You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुमच्या कपातल्या चहावर संकट आलं आहे का? जाणून घ्या जगभरात काय घडतंय
तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते? किंवा दुपारच्या वेळेस आळस झटकण्यासाठी तुम्ही काय पिता? बहुतेकांचं उत्तर असेल अर्थातच चहा.
भारतासह दक्षिण आशियात सगळीकडेच चहा लोकप्रिय आहे. कुटुंबीय असोत वा मित्र मैत्रिणी. अनेकदा गप्पांना चहाची साथ ठरलेली असते.
बरं, साध्या दुधाच्या चहापासून ते बासुंदी चहापर्यंत आणि कोरा चहा किंवा ब्लॅक टीपासून ते काश्मिरी कहावापर्यंत चहाचे प्रकारही बरेच आहेत.
अलीकडे जपानी चहाचा एक प्रकार म्हणजे माचा भारतातही मोठ्या शहरांत मिळू लागला आहे. जगभरात माचा झपाट्यानं लोकप्रिय झाला आहे, परिणामी त्याची किंमतही गगनाला भिडली. या वाढत्या किमतीमागे अनेक कारणं असली तरी हवामान बदलामुळे घटलेलं उत्पादन हेही एक कारण आहे.
जपानच नाही, तर जगभरात चहा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करावा लागतो आहे.
म्हणजे आपल्या कपातल्या चहावर संकट आलं आहे का? हे समजून घेण्यासाठी आधी चहा कुठून आला आणि जगभर कसा पसरला, हेही जाणून घेऊया.
बाकी, तुम्हाला चहा आवडत असेल तर पुढच्या वेळी चहा पिताना तुम्हाला या लेखाची आठवण नक्की येईल.
तसंच हा लेख तुम्ही गोष्ट दुनियेची पॉडकास्टमध्ये इथे ऐकूही शकता.
चहाचा इतिहास
चहा हे पाण्यानंतर जगातलं सर्वात लोकप्रिय पेय आहे.
म्हणजे कॉफी, दूध, सरबतं वाइन, बिअर आणि इतर मद्यांपेक्षाही चहा जास्त प्रमाणात प्यायला जातो. अनेक ठिकाणी चहा हा परंपरांचा भागही बनला आहे.
आता भारत, जपान, स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही पिकवला जातो. पण आधी तो चीनमध्येच पिकवला जात असे.
कॅथरीन बर्नेट त्याविषयी माहिती देतात. कॅथरीन अमेरिकेतील ग्लोबल टी इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ टी कल्चर या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत आणि कॅलिफोर्नियामध्ये चीनच्या कला इतिहासाच्या प्राध्यापकही आहेत.
कॅथरीन सांगतात की चीनमध्ये आधी चहाची पानं वाळवून त्याची पावडर करून पाण्यात मिसळली जात असे आणि ते मिश्रण छोट्या वाटीत प्यायला दिलं जायचं.
चौदाव्या शतकात मिंग राजवंशाच्या काळात चहा पिण्याच्या पद्धतीत बदल झाला आणि पावडर करण्याऐवजी चहाची पानंच उकळत्या पाण्यात टाकली जाऊ लागली.
कॅथरीन सांगतात, "मिंग राजवंशाच्या काळात चहाच्या किटल्यांचा आकार लहान होऊ लागल्या. आठ इंचांच्या किटल्यांऐवजी दोन-तीन इंचांच्या छोट्या किटल्यांमध्ये चहा बनवला जाऊ लागला. किटलीचा आकार आणि तिचे झाकणही बदलू लागले."
तीन शतकांनी म्हणजे सतराव्या शतकात चहाची चव आशियातून युरोपपर्यंत पोहोचली.
सुरुवातीला पोर्तुगीज आणि डच व्यापारी युरोपमध्ये चहाची विक्री करायचे. सतराव्या शतकाच्या मध्यावर चहा ब्रिटनमध्ये पोहोचला. चहाची वाढती मागणी आणि व्यापारामुळे काही युद्धंही झाली.
अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवातही बोस्टन टी पार्टीमुळे झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. त्यावेळी अमेरिकन वसाहतीत राहणाऱ्या लोकांनी ग्रीन टीचे 342 बॉक्सेस बोस्टन बंदरात फेकून देत ब्रिटनला विरोध दर्शवला होता.
"आता आम्ही आणखी अन्याय सहन करणार नाही, याची घोषणाच जणू अमेरिकन्सनी त्यावेळी केली होती. अमेरिकेत ग्रीन टी पिण्याची परंपरा विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत कायम होती, त्यानंतर लोकांनी काळा चहा प्यायला सुरुवात केली.
"दरम्यान युरोपमध्ये चहाची वाढती लोकप्रियता व्यापाराचं संतुलन बिघडवू लागली. ब्रिटन मोठ्या प्रमाणात चांदी आणि संपत्ती चीनला पाठवत होता आणि बदल्यात त्यांना चहाशिवाय काही मिळत नव्हतं," कॅथरीन माहिती देतात.
ब्रिटनने मग भारताद्वारा चीनमध्ये अफूचा पुरवठा सुरू केला. आपल्या जनतेत अफूचं व्यसन वाढल्यानं चीनने कारवाई सुरू केली.
त्यातून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर चीनची ब्रिटन आणि फ्रान्सविरोधात युद्ध झाली जी ओपियम वॉर किंवा अफू युद्धे म्हणून ओळखली जातात.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे अकेर चहा उद्योगावर चीनचा एकाधिकार संपला.
ब्रिटनने चहाची रोपं भारतात आणून इथे चहाची शेती सुरू केली. भारतातही मग चहा पिण्याचं प्रमाण वाढू लागलं.
आशियात चहाची नवी सुरुवात
जगात ब्लॅक टी, ग्रीन टी, माचा असा अनेक प्रकारचा चहा बनवला जातो. पण हे सगळे चहा हिरव्या चहापासूनच तयार केले जातात.
त्याविषयी क्रिस्टीना लारिया माहिती देतात. त्या कॅनडाच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये कृषी आणि अन्न कार्यक्रम विभागाच्या संचालिका आहेत.
क्रिस्टिना माहिती देतात, "पांढऱ्या चहावर खूप कमी प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे त्याचं ऑक्सिडायझेशन कमी होतं आणि चवही हलकी असते. अनेकांना अँटी-ऑक्सिडंट घटकांमुळे हा चहा प्यायला आवडतो.
"तर हिरव्या चहाच्या पानांना पूर्णपणे ऑक्सिडाईज केल्यावर काळा चहा तयार होतो. काळ्या चहात इतर घटक आणि फ्लेवर्स मिसळून हर्बल टी आणि फ्लोरल टी तयार केले जातात."
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर भारतात चहा लागवड सुरू झाली. तसंच मलावी, केनिया आणि दक्षिण आफ्रिका अशा आफ्रिकेतील देशांतही चहा पिकवला जाऊ लागला.
आज चीनमध्ये 30 लाख हेक्टर जमिनीवर चहा पिकवला जातो, तर भारतात 5 लाख हेक्टर जमिनीवर चहाचे मळे आहेत.
"चीन आणि भारत हे चहाचे सर्वात मोठे उत्पादक आहेत, तिसरा क्रमांक आहे केनियाचा. जगातल्या एकूण चहा उत्पादनाच्या 40 टक्के चहा फक्त आशियातच फस्त होतो. त्यामुळे आशियातलं चहा उत्पादन महत्त्वाचं आहे."
जगभरात सुमारे 1 कोटी 30 लाख लोक चहा उद्योगात थेट काम करतात आणि यातल्या बहुतांश कामगार महिला आहेत.
क्रिस्टीना लारिया सांगतात की याचं एक कारण म्हणजे चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिला चहाची पाने तोडण्यासाठी आपल्या मुलांनाही सोबत नेतात.
क्रिस्टीना लारिया माहिती देतात की चहाची प्रक्रिया प्रामुख्यानं तीन केंद्रांमध्ये होते— भारतातलं कोलकाता, श्रीलंकेतलं कोलंबो आणि केनियातलं मोम्बासा.
शेतकरी चहाची लागवड करतात, पण मळ्यातून पुढे चहा या प्रमुख केंद्रांमध्ये आणला जातो, त्यावर प्रक्रिया आणि पॅकेजिंग करून विक्री केली जाते.
म्हणजे विक्रीमध्ये बहुतांश नफा चहा चहा पिकवणाऱ्यांना नाही तर प्रक्रिया करणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपन्यांना मिळतो. शेतकरी आणि मजूरांच्या वाट्याला खूपच छोटा हिस्सा येतो.
क्रिस्टिना सांगतात, "युरोप आणि उत्तर अमेरिकेत आवडीनं चहा पिणाऱ्यांनांही अनेकदा चहा उत्पादक शेतकरी किंवा मजुरांच्या परिस्थितीविषयी फारशी माहिती नाही. लोकांमध्ये याविषयी जागरुकता आणली, तर चहा पिकवणाऱ्यांना नफ्याचा योग्य हिस्सा मिळेल आणि चहा उद्योग बहरेल."
सध्या एक गोष्ट मात्र बहुतांश ग्राहकांना माहिती आहे. ती म्हणजे चहाच्या किंमती अलीकडे वाढल्या आहेत.
चहावर संकटाचं सावट
ईशान्य भारतातल्या आसाम राज्यात पिकलेला चहा कडक चवीचा असतो. तर दार्जिलिंगमध्ये हलक्या चवीचा चहा उगवतो.
कर्नाटक आणि केरळमध्ये पिकणाऱ्या चहाचीही स्वतःची वेगळी चव आणि ओळख आहे. म्हणजे चहाच्या चवीत तो कुठे पिकवला, त्या जागेचं वातावरणही महत्त्वाचं ठरतं.
चहाचं पीक तसं नाजूक आहे. तापमान 23 अंशांपेक्षा जास्त झाले किंवा शून्याखाली गेले तरी समस्या निर्माण होतात.
भारतात चहाची लागवड हिवाळ्यात केली जाते. पण मान्सूनचा पाऊसही यासाठी महत्त्वाचा ठरतो. मात्र हवामानातील बदलांमुळे मान्सूनच्या पावसाची अनियमितता वाढते आहे.
अशा बदलांचा सामना करण्यासाठी हार्की सिद्धू चहा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करतात. ते रेनफॉरेस्ट अलायन्सचे सल्लागार समन्वयक आहेत आणि भारतातील चहा उद्योगाचे तज्ज्ञ आहेत.
"रेनफॉरेस्ट म्हणजे सदाहरीत वनांच्या प्रदेशांमध्ये तापमानवाढीमुळे पूर, डोंगराळ भागात भूस्खलन, अशा घटना वाढत आहेत. याचा चहाच्या पिकावर खूप वाईट परिणाम होतो आहे.
"माती निरोगी राहिली तर चहाची रोपं चांगली वाढतात आणि रोगांचा चांगल्या प्रकारे सामना करतात.
"पण आता उन्हाळ्यात दुष्काळ पडतो तेव्हा माती भुरभुरी होते. मग अचानक जास्त पाऊस पडला तर जमिनीवरचा सुपीक थर वाहून जातो. आधी ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना क्वचित घडायच्या, पण आता वारंवार ही संकटं येतायत."
दुसरीकडे, पूर आला तर शेतजमिनीत गाळ साचतो. तो काढला नाही, तर ऑक्सिजनअभावी झाडांची वाढ खुंटते.
"वातावरणातील अशा चढ-उतारांमुळे अडचणी वाढतात. आता तर अनपेक्षितपणे असं घडतं. म्हणजे पाच दिवस मुसळधार पाऊस पडतो आणि त्यानंतर सुमारी वीस पंचवीस दिवस तीव्र उष्णता असते. अशा परिस्थितीत चहाच्या झाडांचं खूप नुकसान होतं, ज्याचा उत्पादनावर परिणाम होतो.
हवामान बदलामुळे घडणाऱ्या अशा घटनांचा चहाच्या वाहतुकीवरही परिणाम होतो आहे.
हार्की सांगतात, चहाची पाने लवकर सडतात. त्यामुळे झाडावरून तोडल्यावर 8-10 तासांत ती प्रक्रियेसाठी फॅक्टरीत पोहोचणे गरजेचं असतं.
"तीव्र हवामानामुळे वाहतूकीत अडथळा आला, तर पानं फॅक्टरीत वेळेत पोहोचत नाही आणि त्यातून चहा बनवण्यायोग्य राहात नाहीत.
"तसंच, चहा तयार झाल्यावरही तो शक्य तितक्या लवकर बाजारात पोहोचवणे गरजेचं असतं. कारण त्यानंतरच शेतकऱ्यांना पैसे मिळतात. ही एक मोठी समस्या आहे."
भारताप्रमाणेच इतर देशांतल्या चहा उत्पादकांनाही हवामान बदलाचा फटका बसतो आहे. पण एका देशानं या आव्हानाला तोंड देण्यासाठी नवे उपाय आणि तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे.
चहाच्या लागवडीसाठी नव्या जागा
हवामान बदलाच्या आव्हानाला शेतकरी कसं तोंड कसं देतायत, याविषयी लिबरल सेबूरीकोको माहिती देतात.
लिबरल आफ्रिकेतल्या रवांडा या देशात एथिकल टी पार्टनरशिपचे उपप्रमुख आहेत आणि त्यांनी केनियातील चहाच्या मळ्यांचा सखोल अभ्यास केला आहे तसेच तिथे कामही केले आहे.
"चहाच्या झाडांना सतत पाऊस आणि सौम्य तापमानाची गरज असते. पण या दोन्ही गोष्टींवर हवामान बदलाचा परिणाम होतो आहे.
"अनेकदा अचानक हवामान बदलतं. कधी उष्णता असते आणि कधी पावसाची कमी. त्यामुळे चहाच्या पानांची चव बदलते. याचा सर्वाधिक फटका बसतो लहान शेतकऱ्यांना बसतो."
"केनियात चहाच्या एकूण चहा उत्पादनात या लहान शेतकऱ्यांचा वाटा सुमारे पन्नास टक्क्यांचा आहे. त्यांच्यासाठी हवामान बदल हे एक कटू वास्तव आहे. पर्याय म्हणून उंच ठिकाणी चहाची शेती करणे, हा या समस्येवरचा उपाय ठरू शकतो, " असं लिबरल सांगतात.
"केनियात समुद्रसपाटीपासून 1500 ते 1600 मीटर उंचीवर चहाची शेती सहज होत असे. पण आता शेतकऱ्यांना यापेक्षा जास्त उंचावर शेती करावी लागते आहे.
"हवामान बदलामुळे सुमारे 40 टक्के जमीन चहासाठी अनुकूल उरलेली नाही. जगभरातच चहाच्या पिकाखालील जमिनीचा नकाशा बदलतो आहे.
"याच वर्षी दुष्काळ आणि अवकाळी अतीवृष्टीचा फटका केनियातल्या चहाच्या पिकाला बनला. इथे नष्ट झालेल्या चहाच्या पिकाचं आकारमान रवांडाच्या एकूण चहा उत्पादनाइतकं होते."
या समस्येवर तोडगा म्हणून ड्रोनचा वापर वाढला आहे. ड्रोनच्या मदतीने लांबवरच्या मोठ्या प्रदेशाची हाय-रेझोल्यूशन चित्रं घेता येतात. त्यातून पिकात कुठे कीड लागली आहे आणि कुठे आर्द्रता कमी होत आहे, याची माहिती मिळते.
लिबरल सेबूरीकोको सांगतात की केनियात अनेक सहकारी संस्था हे काम करतात आणि ती माहिती फोनवरून मेसेजद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात.
इथे हवामान विभागाच्या अंदाजातही सुधारणा झाली आहे, आणि त्यांची माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एका सामान्य फोनची गरज असते.
तसंच हवामान बदलामुळे आता चहाच्या शेतीच्या जागा बदलण्याची वेळ आली आहे, असं लिबरल यांना वाटतं.
"एकेकाळी असं मानलं जायचं की यूकेचं हवामान चहाच्या शेतीसाठी खूप थंड आहे. पण आता कॉर्नवॉल आणि स्कॉटलंडसारख्या ठिकाणी चहाची शेती सुरू झाली आहे. अर्थात सध्या हे छोट्या प्रमाणातच होतंय."
मग जगभरातील चहा उद्योग वाढती मागणी कशी पूर्ण करेल आणि हवामान बदलाच्या काळात तो टिकून राहू शकेल का?
चहाचे विविध फ्लेवर्स जगभरात लोकप्रिय होत आहेत. जसं की जपानचा माचा
पण चहाची मागणी वाढत असली, तरी हवामान बदलामुळे चहाचा पुरवठा वाढवणं ही समस्या बनली आहे. त्यात राजकीय कारणे आणि वाढत्या मागणीची भर पडल्यानं चहाच्या किंमती वाढल्या आहेत.
पण त्याचा फायदा चहा पिकवणाऱ्यांपर्यंत आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळेच याविषयी जागरूकता वाढवणं गरजेचं बनलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)