जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणं धोकादायक? ICMR च्या तज्ज्ञांनी काय सांगितलं?

    • Author, शुभगुणम्
    • Role, बीबीसी तमिळ

कित्येक रील, कितीतरी गाणी, कितीतरी व्हीडिओ चहा या दोन अक्षरी शब्दावर तयार झालेत. या चहाचे चाहते इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल.. जिकडे तिकडे, चहूकडे आहेत. बोचऱ्या थंडीपासून ते कडक उन्हातही चहाची तलफ भागविणाऱ्या प्रत्येक एका चहाप्रेमीसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे.

कारण सकाळी चहा, नाश्त्यानंतर चहा, जेवणानंतर चहा, संध्याकाळी चहा, रात्री चहा, झोप आल्यास मध्यरात्री चहा. अशा प्रकारे, चहा ही एक सवय आहे जी बऱ्याच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.

पण, हा चहा किती आरोग्यदायी आहे? भारतीयांसाठी आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे त्याची तपशीलवार माहिती देतात.

आयसीएमआरच्या राष्ट्रीय पोषण संस्थेच्या संचालक डॉ. हेमलता, सदस्य सचिव डॉ. उदयकुमार आणि संस्थेतील डॉ. सुब्बाराव एम कावरावरप्पू, डॉ. के.व्ही. राधाकृष्ण, डॉ. अहमद इब्राहिम यांच्यासह 13 शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या समितीने ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

मार्गदर्शक तत्त्वाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचा भाग असलेल्या एका शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की, मार्गदर्शक तत्वांमध्ये चहा आणि कॉफी पिण्याचे फायदे- तोटे आणि जास्त मद्यपानाचे परिणाम याबद्दल सल्ला दिला आहे.

चहा आणि कॉफीचे सेवन किती प्रमाणात करावे, त्याचे फायदे काय आहेत याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसी तमिळने आयसीएमआरच्या तज्ज्ञांशी संवाद साधला.

खाण्यापूर्वी किंवा नंतर चहा किंवा कॉफी घेऊ नये कारण...

चहा आणि कॉफी दोन्हीमध्ये टॅनिन नावाचं रसायन असतं. हे रसायन अन्नातून लोहासारखे सूक्ष्म पोषक घटक शोषतात. त्यामुळे तज्ञांच्या मते, जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर चहा आणि कॉफीचे सेवन करू नये.

तसेच, ते रिकाम्या पोटी घेणे योग्य आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, फक्त जेवण करण्यापूर्वी आणि नंतर काळजी घेणे आवश्यक आहे.

त्यांच्या मते, ज्या लोकांना बऱ्याच काळापासून ही सवय आहे, त्या लोकांमध्ये याचा कोणताही धोकादायक परिणाम दिसून आलेला नाही. पण, जेव्हा आपण जेवणाच्या एक तास आधी किंवा जेवणानंतर एक तासापर्यंत चहा किंवा कॉफी पितो तेव्हा त्या अन्नातून आपल्याला मिळणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये शरीराला उपलब्ध होत नाहीत.

सोप्या भाषेत सांगायचं तर, "पोषक पदार्थांनी युक्त अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच चहा किंवा कॉफी प्यायल्यास त्याचा शरीराला काही फायदा होत नाही. कारण चहा आणि कॉफीमध्ये असलेले टॅनिन हे रसायन शरीराला पोषक तत्त्वे मिळण्यापासून रोखते."

चहा मध्ये दूध ओतल्यावर काय परिणाम होतो?

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काळा चहा, ग्रीन टी, काहीही असो, त्यात थिओब्रोमाइन, थिओफिलिन, तसेच कॅफिन सारखी रसायने असतात. हे शरीरातील रक्तवाहिन्या शिथिल करतात आणि रक्तप्रवाह नियंत्रित करतात.

याव्यतिरिक्त, आयसीएमआरच्या अहवालात असं म्हटलंय की "चहामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि इतर अँटीऑक्सिडंट पॉलीफेनॉल हृदयरोग आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकतात."

पण, यासाठी चहा पिताना काही विशिष्ट गोष्टी करू नयेत. म्हणजेच चहामध्ये दूध घालू नये. तसेच, चहा कमी प्रमाणात प्यावा.

दूध तर अत्यंत आवश्यक पौष्टिक पदार्थ आहे आणि चहा किंवा कॉफी मध्ये ते घालू नये.. असं का? यावर मार्गदर्शक तत्व समिती मधील तज्ज्ञ म्हणाले की, "दूध हे नक्कीच आपल्या आहारात समाविष्ट असले पाहिजे. पण, जेव्हा ते चहामध्ये मिसळले जाते तेव्हा चहाचे फायदे कमी होतात."

"म्हणजेच फक्त दूध प्यायला हरकत नाही. तसं पाहता चहामध्ये दूधच असतं. पण फायदे पूर्णपणे मिळत नाहीत."

ते म्हणतात की, दुधाशिवाय ब्लॅक टी किंवा ग्रीन टी पिणं कधीही चांगलं.

चहा-कॉफीमध्ये दूध घेणे टाळलेलेच बरे. तरच तुम्हाला चहा आणि कॉफीचे फायदे मिळतील.

तुम्ही दररोज किती चहा आणि कॉफी पिऊ शकता?

या आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, व्यक्तीने सरासरी दररोज 300 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करू नये.

आयसीएमआरच्या अहवालानुसार, एक कप (150 एमएल) चहामध्ये 30-65 मिली ग्रॅम कॅफिन असते. एक कप कॉफीमध्ये 80-120 मिग्रॅ कॅफिन असते. इन्स्टंट कॉफीमध्ये कॅफीन 50-65 मिलीग्रामपर्यंत असते.

म्हणजे, फिल्टर कॉफी प्रति व्यक्ती दोन कप, तर इन्स्टंट कॉफी तीन किंवा साडेतीन कप. एक व्यक्ती दररोज 300 मिलीग्राम कॅफिनचे सेवन करू शकते.

पण, "कॅफीन, कॉफी आणि चहा मधूनच शरीरात जाते असं नाही. अगदी शीतपेयांमध्येही कॅफिनयुक्त घटक असतात."

म्हणून केवळ चहा आणि कॉफीच्या आधारे कॅफीन न मोजता तुम्ही कॅफिनयुक्त घटक किती घेता याचे मोजमाप करावे.

सर्वसाधारणपणे, आपण दररोज किती प्रमाणात कॅफीन घेतो यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि नियंत्रण ठेवले पाहिजे असं आयसीएमआरचे तज्ज्ञ सांगतात.

जास्त कॉफी प्यायल्याने काय होतं?

आयसीएमआरच्या अहवालात असा इशारा देण्यात आलाय की जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयाची गती वाढू शकते.

अहवालानुसार, जे लोक भरपूर कॉफी पितात त्यांचे बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणं, हाय कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराची समस्या होण्याची शक्यता जास्त असते.

त्याचप्रमाणे, जास्त चहा पिणं आरोग्यासाठी अहितकारक आहे कारण त्यात कॅफिन असते. कॉफीचे नियमित सेवन करणारी व्यक्ती पूर्णपणे त्यावर अवलंबून राहू लागते असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

याबद्दल बोलताना, आयसीएमआरचे शास्त्रज्ञ म्हणाले, "कॉफी पिणारे त्यावर अधिक अवलंबून असल्याचे जाणवते. त्याच वेळी कॉफी पिणे इतर समस्यांशी देखील संबंधित आहे."

"उदाहरणार्थ, काही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जे लोक जास्त कॉफी पितात त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉल जास्त असते आणि हृदयरोग होण्याची शक्यता असते."

"पण भरपूर कॉफी प्यायल्यास या समस्या निर्माण होतील, असे खात्रीने सांगता येत नाही. मात्र, ज्यांना या समस्या आहेत त्यांच्यामध्ये कॉफी पिणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने, सावधगिरी बाळगणे कधी ही चांगले."