अरविंद केजरीवाल : 'पक्ष चोरला, नाव चोरलं; पण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या मागे'

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. अरविंद केजरीवाल : 'पक्ष चोरला, नाव चोरलं; पण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या मागे'

उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली, त्यांच्या चिन्हाची आणि नावाची चोरी झाली, पण बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, आणि उद्धव ठाकरे हे त्या वाघाचे सुपुत्र आहेत, त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्या मागे असल्याचं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं.

सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं. या भेटीवेळी अरविंद केजरीवाल यांनी हे मत व्यक्त केलं.

ईडी आणि सीबीआयचा वापर हे भित्रे लोक करतात. भाजपवाले ज्या लोकांना घाबरतात त्यांच्याविरोधात या तपास यंत्रणांचा वापर केला जातोय. आम्ही काही केलं नाही, त्यामुळे आम्ही घाबरत नाही, शेवटी सत्याचाच विजय होणार असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

कोरोना काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारे काम केलं ते कौतुकास्पद आहे. कोरोना काळात महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक कामांची दिल्लीमध्ये आम्ही अंमलबजावणी केली असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

2. ‘फक्त व्यवसायाचा विचार केला असता तर मी मस्कपेक्षा श्रीमंत असतो’

देशाऐवजी मी जर फक्त व्यवसायाचा विचार केला असता तर मी आज एलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत व्यावसायिक झालो असतो असं वक्तव्य योगगुरू रामदेवबाबांनी केलं आहे.

साहित्य आजतक या मंचावर रामदेवबाबांनी हे वक्तव्य केलं आहे.

मला जे ज्ञान वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि पूर्वजांकडून मिळालं आहे त्यामध्ये ज्या गोष्टी समजल्या, ज्या गोष्टी शिकलो त्याच अंगिकारल्या. मी या सगळ्या गोष्टींचं पेटेंट करून घेतलं असतं तर आज एलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत असतो असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे.

बाबा रामदेव यांनी असाही दावा केला आहे मी आतापर्यंत अनेक गंभीर आजार असलेल्या रूग्णांना बरं केलं आहे. शुगरचे रूग्ण बरे होत नाहीत असा दावा करण्यात येतो मात्र आम्ही अशा रूग्णांनाही बरं केलं ज्यांना 100-200 युनिट इन्शुलिन घ्यावं लागत होतं.

रक्तदाब, थायरॉईड, लीव्हर, किडनी ट्रान्सप्लांट यापासूनही आम्ही लोकांना वाचवलं, असंही रामदेवबाबांनी म्हटलं आहे.

लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

3. कसबा पोटनिवडणूक : रवींद्र धंगेकर कसबा गणपतीसमोर उपोषण करणार कारण...

कसबा पोटनिवडणुकीतले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आज (25 फेब्रुवारी) गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे. विरोधी उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचं धंगेकरांचं म्हणणं आहे. त्यामुळेच ते उपोषण करणार असल्याचं 'सकाळ'ने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

पोलिसांच्या उपस्थितीत भाजप नेते, पदाधिकारी हे लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला असून ही लोकशाहीची हत्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

धंगेकर हे परभवच्या उंबरठ्यावर आहेत आणि त्यांनी केलेला आरोप हा हास्यास्पद आणि निषेधार्य आहेत. पोलिसांचे नाव घेऊन पैसे वाटण्याचा काम सुरू आहे, हे सांगणे म्हणजे सहानभुती मिळवण्याचा प्रकार आहे, असं भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी म्हटलं आहे.

4. अदानी-हिंडनबर्ग प्रकरणी वार्तांकनाबद्दल माध्यमांना सूचना देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

हिंडनबर्ग अहवाल आणि अदानी समूह यासंदर्भात माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनावर मर्यादा घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याचं द हिंदूने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

“आम्ही यासंदर्भात कधीही अशा प्रकारचे निर्देश माध्यमांना देणार नाही. आम्ही लवकरच या प्रकरणाचा निकाल जाहीर करू”, अशी भूमिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मांडली.

हिंडनबर्ग रिसर्चकडून प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालाच्या विरोधात अदानी उद्योग समूहाची बाजू मांडणाऱ्या चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी घेण्यात आली असून त्यावर अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.

याच याचिकांसोबत एम. एल. शर्मा यांनी हिंडेनबर्ग अहवालाबाबत माध्यमांमधून होणाऱ्या वार्तांकनाबाबत एक मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळली आहे.

5) पाकिस्तानमधल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल जावेद अख्तर यांनी म्हटलं...

लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तान दौऱ्यामध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर शुक्रवारी (24 फेब्रुवारी) भाष्य केलं.

त्यांनी म्हटलं की, पाकिस्तानमध्ये असूनही मनात जे आहे ते बोलण्याची भीती मला वाटली नाही.

प्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जावेद अख्तर सहभागी झाले होतो. त्यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं की, भारत जेव्हा 2008 च्या कट्टरतावादी हल्ल्याबद्दल भाष्य करतो, तेव्हा पाकिस्ताननं नाराज नाही झालं पाहिजे.

एबीपी चॅनेलच्या एका कार्यक्रमादरम्यान या वक्तव्याबद्दल म्हटलं, “ही खूप मोठी गोष्ट बनली. इथे आल्यावर मला असं वाटलं की, मी तिसरं महायुद्ध जिंकलं आहे. लोकांसोबतच मीडियाचेही फोन येत होते. मला असं वाटलं की, मी एवढा काय मोठा तीर मारलाय? मला हे बोलायचंच होतं. आपण गप्प राहायचं का?”

एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)