जॉर्ज फ्लॉईडच्या मानेवर गुडघा ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध

आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूप्रकरणी ज्युरींनी पोलिस अधिकारी डेरेक शॉविन यांना दोषी ठरवलं आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात मिनिसोटा राज्यातील मिनियापोलिसमधील एक व्हीडिओ व्हायरल झाला होता.

या व्हिडिओत आरोपी असलेले पोलिस अधिकारी डेरेक शॉविन यांनी जार्ज फ्लॉइड यांच्या गळ्यावर आपला गुडघा रोवला होता. फ्लॉइड त्यांना म्हणत होते, "प्लीज, आय कान्ट ब्रीद (मला श्वास घेता येत नाहीये.)" पण शॉविन यांनी त्यांना सोडलं नाही आणि नऊ मिनिटांपर्यंत त्यांचा गळा दाबून ठेवला होता. याच कारणामुळे जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाल्याचा आरोप होता.

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत आणि जगातही अनेक ठिकाणी वंशवाद तसंच पोलिस बळाच्या अतिरेकी वापराविरोधात निदर्शनं करण्यात आली होती.

शॉविन हे तीन आरोपांमध्ये दोषी आढळून आले आहेत- सेकंड डिग्री मर्डर, थर्ड डिग्री मर्डर आणि मनुष्यवध.

शिक्षा सुनावली जाईपर्यंत शॉविन यांना पोलिस कोठडीतच ठेवण्यात येईल.

या प्रकरणी आरोप निश्चिती करण्यासाठी 12 ज्युरींनी एका दिवसापेक्षाही कमी वेळ घेतला. या संपूर्ण खटल्याची सुनावणी जवळपास तीन आठवडे सुरू होती.

सोमवारी (19 एप्रिल) दोन्ही बाजूच्या वकिलांकडून शेवटचा युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर ज्युरींना एका हॉटेलमध्ये वेगळं ठेवण्यात आलं. जोपर्यंत ते निर्णय सुनावत नाहीत, तोपर्यंत त्यांचा बाहेरच्या कोणाशी संपर्क राहणार नव्हता.

या निकालानंतर न्यायालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या शेकडो लोकांनी आनंदाने जल्लोष केला.

फ्लॉइड कुटुंबियांचे वकील बेन क्रम्प यांनी म्हटलं की, ही अमेरिकेच्या इतिहासातली एक कलाटणी देणारी घटना आहे.

या निर्णयानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी फ्लॉइड कुटुंबीयांशी संपर्क साधला .

थोडातरी न्याय झाला, असं बायडन यांनी याप्रकरणी म्हटलं. आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे. व्यवस्थेतील वंशवादाविरोधातलं हे पहिलं यश म्हणता येईल, असंही बायडन यांनी म्हटलं.

काय आहे हे सगळं प्रकरण?

या घटनेची सुरुवात 20 डॉलरच्या बनावट नोटेच्या तक्रारीपासून झाली. 24 मे 2020 रोजी संध्याकाळी फ्लॉईड यांनी कप फूड्स दुकानातून सिगारेटचे पाकीट खरेदी केले. याच दिवशी संध्याकाळी तक्रार नोंदवली गेली.

फ्लॉईड यांनी 20 डॉलरची बनावट नोट दिल्याच्या संशयावरुन दुकानातील कार्मचाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली.

फ्लॉईड हे मूळचे टेक्सासमधील हस्टनमधील असून कामानिमित्ताने ते गेल्या काही वर्षांपासून मिनियापोलीस येथे स्थायिक झाले होते.

कप फूड्स दुकानात फ्लॉईड नेहमी येणारे ग्राहक होते. त्यांचा चेहरा ओळखीचा झाला होता. त्यांनी कधीच कुठलाही त्रास दिला नाही, अशी प्रतिक्रिया दुकानाचे मालक माईक अबूमयालेह यांनी एनबीसीशी बोलताना दिली. घटनेच्या दिवशी ते दुकानात हजर नव्हते. संशायस्पद नोटेची तक्रार नोंदवताना दुकानाचा तरुण कर्मचारी केवळ नियमाचं पालन करत होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यादिवशी रात्री 8 वाजता 911 नंबरवर संपर्क करण्यात आला. दुकानदाराने सिगारेटचे पाकीट परत मागितले. पण फ्लॉईड यांना सिगारेटचे पाकीट परत द्यायचे नव्हते.

पोलिसांना संपर्क केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. फ्लॉईड कोपऱ्यात पार्क केलेल्या कारमध्ये इतर दोन लोकांसोबत बसले होते.पोलीस अधिकारी थॉमस लेन गाडीजवळ गेले. त्यांनी पिस्तूल बाहेर काढलं आणि फ्लॉईड यांच्या दिशेनं रोखून त्यांना हात वर करण्यास सांगितले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यानं पिस्तूल का रोखली याचे स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.

लेन यांनी फ्लॉईड यांना कारबाहेर ओढल्याचं फिर्यादीच्या वकिलांचं म्हणणं आहे. त्यानंतर बेड्या ठोकताना फ्लॉईड यांनी विरोध केल्याचंही वकिलांनी सांगितलं .

मात्र जेव्हा पोलीस अधिकारी फ्लॉईड यांना गाडीत न्यायला लागले तेव्हा संघर्षाला सुरुवात झाली.

अहवालानुसार, साधारण सव्वा आठ वाजता फ्लॉईड जमिनीवर पडले. आपल्याला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचं त्यांनी पोलीसांना सांगितलं.

तोपर्यंत शॉविन घटनास्थळी पोहचले. इतर पोलीसांच्या मदतीने त्यांनी फ्लॉईड यांना पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 8 वाजून 19 मिनिटांनी शॉविन यांनी फ्लॉईड यांना गाडी बाहेर खेचले. ज्यामुळे ते जमिनीवर आदळले. ते तसेच खाली पडून होते. खाली पडलेले असताना त्यांचे हात तसेच बांधलेले होते.

यावेळी प्रत्यक्षदर्शींनी व्हीडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. फ्लॉईड यांना प्रचंड त्रास होत असल्याचं या व्हिडिओत दिसून येतंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)