आंब्याच्या किती जाती आहेत? हापूसशी स्पर्धा करणाऱ्या 'या' जातींबद्दल जाणून घ्या...

    • Author, प्रशांत ननावरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

डोक्यावर सूर्य तळपत असताना एप्रिल-मे महिन्यात काही माणसं डोक्यावर लाकडी पट्ट्यांच्या पेट्या घेऊन गल्लोगल्ली फिरताना दिसतात.

या पेट्यांमध्ये काय दडलेलं असतं, हे खरंतर वेगळं सांगण्याची गरज नाही. फळांचा राजा आंबा तुमच्या दारापर्यंत येत असला तरी तो विकत घेणं आणि खाणं आजही श्रीमंतीचं लक्षण मानलं जातं.

आंबा म्हणजे हापूस आणि देवगड हे समीकरण लोकांच्या मनात पक्कं झालेलं आहे. बाजारातील सर्वात चांगल्या प्रतिचा आणि देखणा आंबा देवगड हापूस या नावाने विकला जातो. परंतु आंब्याच्या पेटीतील प्रत्येक आंबा जसा वेगळा असतो, तसाच बाजारात येणा-या प्रत्येक आंब्याची चव, गर, रंगरूप, वास आणि उत्पत्तीस्थान वेगवेगळं असतं.

या पृथ्वीतलावर आंबा असं एकमेव फळ आहे ज्याच्या जगभरात असंख्य जाती आहेत आणि जगातील 111 देशांमध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं.

आंबा हा वृक्ष मूळचा दक्षिण पूर्व आशिया आणि मलाया (मलेशिया) मधील आहे. पण गेली हजारो वर्षे त्याची लागवड भारतात होत आहे. म्हणूनच हा वृक्ष वनस्पतीशास्त्रात - मॅग्निफेरा इंडिका लिन या नावाने ओळखला जातो.

भारतात आंबा फक्त कोकणात होत नाही तर समुद्रसपाटीपासून 1500 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कडाक्याची थंडी असलेल्या जम्मू-काश्मीर, पंजाब या राज्यांमधील टेकड्यांचे प्रदेश वगळता जवळपास सर्व राज्यांमध्ये आंबा आढळतो.

भारतात आंब्याच्या एक हजारहून अधिक जाती आहेत. महाराष्ट्रातही कोकणाव्यतिरिक्त नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात आंब्याच्या विविध जातींचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात आंब्याच्या सुमारे 205 जाती आढळतात.

मात्र सर्व आंब्यामध्ये देवगड हापूसला महत्त्व असण्याचे कारण म्हणजे देवगडसाठी भौगोलिक संकेत (जी. आय.) दर्जा मिळवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

आंबा कुठल्याही जातीचा असो, सर्व जातीच्या आंब्यांच्या झाडांना एकवर्ष आड फळ लागतं. त्यामुळे त्याची एकराप्रमाणे लागवड केली जाते, जेणेकरून दर वर्षी फळ हाती येईल.

आंब्यामध्ये दोन प्रकार असतात. एक चिरून खायचा आणि दुसरा चोखून खायचा. दोन्ही आंबे मऊ असतात. मात्र ज्या आंब्याच्या बाठेला जास्त दोरे असतात, ते आंबे चोखून खायचे आंबे असतात. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस पकडून ठेवण्याची क्षमता असते.

जितके केस कमी तितका आंब्याचा रसाळपणा कमी होतो. चोखून खायच्या आंब्याला कुठेही चीर न देता हाताच्या अंगठ्याने बलकेच दाब देत आंब्याचा रस मोकळा करणे याला आंबा माचणे असं म्हटलं जातं.

तोची आंबा ओळखावा

आंब्याच्या तब्बल एक हजारांहून अधिक जातींची भारतात लागवड केली जाते. कोकणचा हापूस, पायरी, बनारसचा लंगडा, लखनऊचा दशहरी, गुजरातचा केसर, तोतापुरी, दक्षिणेतला नीलम, बैंगनपल्ली या काही जातींचे आंबे नियमितपणे बाजारात विकले आणि खाल्ले जातात.

आंब्याच्या जातीनुसार त्याचा बाजारात दाखल होण्याचा काळ थोडाफार मागेपुढे सरकतो. परंतु फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळातच आंबा बाजारात दिसतो. मान्सून सुरू झाला की आंबा बाजारात यायचा बंद होतो. आंब्याच्या पानांना वायू प्रदूषणातील चढउतार लगेच जाणवतात, म्हणून पर्यावरण आणि हवामानाच्या अभ्यास करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा मानला जातो.

बाजारात आंबा दाखल होताना सर्वात आधी कोकणातील आंबा दाखल होतो. त्यामागोमाग कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरातचे आंबे येतात. कोकणातल्या आंब्याचा सिझन संपत आला की कच्छच्या आंब्याची आवक सुरू होते. कच्छचा केसर आणि लालबाग हापूस जूनअखेरीस मुंबईत दाखल होतो.

बाजारात मिळणारा पेटीतील बहुतांश आंबा देवगड हापूस म्हणून विकला जातो. परंतु देवगडचे क्षेत्रफळ लक्षात घेता तिथे खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होत असेल का आणि सर्व आंबे सारख्याच प्रतीचे असतील का, याचे उत्तर सहज मिळू शकते.

हापूस आंब्यापेक्षा पायरी आणि केसर हे दोन आंबे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मात्र हापूस आंब्यासारखी त्यांची मार्केटींग न झाल्यामुळे त्यांना बाजारपेठेत कायम दुय्यम स्थान मिळतं. याव्यतिरिक्त हापूसशिवाय इतर आंब्यांडे तर बरेचदा ढुंकूनही पाहिलं जात नाही.

डझनाने मिळणा-या हापुसच्या तुलनेत इतर जातीचे आंबे अतिशय स्वस्त दरात किलोने मिळत असल्याने त्यांचं वेगळं दिसणं, रंग, सुवास आणि गोडव्याकडे दुर्लक्ष केले जाते.

काही दशकांपूर्वी कोकणातील हापूसच्या कलमांची गुजरात आणि कर्नाटकमध्ये लागवड करण्यात आली. त्याची फळं आता मिळू लागली आहेत.

या राज्यांमधून येणा-या फळांना हापूसचं रूपडं आणि काही प्रमाणात वास असतो. देवगड हापूसचं प्रमाण बाजारात खरंतर एक टक्कादेखील नसेल. पण या एक्क्याला टक्कर देणारे वेगवेगळ्या राज्यांमधून येणारे आंबे बाजारपेठेत मोठ्या संख्येने दाखल होतात. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षात आंब्याचे उत्पादन वाढले आहे.

मुंबईत डोक्यावर पेटी घेऊन आंबे विकणा-या परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढली आहे. या आंबे विकणा-या पाच ते सहा फेरीवाल्यांचा गट असतो. त्यांचा म्होरक्या घाऊक बाजारातून आंबे खरेदी करतो.

त्यानंतर प्रत्येक फेरीवाला मुंबईतील वेगवेगळ्या विभागात फिरून आंबे विकतो. या फेरीवाल्यांकडे अन्य व्यापा-यांच्या तुलनेत स्वस्त आंबे मिळत असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. हे फेरीवाले कर्नाटकचा आंबा देवगड हापूस म्हणून सर्रास विकताना दिसतात.

हापूस आंबा कसा ओळखावा?

  • या आंब्याचा वास घ्यायची गरज नसते. नुसता हातात घेतला तरी त्याचा मधुर सुवास दरवळतो.
  • हा आंबा हिरवट, पिवळट आणि थोडीशी केशरी रंगाची छटा असलेला असतो. संपूर्ण फळ एकसारखे पिवळे असलेला आंबा हापूस नसतो.
  • आंबा देठाकडून हलकासा आत खेचला गेलेला असतो.
  • हापूस (आणि विशेषत: देवगड हापूस) आतून केशरी रंगाचाच असतो.
  • हापूसची (देवगड) साल पातळ असते. गराला दोरे नसतात. रत्नागिरी हापूसची साल देवगडपेक्षा जाड असते.
  • या आंब्यामध्येही कातळावरचा आणि मातीतला असे दोन प्रकार असतात. कातळा वरचा आंबा चवीला अधिक चांगला लागतो.

रत्नागिरी हापूस : रत्नागिरी पट्ट्यात होणारा हा आंबा साधारण 80-90 टक्के तयार झाल्यावर थोडा लवकर झाडावरून काढला जातो. त्याची साल थोडी जाड असते. आंब्याला गोलाई असते आणि त्याची चव त्याचा सुवास देवगड हापूसपेक्षा वेगळा असतो.

राजापुरी हापूस : या आंब्याची साल जाड असते. तो आकाराला थोडासा लांबट असतो. त्यावर पांढ-या-करड्या रंगाचे दाट ठिपके असतात. या आंब्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं.

पायरी : हा आंबा साधारण थोडासा आंबट असून त्याला टोक असतं. त्याची साल कडकडीत आणि जाड असते. त्याचा रंग पिवळट, लालसर असतो. पण हा रंग सगळ्याच पायरी आंब्याला असेल असं नव्हे. जर झाडाला पानं जास्त असतील तर रंग हवा तसा चढत नाही. पायरी तयार झाला की देठाकडे चांगलाच खोल खड्डा पडतो. पायरीला आतमध्ये लांब केस असतात. हा आंबा पिकल्यावर लगेच खावा लागतो. तो जास्त काळ टिकू शकत नाही. पुण्यात हा आंबा ‘अमृत पायरी’ या नावाने विकला जातो.

केसर : हा आंबा लांबीला मोठा आणि आकाराने जाडसर असतो. याचे वजन 200 ते 300 ग्रॅम पर्यंत असते. याची टिकून राहण्याची क्षमता चांगली आहे.

रत्ना : कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हापूस आणि इतर आंब्यांच्या जातीचं संकर करून रत्ना ही जात विकसित केली गेलेय. हा आंबा गडद हिरव्या रंगाचा असतो. गोल आणि आकाराने मोठ्या असलेल्या या आंब्याची साल जाड असते. बाठ पातळ असते. त्यातून रसही चांगला निघतो.

रायवळ : आकाराने हा आंबा थोडासा बारीक आणि मऊ असतो. शिवाय प्रत्येक झाडाप्रमाणे या आंब्याचा रंग, आकार बदलतो.

दशहरी : उत्तर प्रदेशातील हा आंबा लांबट आकाराचा असतो. चवीला अतिशय गोड आणि इतर आंब्यापेक्षा लवकरच पिकतो. याची फळे इतरांच्या तुलनेत टिकाऊ असतात.

तोतापुरी : लांबट आकाराचा हा आंबा ओळखायला अतिशय सोपा आहे. त्याचा शेपटाकडचा भाग पोपटाच्या चोचेप्रमाणे दिसतो. तो बरेच दिवस टिकतो. त्याची साल गुळगुळीत असते. त्यातून रसही चांगला निघतो.

लंगडा : हा आंबा पिकल्यानंतरही बाहेरून हिरव्या रंगाचाच दिसतो. याची साल पातळ असते. चवीला अतिशय गोड असतो.

गोवा मांकुराद : हा आंबा आकाराने मोठा असतो. त्याच्या देठाकडे तांबूस पिवळट शेड असते. यात भरपूर फायबर असतं. पण हा आंबा जास्त काळ टिकत नाही. पिकल्यापासून दोन दिवासात संपवावा लागतो.

आंब्याच्या आणखी काही जाती पुढीलप्रमाणे : रायवळ, गावरान, आम्रपाली, जम्बो केसर, लाल केसर, चिन्नारसम, नूरजहॉं, बादाम, बारामाही एटीएम, मल्लिका, मालदा, शेपू, साखरगोटी, सिंदुरी, सुंदरजा, सोनपरी, सुवर्णरेखा, हत्ती, हिमसागर, खोबऱ्या, चंद्रमा, दशेरी, नागीण, नीलम, बोरशा, भागमभाग, भोपळी, मल्लिका, मानकुराद, मालगोवा, वनराज, शेंदऱ्या, सिंधू सुवर्णरेखा, हूर, नामपल्ली.

प्रदेशानुसार आंब्याची ओळख

महाराष्ट्र - हापूस, पायरी, कासवजी पटेल, मालगोवा

उत्तर प्रदेश - हापूस, लंगडा, दशेरी, नीलम, सफेदा, गोपाळभोग, फझरी, चौसा, तौमुरिय, दूधपेढा

गुजरात - जमादार

बिहार - हापूस, लंगडा, हेमसागर, कृष्णभोग, सिंदुराय, सुकाल

कर्नाटक - हापूस, पायरी, बदामी, करेल, मडप्पा, पीटर, फर्नोदीन

तमिळनाडू - हापूस

पश्चिम बंगाल - गोपाळभोग, मुर्शिदाबादी, फढली माल्डा

आंध्र प्रदेश - बैंगणपल्ली, रूमाली, नीलम, बेनिशान, तोतपुरी (बंगलोरा), मलगोवा, गोवाबंदर

गोवा - मांकुराद

आंब्याची साठवणूक

आंबा चार—पाच महिनेच मिळतो आणि खाल्ला जातो. आंबा फळाची साठवणूक करता येत नाही. आंब्याचा हंगाम संपल्यानंतर त्यापासून बनवलेल्या विविध उत्पादनांवरच समाधान मानावे लागते.

आंबावडी, आंबापोळी, लोणचे, छुंदा, आमचूर, पल्प असे अनेक प्रकार वर्षभर खाल्ले जातात. प्रत्येक आंब्याच्या चवीत फरक असल्याने उत्पादनातही विविधता येते आणि प्रत्येकाची चव निराळी लागते. फेब्रुवारी महिन्यात बाजारात कै-या यायला लागल्यापासूनच आंब्याची उत्पादने बनवायला सुरूवात केली जाते. हे उद्योग जून-जुलैपर्यंत सुरू असतात.

हेही नक्की वाचा