हापासून वाघाच्या शिकारीचं प्रमाण कमी झालंय.
वाघांच्या शिकारीचं प्रमाण कमी झाल्याचं वन्यप्रेमी विनीत अरोरा सुद्धा सांगतात. ते म्हणतात, "सध्या वाघांच्या शिकारीचं प्रमाण कमी दिसतंय. कारण आधी जसं आंतरराष्ट्रीय बाजारात थेट वाघांचे अवयव विकता येत होते, आता ते तितकसं सोपं राहिलेलं नाही. मात्र, शिकार पूर्णपणे बंद झाली असं नाही.
"भंडारा जिल्ह्यातील तुमसरसारख्या ठिकाणी आताही शिकार होत असल्याचं दिसतंय. हा परिसरात पेंच आणि नागझिरा या दोन अभयारण्याच्या मधला परिसर आहे. त्यामुळे तिथं शिकाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती असते."
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं त्यांच्या वेबसाईटवर गेल्या काही वर्षातं शिकारीमुळे किती वाघांचा मृत्यू झालाय, याची आकडेवारी दिलेली आहे. त्यानुसार वाघांच्या शिकारीचं प्रमाणही कमी झालेलं दिसतंय. 2024 मध्ये तर फक्त एका वाघाची शिकार झाल्याची नोंद आहे. पण 2024 च्या सप्टेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी या विश्लेषणासाठी वापरण्यात आली आहे. तसेच 2019 पासूनची काही प्रकरणांची अजूनही छाननी व्हायची आहे.
वाघांच्या मृत्यूमागील प्रमुख कारणं काय?
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार आणि वन्यजीव अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, वाघांच्या शिकारीचं प्रमाण जर कमी झालं असेल, तर वाघांचे मृत्यू का होत आहेत? त्यामागची नेमकी कारणं काय आहेत?
याबाबत वन्यजीव अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार राजेश रामपूरकर सांगतात, "सध्या बाहेरचे शिकारी दिसत नाही. पण, स्थानिक लोकांकडून वाघांच्या शिकारीचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय. यामागचं मुख्य कारण म्हणजे वाढत चाललेला मानव-वन्यजीव संघर्ष आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी सरकारनं विशिष्ट धोरण आखलं तर शिकारीचे प्रकरणं सुद्धा थांबतील. दुसरं म्हणजे वन्यप्राणी शेतात येऊन पिकांचं नुकसान करतात.
"हे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी शेताभोवती विद्युतप्रवाह लावतात. त्यामधूनही वाघांचा मृत्यू होतो. पण वन्यप्राणी शेताकडे येणार नाहीत, यासाठी काहीतरी उपाययोजना करता येईल का? यादृष्टीनंही विचार व्हायला हवा. तसेच शिकारीवर निर्बंध लावायचे असतील मनुष्यबळ वाढवून गस्त वाढवणे गरजेचे आहे."
10 दिवसांत पाच वाघांचा मृत्यू होणं खरंच दुर्दैवी आहे. वनविभागानं या गोष्टी गांभीर्यतेनं घ्यायला हव्या. शेताभोवती लावण्यात येणारं इलेक्ट्रीक कुंपण हे वाघाच्या मृत्यूचं कारण असल्याचं वन्यप्रेमी विनित अरोरा यांना वाटतं.
ते वाघांच्या मृत्यूचं दुसरं कारणही सांगतात, "वाघांसाठी जंगलात शिकार कमी झालेली आहे. त्यामुळे ते गावांकडे धाव घेतात. वनविभागानं वाघांच्या वाढत्या संख्येसोबत त्याला शिकारीसाठी लागणाऱ्या इतर प्राण्यांची संख्या सुद्धा वाढवायला हवी. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी होईल आणि त्यामधून लोकांनी रागात येऊन केलेल्या वाघांच्या हत्या देखील कमी होतील", असंही विनित अरोरा सांगतात.
वनविभाग नेमकं कुठं कमी पडतंय? याकडे सुद्धा रामपूरकर लक्ष वेधतात. ते म्हणतात, "वनविभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. याउलट वनमजुरांची संख्या जास्त आहे. पण ते वनमजूर कायमस्वरुपी नाहीत. ते कधी कामाला येतात, कधी नाही. पण, हे लोक स्थानिक असल्यानं त्यांना शिकाऱ्यांबद्दल अधिक माहिती असते. त्यांचा एक संवर्ग निर्माण करून सरकारनं त्यांना काहीतरी वेतन ठेवून कामावर घेतलं तर शिकारीवर निर्बंध लावता येऊ शकतात."
तसेच, विनीत अरोरा देखील वनविभागाकडून पाहिजे तशी जनजागृती होत नसल्याचं सांगतात. काही एनजीओला सामावून घेऊन शिकारीबद्दल जनजागृती करायला हवी. त्यामुळे काही संशयास्पद परिस्थिती असेल तर स्थानिक लोकांकडून, एनजीओकडून वनविभागाला लवकर माहिती मिळेल, असं अरोरा सांगतात.
वाघांच्या मृत्यूंबद्दल आम्ही वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून वाघांच्या मृत्यूबद्दलची सरकारची, वनविभागाची बाजू मिळू शकली नाही. सरकारकडून यावर उत्तर मिळाल्यानंतर ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
गेल्या पाच वर्षांत किती वाघांचा मृत्यू झाला?
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं दिलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या वाढलेली होती. एकट्या 2023 मध्ये देशभरात 178 वाघांचा मृत्यू झाला होता. हे गेल्या 12 वर्षांतले सर्वाधिक वाघांचे मृत्यू होते. पण, 2024 मध्ये वाघांच्या मृत्यूंची संख्या झपाट्यानं घटली असून 99 वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
यात गेल्या 12 वर्षांत मध्य प्रदेशात सर्वाधिक 355 वाघांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्र वाघांच्या मृत्यूमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून इथं 261 वाघांचा मृत्यू झालाय. तसेच कर्नाटकमध्ये 179, उत्तराखंड 132 आणि तमिळनाडूमध्ये 89 वाघांचा मृत्यू झालाय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)