ऊस खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे याबाबतचं तज्ज्ञांचं मत

    • Author, झेवियर सेल्वकुमार
    • Role, बीबीसी, तमिळ

ऊसाचा रस कुणाला आवडत नाही? मग तो एखाद्या रसवंती गृहात बसून, वरून मिठाचा शिडकावा करून, ग्लास ओठाला लावून ऊसाचा रस गटागटा पिण्याची मजा काही औरच असते.

त्याहून मजा येते ती ऊस सोलून खाण्यामध्ये. ऊसाचं प्रत्येक चिपाड चावून चावून त्यातल्या रसाचा आस्वाद घेणं... म्हणजे अहाहा... आनंदानुभूतीच असते.

तिकडे तमिळनाळूतदेखील पोंगल सणाचे मुख्य प्रतीक असलेला लाल ऊस खाणे ही तिथल्या लोकांची पारंपारिक प्रथा आहे.

तामिळनाडू सरकारतर्फे शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या पोंगल भेट संचामध्ये ऊसाचाही समावेश करण्यात आला. पोंगल साजरा न करणारे अनेक लोक देखील ऊस खाल्ल्याशिवाय राहत नाहीत.

त्यामुळे पोंगलच्या निमित्ताने घराघरात ऊस येतो, पण तो खाताना मनामध्ये साखरेच्या वाढत्या पातळीची भीतीही असते.

अलीकडच्या काळात ऊस खाण्याचे वैद्यकीय फायदे आणि तोटे यांबाबत सोशल मीडियावर विविध मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

ऊस खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी तो खाऊ नये, असा एक मतप्रवाह आहे.

दुसरीकडे, ऊस खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि दात खूप मजबूत होतात, अशी सकारात्मक मतंही व्यक्त केली जात आहेत. याबद्दल वैद्यकीय शास्त्र काय सांगते, ते आपण या लेखात पाहूया.

ऊस खाल्ल्याने पचनशक्ती वाढते हे खरे आहे का?

ऊसाच्या रसाऐवजी ऊस थेट खाल्ल्याने पचनशक्ती वाढते हे खरे आहे, असे कोईम्बतूर येथील पचनसंस्था विकार आणि एंडोस्कोपी तज्ञ डॉ. व्ही. जी. मोहन प्रसाद म्हणतात.

याबद्दल त्यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सविस्तर माहिती दिली.

ऊसामध्ये शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असलेली 'अँटी-ऑक्सिडंट्स' भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता यात आहे.

त्यासोबतच मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम यांसह विविध खनिजं असतात.

एखाद्याला जुलाब झाल्यास शरीरातील खनिजे कमी होतात, ऊस ती कमतरता भरून काढतो. इतकेच नाही तर ऊसामध्ये फायबर देखील भरपूर असतात," असे डॉक्टर व्ही. जी. मोहन प्रसाद म्हणाले.

त्याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, ''फायबर हे चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करणारे एक महत्त्वाचे घटक आहे. प्रामुख्याने मेंदूसाठी अन्नासारखे कार्य करणारे बॅक्टेरिया आणि आतड्यांची सुरक्षा मजबूत करणारे बॅक्टेरिया वाढवण्यास हे मदत करते. त्या दृष्टीने ऊस हा एक नैसर्गिक 'एनर्जी बूस्टर' आहे. पचनशक्ती वाढवणारा तो एक मुख्य खाद्यपदार्थ आहे.''

ऊस शरीरातील आम्लपित्त कमी करतो, असे सांगून डॉक्टर व्ही. जी. मोहन प्रसाद पुढे म्हणतात की, तो पचनशक्ती वाढवत असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करतो.

शरीराची पचनशक्ती वाढवून ती संतुलित ठेवत असल्यामुळे ऊस आतड्यांसाठीही फायदेशीर ठरतो, तसेच ऊस खाल्ल्याने लघवीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मूत्रपिंडात खडे होण्यापासून प्रतिबंध होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऊसामध्ये असलेले 'एएचए' (Alpha Hydroxy Acid) हे आम्ल वाढत्या वयानुसार त्वचेत होणारे बदल रोखण्यास मदत करते, असंही ते म्हणतात.

ऊस आणि ऊसाचा रस घेण्यामध्ये काय फरक आहे?

याबद्दल स्पष्टीकरण देताना पचनसंस्था तज्ज्ञ डॉ. व्ही. जी. मोहन प्रसाद म्हणतात की, ''ऊसामध्ये साखरेचे ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज हे तिन्ही घटक असल्यामुळे, मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन केल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी थोडी वाढेल हे खरे आहे.

मात्र, ऊस रसाच्या स्वरूपात न पिता तो चावून खाल्ल्यास, साखरेची पातळी एकदम न वाढता ती योग्य प्रमाणात राखली जाते.''

ऊसाचा रस प्यायल्याने पोटातून पित्त बाहेर पडते, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. असे असले तरी, ज्यांना मधुमेह नाही अशा व्यक्तींनी थेट ऊसाचा रस काढून पिणे चांगले आहे, असे ते सांगतात.

त्याचबरोबर, ऊसाच्या रसात काही रसायने मिसळून मिळणारी पेयं पिणे कोणत्याही वयोगटातील व्यक्तींसाठी चांगले नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेच मत व्यक्त करताना मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर कुमार म्हणतात की, "ऊसाचा रस तयार करण्यासाठी एकापेक्षा अधिक ऊसांचा वापर होतो, त्यामुळे तो प्यायल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण त्वरित वाढण्याची शक्यता असते.

मात्र, ऊस चावून खाताना एखादी व्यक्ती जास्तीत जास्त एकच ऊस खाऊ शकते. त्यातून मिळणारा रस कमी असल्याने साखरेची पातळी फारशी वाढत नाही."

"जे लोक योग्य औषधोपचार घेऊन शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात, त्यांना ऊसाचे काही तुकडे खाल्ल्याने कोणताही त्रास होण्याची शक्यता नाही.

जे नियंत्रण ठेवतात, त्यांनी कधीतरी अर्धा ग्लास ऊसाचा रस प्यायला तरी घाबरण्याचे कारण नाही. पण ज्यांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर म्हणजे 400 किंवा 500 च्या आसपास आहे, त्यांनी ऊस पूर्णपणे टाळणेच चांगले," असे डॉक्टर कुमार सांगतात.

सामान्यतः ज्यांना मधुमेह आहे आणि जे त्यासाठी औषधे घेत आहेत, त्यांनी फळांचा रस पिण्याऐवजी फळे खाणे जास्त चांगले असते, असे डॉक्टर कुमार सांगतात.

त्याचप्रमाणे, ऊसाच्या रसाऐवजी ऊस चावून खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची शक्यता नसते. मात्र, रस घेतल्यास साखरेचे प्रमाण खूप जास्त वाढू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऊस खाल्ल्यानंतर जीभ का चरचरते?

ऊस खाताना पाणी प्यायल्यास जिभेला एक प्रकारचा बधीरपणा का जाणवतो आणि त्याचे काही दुष्परिणाम होतात का, असे आम्ही कान, नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. वसुमती विश्वनाथन यांना विचारले.

त्यावर त्या म्हणाल्या, "ऊसामधील आम्लतेमुळे, ऊस खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास रासायनिक प्रतिक्रिया होऊन जिभेला तशा संवेदना जाणवतात.

काही लोकांना घसा दुखणे किंवा सर्दी झाल्यासारखे वाटू शकते. परंतु, यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. 90 टक्के लोकांच्या बाबतीत, एक-दोन तासांत हे पूर्णपणे ठीक होऊन जाते."

ऊस खाल्ल्यानंतर लगेच काहीतरी थंड प्यायल्यास घशात संसर्ग होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे, ऊस खात असताना खूप जोरात ओरडल्यास घशात खवखव होण्यासारखे त्रास होऊ शकतात.

अशा वेळी सतत कोमट पाणी प्यायल्यास या त्रासातून लवकर आराम मिळू शकतो," असेही डॉक्टर वसुमती विश्वनाथन यांनी सांगितले.

ऊस खाल्ल्याने दात मजबूत होतात?

ऊसामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे दातांना थोडी ताकद मिळण्याची शक्यता आहे, असे पचनसंस्था तज्ज्ञ डॉ. व्ही. जी. मोहन प्रसाद म्हणतात.

मात्र, ऊस खाल्ल्याने दात मजबूत होतात हा केवळ एक पसरवलेला गैरसमज असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे दंतवैद्यक तज्ज्ञ डॉ. बालचंदर सांगतात.

त्याच वेळी, एखाद्याच्या दातांची ताकद ऊसाच्या साहाय्याने तपासली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

बीबीसी तमिळशी बोलताना दातांचे डॉक्टर बालचंदर यांनी स्पष्ट केले की, ''सामान्यतः वयाच्या 16 ते 35 वर्षांच्या दरम्यान व्यक्तीचे दात सर्वाधिक मजबूत असतात. त्यानंतर दातांची ताकद ही प्रत्येक व्यक्तीच्या देखभालीवर अवलंबून असते.

आपण आपल्या दातांची ताकद पाहूनच ऊस चावला पाहिजे. कमकुवत दातांचा वापर करून खूप कष्टपूर्वक ऊस चावल्यास, दात पडण्याची शक्यता जास्त असते. ऊसामध्ये फायबर असल्याने दात स्वच्छ करण्यासाठी त्याची थोडी मदत होते.''

सोशल मीडियावरील दाव्यांपेक्षा डॉक्टरांचा सल्ला नेहमीच महत्त्वाचा ठरतो.मधुमेहाच्या रुग्णांनी आणि दातांच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)