चीनमध्ये गुप्तपणे व्हायची चहाची लागवड, ब्रिटीशांनी चहाची रोपं चोरायला पाठवला हेर, पण...

रॉबर्ट फॉर्च्युन...उंचापुरा माणूस. त्यानं समोर उभं असलेल्या माणसासमोर डोकं झुकवलं.

हातात वस्तरा घेऊन त्या माणसानं रॉबर्टचं डोकं भादरायला सुरूवात केली.

कदाचित वस्तऱ्याला धार नसावी किंवा न्हावी मुद्दाम करत असेल...रॉबर्टच्या समोरच्या केसांचे पाट निघतच नव्हते, केवळ त्याचं डोकं खरवडलं जातं होतं.

वेदनेमुळे त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.

हा प्रसंग डिसेंबर 1848 मधला...ठिकाण होतं चीनमधल्या शांघायजवळचं एक शहर.

रॉबर्ट फॉर्च्युन हा ईस्ट इंडिया कंपनीचा हेर होता.

चीनमधल्या अत्यंत दुर्गम भागात जाऊन त्याला तिथे उगवणारा चहा चोरायचा होता. तो घेऊन त्याला भारतात यायचं होतं. पण त्यासाठी त्याला वेश बदलणं गरजेचं होतं. फॉर्च्युनला त्यासाठी चिनी लोकांप्रमाणे वेशभूषा करायची होती. चिनी परंपरेप्रमाणे त्याला समोरचे केस काढायचे होते. त्यानंतर त्याच्या केसांना ती लांबलचक वेणी जोडली जाणार होती. त्याला चिनी वेशभूषाही केली जाणार होती. एवढं सगळं वेशांतर केल्यानंतर त्याने कोणत्याही परिस्थितीत तोंड उघडायचं नाही, अशी सक्त ताकीदही त्याला दिली गेली.

तरीही एक अडचण होतीच. ती लपवणं तितकं सोपं नव्हतं. कारण त्याची उंची सर्वसाधरण चिनी लोकांपेक्षा जास्त होती. पण त्यावरही तोडगा शोधला गेला. रॉबर्ट हा चीनच्या त्या प्रसिद्ध भिंतीपलिकडच्या भागात राहिला असल्याचं सांगायचं ठरलं. कारण त्या भागातील लोक हे जरासे उंच असतात. हा सगळा धोका पत्करला गेला होता तो चहासाठी...जर यात ईस्ट इंडिया कंपनीला यश मिळालं असतं तर चीनचं चहाच्या व्यापारातलं वर्चस्वच संपुष्टात येणार होतं. झालंही तसंच... ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून चहा भारतात आणला, त्याची लागवड केली आणि जगभरात चहाच्या व्यापाराला सुरूवात केली. पण जर उलटं झालं असतं तर??? रॉबर्टसाठी एकच शिक्षा होती...मृत्यूदंड. कारण चीनमध्ये चहाची लागवड ही अतिशय गुप्तपणे केली जात होती. आपलं चहाचं रहस्य जपण्यासाठी चीन अतिशय जागरूक होता. अनेक शतकं चिनी राज्यकर्त्यांनी हे गुपित जपून ठेवलं होतं.

सस्पेन्स थ्रिलर कादंबरीसारखी गोष्ट

एका संशोधनानुसार जगात पाण्याखालोखाल सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय चहा आहे. जगभरातील दोन अब्जहून अधिक लोक हे त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊनच करतात. पण खूप कमी लोक आपल्या कपात येणारा चहा नेमका कुठून आणि कसा आला याचा विचार किती लोक करतात?

जर या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या सस्पेन्स थ्रिलर कादंबरीसारखी गोष्टच तुमच्यासमोर उलगडेल. हा चहा चोरण्यासाठी गेलेल्या गुप्तहेराचा प्रवास अतिशय थरारक होता. त्यातील काही प्रसंग हे त्याच्यासाठी सुदैवी होते, तर काही दुर्दैवी होते...

मुळात चहा ही वनस्पती सापडली कशी?

यासंबंधीच्या अनेक सुरस कहाण्या आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे चिनी सम्राट शिनुन्गची गोष्ट आहे. आपल्या साम्राज्यात स्वच्छता आणि आरोग्य राहावं यासाठी शिनुन्गने लोकांना पाणी उकळून प्यायचे आदेश दिले. एकदा तो जंगलात गेला होता. तेव्हा सेवक त्याच्यासाठी पाणी उकळत होते. त्याचवेळी या भांड्यात वाऱ्याने उडून आलेली काही पानं पडली. शिनुन्गने जेव्हा हे उकळलेलं पाणी प्यायलं, तेव्हा त्याला त्याची चव तर आवडलीच, पण त्या पाण्याने त्याला तरतरीही आली. हे चहाचं पाणी होतं.

त्यामुळे सम्राटाने आपल्या प्रजेला या वनस्पतीची पानं घालून उकळलेलं पाणी प्यायचे आदेश दिले. चीनमध्ये ही पद्धतच पडून गेली. युरोपियन लोकांना चहाची ओळख 16व्या शतकात झाली. पोर्तुगीजांनी चहाचा व्यापार सुरू केला. अवघ्या शतकभरात जगभरात चहा पिण्याची पद्धत रुढ होत गेली. पण इंग्रजांना हे पेय इतकं आवडलं की, दररोज सकाळी चहा पिणं हे त्यांचं रुटीन बनून गेलं.

चीनवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न

पाश्चिमात्य जगाला वेगवेगळ्या वस्तू पुरविण्यात ईस्ट इंडिया कंपनी आघाडीवर होती. त्यामुळेच उर्वरित जगापर्यंत चहा पोहोचविण्यासाठी त्यांना आधी तो चीनकडून अतिशय चढ्या दराने खरेदी करावा लागायचा.

त्यानंतर सागरी मार्गाने तो इतर देशांमध्ये पोहोचायचा. त्यामुळे चहाची किंमत अजूनच वाढायची.

त्यामुळेच ब्रिटीशांनी स्वतःच चहाचं उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. आपण चहाचं उत्पादन घ्यायला लागलो, तर चीनवरही नियंत्रण ठेवता येऊ शकतं असाही विचार त्यांनी केला.

भारतातून चहाचा व्यापार

रॉबर्ट फॉर्च्युन चहाचं सिक्रेट जाणून घेण्यासाठी चीनच्या अतिशय दुर्गम भागात पोहोचला. मार्को पोलोनंतर कोणताही युरोपियन प्रवासी चीनच्या अंतर्गत भागात गेला नव्हता. फॉर्च्युनला असं कळलं की, सर्वांत उत्तम प्रतीचा ब्लॅक टी हा फूजियान भागातल्या पर्वत उतारावर पिकतो. त्यामुळे त्याने त्याच्या एका सहकाऱ्याला तिथे पाठवलं.

चहाच्या रोपांची चोरी

चहाच्या रोपांची चोरी करण्यासाठी फॉर्च्युनला दरवर्षी 500 पौंड द्यायचे असं ईस्ट इंडिया कंपनीने ठरवलं. पण फॉर्च्युनच्या या चोरीचं काम वाटतं तेवढं सोपं नव्हतं. कारण चीनमध्ये चहाचं पीक कुठं घेतलं जातं याची त्याला काहीच माहिती नव्हती. थोडक्यात ज्या चहाची रोपं त्याला चोरून न्यायची होती ती दिसतात कशी याचीही त्याला माहिती नव्हती.

पण फॉर्च्युनला गुप्तहेर म्हणून दांडगा अनुभव होता. जेव्हा तो चहाचं पीक घेणाऱ्या टेकड्यांवर गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, इथून ही रोपं चोरुन नेण्यात काहीच अर्थ नाहीये. भारतात येऊन याची रोपं तयार करावी या हेतूने त्याने आपल्यासोबत चहाच्या बिया घेतल्या. आणि एवढंच नाही तर भारतात चहाचं पीक घेण्यासाठी एखादा चिनी शेतकरी सुद्धा मदतीसाठी हवा असं फॉर्च्युनला वाटलं.

एकाच वनस्पतीपासून काळा आणि हिरवा चहा

त्याचबरोबर कोणत्या सीझनमध्ये चहाचं पीक घ्यायला हवं, पानांची छाटणी कशी करायची, ती पानं कशी वाळवायची हे सगळं माहिती असणं गरजेचं होतं. फक्त रोपं घेऊन येणं एवढ्या पुरतंच फॉर्च्यूनचं काम मर्यादित नव्हतं, तर सर्वात चविष्ट चहा कुठं मिळतो याचा सुद्धा शोध त्याला घ्यायचा होता. कधी नद्यानाले पार करून, कधी पालखीत तर कधी घोड्यांवर स्वार होऊन तीन महिन्यांच्या खडतर प्रवासानंतर फॉर्च्यून एका चहाच्या कारखान्यात पोहोचला.

इथं येण्यापूर्वी त्याला काळ्या चहाची पानं वेगळी आणि हिरव्या चहाची पानं वेगळी वाटायची. पण दोन्ही प्रकारचे चहा एकाच वनस्पतीपासून मिळतात हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. कारखान्यात चहावर प्रोसेस होताना फॉर्च्यून लक्ष ठेऊन असायचा. जर त्याला काही समजलं नाही तर तो त्याच्यासोबत असणाऱ्याला माहिती विचारायचा.

शेवटची संधी

सरतेशेवटी चीनच्या नाकाखालून चहाची रोपं पळवून नेण्यात फॉर्च्युन यशस्वी झाला. त्याने चहाची रोपं, बिया आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या चिनी मजुरांना भारतात पाठवलं. ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये चहाच्या रोपांची लागवड करण्यास सुरुवात केली. पण या चहाची रोपं आणताना फॉर्च्युनने एक गडबड केली. ही जी रोपं होती ती चीनच्या थंड प्रदेशातील होती आणि त्याची लागवड शक्यतो हिवाळ्यात केली जायची. त्यामुळे आसामचा उष्ण प्रदेश या रोपांना मानवला नाही. लागवड केलेली रोपं सुकायला लागली.

आता सगळे प्रयत्न फसणार इतक्यात एक चमत्कार घडला. आता याला ईस्ट इंडिया कंपनीचं नशीब समजायचं आणि चीनचं दुर्दैव. तर घडलं असं की, चीनमधून आणलेली रोपं वाळत असताना इंग्रजांना आसाममध्ये जंगलात वाढणाऱ्या एका वनस्पतीबद्दल माहिती मिळाली. 1823 मध्ये रॉबर्ट ब्रास नावाच्या स्कॉटिश व्यक्तीने या वनस्पतीचा शोध घेतला होता. चहासारखी दिसणारी ही वनस्पती आसामच्या डोंगराळ प्रदेशात घनदाट जंगलात उगवायची.

चहाच्या उत्पादनात चीन मागे पडला

फॉर्च्युनने जी रोपं आणली होती, ती सुकून गेली. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये सापडलेल्या रोपांकडे आपला मोर्चा वळवला. पण यात भारी गोष्ट अशी होती की, फॉर्च्युनने जी रोपं चीन मधून आणली होती. अगदी त्याच प्रजातींची चहाची रोपं आसाममध्ये आढळून आली होती. मात्र चहाची लागवड कशी करायची किंवा चहा बनवायचा कसा यासाठी चीनमधून चोरलेलं तंत्र कामी आलं. ईस्ट इंडिया कंपनीने चीनप्रमाणेच डोंगराळ भागात चहाचे मळे लावले. त्या पानांपासून बनवलेला चहा सगळ्यांनाच आवडला.

अशापद्धतीने कॉर्पोरेट जगाच्या इतिहासातील बौद्धिक संपत्तीची सर्वात मोठी चोरी म्हणजे चहा म्हणता येईल. चहाच्या या लागवडीला मिळालेलं यश पाहून ईस्ट इंडिया कंपनीने आसाममधील एका मोठ्या क्षेत्राला चहाच्या मळ्यांपुरते मर्यादित ठेवलं. एव्हाना चहाचा व्यवसायही सुरू झाला. काही काळानंतर चीन चहाच्या उत्पादनात मागे पडला. निर्यात कमी झाल्याने चीनमधील चहाचे मळे सुकू लागले. एकेकाळी चहासाठी लोकप्रिय असलेल्या देशाची ओळख या चहा व्यापारातून मागे पडली.

इंग्रजांनी चहाचं रुपडं पालटलं

चिनी लोक हजारो वर्षांपासून पाण्यात चहाची पानं उकळून चहा बनवायचे. इंग्रजांनी मात्र चहात नवनवे फ्लेवर्स आणले. इंग्रजांनी चहात साखर आणि नंतर दूध घालायला सुरुवात केली. पण आजही चीनमध्ये नुसत्या पानांचा चहा केला जातो. इतर देश चहामध्ये ज्याप्रमाणे इतर जिन्नस मिसळतात त्याचं त्यांना आश्चर्य तर वाटतंच पण त्यांना हे विचित्र सुद्धा वाटतं. भारतीय लोकही इंग्रजांप्रमाणे साखर आणि दूध मिसळून तयार केलेला चहा पितात.

अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात भारताची भूमिका

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी 1985 साली अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी भारतीय चहा आणि अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध यांचा सहसंबंध जोडला होता. काँग्रेसच्या संयुक्त परिषदेला संबोधित करताना राजीव गांधी म्हणाले होते की, "भारताच्या चहाने अमेरिकेला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा प्रज्वलित केली होती." ते पुढे म्हटले की, 1773 साली ब्रिटिश सरकारनं ईस्ट इंडिया कंपनीला कुठलाही कर न भरता अमेरिकन वसाहतींमध्ये चहा विकण्याची परवानगी दिली होती.

पण वसाहतींमधल्या व्यापारावर ब्रिटनचं असं नियंत्रण अमेरिकन लोकांना मान्य नव्हतं. त्याचा निषेध म्हणून अमेरिकन लोकांनी बोस्टनच्या बंदरात घुसून चहाच्या पेट्या समुद्रात फेकून दिल्या. ब्रिटनने प्रत्युत्तर दिलं मात्र अमेरिकेत जनक्षोभ उसळला. या घटनेनं अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याला वेग मिळाला होता. तीन वर्षांनंतर अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. पण इथं राजीव गांधींची एक चूक झाली होती. त्याचं झालं असं होतं की, 18व्या शतकात भारतात चहाची लागवड होत नव्हती. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनी चीनकडून चहा विकत घ्यायची.

हेही वाचलंत का?