You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका हिंसाचार: जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूपूर्वीच्या 30 मिनिटात नेमकं काय घडलं
पोलिसांच्या कारवाईदरम्यान झालेल्या एका आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीच्या मृत्यूवरून अमेरिकेत सलग सहाव्या दिवशी हिंसाचारा उफाळला आहे.
गेल्या सोमवारी (25 मे) मिनेसोटा राज्यातील मिनिआपोलिस शहरात पोलिसांकडून अटक केली जात असताना जॉर्ज फ्लॉइड यांचा मृत्यू झाला.
46 वर्षांचे जॉर्ज यांच्या गळ्यावर गुडघा ठेऊन बसलेल्या डेरेक शॉविन नावाच्या पोलिस अधिकाऱ्याचा व्हीडिओ समोर आला होता. यामध्ये जॉर्ज आपल्याला श्वास घेता येत नसल्याचं या पोलिसाला सांगतानाही दिसत आहेत.
44 वर्षांच्या शॉविन यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आणखी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
अमेरिकेत पोलिसांकडून कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांवर होणारे अत्याचार नेहमीच तणावाचा विषय राहिले आहेत, आणि या घटनांविषयीची खदखद या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उफाळून आलीय.
फ्लॉइड यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला घटनाक्रम अवघ्या अर्ध्या तासाचा आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती, व्हीडिओ फुटेज आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन या गोष्टी समोर आल्या.
कुठून सुरू झालं हे प्रकरण?
या घटनेची सुरुवात 20 डॉलरच्या बनावट नोटेच्या तक्रारीपासून झाली. 24 मे रोजी संध्याकाळी फ्लॉईड यांनी कप फूड्स दुकानातून सिगारेटचे पाकीट खरेदी केले. याच दिवशी संध्याकाळी तक्रार नोंदवली गेली.
फ्लॉईड यांनी 20 डॉलरची बनावट नोट दिल्याच्या संशयावरुन दुकानातील कार्मचाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली.
फ्लॉईड हे मूळचे टेक्सासमधील हस्टनमधील असून कामानिमित्ताने ते गेल्या काही वर्षांपासून मिनियापोलीस येथे स्थायिक झाले होते. इथे ते बाऊंसरचे काम करत होते. पण कोरोना व्हायरस आरोग्य संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात फ्लॉईड यांचीही नोकरी गेली.
कप फूड्स दुकानात फ्लॉईड नेहमी येणारे ग्राहक होते. त्यांचा चेहरा ओळखीचा झाला होता. त्यांनी कधीच कुठलाही त्रास दिला नाही, अशी प्रतिक्रिया दुकानाचे मालक माईक अबूमयालेह यांनी एनबीसीशी बोलताना दिली. घटनेच्या दिवशी ते दुकानात हजर नव्हते. संशायस्पद नोटेची तक्रार नोंदवताना दुकानाचा तरुण कर्मचारी केवळ नियमाचं पालन करत होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यादिवशी रात्री 8 वाजता 911 नंबरवर संपर्क करण्यात आला. दुकानदाराने सिगारेटचे पाकीट परत मागितले. पण फ्लॉईड यांना सिगारेटचे पाकीट परत द्यायचे नव्हते.
दुकानातील कर्मचाऱ्याने दिलेल्या साक्षीनुसार ग्राहक दारू प्यायलेला होता. तो स्वत:च्या नियंत्रणात नव्हता.
पोलिसांना संपर्क केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. फ्लॉईड कोपऱ्यात पार्क केलेल्या कारमध्ये इतर दोन लोकांसोबत बसले होते.
पोलीस अधिकारी थॉमस लेन गाडीजवळ गेले. त्यांनी पिस्तूल बाहेर काढलं आणि फ्लॉईड यांच्या दिशेनं रोखून त्यांना हात वर करण्यास सांगितले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यानं पिस्तूल का रोखली याचे स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.
लेन यांनी फ्लॉईड यांना कारबाहेर ओढल्याचं फिर्यादीच्या वकिलांचं म्हणणं आहे. त्यानंतर बेड्या ठोकताना फ्लॉईड यांनी विरोध केल्याचंही वकिलांनी सांगितलं आहे.
"बनावट डॉलर दिल्याप्रकरणी फ्लॉईड यांना अटक केल्याची माहिती लेन यांनी दिली. बेड्या ठोकल्यानंतर फ्लॉईड यांनी सहकार्य केल्याचं लेन यांनी मान्य केलंय.
मात्र जेव्हा पोलीस अधिकारी फ्लॉईड यांना गाडीत न्यायला लागले तेव्हा संघर्षाला सुरुवात झाली.
अहवालानुसार, साधारण सव्वा आठ वाजता फ्लॉईड जमिनीवर पडले. आपल्याला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचं त्यांनी पोलीसांना सांगितलं.
तोपर्यंत शॉविन घटनास्थळी पोहचले. इतर पोलीसांच्या मदतीने त्यांनी फ्लॉईड यांना पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 8 वाजून 19 मिनिटांनी शॉविन यांनी फ्लॉईड यांना गाडी बाहेर खेचले. ज्यामुळे ते जमिनीवर आदळले. ते तसेच खाली पडून होते. खाली पडलेले असताना त्यांचे हात तसेच बांधलेले होते.
यावेळी प्रत्यक्षदर्शींनी व्हीडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. फ्लॉईड यांना प्रचंड त्रास होत असल्याचं या व्हिडिओत दिसून येतंय. ही दृश्यं अनेकांनी आपल्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली. सोशल मीडियावरही व्हायरल केली. हा व्हीडिओ फ्लॉईड यांचा अखेरचा व्हीडिओ ठरला.
फ्लॉईड यांना पोलिसांनी धरून ठेवलं होतं, तर शॉविन यांनी आपला डावा गुडघा फ्लॉईड यांच्या मानेवर दाबून धरला होता.
'मला श्वास घेता येत नाहीय,' असं फ्लॉईड वारंवार पोलिसांना सांगत होते. विनवणी करत होते.
शॉविन यांनी तब्बल 8 मिनिटं 46 सेकंद फ्लॉईट यांची मान गुडघ्यानं दाबून धरल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.
सहा मिनिटांनंतर फ्लॉईड यांच्याकडून प्रतिसाद बंद झाला. व्हीडिओमध्य फ्लॉईड अचानक शांत होऊन निपचित पडल्याचं दिसतंय. त्यानंतर तिथे जमलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना त्यांची नाडी तपासण्यास सांगितलं.
कूएंग यांनी फ्लॉईड यांच्या उजव्या मनगटाची नस तपासली, पण ठोके सापडत नव्हते. तरीही अधिकाऱ्यांनी फ्लॉईड यांना सोडलं नाही.
8 वाजून 27 मिनिटांनी शॉविन यांनी फ्लॉईडच्या मानेवरुन गुडघा काढला. तोपर्यंत फ्लॉईड यांची हालचाल बंद झाली होती. त्यांना रुग्णवाहिकेतून हेनपिन काऊंटी वैद्यकीय केंद्रात नेले. त्यानंतर तासाभरानंतर फ्लॉईड यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
फ्लॉईड यांच्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी ते आपल्या जवळच्या मित्राशी फोनवर बोलले होते. क्रिस्टोफर हॅरीस यांनी त्यांना तात्पुरती नोकरी शोधण्याचा सल्ला दिला होता.
क्रिस्टोफर सांगतात, "फ्लॉईड बनावट चलन वापरणारा व्यक्ती नव्हता. त्याचे व्यक्तिमत्व तसे नव्हते."
"ज्या पद्धतीने त्याचा मृत्यू झाला ते अतिशय असंवेदनशील आहे," हॅरीसने आपल्या भावना व्यक्त केल्या.
"त्याने जगण्यासाठी विनवण्या केल्या. व्यवस्थेवर विश्वास ठेवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, ही व्यवस्था आपल्यासाठी बनवण्यात आलेली असते. पण वारंवार न्याय मागूनही जेव्हा तुम्हाला न्याय मिळत नाही, तेव्हा तुम्ही कायदा हातात घेता."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)