You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात चर्चमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू
अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार झाला आहे. यात एका जणाचा मृत्यू, तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
स्थानिक वेळेनुसार, रविवारी (15 मे) दुपारी चर्चमध्ये गोळीबार झाला आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, ऑरेंज काऊंटीचे अधिकारी जेफ हॅलोक यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटलं की, "चर्चमध्ये उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडलं आहे. तसंच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचण्याआधीच त्याच्या पायाला एक्स्टेंशन क्वार्डच्या साहाय्यानं बांधून ठेवलं आहे."
सध्या याप्रकरणी चौकशी सुरू आहे. या घटनेमागच्या हेतूचा तपास करणे सुरू आहे, असं लॉस एंजलिसच्या एफबीआयच्या प्रवक्त्यांनी म्हटल्याचं रॉयटर्सनं सांगितलं आहे.
पोलिसांनी या हल्ल्याविषयी दुपारी दोन वाजता इशारा दिला होता. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच त्याच्याकडील शस्त्रंही ताब्यात घेण्यात आली आहेत.
वृत्तसंस्था एएफपीच्या मते, कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून स्थानिक अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत असल्याचं सांगितलं आहे.
याआधी शनिवारी (14 मे) न्यूयॉर्कच्या बफेलो सुपरमार्केटमध्ये गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतेक जण कृष्णवर्णीय होते. हल्लेखोरानं स्वत:हून पोलिसांच्या समोर समर्पण केलं होतं.
काल काय घडलं?
अमेरिकेत न्यूयॉर्क राज्यात एका तरुणाने केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. गोळीबारानंतर तरुणाने आत्मसपर्पण केलं.
बफेलो शहरातील सुपरमार्केटमध्ये हा गोळीबार झाला. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पोलिसांनी सांगितलं की, एका 18 वर्षांच्या तरुणाने एका सैनिकाप्रमाणे गणवेश, सुरक्षा कवच आणि हेल्मेट घातलं होतं. हेल्मेटवर कॅमेरा लावलेला होता आणि या हल्लाचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होते.
बफेलो शहराचे पोलीस आयुक्त जोसेफ ग्रॅमागलिया यांनी सांगितलं की, तरुणाने दुकानाबाहेर चार जणांवर गोळी झाडली. दुकानात गेल्यानंतर सुरक्षारक्षकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न करत त्याच्यावर गोळी झाडली पण त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.
हल्ल्यातील 11 पीडित कृष्णवर्णीय होते आणि दोघेजण श्वेतवर्णीय होते. पोलिसांनी, 'वांशिकदृष्ट्या प्रेरित हिंसक कट्टरवादी' हल्ला मानत तपास सुरू केला आहे.
संबंधित तरुणाकडे रायफल असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. त्याच्यावर 'फर्स्ट डिग्री मर्डर' केल्याचा ठपका असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.
सीबीएसशी बोलताना पोलिसांच्या सुत्रांनी आरोप केला आहे की, तरुणाने हल्ल्यादरम्यान 'वांशिक अपशब्द' वापरले.
महापौर बायरॉन ब्राऊन पत्रकार परिषदेत म्हणाले, "हा सर्वांत भयानक अनुभव होता. आम्ही दुखावलो आहोत. आम्ही अशा द्वेषपूर्ण व्यक्तीला आमच्या देशात किंवा समाजात फूट पाडू देणार नाही."
साक्षीदार ग्रेडी लुईस यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितलं, "मी एका मुलाला अंदाधुंद गोळीबार करताना पाहिलं."
हा हल्ला झाला तेव्हा शोनेल हॅरीस दुकानात काम करत होत्या. त्यांनी बफेलो न्यूजला सांगितलं की, त्यांनी 70 हून अधिक शॉट्सचे आवाज ऐकले कारण त्या इमारतीच्या मागच्या बाजूने बाहेर पडल्या.
"दुकानात गर्दी होती कारण वीकेंड होता. एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे तो अनुभव होता." असंही त्या म्हणाल्या.
बफेलो न्यूजशी बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, "भीतीदायक सिनेमात आपण प्रवेश करतोय की काय असं वाटत होतं. पण सर्वकाही प्रत्यक्षात घडत होतं."
न्यूयॉर्कचे राज्यपाल कॅथी होचुल म्हणाले, 'संशयित वर्चस्ववादी होता आणि तो दहशवादी कृत्यांमध्ये अडकलेला होता.'
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. "जो बायडन आणि प्रथम लेडी यांनी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांसाठी आणि त्यांच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करत आहेत," असं व्हाईट हाऊसने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)