You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डायबेटिस असलेल्या लोकांनी आंबा खावा का? डॉक्टर काय सांगतात? वाचा
उन्हाळा सुरू झाला की, सगळेच जण वाट पाहतात आंब्यांची. केवळ या दोन-तीन महिन्यांमध्ये उपलब्ध होणारं फळ म्हणून आंब्याची अपूर्वाई नसते, तर गोडव्यासोबत यात अनेक पोषक तत्वं असल्याने तो आरोग्यालाही लाभदायक असतो.
पण हे मधुर फळ काही जणांसाठी मात्र वर्ज्य असू शकतं. असं का बरं?
आंब्यात नैसर्गिक साखर असल्याने शरीरातली साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेह (डायबेटिस) असलेल्या रुग्णांना आंबा खाऊ नये असं सांगितलं जातं.
पण आंब्यामुळे रक्तातील साखर खरोखरच वाढते का? मधुमेह असलेल्यांनी आंबा खाणं टाळावं का किंवा किती प्रमाणात खावा? या प्रश्नांची उत्तरं बीबीसी गुजरातीने डॉक्टरांकडूनच जाणून घेतली.
आंब्यातील पौष्टिक घटक
आंबा अनेक सूक्ष्म पोषक तत्वांचा स्रोत आहे. त्यात कर्बोदके, प्रथिने, अमीनो ऍसिड, लिपिड्स आणि फायबर असतात.
आंब्यामध्ये कोलेस्टेरॉल नसते.
याशिवाय आंब्यामध्ये आढळणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि जीवनसत्त्वे ए आणि सी यांचा समावेश होतो.
100 ग्रॅम आंबा खाल्ल्याने 60-90 कॅलरीज मिळतात. याशिवाय आंब्यात 75 ते 85 टक्के पाणी असते.
100 ग्रॅम आंब्यामध्ये खालील पोषक घटक असतात :
आंबा रक्तातील साखर वाढवतो का?
डॉ. मनोज विठलानी हे अहमदाबादमधील मधुमेह रोगतज्ज्ञ आहेत.
बीबीसीशी बोलताना डॉ. मनोज विठलानी यांनी सांगितलं की, "तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही आंबा खाऊ नये हा संपूर्ण गैरसमज आहे."
ते पुढे सांगतात की, "आंब्यामधील साखर फ्रुक्टोजच्या रूपात असते आणि फळातील नैसर्गिक फ्रुक्टोज शरीरासाठी हानिकारक नसते. फक्त ती वस्तू मर्यादित प्रमाणात खाल्ली पाहिजे.
"याशिवाय आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. आंब्यामध्ये फायबर आणि पोटॅशियम असते जे पचन प्रक्रियेत मदत करते. हे दोन्ही रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
"फायबर आंब्यातील साखरेचे रक्तातील शोषण कमी करते."
हे शरीरातील कर्बोदकाच्या प्रवाहाचे नियमन करते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर करणे सोपे होते.
आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, त्यामुळे आंबे कमी प्रमाणात खाल्ल्यास ते फायदेशीर ठरते.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न नेहमीपेक्षा जास्त वेळाने पचते आणि शोषले जातात, परिणामी रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याऐवजी हळूहळू वाढते.
ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय?
ग्लायसेमिक इंडेक्स खाद्यपदार्थांच्या साखरेतील परिणामाच्या आधारावर मोजले जाते. ते 0 ते 100 या आधारावर मोजतात. 0 म्हणजे अन्नातील साखरेचा कोणताही परिणाम होत नाही आणि 100 म्हणजे अन्नातील साखरेची पातळी वाढली आहे.
55 किंवा त्यापेक्षा कमी गुण असलेले कोणतेही अन्न खाण्यासाठी सुरक्षित आहे, कारण ते रक्तातील साखर वाढवत नाही.
आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 51 असतो. त्यामुळे तो खाण्यास सुरक्षित आहे आणि त्यामुळे साखर मोठ्या प्रमाणात वाढत नाही.
मात्र, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
या निर्देशांकानुसार, अननस, टरबूज, बटाटे आणि ब्रेड यांचा ग्लायसेमिक इंडेक्स 70 पेक्षा जास्त आहे, म्हणजे ते खाल्ल्याने साखरेची वाढ होऊ शकते.
तुम्हाला मधुमेह असेल तर किती प्रमाणात आंबा खावा?
भारतातील विविध महाविद्यालयांतील संशोधकांनी 'आंबा आणि मधुमेह' हा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या मते ज्याला मधुमेह आहे त्यांनी आंबा खाणे सोडू नये. पण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आंब्याचे सेवन करावे.
या संदर्भात डॉ. मनोज विठलानी आणि इतर संशोधने सांगतात की, आंबा जपून खाल्ल्यास मधुमेह आणि साखर वाढण्याची शक्यता नसते.
- त्यांच्या मते, एकाच वेळी जास्त आंबा खाणे टाळावे. कमी प्रमाणात आंबा खाल्ल्याने कोणताही धोका उद्भवत नाही.
- एखादी व्यक्ती दिवसातून 100-150 ग्रॅम आंबे किंवा 50-50 ग्रॅम आंबे दिवसातून तीन वेळा खाऊ शकते.
- जेवणानंतर व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते आणि आंबा खाल्ल्यानेही साखर वाढते. त्यामुळे मुख्य जेवणासोबत आंबा खाऊ नका. जेवणाच्या दरम्यान आंबे खाता येऊ शकतात.
- या संशोधनात पुढं म्हटलंय की, आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी तो इतर फायबरयुक्त पदार्थांसोबत खावा. जसे सॅलड, बीन्स आणि धान्य. शरीरात जितके फायबर जास्त तितकी पचन प्रक्रिया मंद होते. मंद पचनामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल आणि जास्त खाण्याची इच्छा होणार नाही. याव्यतिरिक्त, फायबर रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढवत नाही.
- आंबे खाताना आपण एक खातो, पण आमरस म्हटलं की 2 ते 3 आंबे एकत्र करून त्याचा रस काढला जातो. त्यात साखर टाकली जाते. अशावेळी आमरस खाल्ल्यास रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणून नेहमी आंबा कापून खावा.
- त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आंब्याचे सेवन योग्य प्रमाणात केले पाहिजे.
- या फळाचे सेवन करताना एकूण उष्मांक, प्रमाण आणि ग्लायसेमिक भार लक्षात घेणे आवश्यक आहे.
भारतातील आंबा उत्पादन
फळांमध्ये आंबा उत्पादनात भारत अग्रेसर आहे.
भारतात 2400 हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली जाते. यातून 21.79 मिलियन मेट्रिक टन उत्पादन निघतं.
भारतात आंब्याच्या सुमारे 1,000 जाती आहेत.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात आणि तेलंगणा ही प्रमुख आंबा उत्पादक राज्ये आहेत.
महाराष्ट्रात आंब्याच्या महत्त्वाच्या जातींमध्ये हापूसचं मोठं महत्व आहे. याशिवाय, केसर, बदामी, तोतापुरी, दशेरी, पायरी या जाती देखील आहेत.