बहिणीच्या वाढदिवसालाच भावाचा गोळीबारात मृत्यू, 'आता माझा वाढदिवस पहिल्यासारखा नसेल'

    • Author, जेसिका पार्कर
    • Role, बीबीसी न्यूज, अलाबामा

अलाबामा येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या धक्क्यातून लोक अजूनही सावरलेले नाहीत. यापैकीच काही लोकांशी बीबीसीने संवाद साधला.

या घटनेच्या दिवशी वाढदिवस असलेल्य़ा एका मुलीने आपल्या मांडीवरच भावाने प्राण सोडल्याचं सांगितलं. त्या भावानेच तिचे प्राण वाचवले होते. या गोळीबारात एकूण चार जणांचे प्राण गेले.

ही होती अलेक्सिस डॉवडेल. तिचा 16 वा वाढदिवस रुरल डेडव्हिल इथं डान्स स्टुडिओत साजरा करायला ते आले होते. पार्टीमध्ये कोणाकडे तरी बंदुक असल्याचं कळल्यावर तिचा 18 वर्षांचा भाऊ फिल तिला न्यायला आला.

तिची आई लातोन्या अ्ॅलनलाही या पार्टीत बंदूक असल्याची अफवा समजली होती. तिनं डीजे बुथवर जाऊन लाइट लावायला सांगितले आणि बंदूक असणाऱ्या व्यक्तीने पार्टी सोडून जावे असं तिनं सांगितलं.

पण कोणीच काही बोललं नाही, मग परत दिवे मालवले गेले.

त्यानंतर लगेचच गोळीबार झाला. अचानक गोळीबार झाला आणि लोक सगळे दाराच्या दिशेने किंचाळत जाऊ लागले असं अलेक्सिस सांगते.

तिचा भाऊ फिलने तिला जमिनीवर खाली पडायला सांगितले, परंतु तेवढ्यात आम्ही एकमेकांपासून या गोंधळामुळे दूर गेलो. असं अलेक्सिस सांगते.

ती कशीबशी तिथून बाहेर पडली. कदाचित गोळीबार करणारा बाहेरही येईल म्हणून ती एका इमारतीजवळ लपली.

नंतर तिला आपल्या भावाला गोळी लागल्याचं समजलं.

त्याचं भरपूर रक्त वाहून गेलं होतं. ती त्याच्याजवळ थांबली, त्याची सारखी शुद्ध हरपत होती. त्याला बोलताही येत नव्हतं. तरीही त्यानं एकदा डोळे उघडले, भुवया उंचावल्या... अलेक्सिसने त्याला हाताने सावरुन धरलं, आणि धीर सोडू नको असं तिनं सांगितलं.

ती सांगते, आता यापुढे आपला वाढदिवस पूर्वीसारखा कधीच असणार नाही.

डेडव्हिल या लहानशा गावात झालेल्या गोळीबारात 32 लोकही जखमी झाले.

गोळीबार करणाऱ्याने हे सगळं का केलं अजून पोलिसांना समजलेलं नाही. याबद्दल माहिती देण्याची विनंती त्यांनी लोकांना केली आहे. अलेक्सिस आणि तिच्या आईलाही या गोळीबारामागचं कारण समजलेलं नाही.

डेडव्हिलचे महापौर जिमी फ्रँक गॉडमॅन बीबीसीशी बोलताना म्हणाले, या गोळीबारानंतर रुग्णालयातील स्थिती एकदम गोंधळाची होती. अगदी मी जेव्हा व्हीएटनाम युद्धात सेवा बजावत होतो त्यापेक्षाही वाईट होती.

लोक रडत होते, लोकांना उपचारासाठी आणलं जात होतं. रक्ताळलेले कपडे सर्वत्र पसरलेले होते.

फिल डॉवडेल हा तीन भावंडांतला सर्वात मोठा होता. तो एक चांगला अॅथलिट आणि चांगला मित्र म्हणून ओळखला जाई. त्याला काही काळातच जॅकसनव्हिल राज्य विद्यापीठात तो क्रीडा शिष्यवृत्तीवर जाणार होता.

आपल्या भावाला फुटबॉल खेळताना आपल्याला आवडायचं असं अलेक्सिस सांगते. दोघांत भांडण झालं तर तोच नेहमी माफी मागायचा असं ती म्हणते.

आपल्या मुलाने नेहमीच आपली मान सर्वच क्षेत्रात उंचावण्याचा प्रयत्न केला असं त्याची आई सांगते.

ती म्हणते, माझ्या हृदयाचा तुकडाच काढून नेल्यासारखं वाटतंय. पुढच्याच महिन्यात तो ग्रॅज्युएट होणार होता. ग्रॅज्युएशनच्या कार्यक्रमाऐवजी आता मी त्याला स्मशानात पाहात आहे.

या गोळीबारात शाउनकिविया स्मिथ, मारसिया कॉलिन्स, कॉर्बिन हॉल्ट्सन यांचाही मृत्यू झाला.

स्मिथही हायस्कूलचं शिक्षण संपवून बाहेर पड़णार होती असं तिच्या जवळचे लोक सांगतात.

कॉलिन्सही फुटबॉल खेळाडू होती आणि तिला वकील व्हायचं होतं. हॉलस्टन हा आपले कुटुंबीय पार्टीत आहेत का हे पाहायला आला होता. आणि मारला गेला.

डेडव्हिलमधील शाळांवरील झेंडे अर्ध्यावर आणले गेले तसेच दुखवटाही पाळला गेला. शेकडो लोकांनी या चार जणांना श्रद्धांजली वाहिली.

या वर्षात 160 हून अधिकवेळा अशाप्रकारचा गोळीबार झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)